आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:'जे हमार जिंदगी का सबसे बड़ा मैडल है साब!’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरफानकडे परिकथेसारखं झटक्यात मिळणारे यश नाही की चणेफुटाणे खाऊन दिवस काढले असल्या भाकडकथा लोकांना अचंबित करण्यासाठी नाही.

जितेंद्र घाटगे

इरफानकडे परिकथेसारखं झटक्यात मिळणारे यश नाही की चणेफुटाणे खाऊन दिवस काढले असल्या भाकडकथा लोकांना अचंबित करण्यासाठी नाही. अंगी पात्रता असतानाही नियती यश देत नाही तेव्हा येणारी असहायता आपल्या मुलभूत निष्ठा सांभाळत कशी तोलून धरावी यासाठीचा आत्मविश्वास मात्र ठासून आहे. ‘डंग बीटल्स’ म्हणजे शेणातल्या किड्यामध्ये रात्रीच्या भयाण अंधारात आकाशगंगेला पाहून दिशा ओळखत मार्गक्रमण करण्याचं कौशल्य असतं. इरफानचं स्ट्रगल म्हणजे असंख्य कलाकारांना अर्थशून्यतेच्या काळात त्याच्या प्रकाशात तरुन नेणार आहे. इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे संघर्ष करून सुद्धा यश मिळत नाही अशा अनेक तरुणांसाठी सुपरस्टार हिरोंच्या परीकथेपेक्षा इरफानची लढाई जास्त जवळची वाटते ती यामुळेच.

जवळपासचे अनेक मृत्यू बघितल्याने कधीकधी संवेदना इतका बोथट झालेल्या असतात की कुठलीच गोष्ट आपल्याला मुळापासून हलवू शकणार नाही याचा निब्बर अभिमान आपल्याही नकळत सोकावलेला असतो. इरफान खान गेल्याची बातमी कळल्यावर मात्र ‘सुन्न होणे’ ह्या अतिवापराने गुळगुळीत झालेल्या शब्दप्रयोगाच्या गाभ्यापर्यंत पोचणारी नवी संज्ञा निर्माण करण्याची गरज झालीये. एखादा सेलिब्रीटी गेल्याने सोशल मिडीयावर श्रद्धांजली देणाऱ्या पोस्ट तशा नवीन नाहीत. इरफानच्या बातमीने मात्र सगळयांना सहवेदनेच्या एकाच प्रतलावर आणून सोडलय ज्या दु:खाची कारणसंगती लागत नाहीये. शब्दात मांडायची म्हटलं तरी अस्वस्थता आणि अखंड घालमेल मागे राहणार आहे. ‘Catharsis’ म्हणजे भावनेचं किंबहुना दुःखाचं विरेचन हे एरिस्टोटलने पहिल्यांदा फक्त शोकांतिकेच्या संदर्भात वापरलं होतं. इरफानने नियतीसोबत दोन हात करत खेळलेल्या अभूतपूर्व लढ्याला शोकांतिका नक्कीच म्हणता येणारं नाही. तरी सुद्धा एखाद्या श्रेष्ठ शोकांतिकेच्या वाट्याला यावा असा  ‘Collective catharsis’ त्याच्या पश्चात जनमानसात दिसला. आपल्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून देताना प्रत्येकजण हतबल होता. माणूस दिमाखात जगला की स्टेजवरून निघताना त्याच्या एक्झिटला सुद्धा टाळ्या पडतात. इरफान स्टेजवरून पायउतार होताना सगळ्यांना जागीच स्तब्ध करून गेलाय. 

सर्वसाधारण कलाकार त्याच्या प्रतिभेचा परीघ पहिल्या काही कलाकृतींमध्ये दाखवून देतात. ‘मकबूल’ अणि ‘हासिल’ हे दोनच सिनेमे जरी त्याने संपूर्ण आयुष्यात केले असते तरी एक अद्वितीय अभिनेता म्हणून त्याचं नावं गणलं गेलं असतं. कालानुरूप बहरत जाणाऱ्या अभिनयक्षमतेने इरफान मात्र दिवसेंदिवस धक्के देत होता. त्याचा शेवटचा ‘अंग्रेजी मिडीयम’ बघितल्यावर लक्षात येतं की आपण आजवर बघितलं ते हिमनगाचं फक्त एक टोक होतं. पाण्याखाली अजून काय दडून ठेवलं होतं ते आता कधीच कळणार नाहीये. पण आजवर जे दिसलं त्याची मीमांसा करायची म्हटलं; तर एका आयुष्यात तेही शक्य नाही एवढं ते अफाट आणि विस्तृत आहे. भारतात देवीदेवतांचं चित्र राजा रविवर्मा यांनी आपल्या कुंचल्यातून चितारले तेव्हा लोकांच्या मनात असलेल्या अमूर्त कल्पनेला पहिल्यांदा चेहरा मिळाला. गुंतागुंतीच्या भावनेला देखील असाच एक चेहरा असतो. प्रत्येक अभिनेता आपल्या वकुबानुसार त्याला मूर्त रूप देऊ बघतो. पण समोर आलेला चेहरा प्रत्येकाला सारखाच अपील होईल असं नाही. आपल्या सांस्कृतिक आणि भौगोलिक वैविध्यामुळे हे चेहरे मर्यादित वर्गाला अपील होणारे असतात. इरफानला लाभलेला चेहरा हा "कॉमन मॅन'चा चेहरा आहे. ज्याला प्रत्येक भावनेचं ध्वनिचित्र समोर ठेवण्याची किमया लाभली आहे. इरफानसोबत प्रेक्षकांच्या जुळलेल्या नाळेची चिकित्सा करणे म्हणजे एखाद्या महाकाव्याचा पापुद्रा काढणे आहे. जसंजसं आपण सोलत जातो, तसं तो तर कधी नागवा होत नाही, उलट आपल्या ठसठसत राहणाऱ्या वेदनागर्भात शिरून त्यातल्या प्रत्येक शिरेचा सोनोग्राफ समोर ठेवतो... इरफानने वेदनेला चेहरा दिला आहे.

‘मुंबई मेरी जान’ मध्ये सायकलवर चहा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थलांतरित व्यक्तीची भूमिका इरफानने केली आहे. एका प्रसंगी त्याच्या भांड्यातलं सगळं दुध पोलिसांकडून रस्त्यावर सांडलं जातं. लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याची गाडी रस्त्यावर ओतून देणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ बघितला आणि त्या व्यक्तीमध्ये इरफानचा सिनेमातला पिचलेला चेहरा दिसला. आज कुठलाही स्थलांतरित मजुर आपल्या कुटुंबासोबत पायी जाताना दिसतो तेव्हा माझ्या 'सबकोंशियस माईंड"ने त्याला इरफानचा "कॉमन मॅन'चा चेहरा लावलेला असतो. एखादा अपराधगंड पिच्छा सोडत नाही तेव्हा आरशात बघितल्यावर प्रतिमेत स्वतःच्या जागी "मकबूल' दिसतो. कुणाचीही मुलं दोन संस्कृतीच्या "आइडेंटिटी क्राइसिस' मध्ये अडकलेली दिसतात तेव्हा त्या बापाच्या चेहऱ्यावर "नेमसेक'चा अशोक गांगुली आपोआप दिसतो. कधीही न मोडता येणाऱ्या प्रेमाच्या अपरिहार्य चौकटीत अडकलेल्या माणसाचा चेहरा "लंचबॉक्स'च्या साजन फर्नांडिस सारखा दिसतो. आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालावं याची बायकोसोबत "तुतु मैमै' होते तेव्हा आपल्याही नकळत आपला "हिंदी मिडीयम'चा राज बत्रा झालेला असतो. असं मनस्वी काम करणाऱ्या एखाद्या कलाकाराचं मरण उद्दात्त असू शकतं का? इरफानला एका दुर्मिळ कॅन्सर कॅन्सरशी झगडताना आलेला मृत्यू रूढार्थाने उदात्त नसेलही. पण उमेदीने लढा देणाऱ्या नव्या कलाकारांमध्ये कलेविषयी, जीवनाविषयी असलेली मूल्यनिष्ठता डळमळीत होऊ नये यासाठी इरफानची कारकीर्द नंदादीप बनून राहणार आहे. बॉलीवूडमध्ये सुपरस्टार झालेल्या व्यक्तीने पूर्वी केलेल्या स्ट्रगल्सला अतिशयोक्ती झळाळी असते. म्हणजे एखादा कलाकार रेल्वे स्टेशनवर, फुटपाथवर उपाशीपोटी झोपून कसा यशस्वी झाला याचे किस्से रंगवून सांगितले जातात, चवीने ऐकले जातात. त्यामुळे "स्ट्रगलर्स' ह्या शब्दाची हिंदी प्रेक्षकांची व्याख्या तोकडी आहे. म्हणूनच की काय बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी सुद्धा मूठभर प्रेक्षकवर्ग वगळता आपण कुणाच्या खिजगीणतीत नाही ह्या विचाराने येणारं नैराश्य प्रेक्षकांना इतकं महत्वाचं वाटत नाही. घरची आधीची परिस्थिती चांगली असल्याने एकदा स्वतःला इंडस्ट्रीत सिद्ध करून दाखवले तरी त्यांनी तो संघर्ष "उपाशीपोटी' न केल्याने त्याची दखल घेतली जात नाही. 

शाहरुख-आमिर-सलमानसारख्या देखण्या चॉकलेट हिरोंकडे पाहून आपणही अभिनेता बनू शकतो ही प्रेरणा हल्ली अनेक नवख्या कलाकारांना मिळत असेल. इरफानसारखा सामान्य चेहरा लाभलेले असंख्य कलाकार पडद्यावर कुठल्या ऍक्टर्सला पाहून प्रेरित होतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे. आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म यातील दरी मिटवत चौफेर उधळणाऱ्या इरफानला पाहिल्यावर अनेक जण विश्वास ठेवणार नाही की, आपला चेहरा सुद्धा जनता स्वीकारेल हा विश्वास, ज्याला अभिजन वर्ग नाक मुरडतो त्या "मिथुन चक्रवर्ती'ला पाहून आला होता. इरफान १०-१२ वर्षांचा असताना मिथुनचा 'मृगया' प्रदर्शित झालेला. त्याच्या आणि आपल्या चेहऱ्यात कमालीचे साम्य आहे हे समजल्यावर त्याचा आत्मविश्वास बळावला. मृगयामध्ये असलेले मिथुनचे सर्व संवाद पाठ करून मित्रांना सतत ऐकवायचा. 

इरफानची अभिनयक्षमता, सिनेमा निवडीबाबत भूमिका ह्या गोष्टी - त्याचे बॉलीवूड मध्ये पदार्पणाचे वर्ष आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत सुसंगत नसल्याने - यश, प्रसिद्धी हुलकावणी देत गेले. 70s आणि 80s च्या दशकात कलात्मक आणि समांतर सिनेमा वेगळी वाट चोखाळत असताना लोकप्रियतेच्या अत्युच्च टोकावर होते. हे यश केवळ अॅवॉर्डस आणि समीक्षकांनी सिनेमाला गौरवण्याइतपत मर्यादित नव्हते. श्याम बेनेगल यांच्या "अंकुर'(१९७४) ने तब्बल २५ आठवडे थिएटरमध्ये मुक्काम ठोकला होता. आक्रोश आणि अर्धसत्यसारखे सिनेमे तिकिटबारीवर अफाट गर्दी खेचत होते. 90s चं दशक सुरू होण्याअगोदर मात्र सुमार मसालापट चित्रपटांनी बॉलीवूड बरबटलेले होते. नेमके त्याच दरम्यान १९८८ साली "सलाम बॉम्बे' द्वारा एका छोट्या भूमिकेत इरफानने पदार्पण केले. त्या वर्षी आमिर खान च्या "कयामत से कयामत तक' ने धुमाकूळ घातला होता. १९८९ च्या "मैंने प्यार किया' पासून सलमान तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मनोरंजनात "एस्पेकीजम' शोधणाऱ्या कालखंडात कलात्मक आणि समांतर सिनेमा रसातळाला गेला होता. जे काही थोडेथोडके प्रयत्न व्हायचे केवळ प्रेक्षकांच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिले. हाच कालखंड होता की त्यात ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह यांनी देखील व्यवसायिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे इरफान खानने अभिनय केलेले कमला की मौत, दृष्टी, एक डॉक्टर की मौत हे उत्तम प्रायोगिक सिनेमे गल्लेभरू सिनेमाच्या लाटेत वाहून गेले.

या दरम्यान भारत एक खोज, चाणक्य, बनेगी अपनी बात, कहकशा या टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून त्याने काम सुरू ठेवल्याने आपला संघर्ष सोडला नव्हता. परंतु परिक्षा घेणारा हा कालखंड छोटा नव्हता. टीव्ही सिरियल्समध्ये काम करणं त्याला कंटाळवाणं वाटत होतं. एका नाटकात निर्मात्यांना इरफानचे काम पसंद न आल्याने ठरलेल्या रकमेपेक्षा अर्धे पैसे हातात ठेवत सांगितले, "तुम्हारा काम भी बस ठीक ही तो हुआ। "एकवेळ' आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही तुला काही देऊ शकत नाही', असे सांगितले असते तरी चालले असते. मात्र अभिनय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केल्यानं इरफान पुरता हादरला होता. प्रस्थापित खान मंडळींच्या सिनेमात आपल्याला व्हिलनच्या गँगमधला मारधाड करणाऱ्या गुंडांची तरी भूमिका मिळावी असं त्याला वाटायचं. मात्र नवख्या अभिनेत्यासारखं आपला फोटो अल्बम घेऊन निर्माता दिग्दर्शकांसोबत स्वतःची मार्केटिंग करणे त्याला जमत नव्हते. 

बॉलिवूडमध्ये  खऱ्या अर्थाने व्यावसायिक सिनेमा "रीडीफाईन' करण्याचे काम एकविसाव्या शतकात सुरू झाले. उशीर तर झालेला होताच, पण स्वतःला सिद्ध करण्याची हीच संधी होती. २००१ साली "दि वॉरीयर' ह्या ब्रिटिश सिनेमातून फिल्म सर्कलमध्ये इरफानने वाहवा मिळवली होती. तिग्मांशू धुलियाच्या कल्ट फॉलोविंग लाभलेल्या "हासिल'(२००३) ने  बॉलीवूड मध्ये सर्वदूर त्याची प्रशंसा झाली. २००३ साली शाहरुख खान रोमान्सचा 'बादशहा' म्हणून अढळ स्थान पटकावून होता. आमिर खान "मि. परफेक्शनिस्ट'चं बिरुद मिळवण्याच्या तयारीत होता. सलमान-अजय-अक्षय आपल्या फॅन फॉलोविंग ला टारगेट करत यशस्वी अभिनेते म्हणून नावारूपास आले होते. इरफान बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत काम मिळवण्यासाठी मात्र पदार्पणानंतर तब्बल १५ वर्ष जावी लागली. त्याने स्वतः आधी सुरवात करून सुद्धा वयाने आणि अनुभवाने कमी असलेले स्टारपुत्र सुपरस्टार पदावर पोचले होते. शेक्सपियरन ट्रेजेडी 'मॅकबेथ'वर आधारित मकबूल(२००३) मध्ये इरफानला मुख्य भूमिकेत संधी मिळणे हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. निष्ठा, विश्वासघात आणि त्यानंतर आलेला अपराधगंड ह्या तिन्ही भावनांचे अवस्थांतर त्याने ज्या सहजतेने साकारले ते केवळ अतुलनीय! इरफानने प्रसंगी साधारण सिनेमे केलेले असले तरी त्याच्या अभिनयात चिंतनाची सलगता आहे. त्यामुळे सिनेमात त्याने वठवलेल्या उत्तम भूमिका पाहताना आपल्यात नकळत कलाविषयक संस्कार होतात. त्याच्या भूमिकांचा थेट आणि शो सुटल्यानंतरसुद्धा सोबतीला राहणारा परिणाम असतो. म्हणूनच की काय 'पान सिंग तोमर' पाहून कुणी निर्लेप, निर्विकार मनाने बाहेर पडूच शकत नाही. 'मुंबई मेरी जान' मध्ये आपले दूध विक्रेता थॉमसला पाहून अस्वस्थ झाला नसेल असा प्रेक्षक विरळा. ‘बिल्लू’ मध्ये त्याला बघून आपल्या खऱ्या आयुष्यात टेकू लावून धरणारे सुदामा न आठवले तरच विशेष! 'किस्सा' मधलं फाळणीच्या वेदना भोगणारा अंबर सिंग आपल्या मानगुटीवर सोडून देतो.  लंच बॉक्स, हिंदी मिडीयम, करीब करीब सिंगल यात त्याने मध्यमवयीन प्रेक्षकांना दाखवलेले प्रेमाचे रूप वेगळे आहे. हिरवळीत हात मागे करत रोमान्स करणाऱ्या शाहरुखपेक्षा गिऱ्हाईकांना साड्या विकत स्वतःच्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा 'हिंदी मिडीयम' मधील इरफान प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो यात नवल नाही. 

इरफानकडे परिकथेसारखं झटक्यात मिळणारे यश नाही की चणेफुटाणे खाऊन दिवस काढले असल्या भाकडकथा लोकांना अचंबित करण्यासाठी नाही. अंगी पात्रता असतानाही नियती यश देत नाही तेव्हा येणारी असहायता आपल्या मुलभूत निष्ठा सांभाळत कशी तोलून धरावी यासाठीचा आत्मविश्वास मात्र ठासून आहे. ‘डंग बीटल्स’ म्हणजे शेणातल्या किड्यामध्ये रात्रीच्या भयाण अंधारात आकाशगंगेला पाहून दिशा ओळखत मार्गक्रमण करण्याचं कौशल्य असतं. इरफानचं स्ट्रगल म्हणजे असंख्य कलाकारांना अर्थशून्यतेच्या काळात त्याच्या प्रकाशात तरुन नेणार आहे. इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे संघर्ष करून सुद्धा यश मिळत नाही अशा अनेक तरुणांसाठी सुपरस्टार हिरोंच्या परीकथेपेक्षा इरफानची लढाई जास्त जवळची वाटते ती यामुळेच.  

इरफानने कारकिर्दीतील पहिल्या ‘सलाम बॉम्बे’ ह्या सिनेमात पैसे घेऊन पत्र लिहून देणाऱ्याची भूमिका केली होती. शहरात अडकलेल्या छोट्या ‘क्रिष्णा’ला आपल्या आईला देण्यासाठी पत्र इरफानकडून लिहून घेतो. पूर्ण पत्ता मात्र त्याला माहिती नाहीये. तो मुलगा निघून गेल्यानंतर इरफान ते पत्र चुरगळून फेकून देतो. आधीच अवघड असलेली भेट अजून अशक्य होऊन बसते. ‘सलाम बॉम्बे’ ते ‘अंग्रेजी मिडीयम’ इरफानने एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. आपल्या शेवटच्या फिल्मच्या प्रमोशनसाठी ‘Wait for me’ असा ऑडीओ मेसेज देऊन तो अकाली चालला गेला. मिशीवर पीळ देत आरपार काळजात घुसणारी भेदक नजर घेऊन पुन्हा येईल असं फार वाटलेलं. पण ते आता शक्य नाहीये. इरफानच्या निधनानंतर अनेकांसारखा मी देखील असहाय झालो होतो. त्या रात्री फेसबुक मेसेंजरवर जाऊन स्वत:ला बरं वाटावं म्हणून त्याला मेसेज केला. तसा तिकडून रिप्लाय आला, ‘Thank you for touching my life in ways you never know… My riches don’t lie in materialistic things… But, truly in fans like you.’ इरफानने  फेसबुक अकाऊटवर मृत्यूआधी स्वयंचलित मेसेज देऊन ठेवलाय. छोट्या क्रिष्णाचा निरोप सिनेमात देऊ शकला नव्हता. मृत्यूनंतर असंख्य चाहत्यांना वैयक्तिक मेसेज देऊन गेलाय. जणू सगळे भौतिक अवॉर्ड आणि सन्मान बाजूला ठेवून प्रमाणे आईसस्क्रीम खात पान सिंग तोमार म्हणतोय - ‘जे हमार जिंदगी का सबसे बड़ा मैडल है साब!’ 

संपर्क - ९६८९९४०११८

jitendraghatge54@gmail.com

बातम्या आणखी आहेत...