आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:पुनश्च लॉकडाऊन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तेरा कोटी लोकसंख्येचे राज्य २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊनमध्ये बंद होते. या लाॅकडाऊनचे चार टप्पे झाले आणि ३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुन:श्च हरीओम’ची हाक दिली. लाॅकडाऊनच्या निर्बंधातून जनतेची काहीशी सुटका झाली. आता ३० जूनला अनलाॅक १.० संपतो आहे. त्यामुळे आणखी निर्बंध शिथिल होतील, अशी आशा होती. पण, सरकारने निर्बंध आणखी कडक केले. घराजवळ खरेदी करण्याचे बंधन टाकले. ठाणे, नवी मुंबई पालिका हद्दीत पुन्हा लाॅकडाऊन लागू केले. कोरोना वाढत असल्याचे सरकार सांगते. पण, हे आजारापेक्षा औषध जालिम असे होते आहे. लोक त्रस्त आहेत. लाॅकडाऊनमध्ये किती काळ राहायचे, असा त्यांचा सवाल आहे आणि त्याचे सरकारकडे उत्तर नाही. कोरोनावर औषध नाही, पण सरकारला लाॅकडाऊनची मात्रा सापडली आहे. वैद्यकीय सुविधा वाढवायच्या सोडून सरकार संचारबंदीचे डोसवर डोस देत आहे. ठाकरे सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग होतो आहे. 

लोकांना मृत्यूची भीती नाही, असे नाही. पण, पोटाची भूक त्यापेक्षा मोठी आहे. सरकारी नोकरदार सोडले तर प्रत्येकाला चणचण आहे. कितीतरी लोक भविष्य निर्वाह निधीवर जगत आहेत. परप्रांतीय मुंबईत पुन्हा परतत आहेत. तीन महिने कसेबसे काढले. आता घरात बसणे शक्य नाही. देशातला बेरोजगारीचा दर २७ टक्के आहे. लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे ३५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. जगात महामंदी आहे. विकासदर सर्वत्र उणे ४ टक्क्यांच्या खाली आहे. रोज आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. महिन्याकाठी सुमारे शंभर शेतकरी जीवनयात्रा संपवत आहेत. हे अरिष्ट कोरोनाइतेके मोठं आहे. पण, ‘घरात राहा, नाहीतर लाॅकडाऊन लावेन’, ही राज्यकर्त्यांची भाषा आहे. 

तुम्हाला वैद्यकीय पुरेशा सुविधा पुरवता येत नाहीत, रुग्णांसाठी खाटा वाढवता येत नाहीत, रुग्णवाहिका देता येत नाहीत, वेगाने अन् मोठ्या प्रमाणात चाचण्या करता येत नाहीत... मग काय फक्त लाॅकडाऊन लावणे हेच सरकारचे काम आहे? हा खाक्या तुघलकी आहे. त्यामुळे जनतेची फरपट होते आहे. तिला कोरोनातून वाचवण्यासाठी उपासमारीच्या खाईत ढकलू नका.

बातम्या आणखी आहेत...