आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:खडसे पॉझिटिव्ह, भाजप निगेटिव्ह

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • मुळात पॉझिटिव्ह असणं हे उत्साहवर्धक, प्रेरणादायी मानले जाते.

मुळात पॉझिटिव्ह असणं हे उत्साहवर्धक, प्रेरणादायी मानले जाते. पण अलीकडे ‘पॉझिटिव्ह’ शब्द उच्चारला तरी, कोण? असा प्रतिप्रश्न पटकन समोरून केला जातो. एवढी भीती या शब्दाने जगभरात निर्माण केली आहे. राज्याच्या राजकारणातही अशीच स्थिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंबाबत निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठी खडसे पॉझिटिव्ह आहेत म्हटल्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये धस्स होते. जो-तो खडसेंपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याजवळ जाणे म्हणजे आपणही पॉझिटिव्ह आहोत, असा वरिष्ठांचा गैरसमज होईल आणि वाळीत टाकले जाईल, या भीतीपोटी खडसेंबद्दल प्रेम असतानाही काही लोक दूर राहण्यातच धन्यता मानत आहेत. राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे हे इच्छुक होते. तथापि, त्यांचे या वेळेसही तिकीट कापले गेले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर परखड, स्पष्ट भाषेत नेत्यांवर आसूड ओढले. 

ज्यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केले अशा लोकांना डावलले आणि ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या त्यांना जवळ केले जात आहे. खडसेेंची पक्षात चलती होती तेव्हा आताचे तिकीट देणारे किंवा त्यांना डावलणारे त्यांच्यामागे कधीकाळी फिरत होते. तथापि, तेच लोक आता खडसेंना विनवण्या करण्यास भाग पाडत आहेत. खडसेंच्या कोणत्याच प्रतिक्रियेवर भाजपचे हे नेते बोलायलाही तयार होत नाहीत. पक्षासाठी आपण खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यामुळे मी पक्ष का सोडून जावा? असे त्यांना वारंवार वाटत आहे. दुसरीकडे कार्यकर्ते त्यांच्यावर दबाव टाकत आहेत की, त्यांनी आता पक्ष सोडावा. किती दिवस अन्याय सहन करणार आहात. पण खडसेही निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाही. दुसरीकडे पक्ष त्यांची घुसमट करत आहे. अर्थात, खडसेंनी पक्ष सोडावाच म्हणून त्यांना डावलले जात आहे. कारण ते पक्षात काम करण्यासाठी पॉझिटिव्ह असणं हे पुढे जाऊन ते अनेकांना बाधा निर्माण करणारं ठरेल या भीतीपोटीच त्यांना दूर ठेवले जात आहे, हे आता भाजपच्या राजकारणात लपून राहिलेले नाही. 

भाजप शेठजी-भटजींचा पक्ष आहे म्हणून तेथे आमच्यासारखा ओबीसी नेता जाऊन काम करत नव्हता. पण आम्ही प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत राहून या पक्षाला निव्वळ मोठंच केलं नाही तर तो बहुजनांचा आहे, अशी ओळख निर्माण करण्यात आमचा खारीचा वाटा राहिला आहे, तरीही डावलले जाते आणि आमचा दोष काय? या प्रश्नाचे उत्तरही दिले जात नाही. खडसेंची ही खंत आहे. वारंवार होणाऱ्या अन्यायामुळे खडसे भविष्यात पक्ष सोडण्याचा निर्णय घेतीलही, पण काळ कोरोनाचा आहे. राजकारण नको, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. खडसे अजूनही पक्षाबाबत पॉझिटिव्ह असले तरी त्यांच्याबाबत नेते मात्र निगेटिव्ह आहेत. एवढे साधे, सरळ राजकारण नाथाभाऊंना कळू नये ही त्यांच्या कार्यकर्त्यांची खंत आहे. त्यामुळे यापुढे जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपला नाही तर एकनाथ खडसेंनाच घ्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...