शिक्षण : शाळा, मुलांनी प्रतीक्षा नव्हे, ऑनलाइन अभ्यास करावा 

  • कोरोनामुळे शाळा 31 मार्चपर्यंत बंद, पण पुढील निर्णय  मात्र सरकारवर अवलंबून

दिव्य मराठी वेब टीम

Mar 23,2020 08:53:00 AM IST

अनुराग त्रिपाठी


कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सीबीएसईने परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहे. वास्तविक, ही वेळ निकाल जाहीर करण्याची आणि पुढील अभ्यासक्रम सुरू करण्याची आहे. परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, हे आम्ही आता सध्या तरी सांगू शकत नाही. ३१ मार्चनंतर सरकार काय निर्णय घेते? यावर हे सगळे अवलंबून आहे. विद्यार्थ्यांंचे नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसईने सूचना जारी केल्या आहेत. आमचा असा प्रयत्न आहे की शाळा आणि विद्यार्थ्यांनी आता फार प्रतीक्षा न करता ऑनलाइन पद्धतीचा वापर करून अभ्यास सुरू करावा. देश-विदेशातील आमच्या अनेक शाळांंनी ई-क्लासरूम सुरू केले आहेत. यासाठी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यातील मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा दीक्षा हा प्लॅटफॉर्म सर्वात उपयुक्त आहे. दीक्षावर विद्यार्थ्यांंचा अभ्यासक्रम आणि एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांनुसार अनेक व्हिडिओ क्लासरूम, मजकूर उपलब्ध आहे. दीक्षा प्लॅटफॉर्मचा वापर वाढवून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू करावा, याबाबत सर्व शाळांंना आधीच कळवण्यात आले आहे. याशिवाय गूगल, खान अकॅडमी आदींचा उपयोगही विद्यार्थी अभ्यासासाठी करू शकतात. अनेक शाळांंनी स्वत:हून पुढाकार घेऊन ऑनलाइन क्लास किंवा मजकुराचा वापर सुरू केला आहे. या शाळांनी मुलांना त्यांच्या घरांतच ई-क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. याद्वारे शिक्षक आपल्या घरातून लॅपटॉप, टॅॅब किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून मुलांना मदत करतात.संबंधित विषयाचा वर्ग घेतात.


आपला स्वत:चा मजकूर, व्हिडिओ तयार करून मुलांना ई-क्लासरूमची सुविधा उपलब्ध करावी, अशी विनंती आम्ही शाळांना केली होती. ज्या शाळांना आपला ई-कंटेंट तयार करणे शक्य होत नाही, त्या शाळांंनी अन्य प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा. अलीकडेच सीबीएसईने अॅपवर सर्व विषयांचा मजकूर उपलब्ध केला आहे. चालू परिस्थितीत क्षमता आणि कौशल्य विकास याकडेच शिक्षणाचा केंद्रबिंदू सरकला आहे. मुलांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी सीबीएसईने नुकत्याच काही सूचना जारी केल्या आहेेत. सीबीएसई बोर्डाच्या जवळपास ७० टक्के परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. फक्त ३० टक्के परीक्षा व्हायच्या आहेत. यामध्ये बिझनेस स्टडीज, भूगोल, समाजशास्त्रासह अन्य काही छोटे पेपर आहेेत. आम्हाला आशा आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर कमीत कमी वेळात या परीक्षाही पूर्ण केल्या जातील आणि तातडीने उत्तरपत्रिका तपासणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. पण परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला तरी विद्यार्थ्यांंनी चिंता करण्याची गरज नाही. परीक्षा आणि उत्तरपत्रिकांची तपासणी लांबणीवर जाईल एवढेच. तरीही मला असे वाटते की, ही समस्या फक्त आपल्या देशाची नसून, जागतिक समस्या आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, उच्च शिक्षण संस्था आणि विदेशी संस्थाही आपली प्रक्रिया त्यानुसारच वाढवतील, ज्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही.


साधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळा मुलांना काही प्रकल्प आणि नवीन उपक्रम देतात. आताची वेळ अशी आहे की, शाळांनी हे प्रकल्प आणि उपक्रम ई-मेलद्वारे मुलांना पाठवले पाहिजेत. मुलांनी आपल्या घरांत बसून यूट्यूब किंवा अन्य प्लॅटफॉर्मच्या मदतीने प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
उन्हाळ्याच्या सुट्या मे महिन्याच्या मध्यापासून जूनपर्यंत असतात. आता मात्र सुट्यांचा हंगाम एक मार्चमध्येच सुरू झाला आहे. आम्हाला आशा आहे की कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळेल. मे-जूनच्या सुट्या यंदा एप्रिल-मेमध्ये द्याव्यात आणि जूनमध्ये शाळा सुरू करावी, असा सल्ला अनेक शाळांनी आम्हाला दिला आहे. याबाबत माझे असे म्हणणेे आहे, राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे शाळांनी पालन करावे. कोरोनाच्या बाबतीत सीबीएसईकडूून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यानुसार शाळांना दंड ठोठावला जाऊ शकताे, यासोबत शाळांची संलग्नताही रद्द केली जाऊ शकते. पण आम्हाला अपेक्षा आहे की, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व शाळा सीबीएसईच्या सूचनांचे पालन करतील. येत्या काळात ऑनलाइन क्लासेसना अिधकाधिक चालना कशी देता येईल, याचा विचार आम्ही सध्याच्या परिस्थितीपासून धडा घेऊन सुरू केला आहे. ऑनलाइन क्लासेसमुळेे मुले आपल्या घरी राहून २४ तास अभ्यास करू शकतील. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आणि व्यवस्था रुळावर आल्यानंतरही सीबीएसई भविष्यात ऑनलाइन क्लासला चालना देईल. ऑनलाइन परीक्षेसह आनलाइन तपासणीच्याही सूचना आमच्याकडे आल्या आहेत.

X