आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बांगलादेश मुक्तीची पन्नास वर्षे...

जतीन देसाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय संबंधात नेहमी स्वतःच्या हिताला प्राधान्य असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून नेहमी शेजारील राष्ट्राला अधिक महत्त्व दिले पाहिजे. भारताच्या संदर्भात बांगलादेशला अधिक महत्त्व देऊन अनिर्णित प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजे. आजचा बांगलादेश वेगळा आहे आणि विकासाच्या दिशेने त्याची वाटचाल झपाट्याने सुरु आहे.

बांगलादेश शब्द उच्चारला की आपल्याला आठवतं भारताने पाकिस्तान वर मिळवलेला विजय आणि बांगलादेशची निर्मिती. त्याचसोबत आपल्या डोळ्यासमोर बंगबंधू मुजीबूर रहमान, इंदिरा गांधी, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ उभे राहतात. मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील जनतेने स्वातंत्र्यासाठी अभूतपूर्व लढा दिलेला. त्यांना मदत मिळालेली इंदिरा गांधींंचीं, भारताची. अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने असताना देखील जिद्दीने पेटलेल्या बंगाली लोकांनी स्वातंत्र्य मिळवलं. त्याची त्यांना मोठी किंमत देखील मोजावी लागलेली. जवळपास तीस लाख लोकांची हत्या करण्यात आलेली आणि दोन लाख बलात्कार. भारताची भूमिका बांगलादेशच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची राहिल्याने सहाजिकच बांगलादेशच्या रूपाने नवीन राष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही देशातील संबंध अतिशय मैत्रीपूर्ण राहिले.

१६ डिसेंबर हा बांगलादेश आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. १६ डिसेंबर १९७१ ला तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या लष्कराची जबाबदारी असलेल्या जनरल ए ए के नियाझीने भारतीय लष्कराच्या समोर ढाक्यात त्यांच्या जवळपास ९३,००० जवानांसह शरणागती पत्करली. त्या ऐतिहासिक दिवसाला ५० वर्ष होत आहेत. नियाझीने भारताच्या लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली तेव्हा ढाक्याच्या रामना रेसकोर्स मैदानात लोकांनी उत्सव साजरा केला. तो दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

इंदिरा गांधी, भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानातून मुजीबूर रहमान यांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं होतं. शेवटी ८ जानेवारी १९७२ ला पाकिस्तानने मुजीबूर यांना तुरुंगातून सोडलं. तिथून मुजीबूर रहमान लंडनला गेले. ढाकाला जाण्यापूर्वी काही तासासाठी ते १० जानेवारीच्या सकाळी दिल्लीला थांबले. इंदिरा गांधी इत्यादींनी त्यांचं विमानतळावर भव्य स्वागत केलं. इंदिरा गांधी आणि मुजीबूर रहमान यांची ही पहिली भेट होती. यातूनही भारत आणि बांगलादेशचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, हे आपल्या लक्षात येत. शेवटी भारताची भूमिका बांगलादेशच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची होती.

उभय देशांच्या मैत्रीचा आधार विश्वास आहे आणि त्यामुळेच दोन्ही देशातले परस्पर संबंध अतिशय जवळचे आहेत. बांगलादेशला भारत नेहमी आपला नैसर्गिक मित्र वाटत आला आहे. याचा अर्थ असा नव्हे की दोन्ही देशात तणाव कधीचं निर्माण झाले नाहीत किंवा मतभेद निर्माण झाले नाहीत. बऱ्याचदा तणाव निर्माण झाले आहेत आणि त्यातून मार्गही काढण्यात आले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगशी भारताचे खूप जुने संबंध आहेत. १९७५ च्या १४-१५ ऑगस्टच्या रात्री मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांची हत्या करण्यात आली. तेव्हा शेख हसीना बांगलादेशात नव्हत्या आणि म्हणून त्या वाचल्या. भारताने मुजीबूर यांना त्यांच्या हत्येचं षड्यंत्र लष्करातील काही अधिकारी करत असल्याचा इशारा देखील दिला होता.परंतु कुठलाही बंगाली माणूस आपली हत्या करणार नाही, असं मुजीबूर यांना वाटत होतं.

बांगलादेशात शेख हसीना किंवा अवामी लीग सत्तेवर असणं भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माजी पंतप्रधान खालेदा जिया आणि त्यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) अधून-मधून भारताच्या विरोधात लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करतात. जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टर धार्मिक पक्षाची मदत ते आपल्या राजकारणासाठी घेतात. अवामी लीगचा धर्मनिरपेक्ष राजकारणावर विश्वास असला तरी अनेकदा तेदेखील धार्मिक पक्षांसोबत तडजोड करताना आढळतात.

भारताच्या नागरिक कायदा आणि राष्ट्रीय वस्ती नोंदणीमुळे बांगलादेशात असंतोष आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नागरिकता कायदा संसदेने मंजूर केल्यानंतर बांगलादेशच्या गृहमंत्री असदुझमन खान आणि परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेननी त्यांचा भारत दौरा रद्द केलेला. यातून देखील नागरिकता कायद्याच्या विरोधात बांगलादेशात वातावरण असल्याचं दिसतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनी त्यांच्या दोन दिवसांच्या ढाकाच्या दौऱ्यात बांगलादेशच्या लोकांनी नागरिकता कायद्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. ती भारताची 'अंतर्गत बाब' असल्याचं म्हटलेलं. दोन्ही बाजूच्या नेतृत्वाने घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे आता तणाव कमी झाला आहे.

भारत-बांगलादेश मधील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी कुठलीही बाबत अनिर्णित राहता कामा नये. वेगवेगळ्या मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. अनिर्णित गोष्टींपैकी एक म्हणजे तिस्टा नदीच्या पाण्याचे वाटप. गेली अनेक वर्ष या मुद्द्यांवर समाधान झालेलं नाही. या मुद्द्यांवर बांगलादेशात भारताबद्दल नाराजगी आहे. बीएनपी आणि खालेदा जिया तिस्टा नदीचा मुद्दा अनेकदा उपस्थित करतात. खरंतर याचा तोडगा २०११ मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असताना निघणार होता. पण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी त्याला विरोध केला असल्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सरकारला बांगलादेश सोबत करार करता आला नाही. पंतप्रधानांसोबत ममता बॅनर्जी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होत्या पण शेवटच्या क्षणी त्यांनी बांगलादेशात जाण्याचं रद्द केलं. सहाजिकच ममता बॅनर्जीच्या या निर्णयामागे तिस्टा नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा होता.

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशच्या दौऱ्यात म्हटलेलं," पक्षी, वारा आणि पाण्याला व्हिसाची आवश्यकता नसते.' लवकरच तिस्टा पाणी वाटपावर तोडगा काढण्यात येईल, असं पंतप्रधानांनी म्हटलेलं. मात्र अद्याप त्यावर तोडगा काढता आलेला नाही. या दौ-यात ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. दक्षिण आशियात भारताचे बांगलादेश आणि अफगाणिस्तानशी सर्वात चांगले संबंध आहेत. ज्यातून वाद किंवा असंतोष निर्माण होऊ शकतात अशा मुद्द्यांवर लवकर तोडगा निघाला नाही तर इतर शक्ती देखील त्याचा फायदा घेऊ शकतात. चीनने तिस्टा नदी प्रकल्पासाठी बांगलादेशला एक अब्ज अमेरिकन डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आशियात चीन सक्रिय आहे. बांगलादेशला मदत करून शेख हसीनाचे सरकार आणि तिथला जनमत आपल्या बाजुला करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. बांगलादेशातून आयात करण्यात येणाऱ्या ९७ टक्के वस्तूंवर कर न लावण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनचा प्रयत्न त्यांचा प्रभाव संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य आशियात वाढविण्याचा आहे. पाकिस्तानचा चीन कायमचा मित्र आहे. मालदीव, श्रीलंका आणि नेपाळात प्रचंड गुंतवणूक करून चीनने स्वतःचा प्रभाव वाढवला आहे. बांगलादेशात चीन नेमकं हेच करत आहे.

बांगलादेशचे, सहाजिकच, पाकिस्तानसोबत फारशे चांगले संबंध नाही. २०१६ मध्ये इस्लामाबाद येथे सार्कची शिखर परिषद होणार होती. पण त्यापूर्वी काश्मीरच्या उरी येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्यात सहभागी होण्यास नकार दिला. लगेच बांगलादेशनी पण आपण सार्क परिषदेत सहभागी होणार नाही असं कळवलं. भारत-बांगलादेशात अश्या स्वरुपाचे संबंध आहे. दुसरं पाकिस्तानने १९७१ मध्ये बांगलादेशात करण्यात आलेल्या अत्याचाराबद्दल अद्याप माफी मागितलेली नाही. किंबहुना, तेव्हा ज्यांनी पाकिस्तानी लष्कराला अत्याचारास मदत केलेली त्यांना शिक्षा देण्यासाठी शेख हसीना यांनी ट्रिब्युनल बनवलं. जमात-ए-इस्लामीच्या काही नेत्यांना त्यांच्या गुन्हा बद्दल फाशी देण्यात आली. पाकिस्तानने ट्रिब्युनल आणि जमातच्या नेत्यांना देण्यात आलेल्या फाशीला विरोध केलेला.

भारत आणि बांगलादेशनी रस्ते, समुद्र आणि रेल्वेचा संपर्कासाठी अधिक उपयोग करण्याचं ठरवलं आहे. भारताच्या त्रिपुराला बांगलादेशच्या चितागोंग बंदर मार्फत पुरवठा करणं अधिक सोपं झालं आहे. दोन्ही देशात व्यापार सतत वाढत आहे. २०१८-१९ मध्ये भारताने ९.२१ अब्ज डॉलर एवढ्या किमतीचा वस्तू बांगलादेशात निर्यात केल्या होत्या. बांगलादेशने १.०४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीच्या वस्तू भारतात निर्यात केल्या होत्या. भारत दरवर्षी जवळपास २० लाख बांगलादेशी लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी व्हिसा देत आहे. बांगलादेशच्या विकासाचा वेग निश्चितच कौतुकास्पद आहे.

अनेकदा चुकीच्या बातम्यांमुळे देखील भारत आणि बांगलादेशच्या संबंधात सर्व काही व्यवस्थित नाही असं चित्र निर्माण होतं. त्याचं अलीकडचं एक उदाहरण म्हणजे भारत आणि बांगलादेशात बातम्या प्रसिद्ध झाल्या की भारताच्या राजदूताला गेले चार महिने बांगलादेशच्या पंतप्रधान भेटत नाही. पण वस्तुस्थिती वेगळी होती. कोरोनामुळे शेख हसीना कुठल्याही परराष्ट्राच्या माणसाला भेटत नव्हते. दोन देशांच्या संबंधाबाबत माध्यमांनी अतिशय जबाबदारीने वागले पाहिजे हे या उदाहरणावरून दिसतं. माध्यमांची भूमिका वस्तुनिष्ठ असली पाहिजे.

कर सवलती मुळे बांगलादेशात उद्योग सतत वाढत आहेत. परकीय गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात येत आहे. बांगलादेशच्या तरुणांच्या आशा आकांक्षा वाढल्या आहेत. बंगाली भाषा, संस्कृती आणि रवींद्र संगीत दोन्ही देशाला जोडणारी महत्त्वाची कडी आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही हे संबंध कमकुवत होणे कठीण आहे. पण आंतरराष्ट्रीय संबंधात नेहमी स्वतःच्या हिताला प्राधान्य असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून नेहमी शेजारील राष्ट्राला अधिक महत्त्व दिले पाहिजे. भारताच्या संदर्भात बांगलादेशला अधिक महत्त्व देऊन अनिर्णित प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजे. आजचा बांगलादेश वेगळा आहे आणि विकासाच्या दिशेने त्याची वाटचाल झपाट्याने सुरु आहे.

jatindesai123@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser