अग्रलेख : मीच माझा रक्षक!

  •  मीच माझा रक्षक!

दिव्य मराठी

Mar 24,2020 09:20:00 AM IST

भारतात काेरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच, भारत हे काेरोनाचे पुढील मुख्य केंद्र ठरू शकते, अशी चिंता वाढवणारी शक्यता वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्सने व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला अधिक सावध पाऊले उचलावी लागतील. २० टक्के ते ६० टक्के लोकसंख्येला काेरोनाची लागण होऊ शकते हा अमेरिकेने स्वत:बाबत व्यक्त केलेला अंदाज भारतात लागू केला, तर ६० टक्के भारतीयांना म्हणजेच ७० ते ८० कोटी नागरिक बाधित हाेतील. मात्र, यातील बहुसंख्य लोकांमध्ये विषाणुंचे सौम्य परिणाम दिसतील, थोड्या लोकांमध्ये हा आजार तीव्र स्वरूप धारण करेल आणि फारच थोड्या लोकांना यामुळे प्राण गमवावे लागतील, असेही या संस्थेने नमूद केले. त्यामुळे आता उपाय एकच तो म्हणजे भारतीयांनी स्वयंशिस्त लावून घेणे. काेरोना विरोधातले हे वेगळ्या प्रकारचे युद्धच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. दुर्दैवाने आपल्याकडे लोकांना स्वत:च्या जिवावर येईपर्यंत कशाची काळजी वाटत नसते आणि सार्वजनिक जीवनात जबाबदारीने व्यवहार कसा करायचा याचे भानही अनेकांना नसते. रविवारच्या जनता कर्फ्युला अनेक ठिकाणी जे काही उत्सवी स्वरूप आले आणि जनता कर्फ्यु हटताच मुंबईच्या टोलनाक्यांवर खाजगी वाहनांची जी काही गर्दी उसळली ते पाहता अद्यापही प्रसंगाचे गांभीर्य आपणांस लक्षात येत नाही हेच खरे. रविवारचा जनता कर्फ्यू ही खरंतर अागामी काळातील व्यवहार थांबवण्याची रंगीत तालीमच समजायला हवी. जो घरात राहील तोच यापुढील काळात जगू शकेल हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. काेरोना बाधित सर्वाधिक रुग्ण हे या घडीला महाराष्ट्रात आहेत. काेराेना विरूद्धचे हे युद्ध फक्त एकट्या सरकारला, सरकारच्या चारदोन यंत्रणांना लढता येणारे नाही. यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कोणत्याही संकटाच्या काळात सरकारी यंत्रणांना किती समन्वयाने काम करता येते याचा वस्तुपाठ महाराष्ट्र सरकारने यानिमित्ताने घालून दिला. केंद्र सरकारलाही त्याची दखल घेणे भाग पडले. महाराष्ट्र सरकारला आरोग्याच्या बरोबरीने अर्थनियोजनाची तरतूद करावी लागेल. विशेषत: मुंबईचा विचार करायचा झाल्यास येथील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजवर बेरजेतच रस दाखविणारा हा विषाणू गुणाकाराकडेही वळेल. चीनकडे जो पूर्वानुभव नव्हता तो आपल्याकडे आहे ही तेवढी जमेची बाब म्हणावी. जनता कर्फ्यूची संकल्पना त्यातूनच आली आहे. द. कोरिया आणि तैवानने प्रतिबंध आणि नियंत्रणाची पंचसूत्री किती परिणामकारक आहे हे सिद्ध केले. विलगीकरण, उपचार, संशयिताचे निदान, निकट सह-वासियांचा शोध आणि लोकांना काेरोनाबाबत शिक्षित करणे ही ती पंचसूत्री आहे. आपण सर्वांनीच ही जबाबदारी ओळखली तर या संकटकाळात सरकार आणि नागरिक हातात हात घालून सोबत असल्याचे चित्र जगापुढे उभे राहील.

X