आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चर्चा-वाद:... तर सध्या सारं असं सुरु आहे !

गजानन कोर्तलवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वोदत्तरी कवितेनंतर आता येत्या काळात "कोरोनात्तरी कविता' हा एक नवा प्रयोग सुरू झाला आहे. covid-19 हा महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील काही कलावंतासाठी महोत्सव झालेला दिसतोय. कविता सादरीकरणाच्या नव्या माध्यमाच्या आधारे साहित्याचा नवाव्यवहार रुजूवू पाहिला जातो आहे. साखळी कविसंमेलने, covid-19 कवीकट्टा, चित्रपट आकलन साखळी, व्हाट्सअप समूहावरचे कविसंमेलने मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभर राबवले जात आहे. विविध फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेकड्यांनी रोज कविता सादर केल्या जात होत्या, आजही सादर केल्या जात आहे. याला बरे म्हणायचे की वाईट? 

समाज माध्यमातून साहित्यक्षेत्रात काय सुरू आहे?

भाषेतून अभिव्यक्त होणाऱ्या खऱ्या कलावंताची संवेदना टोकदार असते. आपल्या निर्मितीतून समाजातील वास्तवाचे विविध स्तरीय अन्वयार्थ लावण्याचे त्याचे भाषिक सामर्थ्य फार उंचीचे असते. त्याच्या जवळच्या शब्दसामर्थ्याची कसोटी लावून तो वास्तवाकडे आरपार बघत असतो. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय अवकाशातील त्याच्या जगण्याचा अन्वयार्थ लावून मानवी जीवनाकडे मूल्यात्मक मागणीचा त्याचा आग्रह असतो. तो व्यवस्थेला प्रश्न विचारत असतो. त्याला जगण्यातील विसंगतीची जाणीव असते. जगण्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची दृष्टी या कलावंताकडे असते. हा कलावंत त्याच्याकडे असलेल्या प्रतिभा सामर्थ्यतून व्यापक दृष्टीने मानवी जगण्याला भिडत असतो. पण अलीकडे covid-19 हा महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील काही कलावंतासाठी महोत्सव झालेला दिसतो. या टाळेबंदीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर बरेच वांड:मय व्यवहार घडत असताना दिसत आहे. कविता सादरीकरणाच्या नव्या माध्यमाच्या आधारे साहित्याचा नवाव्यवहार रुजूवू पाहिला जातो आहे. महाराष्ट्रभरातील अनेक कवींच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात व्यवस्थेचे आडाखे राबविण्यात येत आहे. त्याला अनेक कवी गळालाही लागले आहेत. त्यात साखळी कविसंमेलने, covid-19 कवीकट्टा, चित्रपट आकलन साखळी, व्हाट्सअप समूहावरचे कविसंमेलने मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभर राबवले जात आहे. विविध फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेकड्यांनी रोज कविता सादर केल्या जात होत्या, आजही सादर केल्या जात आहे. याला बरे म्हणायचे की वाईट? 

टाळेबंदीच्या मधल्या काळात फेसबुक ओपन केले की कोणतेतरी क्रिएशन, कोणतीतरी कवयित्री, तिने निर्माण केलेली कवींची साखळी, त्यात महाराष्ट्रभरातील चांदा ते बांदा या परिसरातील जोडले जाणारे अनेक कवी आपल्या कविता सादर करताना पाहिलेे. कवयित्रीने जोडलेल्या काव्य साखळीतील विविध कवींच्या उत्साहाबद्दल मला मात्र खूप आश्चर्य वाटले आहे. कविता सादर करीत असलेल्या कवीने आपल्यानंतर दिलेल्या दोन कवींना "खो', नंतरच्या त्या दोन कवीने दुसऱ्या कवीला जोडलेले पाहिले. या साखळीत अनेक चांगले कवीही जोडले गेले. रोज तेच ते नामस्मरण,आभाराचा  उपचार, काहींच्या एकसारख्या कविता हे मी पाहत आलो, ऐकत आलो. खरे तर ते फेसबुक लाईव्ह पाहायचे की नाही? हे माझ्या इच्छेवर अवलंबून होते. तरीही मी गंभीरपणे सर्व कविता ऐकत आलो. मला हे साहित्य व्यवहारातील एक नवे माध्यम वाटल्याने माझी या विषयी उत्सुकता वाढत होती. म्हणून या सर्व लाईव्ह कार्यक्रमाकडे मी दिवसेंदिवस उत्सुकतेने पहात होतो.त्या काव्य  साखळीत रोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील कविता सादर करणारे कवी, त्यातील तेच ते नामस्मरण ऐकून काही दिवसांनी मला हे साखळी कवी संमेलन कंटाळवाणे वाटले. 

  महाराष्ट्रातील साहित्य विषयक काही उपक्रमाला covid-19 असे नामकरण देण्यात आले आहे. ज्या आजारामुळे जगभर लाखो माणसे मरत आहेत. भारतात आजतागायत  तेरा हजाराच्यावर  माणसे मृत्युमुखी पावलेले आहेत. साथीच्या आजाराने सर्व देश भयभीत झालेला आहेत. अनेक माणसं भूकबळी जात आहेत, ते निमित्त उत्सवाचे कसे होईल? covid-19 असे  एखाद्या उपक्रमाचे नामकरण करताना आपले तारतम्य कुठे हरवले? आपल्या संवेदना बोथट झाल्यात काय? आपल्याला वास्तवाचे भान उरले नाहीत काय? की आपण फक्त संवेदनेचे प्रदर्शन करणारे शब्दप्रभू आहोत? आपण नक्कीच साहित्यिक म्हणून फक्त मध्यमवर्गीय चौकटीत बंदिस्त झाले आहोत काय? असे विविध प्रश्न साहित्य क्षेत्रातील लोकांना का पडत नाही?  आपण सादर केलेल्या कवितेचे फेसबुक लाइव्हचे व्युज, आपण दिलेल्या व्याख्यानाचे फेसबुक व्युज, आपल्या  व्हिडीओचे लाईक मोजण्यात अनेकजण मश्गुल आहेत.काल, परवा, तेरवा,पंधरा दिवसांपूर्वी, महिनाभरापूर्वी मी सादर केलेल्या कवितेच्या व्हिडिओचे व्युज आज   किती आहे? याची उत्सुकता या लोकांच्या मनामध्ये आहे. ते रोज हे लाईक आणि  व्युज मोजू  लागले आहेत.माझे व्युज किती? त्याचे  किती?  दिवसात माझे आणि त्याचे व्युज कसे वाढत आहे. याची तुलना करू लागले आहेत. हे काय चाललयं साहित्यव्यवहारात?

वास्तवापासून अधिकाधिक दूर जात माझी कविता श्रेष्ठ की त्याची कविता श्रेष्ठ? अशा थोतांड प्रश्नात काही लोक गुंतू लागले. लिहिणाऱ्या मधील वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी, मानवी मनाच्या व्यापक दृष्टीला संकोचून  त्याला आत्मप्रौढीच्या गर्तेत ढकलण्याचे फार मोठे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात यशस्वी होते आहे. आजही त्याला काही महाराष्ट्रातील नामवंत कवी बळी पडत आहे. खरे तर श्रेष्ठ कलेचे मूल्य जगण्यातील सत्याच्या जवळ पोहोचणे हे असते. आपण भ्रामक जगामध्ये सतत वावरत राहिलॊ तर सत्या जवळ आपल्याला पोहचता  येणार नाही. वेळीच याचे तारतम्य आज लिहिणाऱ्या लोकांमध्ये येणे फार गरजेचे आहे. तसे ते येत  नसेल तर येणाऱ्या काळात मराठी साहित्यात श्रेष्ठ साहित्यमूल्य असणारी कविता,  कथा,  कादंबरी,  नाटक, हे निर्माण होईल काय? चांगलं लिहिणाऱ्या लोकांची डोके ठिकाणावर असू नये असे व्यवस्थेला वाटत आहे. म्हणून व्यवस्था विविध षडयंत्र आखत आहे. या षडयंत्रात  कवी स्वतःहून डोके  आपटत असेल तर तो वस्तुनिष्ठ लिहू शकेल काय? त्याला जग समजेल काय? तो आपली मध्यमवर्गीय चौकट मोडेल काय? समाजाच्या तळागाळापर्यंत आपली दृष्टी भिडेल एवढे व्यापक भान त्याला येईल काय?  हे असे  जर होणार नसेल, उलट दिवसेंदिवस आपण उथळ वर्तन करीत राहिलो, आत्मप्रेमात पडलो, स्वतःला श्रेष्ठ म्हणायला लागलो, तर श्रेष्ठ साहित्यमूल्ये असणारे मराठी  साहित्य कसे निर्माण होईल?

वैचारिक क्षेत्रातील वर्तनाच्या नोंदी -
 
 
काहींनी अतिशय जबाबदारीने आणि अभ्यासपूर्णपणे या परिस्थितीचे विश्लेषण केले, आर्थिक विश्लेषण करून येणाऱ्या परिस्थितीवर आपणास कसे मात करता येईल? याचेही व्यापक दृष्टीने तर्क मांडत होते आणि आहेत. त्यांनी वस्तुनिष्ठपणे सरकारची जबाबदारी, आरोग्य व्यवस्थेच्या जबाबदाऱ्या, समाजाची सार्वत्रिक जबाबदारी, याविषयी विविध लेख आणि व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर  जनजागृती केली. काही पत्रकार, काही अभ्यासक, काही वैज्ञानिक, काही डॉक्टर, काही मनोविश्लेषक समाजाला सावरण्यासाठी महत्त्वाचे फेसबुक लाईव्ह, युट्युबवर आपले विचार मांडत होते, यात अच्युत गोडबोले, अभय बंग, मिलिंद मुरुगकर, अतुल देऊळगावकर, श्रुती तांबे, हमीद दाभोळकर, अतुल पेठे,डॉ.आनंद नाडकर्णी,डॉ. संग्राम पाटील, संजय आवटे, निखिल वागळे यांनी वेळोवेळी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. काहींनी थिंक टॅंकच्या  व्यासपीठावर जाऊन मुलाखती दिल्या. या परिस्थितीवर कसे  मात करता येईल याचे उपाय सांगितले. या विषयाकडे गांभीर्याने पाहणारेही खूप लोक होते. 

व्यवस्थेची सक्रियता -

या सगळ्या काळात व्यवस्था एक काळजी सतत घेताना दिसत होती. बुद्धिवंतांनी, लिहिणाऱ्यांनी वर्तमानाकडे डोळसपणे पाहू नये, त्यांचे वास्तवाकडे लक्ष जाऊ नये, त्यांनी वास्तवाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करू नये, त्यांच्या हातून जाणीवपूर्वक  राजकीय दृष्टीने जागृती घडू नये, समाजाला सत्याचा परिचय होऊ नये, कोरोना या संकट काळातील एकूणच राजकीय जबाबदारीच्या बाबतीत त्यांना भान येऊ नये, या बाबतीत व्यवस्थेचे हुजरे अतिशय दक्ष होते. व्यवस्था संवर्धन करणाऱ्या अनेक घटकातून विविध मुखवटेधारी व्यक्ती, विविध संस्था, आपले व्यवस्थेशी असणारे हितसंबंध जोपासणाऱ्या रंग बदलू माणसांनी समाजमाध्यमाच्या आधारे विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणले, सत्य जाणाऱ्या, वास्तव समजून घेणाऱ्या, तर्काने विचार करणाऱ्या, लोकांना व्हाट्सअप,फेसबुक सारख्या भ्रामक विश्वात या कसे गुंतवून ठेवता येईल?  लिहिणाऱ्या हातातील लेखणी बंद पाडून, वर्तमानातील गंभीर परिस्थितीकडे त्यांचे दुर्लक्ष होईल यासाठी काय करता येईल? अशा लोकांना आत्मप्रौढीच्या जाळ्यात कसे बंद करता येईल? यांच्या डोळ्यावर स्वतःच्याच निर्मितीची पट्टी कशी बांधता येईल?  लिहिणाऱ्यांचे  मेंदू विचारापासून,तर्कापासून आणि भूमिकेपासून कसे लांब ठेवता येईल या दृष्टीने पोकळ उपक्रमाचे जाणीवपूर्वक योजना करून षड्यंत्र आखले जात होते यात काही साहित्य क्षेत्रातील लोक गळी लागले असे दिसते. 

शैक्षणिक क्षेत्रात काय मांडले जातेय? 

covid-19 चा हा काळ शिक्षण व्यवस्थेतल्या काही लोकांनी संधी मानले. शिक्षण व्यवस्थेतील बदलणाऱ्या घटनांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, त्यासाठी अध्ययन अध्यापनात नव  तंत्रज्ञानाचा वापर आता केलेच पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने अद्यावत झाले पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानाचा चपखलपणे वापर करता येणे हीच काळाची गरज आहे. अशीही खूप मांडणी झाली आहे. असो,  नवे विचार मांडले पाहिजे, पण ते म्हणताना वास्तवाचे भान सुटू नये. ग्रामीण भागात आजही आठ तास चालणारे लोडशेडिंग, गरिबांना न  परवडणारे स्मार्टफोन, लॅपटॉप,  शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनात ही साधने त्यांच्याकडे नसल्यामुळे निर्माण होणारा न्यूनगंड, याकडे हे लोक का  दुर्लक्ष करतात?  मध्यमवर्गीय चौकटीतूनच संपूर्ण समाजाकडे हे लोक का पाहतात? त्यांना आपले शहर, आपला उंबरा न ओलांडता असे कसे बेधडक बोलता येते? हे प्रश्न मला छळतात, ही माझी अडचण आहे.शिक्षणातील क्रांती सांगणारे अनेक लोक मोबाईलसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या नव माध्यमांच्या तंत्राची अनुपलब्धता, गरीबीमुळे निर्माण झालेला त्यांच्या मनातील न्यूनगंड या विद्यार्थ्यांना नकारात्मक बनवीत आहे.ही परिस्थिती शिक्षणाती क्रांतिकारकांना का दिसत नाही? हा प्रश्नही उपस्थित होतो. शालेय जीवनात "भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहे" अशी एकीकडे आपण प्रतिज्ञा म्हणत आलो. आज देशात 13 हजार लोक covid-19 मृत्युमुखी पावले असताना लिहिणाऱ्या लोकांची समाजमाध्यमांवरील ही वृत्ती मला सवंग आणि उथळ वाटते.

आपली जबाबदारी कशी असायला हवी? 

अशा वर्तमानात उच्चविद्याविभूषित असलेल्या माणसांची जबाबदारी अधिक वाढते आहे. माणूस म्हणून,  साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाचा कवी, समीक्षक,  विचारवंत, प्राध्यापक म्हणून माझी काय जबाबदारी आहे? या वर्तमानाकडे मी कसे पाहिले पाहिजे? या वर्तमानात व्यवस्था कशी कार्यरत आहे?  दबलेल्या, पिचलेल्या माणसाच्या वाटेला कोणते जगणे आले आहे? तळागाळातल्या माणसाची काय मानसिकता आहे?  समाजात अजूनही कशा अंधश्रद्धा बोकळल्या जाते आहे? असे प्रश्न मला  पडतात काय? त्यासंदर्भात मी काय लिहितो आहे?  वर्तमानात माझं वर्तन काय आहे? अशा संकटकाळात माझे राजकीय आकलन काय आहे? मी हितसंबंधाचा विचार करूनच बोलतो काय? माझ्या मनातील सुप्त महत्वकांक्षामुळे मी व्यवस्था शरण करत आहे काय? मी सत्याच्या बाजूने खरोखरच आहे काय? मी संवेदनशील असल्याचे खरोखरच ढोंग तर करत नाही ना? आज पर्यंत  मी खरोखरच सत्याची बाजू घेऊनच माझे वर्तन केलेले आहे काय? मी माझ्या जीवनात काय काय तडजोडी केलेल्या आहेत? या प्रश्नांचे भान आपल्याला असले की आपण पोकळ बाता मारत नाही. आपण ढोंग करत नाही. बोलू ते सत्यच बोलू. आपली भूमिका अशी असायला हवी.

gajanankortalwar@gmail.com

लेखकाचा संपर्क - 8551846256.