आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:आता सर्व ‘कुलपे’ उघडा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलाॅक-२ संपण्याची वेळ आलेली असताना, ‘कोरोनाशी तर लढायचेच आहे

अनलाॅक-२ संपण्याची वेळ आलेली असताना, ‘कोरोनाशी तर लढायचेच आहे; पण अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे’ हे शरद पवार यांनी केलेले विधान महत्त्वाचे आहे. अनलाॅकबाबत अत्यंत सावधपणे निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी जाहीरपणे केलेली ती सूचना आहे, हे पवार यांची कार्यपद्धती जाणणाऱ्यांच्या सहज लक्षात आले असेल. मागच्या वेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि नंतर लगेच राज्य सरकारने बऱ्याच सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे पवार यांच्या या जाहीर सूचनेचाही योग्य तो परिणाम होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. अर्थात, केंद्र सरकारने आधी लाॅकडाऊनच्या बंधनातून पुरेशी मुक्तता द्यायला हवी. पूर्वीप्रमाणेच पंतप्रधान आधी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि नंतर निर्णय घेतील, असे जाहीर करण्यात आले आहे. तशी चर्चा त्यांनी अवश्य करावी, पण मुख्यमंत्र्यांपेक्षाही जनतेची आणि देशाची गरज आणि इच्छा काय आहे हे आधी लक्षात घ्यावे, अशी अपेक्षा आहे. एक तर मुख्यमंत्री सांगतील तसे करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव नाही. त्यांना जे करायचे तेच ते करतील, हे सारा देश जाणतो.

देशातील जनतेच्या मनाची नाडी ओळखण्यात ते पटाईत आहेत, हेही देशाला माहिती आहे. त्यामुळे अनलाॅकच्या बाबतीतही जनतेची नाडी परीक्षा त्यांनी केली असेल, असे आपण गृहीत धरू या. त्यानुसार आता संपूर्ण मुक्ततेचाच मार्ग त्यांनी अनुसरायला हवा. अनलाॅकच्या पुढे आकड्यांची जंत्री वाढवण्यात आता अर्थ नाही. देशातील सर्वसामान्य नागरिकांची आणि देशाचीही आर्थिक स्थिती ज्या दुरवस्थेला पोहोचली आहे ती सावरणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शिवाय, लाॅकडाऊन हा काही अंतिम उपाय नाही. लोकांना या आजाराचे एकूण गांभीर्य लक्षात येण्यासाठी आणि त्यांना स्वत:ची काळजी घेण्याइतके सजग करण्यासाठी लाॅकडाऊनचा उपयोग व्हायला हवा. आता चार महिने पूर्ण होऊनही लाॅकडाऊन वेगगेवळ्या पद्धतीने सुरू ठेवणे हा देशातील सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे. लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसण्याऐवजी रुग्णांची संख्या लाखालाखाने वाढतच चालली आहे. त्यामुळे लोकांच्या सजगतेवर विश्वास ठेवून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचाच विचार आता महत्त्वाचा आहे. अनलाॅकबाबत निर्णय घेताना म्हणूनच आता सर्व कुलपे उघडायची गरज आहे.