आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:लडाखमधून शत्रूला संदेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्व लडाखला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भेटीने भारतीयांना व चीनलाही आश्चर्याचा धक्का दिला.

पूर्व लडाखला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भेटीने भारतीयांना व चीनलाही आश्चर्याचा धक्का दिला. काही तासांतच चिनी परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली. ‘‘लष्करी व राजनैतिक वाटाघाटी सुरू असताना गुंता वाढेल असे कोणी काही करू नये.’’ हे वक्तव्य म्हणजे चीनच्या उलट्या बोंबा. २० भारतीय जवानांना खिळ्यांच्या काठ्यांनी मारल्यानंतर तणाव वाढत नाही. पण मोदींच्या भेटीने गुंता वाढू शकतो, असे म्हणणे दिसते. ‘विस्तारवादाचे पर्व संपले,’ ही पंतप्रधानांची टिप्पणी चीनला झोंबली. चीनचा पाकिस्तान सोडून १३ देशांशी चीनचा सीमावाद सुरूच आहे. पाकशी सीमावाद नसला तरी आर्थिक मदतीच्या नावाखाली तेथेही घुसखोरी चालूच आहे. 

‘‘चीन म्हणजे नव्या रूपातली ईस्ट इंडिया कंपनी आहे,’’ अशी बोचरी टिप्पणी इम्रान खान यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच केली होती. नंतर त्यांनीच पैशासाठी चीनसमोर गुडघे टेकले. शेजारी देशांना सतत तणावाखाली ठेवत सीमावाद विझू द्यायचा नाही, हे चीनच्या विस्तारवादामागचे मूळ सूत्र आहे. भारताचे धोरण कधीच विस्तारवादाचे राहिले नाही, हे जगाने अनुभवले आहे. पाकशी युद्ध जिंकल्यानंतर भारताने बांगलादेशवर दावा केला नाही. मालदीवमधील लष्कराचे बंड भारतीय लष्कराने मोडल्यानंतर मालदीववर दावा केला नाही. ‘‘आता काळ विकासाचा आहे,’’ हे मोदींचे विधान चीनला मान्य आहे. पण ते त्यांच्या कलाने. ‘‘आर्थिक विकास आमचाच व्हावा. पहिल्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनावे ते आम्हीच.’’ चीनच्या या भूमिकेमुळेच जागतिक अशांतता निर्माण झाली. चीनने प्रत्येक देशात निर्माण केलेली पिलावळ येथील उत्पादकता मारण्याचा प्रयत्न करते. अशी पिलावळ भारतातही आहेच. मोदींची पिकनिक स्पॉटला भेट अशी मल्लिनाथी काही निवृत्त अधिकाऱ्यांनी केली. त्याला भारतीय लष्कराच्या तेथील कमांडरनीच उत्तर दिले. ‘‘ज्यांनी त्यांच्या सेवाकाळात सैन्यासाठी गंभीर कामगिरी केली नाही, अशांसाठी लेह, कारगिलदेखील पिकनिक स्पॉटच आहे.’’ अशी सडकी डोकी भारतात आहेतच. टीका जरूर करावी. पण ती तणाव संपल्यानंतर शांततेच्या काळात. ताबारेषेवर जवान शहीद होत असताना असे भाष्य न शोभणारे आहे.

0