आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थेट भाष्य:​​​​​​​स्मृतिग्रंथाच्या चौथ्या खंडात प्रणवदा यांचे मौन खटकते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रणव मुखर्जींनी आपल्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ पुस्तकात जेवढे सांगितले त्यापेक्षा अधिक लपवले

दिवगंत प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतींचा ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ हा चौथा खंड वाचल्यानंतर त्यांचा सूर बदलल्याचे तुम्हाला जाणवेल. आधीचे तिन्ही खंड ज्यांनी वाचले आहेत त्यांना हे आणखी चांगल्या प्रकारे समजेल. त्यांनी पुस्तकात खोटे सांगितले, असे मी म्हणणार नाही, परंतु ते खरे बोलण्यास कचरले.

अलीकडेच प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यांनी ज्या वर्षांबद्दल सांगितले ती अलीकडील आहेत, हेही त्याचे एक कारण असू शकते. किंवा असेही असू शकते की एक ‘पक्ष-निरपेक्ष व्यक्ती’ म्हणून राष्ट्रपती भवनातील आपल्या कार्यकाळाबाबत भावी पिढीला जे सांगायचे होते त्यात त्यांनी खूप संयम बाळगला आहे.

प्रणवदा कोणत्याही वादात न पडता कसे सावध राहिले, हे एक आश्चर्य आहे. यामुळे काही अंशी निराशाही होते, कारण सार्वजनिक जीवनात ते खूप मोजके आणि सावधपणे कमी शब्दांत बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी प्राप्तिकर कायद्यात रेट्रोस्पेक्टिव्ह (मागील तारखेपासून) दुरुस्ती करण्याचे वादग्रस्त पाऊल उचलले होते, हे आठवा. सोनिया गांधींपासून मनमोहनसिंग आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील चिदंबरम, सिब्बल यांच्यासारखे वरिष्ठ सहकारीही याच्या विरोधात होते, परंतु प्रणवदा आपल्या निर्णयावर ठाम होते.

पुस्तक चर्चेत येण्याचे पहिले कारण म्हणजे त्यात त्यांच्या राष्ट्रपती भवनात असतानाच्या, पण पक्षात नसतानाच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे. सोनिया गांधी संकटाच्या वर्षांत पक्षाचे प्रभावी नेतृत्व करण्यात अपयशी ठरल्याचा ओझरता उल्लेख ते करतात. मी मंत्रिमंडळात असतो तर ममता बॅनर्जींनी यूपीएतून बाहेर पडू दिले नसते किंवा आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण राज्य निर्मिती होऊ दिली नसती, असे ते म्हणतात. याबाबत ते उत्सुकता निर्माण करतात, पण हे ते कसे करणार होते, याबाबत काही सांगत नाहीत. प्रणवदांसारखे नेते राष्ट्रीय राजकारणातील सध्याचे वास्तव आणि आपल्या पूर्वीच्या पक्षाची दशा विसरू शकत होते का? प्रकाशकाला पुस्तक चर्चेत आणायचे असते, परंतु त्याच्या पलीकडे पुस्तकाचा मूळ विषय कुठे आहे? तो गायब आहे. आपल्या स्मृती ग्रंथाचा पहिला खंड त्यांनी बारकाईने लिहिला आहे. त्यात त्यांनी पक्षातील त्यांच्यासमोर आलेल्या अडचणींविषयी सांगितले की, राजीव गांधींनी त्यांना कसे बाजूला केले आणि त्यांच्याशी ‘विजातीय’ (त्यांनी वापरलेला शब्द) प्रमाणे वागणूक दिली. आणि १९८५ मध्ये मुंबईत अ. भा. काँग्रेस समितीच्या अधिवेशनात राजीव गांधींनी भाषणात काँग्रेस कसा सत्तेच्या दलालांचा पक्ष झाला आहे, असा उल्लेख करून त्यांना कसे लज्जित केले होते, याबद्दलही लिहिले आहे.

पहिल्या खंडात प्रणवदांनी इंदिरा गांधींचा उत्तराधिकारी म्हणून राजीव यांच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढच्या खंडात त्यांनी खूप संयम बाळगला. पक्ष ते राष्ट्रपती भवन प्रवासाला फार काळ लोटला नव्हता, हेही कदाचित त्याचे एक कारण असू शकते. नंतरच्या खंडांत त्यांचा स्पष्टवक्तेपणा फिका पडण्याचे कारण म्हणजे त्यांनी जेवढे सांगितले त्यापेक्षा जास्त लपवले. उदा. पंतप्रधानांनी नोटबंदीच्या निर्णयाबाबत त्यांना आणि मंत्रिमंडळाला माहिती न देणे त्यांनी योग्य ठरवले. किंवा अरुणाचल प्रदेश-उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याच्या सरकारी निर्णयाचे त्यांनी अनुमोदन का केले, याबाबत ते सांगतात.

ज्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील महारथी क्वचितच एखादा दस्तऐवज, पत्र किंवा पुस्तक मागे सोडून जातात, तिथे त्यांनी चार खंड दिल्याबद्दल त्यांचे आभार, परंतु वास्तव राजकीय प्रकरणांना बगल देऊन त्यांनी निराश केले. मनमोहनसिंग व सोनिया गांधी नेतृत्वात कमकुवत सिद्ध होत असल्याचे दिसत असताना ते आपला पक्ष व तत्त्वांसाठी लढण्याचे सोडून राष्ट्रपती भवनात का गेले? सोनिया गांधींनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींना राष्ट्रपतिपद देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना कळले तेव्हाच्या कठीण काळाबाबत त्यांनी काही सांगितले नाही.

त्यांनी मायावती, ममता बॅनर्जी, शिवसेना आणि भाजपशीही संपर्क साधून सोनिया गांधींची योजना कशा चतुराईने विफल केली, हे आता इतर कुणाला पुस्तक लिहून सांगावे लागेल. प्रणवदा विरुद्ध गांधी कुटुंब या सामन्यात कोण जिंकले, याचे उत्तर मिळणे बाकी आहे. सोनियांच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रपतिपद मिळवणारे प्रणवदा जिंकले का? असे असेल तर गांधी परिवाराने त्यांना पाहिजे असलेला पुरस्कार म्हणजे पंतप्रधानपद त्यांना दिले नाही याची त्यांना खंत का वाटते? आपल्याला ते कसे कळेल? त्यांच्या नजरेत ते विजेते होते की पराभूत, हे तुम्हाला ते चार खंड वाचूनच ठरवावे लागेल.

एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta शेखर गुप्ता

बातम्या आणखी आहेत...