आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘मातोश्री’वरची शिकवणी

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात गेले ४८ तास राजकीय भूकंपाच्या चर्चा होत्या. त्याचे कारण तसेच होते. महाराष्ट्र विकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांच्या एकाच दिवसातल्या दोन भेटी. एक ‘राजभवना’ची, दुसरी ‘माताेश्री’वरची. लगोलग गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले. ठाकरे सरकारच्या भवितव्याविषयी वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. मध्यंतरी राजभवनाने प्रशासनाला परस्पर आदेश देणे सुरू केले होते. तेव्हा ठरवून शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी राजभवनाच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती. त्यामुळे पवार अन् राजभवनाचे बिनसले होते. पवार यांची साेमवारची भेट त्याच्या पॅच अपचा भाग होती. ‘तुम्ही अनुभवी आहात, मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करा’, असा सल्ला राजभवनाने पवारांना दिला. त्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरवले. ब्रीच कँडीजवळच्या ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. पण, पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाण्याचे ठरवले.

पवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ‘मातोश्री’ येथे गेले होते. परवाच्या बैठकीत पवार, राऊत अन् ठाकरे असे तिघे होते. लाॅकडाऊनमध्ये कशी शिथिलता आणावी, कोरोनावर काय उपाययोजना कराव्यात, प्रशासकीय नियुक्त्या करताना काय खबरदारी घ्यावी, मंत्र्यांना कारभारात आणखी सामावून कसे घ्यावे, आघाडी म्हणून विराेधी पक्षाचा कसा सामना करायचा, यावर तब्बल ९० मिनिटे मंथन झाले. 

पवारांनी ‘मातोश्री’वर हजेरी लावून मुख्यमंत्र्यांचे आघाडीतले महत्त्व अधोरेखित केले. आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून दिले. आणि आपण मुख्यमंत्र्यांची शिकवणीसुद्धा घेतो, हेही सांगितले. बाबा-दादांच्या सरकारमध्ये आघाडीत सतत कुरघोड्या असायच्या. त्यातूनच सिंचनाची श्वेतपत्रिका निघाली अन् राष्ट्रवादीचे गंडस्थळ असलेल्या शिखर बँकेवर प्रशासक बसवला. उद्धव ठाकरे यांचे राजकारण त्या धर्तीचे नाही. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीची भीतीसुद्धा निराधार आहे. राज्यपाल महोदयांनी केली शिफारस की लादली राजवट, असे नसते. त्यासाठी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद आहे. बरे, चार-सहा महिन्याला आघाड्या मोडणे राजकीय पक्षांसाठी सोयीचे नसते. काेरोना महामारीच्या काळात तर अशी हिंमत कोणी करणार नाही. ४८ तासांच्या संभ्रमानंतर, सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही आणि आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणीही करणार नाही, असे स्वत: भाजपने जाहीर केले. परिणामी राजकीय भूकंपाच्या चर्चांना काही महिन्यांसाठी तरी पूर्णविराम मिळाल्याचे समजायला हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...