आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:चीनच्या पुन्हा कुरापती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीनच्या सीमावर्ती भागातील स्थिती आणि त्यामुळे उभय देशांमध्ये निर्माण होणारा तणाव दररोज नवनवी वळणे घेत आहे. चीनचा खोडसाळपणा हे त्यामागचे मुख्य कारण आहे. आताही दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवरील चर्चेची पाचवी फेरी सुरू असताना आणि त्या माध्यमातून तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत असतानाही चीनने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. भारतीय सीमेलगतच्या काशगर विमानतळावर चीनने चक्क अण्वस्त्रसज्ज बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. उपग्रह चित्रणामुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, महत्प्रयासाने सुरू असलेल्या शांतता चर्चेला वेगळे वळण लागू शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आज कोणताही देश अशा प्रकारच्या हालचालींची माहिती फार काळ दडवून ठेऊ शकत नाही. तसाच प्रकार या बाबतीत घडला आहे. ओपन इंटेलिजन्स सोर्स म्हणवून घेणाऱ्या डेट्रेसफाने चीनच्या या हालचालींचा पर्दाफाश ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ डेट्रेसफाने उपग्रहांच्या माध्यमातून हाती आलेली छायाचित्रेही जारी केली आहेत. त्यानुसार, अण्वस्त्रसज्ज युद्धविमानांसोबतच काशगरमध्ये चीनने इतरही लढाऊ विमाने आणि युद्धसामग्री तैनात केल्याचे स्पष्ट होते.

तज्ज्ञांच्या मते, चीनच्या ‘एच-६’ श्रेणीतील विमानांची वहन क्षमता साडेतीन हजार किलोमीटर आहे, तर भारताच्या लडाख लष्करी तळापासून काशगर जेमतेम ६०० किलोमीटरवर आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने भारताने त्याबाबत वेळीच सावध व्हायला हवे. आता हा कारनामा उघड झाल्यावर चीनने नेहमीप्रमाणे मखलाशी करत हा नियमित युद्ध सरावाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या या विधानाचा एक अर्थ अप्रत्यक्षपणे चीन जोरदार युद्ध सज्जता करत आहे, असाही होतो. एकीकडे लष्करी पातळीवर भारताशी चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे अधिकाधिक युद्धसज्जता करायची, ही दुटप्पी नीती झाली. चीनची त्यासाठी जगभरात ‘ख्याती’ आहे. मध्यंतरी दक्षिण चीनच्या सामुद्रधुनीत चीनने असेच उद्योग आरंभले होते. भारताने तर १९६२ मध्ये चीनच्या दगाबाज वृत्तीचा अनुभव घेतला आहे. अजूनही त्या कटू स्मृती आपल्याला अस्वस्थ करतात. तेव्हा पूर्वानुभव लक्षात घेता, राजकीय मुत्सद्दीपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताने कुरापतखोर चीनला वेळोवेळी जगासमोर उघडे पाडण्याची संधी साधली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...