आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाद:काेराेनाविषयी माैलानाचा दावा, इम्रान खान संशयाच्या भोवऱ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला ताेकड्या वस्त्रानिशी वावरत असल्यामुळे महामारी फैलावली, पाकिस्तानी पंतप्रधानांकडे तारिक जमीलचा दावा

काेराेनाचा विषाणू चीनच्या प्रयाेगशाळेत जन्माला आला आणि तेथूनच ताे जगभर फैलावला, असा सनसनाटी आराेप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आराेपांच्या फैरी अधिक तेज केल्या. या संदर्भातील ठाेस पुरावे असल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यांनी वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायराॅलाॅजीकडे अंगुलिनिर्देश केला. परंतु, खुद्द अमेरिकी लाेक ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. चीनविषयी अमेरिकी जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रम्प करीत असल्याचे त्यांना वाटते. केवळ अशी एकच व्यक्ती आहे, जी सारे गैरसमज दूर करू शकते. त्यासाठी त्यांनी माैलाना तारिक जमील यांना भेटावे. हा पाकिस्तानी माैलाना त्यांना काेराेना विषाणूचे सत्य सांगू शकताे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा माैलाना तारिक जमील काेण? तो मुस्लिम धर्माेपदेशक असून पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्ती मित्र आहे. नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ यांचाही ताे निकटवर्ती हाेता. ट्रम्प यांना वाटले तर इम्रान खान निश्चितच ट्रम्प आणि माैलाना यांच्यात व्हिडिआे काॅल जाेडून देऊ शकतात. या माैलानाने काेराेनासंदर्भातील सारे वैज्ञानिक दावे नाकारले आहेत. त्याच्या मते ही महामारी केवळ महिला अर्धनग्न स्थितीत वावरतात, ताेकडा पेहराव करतात त्यामुळे  फैलावली आहे. त्याने हा एेतिहासिक दावा इम्रान खानसाेबतच्या बैठकीत केला हाेता.

इम्रान खान यांनी गरिबांसाठी निधी गाेळा करण्याकरिता तीन तासांचा टेलिथाॅन आयाेजित केला. अन्य पत्रकारांसाेबत मीदेखील सहभागी हाेताे. सर्व टीव्ही वाहिन्यांवरून जगभरातील लाेकांनी पंतप्रधानांशी थेट संपर्क साधला आणि लाखाे रुपये दान स्वरूपात दिले. अखेरीस माैलाना तारिकला दुआ पठण करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्या वेळी या महामारीच्या प्रादुर्भावाचे कारण सांगताना त्याने वरील दावा केला. प्रसारमाध्यमांवरील बातम्या खाेट्या असल्याचे सांगितले. सारे जग आणि पाकिस्तानी मीडिया खाेटी माहिती देत असल्याचे ताे म्हणाला. त्या वेळी मी इम्रान खान यांच्याकडे चकित हाेऊन पाहिले. माैलाना म्हणाला, ‘मी एका वाहिनीच्या मालकास फाेन लावून खाेटी माहिती देणे थांबवा असे सांगितले, तेव्हा ताे म्हणाला, ‘ मी खाेटी माहिती देणे थांबवले तर चॅनल बंद पडेल.’ त्याने महामारीचे कारण सांगतानाच महिलांमध्ये वाढत असलेली अश्लीलता, अशिष्टतेवर अल्लाहने केलेला हा प्रहार आहे. आणि ताे चक्क रडू लागला. मी विचार करीत हाेताे की, लाहाेरमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम झाल्यानंतर बहुतांश लाेकांना काेराेनाची लागण झाली हाेती. पाकच्या पंजाबमधील निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण तबलिगींशी संबंधित आहेत. यात सामील झालेल्यांनी पाकिस्तानात हा विषाणू पसरवला हाेता. यापैकी बहुतेकांनी व्यवस्थित पेहराव केलेला हाेता. तरीही ते अल्लाहचे लक्ष्य बनले. पवित्र मक्का आणि मदिना या महामारीमुळे बंद आहे. साैदी अरेबियामध्ये तर काेणीही अर्धनग्न वावरत नाही, मग या शहरांना काेराेना लक्ष्य का बनवत आहे? मला काही विचारायचे हाेते, तेव्हाच कार्यक्रम संपला.

त्याच रात्री चॅनलवरील एका कार्यक्रमात माैलानाकडून मला समजून घ्यायचे हाेते की, काेणता असा मालक आहे, जाे खाेट्या माहितीशिवाय वाहिनी चालवू शकत नाही. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी अन्य एका वाहिनीवर पत्रकार माेहंमद मलिक यांच्या कार्यक्रमात माैलानाने माझी आणि साऱ्या मीडियातील कर्मचाऱ्यांची माफी मागितली. मात्र त्या टीव्ही मालकाचे नाव काही सांगितले नाही. या माैलानाने मीडियाची माफी मागितली परंतु महिलांची नाही. मंत्री शिरीन मजारी यांनी महिलांविषयीची टिप्पणी तत्काळ नाकारली, तर संसदीय कार्यमंत्री अली माेहंमद खान यांच्यासह सरकारमधील अनेक जण माैलानाशी सहमत असल्याचे दिसले. मुळात या माैलानाने पाकिस्तानी संसदेत उभी फूट पाडली. उल्लेखनीय म्हणजे अन्य माैलाना आणि तबलिगी जमातीच्या साऱ्या सदस्यांनी या माैलानाच्या भूमिकेला कडाडून विराेध केला. परंतु या माैलानाची इम्रान खान यांच्याशी मैत्री असल्यामुळे अनेक जण माैन बाळगून आहेत. इम्रानही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत नसल्यामुळे अस्वस्थता दिसते आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी तरी किमान महिलांना कमी लेखणाऱ्या लाेकांना संधी द्यायला नकाे हाेती. हे लाेक धर्माच्या नावावर समाजात दुही माजवत असतात. वस्तुत: या काेराेनारूपी महामारीचा धर्माशी काहीही संबंध नाही. मात्र इम्रान यांच्या माैनामुळे असे वाटते की, ते अशास्त्रीय गाेष्टींशी सहमत आहेत. जर असेच असेल तर ट्रम्प आणि माैलाना यांच्यात चर्चा घडवून काेराेनाच्या संदर्भातील चीनविषयीचा गैरसमज दूर करण्यात इम्रान खान हस्तक्षेप का करीत नाहीत?

हामिद मीर, पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार

tweets @HamidMirPAK