आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कविता अभिव्यक्तीच्या...:कवितेने चारही दिशांनी आक्रमक व्हावं...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयंत पवार

कवितेने उच्छाद मांडावा.. तिचा, कवीचा गळा घोटू बघणाऱ्यांसाठी. कवितेने चारही दिशांनी आक्रमक व्हावं. हाच परिस्थितीला सामोरं जाण्याचा मार्ग आहे... सुप्रसिद्ध लेखक-नाटककार जयंत पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या आठवड्यापासून दर रविवारी "दिव्य मराठी रसिक'च्या या विचारमंचावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कवितांचे काव्यसंमेलन आयोजित करीत आहोत. याची सुरूवात गणेश विसपुते, मंगेश नारायण काळे आणि प्रफुल्ल शिलेदार या कवींपासून...

कवी हे सॉफ्ट टार्गेट आहेत़... त्यांचे शब्द, त्यामागचे लक्षणार्थ, व्यंजनार्थ समजून न घेता भावार्थ ध्यानात न घेता थेट उचलून गोंधळ घालता येतो. कवितेची समज नसणाऱ्या लोकांची पैदास समाजात वाढते आहे आणि धार्मिक-जातीय-राष्ट्रीय अस्मिता दुखावल्या जाण्याच्या जागा शोधायला अनेक मुखंड बाहेर पडले आहेत. त्यांच्या समूहांना राज्यकर्त्यांनीच दंडशक्ती बहाल केल्यामुळे सगळे मोकाट झाले आहेत. व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, तिच्या विरोधात बोलणाऱ्यांंना एकटं पाडण्याचं, बदनामी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांनी नामोहरम करण्याचं एक षडयंत्र गेली काही वर्षे देशात आकाराला आलं आहे. 

लेखक कवी हे मुळातच एकटे असतात. हे एकटेपण ही त्यांची शक्ती आणि स्वायत्तता असते. पण त्यामुळेच त्यांना ठेचणं, सामाजिक दृष्ट्या बदनाम करणं, प्रपोगंडा करून बथ्थड केलेल्या समाजाला त्यांच्यावर सोडणं सोपं होऊन जातं. त्यामुळे आता आपल्या एकटेपणाची शक्ती अबाधित राखण्यासाठी लेखक-कवींनी एकत्र येऊन अभिव्यक्तीची ताकद समाजाला, राज्यकर्त्यांना आणि ते राबवत आपल्याला हवं तसं वाकवणाऱ्या व्यवस्थांना दाखवून दिली पाहिजे. हा अहिंसक आणि विधायक उठाव आहे. समंजस आणि विचारी नागरिकांनी अशावेळी लेखक कवींच्या मागे उभं राहिलं पाहिजे कारण लेखक-कवीच समाजाचा, सर्वसामान्य माणसांचा, वर्तमानाचा आरसा असतात. कवींनी जपून रहावं किंवा मरून जावं असं सांगतोय का हा काळ? मला वाटतं राष्ट्रीय पातळीवर प्रमुख कवींनी पुढाकार घेऊन एकत्र येऊन जागोजाग कवितांचे मेळावे घ्यावेत. जे माध्यम हाताशी असेल त्यावरून बोलावं. कविता म्हणावी. कवितेने उच्छाद मांडावा.. तिचा, कवीचा गळा घोटू बघणाऱ्यांसाठी. कवितेने चारही दिशांनी आक्रमक व्हावं. हाच परिस्थितीला सामोरं जाण्याचा मार्ग आहे. "कवी सापासारखे असतात, शेपटीवर पाय पडला की दंश करणारे...' कवी मनोहर ओकच्या या ओळी प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे!

१) करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट 
मंगेश नारायण काळे

म्हणजे आता जो काय राजा असल्याचं सांगितलंय  कथेकऱ्यानं गोष्टीत जीवाचा कान करून ऐकणाऱ्या प्रत्येकालाच  त्याचा फक्त वर्तमानंच ठळक केला जात असल्याचे लक्षात येऊ लागलेयं  श्रोत्यांच्या म्हणजे जे काय जास्तीचे कुतूहल असणारे प्रेक्षक वाचक  श्रोते आहेत या ऐकणाऱ्यांच्या गर्दीत त्यांनी तर आग्रह धरला आहे गोष्टीतल्या राजाचे पूर्वसूरीचे चरित्रही विशद करण्याचा 

नि ही तर नैसर्गिक अशी मागणीयं गोष्टीतल्या प्रत्येक  चरित्राचे चरित्र समजून घेण्याची म्हणजे त्याशिवाय व्हर्च्युअल  का होईना कसे रिलेट होता येणारेय ऐकणाऱ्याला गोष्टीतल्या गोष्टीशी गोष्टीत

म्हणजे आता जो काय राजा असल्याचं नि त्याची सार्वभौम सत्ता सर्वदूर प्रस्थापित झाल्याने  तो कितीय महान नि चक्रवर्ती असल्याचं जे रसभरीत निरूपण केलं जात आहे कथेकऱ्याकडून तो तर कालच्या गोष्टीत अगदी वेगळाच असल्याचं सांगितलं होतं अगोदरच्या कथेकऱ्यानं   म्हणजे ती जरी एका नृशंस नरसंहाराची गोष्ट असली काळीमा फासणारी मानव्याला नि त्या गोष्टीला वर्तमानाचा एक मोठा संदर्भ आहे हे लक्षात घेतले तर कालच्या गोष्टीत जो होता एक कारस्थानी कट-कारस्थानं रचून स्वतःची सत्ता बळकट करणारा, महत्त्वाकांक्षी हत्यारा तो अचानक  कसा काय आपले चरित्र बदलवून येऊ शकतो नव्या गोष्टीत राजाच्या रूपात?  म्हणूनच या अनुत्तरित प्रश्नाजवळच थांबलीये गोष्ट काही वेळ नि कथेकऱ्यानेही उबळ आल्याचे दर्शवून घेतला आहे एक दीर्घपॉज

म्हणजे किती भयावह होती ती गोष्ट की आपल्याला नकोशी असलेली  सगळीच चरित्रं समूळ नष्ट करण्याचाच घाट घातला होता त्यानं बेमालूम  आपल्या सार्वभौम नकाशातून नि अंमलबजावणीही घडवून आणली होती तडफेने त्याच्या कार्यप्रवण तत्पर प्रणालीने अस्मिता जागवून म्हणजे ती गोष्ट होती एवढी परिणामकारक की अजूनही अनुभवता येतो त्या सून्न करून टाकणाऱ्या  गोष्टीतला जाळ, ध्वनी-प्रतिध्वनी, गर्जना, किंकाळ्या, टाहो, शोक, हुंदके डोळ्यातले नि व्हर्च्युअली केलं थोडं जास्त इमॅजिन तर भरूनही आणता येते मूठभर राख प्रत्येकालाच बेचिराख झालेल्या गोष्टीची गोष्टीतल्या गोष्टीत.

mangeshnarayanrao@gmail.com (संपर्क - 9766594154)

२) म्हाताऱ्या जीवाला झोप कमीच लागते । 
गणेश विसपुते

सत्य सत्ता आणि सजा यांचा परस्परांशी संबंध ज्ञात इतिहासात सुरुवातीपासून आलेला आहेच. फक्त एवढंच आहे की, सत्य सत्तेला रूचत नाही समझोता करता येत नाही -त्यांना सजा होते जशी झाली अडीचेक हजार वर्षांपूर्वी एका ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याला. तरूणांना प्रश्न विचारायला शिकवतो हा होता त्याचा गुन्हा चारशे वर्षांपूर्वी असाच एक म्हातारा सांगत होता- पृथ्वी फिरते सूर्याभोवती सजा झाली त्याला आजन्म कारावासाची धडधडीत असं बोलतो सत्य धर्मसत्तेविरुद्ध म्हणून कित्येक आहेत असे शेकड्यानं म्हातारे -आणि तरणेही ज्यांची नावं लक्षात ठेवली काळानं त्यांना शिक्षा ठोठावणाऱ्या सत्ताधीशांची नावं माहीत नाहीत कुणाला याचा अर्थ असा नाही की सत्तेला कळत नाही सत्य. ते तिला असतंच माहीत. रस्त्यावरच्या उघड हत्येत कुणाचे हात आहेत रक्तात भिजलेले, कोण चोरतं भाकरी आणि घाम सगळं माहीत असतं तिला पाशवी या विशेषणाशी तर तिचा रक्ताचा संबंध त्यासाठी वाट्टेल ते करते ती. तिला नको असतो सत्याचा उच्चार का, तर तिला माहीत असतं सत्याच्या संसर्गानं सत्तेच्या सर्वनाशाची सुरुवात अटळ असते. आणि हे यडे म्हातारे उभेच असतात दरवेळी तिच्या वाटेत आडवे तुकोबाचा सोटा घेऊन तिचं टकुरं फोडायला. ते राहाणारच आहेत दर वळणावर उभे म्हाताऱ्या जीवाला झोप तशी कमीच असते सगळ्यांना जागं केल्याशिवाय त्यांना गोड वाटत नाही. 

bhasha.karm@gmail.com संपर्क- 9890061421

३) कारखाना 
प्रफुल्ल शिलेदार 

इथे खूप वस्तू बनवतो आम्ही  म्हणजे खूप प्रकारच्या नव्हे  एकाच प्रकारच्या खूप वस्तू आम्ही तयार करतो  

त्या सगळ्या अगदी एकसारख्या असतील  याची काळजी घेतो आम्ही  म्हणजे अगदी काटेकोरपणे  काही कसोट्या पाळत डोळ्यात तेल घालून  इथे तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर पाळत ठेवतो आम्ही  आणि हे बघतो की तयार होणारी प्रत्येक वस्तू हुबेहूब एकसारखीच असेल 

एखाद्या वस्तूने जर हुलकावणी देत  थोडे वेगळे रंग रूप घ्यायचा प्रयत्न केला तर  तिला खड्यासारखे वेगळे करतो  आधी बाजूला घेतो  मग तिची अंतर्बाह्य तपासणी करतो  तिच्या वेगळेपणाचे मूळ शोधायचा प्रयत्न करतो  तिच्यात वेगळे होण्याच्या कुठल्या छुप्या प्रेरणा दडलेल्या आहेत   याचा शोध घेतो  मग त्या प्रेरणांचा नायनाट कसा करता येईल हे बघतो  नव्या उपाययोजना शोधून काढतो  आमच्या व्यवस्थेत यंत्रणेत  काही गडबड तर नाही ना हे फार खोलवर जाऊन पाहतो  खरे तर वस्तूंच्या निर्मितीच्या यंत्रणेच्या बाहेरही सगळीकडे लक्ष ठेवण्यासाठी  आमची एक मोठी फळीच काम करीत असते  संपूर्ण निर्मितीप्रक्रियेवर ती लक्ष ठेवून असते  निर्मितीप्रक्रिया तर तशी धोकादायकच असते म्हणतात  कुणी तिला स्वायत्त म्हणत असले तरी  आमच्या इथे सगळे काही आखीव रेखीवच  

अशात काहीही होऊ शकते  कधीही कसेही रूप घेतले जाऊ शकते  म्हणून काटेकोर यंत्रणा उभी करायची  आणि त्या यंत्रणेवर लक्ष ठेवणारी  एक प्रभावी यंत्रणा  आणि त्या यंत्रणेची कळ  आपल्या हाताच्या पकडीत घट्ट 

हा कारखाना आहे  याची जाणीव ठेवा कवींनो  इथे तुम्हाला प्रवेश नाही 

shiledarprafull@gmail.com
संपर्क- 9970186702