आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:धंदा है पर गंदा है... 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गिरीश मालविय

सुशांत सिंह राजपूतच्या चितेची राख अजून थंड झालेली नसतानाच गेल्या कित्येक दशकांपासून झाकून ठेवलेला बॉलीवूडचा "पेंडोरा बॉक्स' आता उघडला आहे. त्यातून बॉलीवूडच्या चकाचक ग्लॅमरस मुखवट्यामागे लपलेला अत्यंत किळसवाणा चेहरा समोर यायला सुरुवात झाली आहे. नेपोटिजम ते बॉलीवूडवर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या काही बड्या कंपन्यांचे राजकारण आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपन्यांमधील जीवघेणी स्पर्धा ते व्यवस्थेपुढे हार पत्कारून सिद्ध केलेले नाकर्तेपण अशा अनेक अंगाने सुशांतच्या आत्महत्येची चिकित्सा सुरू आहे. मात्र सुशांतच्या निघून जाण्याने बॉलीवूडमध्ये कशाप्रकारची बजबजपुरी माजली आहे हा विषय ऐरणीवर आला असून सुशांतचा मृत्यू #Metoo चळवळीप्रमाणे एका मोठ्या मूव्हमेंटची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलीवूड इंडस्ट्रीची सगळयात मोठी समस्या समोर आणली आहे ज्याच्याशी आमच्यासारखे अनेकजण सामना करतात. एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी अशी कोणती गोष्ट असू शकते? मला भिती आहे की, सुशांतचा मृत्यू #Metoo चळवळीप्रमाणे एका मोठ्या मूव्हमेंटची सुरुवात नसावी... - अभिनव कश्यप.

‘सुशांत, तू ज्या वेदनेतून जात होतास त्याची मला कल्पना होती. मला त्या लोकांची गोष्ट माहीत आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं. तेही इतकं की तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकला असता. गेल्या सहा महिन्यांत मला तुझ्याजवळ असायला हवं होतं. कदाचित तू माझ्याकडे आला असता तर आज गोष्ट वेगळी असती. तुझ्यासोबत जे घडलं हे त्या लोकांचं कर्म आहे. तुझं नाही’... - शेखर कपूर

“धर्मा (करण जौहर), यश राज फिल्म्स (आदित्य चोप्रा), टी सीरिज (भूषण), बालाजी (एकता कपूर), नाडियाडवाला (साजित) आणि सलमान खान फिल्म्स या सहा कंपन्या बॉलिवूडवर नियंत्रण ठेवतात. या कंपन्या कुठल्याही कलाकाराचे करिअर एका झटक्यात संपवू शकतील इतकी ताकत यांच्याकडे आहे.”... - कमाल खान उर्फ केआरके

सुशांत सिंह राजपूतच्या चितेची राख अजून थंड झालेली नसतानाच गेल्या कित्येक दशकांपासून झाकून ठेवलेला बॉलीवूडचा "पेंडोरा बॉक्स' आता उघडला आहे. "दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप (अनुराग कश्यपचा भाऊ) कंगना रणौत, रवीना टंडन, दिग्दर्शक शेखर कपूर, रणवीर शौरी या आघाडीच्या कलाकारांनी केलेला हल्लाबोल यामुळे बॉलीवूडच्या चकाचक ग्लॅमरस मुखवट्यामागे लपलेला अत्यंत किळसवाणा चेहरा समोर यायला सुरुवात झाली आहे.

सुशांतच्या आत्महत्येपूर्वीच्या काही घटना पाहिल्यानंतर बॉलीवूडच्या या बजबजपुरीची कल्पना येऊ शकेल. अगदी काही दिवसांपूर्वी दिशा सालियनने मुंबईत १२व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आणि दोन वर्षांपूर्वी अनिर्बन दास ब्लाह यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो त्यात सफल झाला नव्हता. सुशांत, दिशा आणि अनिर्बन यांच्यात असे कोणते कनेक्शन होते...? दिशा सालियन ही सुशांतची मॅनेजर होती आणि ती ज्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीच्या अंतर्गत सुशांतचे काम पाहात होती त्या कंपनीचे मालक होते अनिर्बन दास... या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीचे नाव "क्वान एंटरटेनमेंट'... हीच कंपनी काही दिवसांपर्यंत सुशातसिंह राजपूतचे काम पाहात होती.  भारतातली सगळ्यात आघाडीची सेलिब्रिटी मॅनेजमेंट फर्म म्हणून ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीचे क्लायंटही तितकेच तगडे... दीपिका पादुकोण, ऋतिक रोशन, रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, सोनम कपूर, श्रद्धा कपूर आणि जॅकलिन फर्नांडीस ही काही त्यापैकी नावं! 

वास्तविक प्रत्येक हिरो/ हिरोईनचा "सुभाष घई'सारखा एक गॉडफादर असतो इथपर्यंतच आपल्याला ठाऊक असतं. खरं म्हणजे आपले हे आकलन खुपच "ओल्डस्कुल टाईप'  आहे. सुभाष घईचा जमाना केव्हाच गेला... एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक संपायला आले असतानाही आपण अजूनही नव्वदीच्या काळाप्रमाणे विचार करत असतो. २००० च्या दशकापासून हे चित्र बदलायला सुरू झाले आणि २०१५ उजाडेपर्यंत सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपन्यांनी इंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. आता त्यात परदेशी कंपन्यांचाही पैसा मोठ्या प्रमाणात लागायला सुरूवात झाली होती. त्यामुळे हा सगळा खेळ "सेक्रेटरी टाईप' पद्धतीने खेळणे निव्वळ अशक्य होते. आता तगडया कंपन्यांनी तो खेळ त्यांच्या हातात घेतला होता. या खेळामध्ये फक्त चित्रपटच नव्हे तर "ब्रँड इंडोर्समेंट' नावाचा एक प्रकार जोडला गेला होता. 

"ब्रँड इंडोर्समेंट'च्या या खेळात आणखी एक मोठी कंपनी म्हणजे "कॉर्नरस्टोन'. सुशांतची मॅनेजर दिशा सलियन "क्वान'मध्ये जॉईन होण्यापूर्वी याच कंपनीत कामाला होती. कॉर्नरस्टोन स्पोर्टस अॅन्ड एंटरटेनमेंट या कंपनीचे सीईओ आहेत बंटी सजदेह, ज्यांची चुलत बहीण रितिका सजदेह या कंपनीत स्पोर्टस मॅनेजर म्हणून काम पाहते आणि रितिका सजदेह म्हणजे भारताचा आघाडीचा क्रिकेटर रोहित शर्मा याची पत्नी. कॉर्नरस्टोन कंपनीचा सगळ्यात मोठा क्लायंट म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहली...  "क्वान एंटरटेनमेंट'ची आणखी एक प्रतिस्पर्धी कंपनी आहे मैट्रिक्स... जी अगोदर करीना कपूर आणि सलमान खानचे काम पाहायची आणि आता कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरूण धवन आणि करण जौहर यांचे काम ही कंपनी पाहते. मात्र करीना आणि सलमान हातातून निसटल्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे बॉलीवूडची सगळ्यात आघाडीची यशराज फिल्म यांची आणि बॉलूवड बादशाह शाहरुख खान यांची स्वत:ची सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आहे तर आमीर खानच्या कंपनीचे काम स्पाईस नावाची कंपनी पाहते. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अलिकडच्या काळात कायम चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतचे काम प्रख्यात फोटोग्राफर अतुल कसबेकरची ब्लिंग एजेंसी सांभाळते ज्यात विद्या बालन आणि सोनम कपूर यांचीही नावे आहेत. 

कंगना आणि ऋतिक रोशन यांच्यात गेल्या वर्षी जो काही "राडा' झाला तो याच कंपन्यांच्या अंतर्गत कलहातून झाला होता. कंगनाने आरोप केलेल्या "नेपोटिजम'चे मूळ इथूनच जन्मले होते. आजच्याघडीला इंडस्ट्रीचे सगळेच आघाडीचे कलाकार "क्वान' शी करारबद्ध असताना कंगनाचे अकाऊंट जी ब्लिंग कंपनी सांभाळते त्यांच्याकडे फारशी चर्चेतील नावे नाहीत. ऋतिक तर क्वानकडे आहेच शिवाय सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने ज्या "गली बॉय'विरुद्ध "छिछोरे' अशी तुलना केली त्या गली बॉयची दिग्दर्शिका झोया अख्तरदेखील क्वानचीच क्लायंट आहे. अनुराग कश्यपच्या पूर्ण टीमला आपल्याकडे वळवून क्वानने या संघर्षात मोठी भरारी घेतली आहे. या कंपनीकडे आजच्या घडीला टीव्ही आणि बॉलीवूड मिळून सव्वाशेच्या आसपास सेलिब्रिटी आहेत. अर्निबन दास आणि मधू मोन्टेना या दोघांनी मिळून काही अन्य भागीदारांसोबत क्वानची स्थापना केली होती. आज ही कंपनी वर्षाला तब्बल साडे तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिझनेस करते. केवळ चित्रपट स्टारच नाही तर आघाडीचे लेखक, संगीतकार, दिग्दर्शक यांच्या ब्रँड मॅनेजमेंटसह टीव्ही, वेब कंटेट, प्रॉडक्ट प्लेसमेंट, लाईव्ह प्रोग्रामिंग, ब्रँड पोजिशनिंग, मार्केट एडवायजरी, स्पोटर्स फ्रान्चायझी आणि फॅशन रिटेल क्षेत्रातही या कंपनीची उलाढाल आहे. २०१८ पर्यंत अव्वल स्थानावर असलेल्या या कंपनीला #Metoo प्रकरणामुळे मात्र ग्रहण लागले. कंपनीचे प्रमुख असलेल्या अर्निबनवरच चार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आणि त्यानंतर अर्निबनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे क्वानमधून त्याची हकालपट्टी झाली मात्र कंपनीला आर्थिकदृष्ट्या तसा काहीही तोटा सहन करावा लागला नाही कारण सलमान खाननेच या कंपनीत भागीदारी सुरू केली होती. 

आता या सगळ्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपन्यांच्या आपापसातील युद्धात सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण कसे घडले याची लिंक लावू या... काय पो चे आणि शुद्ध देसी रोमांस या चित्रपटांमधून आपल्या बॉलीवूड करिअरला सुरूवात करणाऱ्या सुशांतला २०१३ साल लाभदायी ठरले होते.  त्यावेळी सुशांतला जवळपास सगळ्याच मोठ्या कंपन्यांनी साईन केले. २० लाख मानधनापासून सुरूवात करणाऱ्या सुशांतची साईनिंग रक्कम अडीच कोटींच्या घरात गेली होती. अर्निबनच्या क्वान कंपनीने सुशांतला साईन करून गार्नियर मॅन आणि पेप्सिको सारख्या मोठ्या जाहिरातीही मिळवून दिल्या. "व्योमकेश बक्षी'साठी यशराज फिल्म्सने त्याला साईन केले. त्यानंतर आला "धोनी'. २०१८ पर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. मग असं नेमकं काय घडलं की आघाडीवर असलेल्या या गुणी कलाकाराला दोन वर्षातच डिप्रेशनमुळे आत्महत्या करावी लागली. या गेल्या दोन वर्षात यशराज फिल्म्स आणि सलमान खानशी सुशांतसिंह राजपूतचे बिनसले. बॉलीवूडमधल्या या दोन महासत्तांशी पंगा घेतल्यानंतर व्हायचं ते झालचं आणि मग साहजिकच "क्वान'सारख्या तगड्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीने सुशांतला वाऱ्यावर सोडून दिले. क्वानची साथ न मिळाल्यामुळे सुशांतच्या हातून मोठ्या बॅनरचे चित्रपट निसटायला सुरूवात झाली आणि तो हळूहळू नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागला. यशराज टॅलेंट सर्चच्या कराराच्या तांत्रिक मुद्द्यावरून यशराज फिल्म्सने सुशांतला असे काही अडकवले  की ऑफर असूनही त्याच्या हातून तगड्या बॅनरचे चित्रपट निसटले. तशाच पद्धतीचा करार रणवीर सिंगसोबतही झाला असतानाही यशराज फिल्म्सने या दोघांमध्ये पूर्णपणे पक्षपात केला. दुसरीकडे करण जोहरच्या "ड्राईव्ह' चित्रपटासाठीही सुशांतने इतर ऑफर धुडकावल्या आणि ड्राईव्हची इतका रखडला की शेवटी सुशांतला अंधारात ठेवून करण जोहरने तो चित्रपट सिनेमागृहांऐेवजी थेट नेटफ्लिक्सवर रिलीज करून टाकला. या घटनेमुळे सुशांत आणि करणमध्ये जे काही बिनसले त्याचा सुशांतला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्रास होत गेला. सुशांतच्या आत्महत्येनंतर करणने जे ट्वीट केले आहे, ""गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे.”' त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

करण जोहर असो वा यशराज फिल्म्स... सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर या मंडळींना जरी प्रचंड ट्रोल केले जात असले तरी पडद्यामागे हे असले सगळे घाणेरडे राजकारण याच सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपन्या करत असतात हे कुणाच्या लक्षात येत नाही. या कॉर्पोरेट कंपन्यांचा मोठा फटका सुशांतला बसला होता आणि त्याचे आगामी परिणाम काय होणार आहेत याच धास्तीपोटी मानसिक आजाराखाली तो तणावात जगत होता. 

"कृपा करून माझे चित्रपट पाहा. तरच मी इंडस्ट्रीत तग धरू शकेन... माझा कोणीही गॉडफादर नाही, तुम्हीच माझे गॉडफादर आहात. तुम्ही जर माझे चित्रपट नाही पाहिलेत तर ते मला बॉलीवूडच्या बाहेर फेकून देतील...' आयुष्याच्या अखेरीस सुशांतसिंह राजपूतने व्यक्त केलेली ही खंत "गंदा है पर धंदा है' अशापद्धतीने बॉलीवूडचा एक भयावह चेहरा उघड करते.

girishmalviya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...