आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:आळंदीच्या "धाकड गर्ल'

जयश्री बोकील10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याजवळची आळंदी...माऊलींचे समाधीस्थळ... ..खुद्द माऊली हे आदर्श शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण. त्याच आसमंतात दिनेश गुंड सरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र एका आधुनिक गुरूकुलाच्या रूपाने उभे आहे. सरांच्या अनेक विद्यार्थिनी आज पोलिस दलात विविध पदांवर कार्यरत आहेत. कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. 

मानवी आयुष्यात शिकणे आणि शिकवणे (अधिक भारदस्त शब्दांत सांगायचे, तर अध्ययन आणि अध्यापन) हा फार सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पाच खऱ्या अर्थाने मनुष्यप्राण्याला ‘प्राणी’ या संज्ञेपलीकडे घेऊन जातो. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात हा टप्पा ‘गुरूकुला’च्या रूपाने येत असे आणि या कालखंडाला ‘अर्जनपर्व’ असे यथार्थ संबोधन होते. भावी वाटचालीसाठी जे उपयुक्त, जे आदर्श ते सारे या अर्जनपर्वात विद्यार्थी ग्रहण करत असत. कालचक्रानुसार, या गुरुकुलांची विद्यापीठे आणि विश्वविद्यालये झाली, पण विद्यार्थ्याच्या मनातले ‘अर्जनपर्व’ आजही अबाधित आहे. हे पर्व खऱ्या अर्थाने जे ‘सार्थ’ करतात, त्या ‘गुरूं’विषयी काय बोलावे? आपल्या परंपरेने गुरूंना साक्षात परब्रह्मच म्हटले आहे. जो वाट दाखवतो, त्या वाटेवर कसे चालायचे हे शिकवतो, त्या वाटेवर अधिकाधिक प्रकाशमय वाटचाल कशी करायची, याचे मार्गदर्शन करतो..तो गुरू..पूर्वी त्यांना आचार्य म्हणत, आताचे शिष्य ‘सर’, ‘मॅडम’ म्हणतात, एवढाच फरक..गुरू-शिष्यांशी संवाद साधताना जा‌णवला तो असा संबोधनाचा फरक, त्यामागील भावना तीच होती - विद्यादानाची आणि अर्जनपर्वाची…

पुण्याजवळची आळंदी सगळ्यांना परिचित आहे, ती माऊलींचे समाधीस्थळ म्हणून..खुद्द माऊली हे आदर्श शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण. त्याच आसमंतात दिनेश गुंड सरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र एका आधुनिक गुरूकुलाच्या रूपाने उभे आहे. सरांच्या ३२ विद्यार्थिनी आज पोलिस दलात विविध पदांवर कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. स्वत: आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून प्रख्यात असणारे दिनेश सर, इथल्या कुस्तीगीर विद्यार्थिनींसाठी मात्र ‘त्वमेव माता पिता त्वमेव’ अशा भूमिकांमध्ये आहेत. ‘मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, असे न म्हणता केंद्रातली प्रत्येक विद्यार्थिनी मला माझ्या मुलीच्या रूपात दिसते,’ ही सरांची भावना आहे. इथे कुस्ती शिकण्यासाठी दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीची जबाबदारी दिनेश अक्षरश: ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ या पद्धतीने निभावतात. इथे दाखल होताना जी ‘कच्ची मडकी’ असतात, ती इथल्या वातावरणात, प्रशिक्षणात, संस्कारांत, शिस्तीत एकदम ‘फिनिश्ड’ बनून जातात. खेळाडू म्हणून तर ती उत्कृष्ट घडतातच, पण माणूसपणाच्याही कित्येक पायऱ्या सहज चढून जातात..सरांच्या शिष्यांशी संवाद साधताना, त्यांच्यातले हे परिवर्तन, त्यांच्यातील गुरू-शिष्य नात्याला उजळून टाकणारे वाटले.

सरांनी जणु मला दत्तक घेतलंय - अश्विनी मुंडे (राष्ट्रीय कुस्तीपटू)

मी  मूळची परभणीमधल्या गंगाखेडची. घरची गरिबी. पण कुस्तीची आवड होती. एकदा टिव्हीवर सरांना पाहिले आणि सरळ आळंदीला आले. सरांनी जणु मला दत्तक घेतलंय. आईवडिलांच्या मायेचा अनुभव मला येतो. मला राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळालं, ती वाटचाल त्यांच्यामुळेच झाली. अर्थात शिस्तही तशीच कडक आहे त्यांची, पण मायाही तेच करतात. सर आणि मॅडम म्हणजे मला आईच्या जागीच दिसतात. सरांनी माझ्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मी पूर्णवेळ सराव करते. फक्त परीक्षेपुरती औरंगाबादला जाते. फक्त खेळापुरतंच नव्हे तर दैनंदिन जगण्यातही कसं बोलावं, वागावं...हेही सरच शिकवतात. मला तर सर देवाच्या ठिकाणी दिसतात,”.

देशासाठी आणखी एक पदक मिळवायचयं... - वैष्णवी जावळकर (आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू)

‘आमच्या घरी म्हणजे  पुण्याजवळच्या खानापूर येथे कुस्तीची आवड होती. साहजिकच मलाही कुस्तीविषयी प्रेम वाटायचं. त्या आवडीला ध्येय बनवलं ते सरांनी. त्यांच्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकले. मला जपानला खेळण्याची संधी मिळाली. तिथे माझं पदक हुकलं, पण सरांनी मला नाउमेद होण्यापासून वाचवलं. त्यांनी प्रयत्नांवर भर द्यायला आणि कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करायला शिकवलं. जपानमधला अनुभव पुढच्या स्पर्धेत कामी आला. त्यामुळे मी जॉर्जियामधल्या स्पर्धेत पदक मिळवण्यात यशस्वी झाले. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते. बाहेरूनच अभ्यास करते आणि परीक्षेपुरती कॉलेजमध्ये जाते. केंद्रात सरांची शिस्त प्रचंड आहे. पण ते आम्हाला त्यांच्या कुटुंबियांपैकीच एक मानतात. सरावात हयगय त्यांना मान्य नाही. खूप मेहनत करून घेतात आणि खूप मायाही करतात. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशासाठी अजून पदकं मिळवण्याचं माझं स्वप्न आहे. तीच माझी गुरूदक्षिणा असेल, असं वाटतं...’”

सरांच्या व्यक्तिमत्वात एक आश्वासकता... - शैला धुमाळ (शिरूर मल्लसम्राट)

दिनेश सरांच्या व्यक्तिमत्वात एक आश्वासकता आहे. त्यामुळेच अवघ्या दीड वर्षांपूर्वी त्यांच्या सहवासात आलेल्या शैला धुमाळ या शिरूर तालुक्यातील मुलीलाही सर म्हणजे ‘आधारस्तंभ’ वाटतात. ‘माझ्या पपांना कुस्तीची प्रचंड आवड होती. मी कुस्ती शिकावी, अशी त्यांची इच्छा होती. ते गेल्यावर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला सरांशिवाय दुसरे कुणाचे मार्गदर्शन मिळणार होते? मी सरांना विचारून थेट केंद्रावरच राहायला आले. पहाटे चार वाजल्यापासून इथे दिवस सुरू होतो. सोबतीला मी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्या अभ्यासाकडेही सरांचे जातीनं लक्ष असते. मला माझ्या गावातला ‘शिरूर मल्लसम्राट’ हा सन्मान मिळाला, तेव्हा माझ्यापेक्षा सरांना जास्त आनंद झाला होता. माझ्यासाठी सर आईवडिलच आहेत. तोच आदर, तोच दरारा आणि तोच जिव्हाळा त्यांच्याविषयी वाटतो,”.     

सरांमुळेच एक डॅशिंग ऑफिसर बनले... - प्रियांका बुरंगले (पोलिस उपरनिरीक्षक)

सध्या रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस ठाण्यात पोलिस उपरनिरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणारी प्रियांका बुरंगले मूळची बारामतीची. ‘वडील साखर कारखान्यात कामाला तर आई घरीच असायची. मला एक भाऊ आणि एक बहीण. खेळांची जबरदस्त आवड. त्यातही कुस्तीचे प्रेम अधिक. त्यामुळे मी सरांकडे शिकू लागले आणि थेट राष्ट्रीय स्तरावर खेळले. सोबतीनं मी राज्य सेवा परीक्षेचा (एमपीएससी) अभ्यास करत होते. पोलिस दलात जाण्याचे स्वप्न होते. अभ्यासात सुरवातीपासून चांगली होते. त्यामुळे सरांनी खेळाइतकंच माझ्या अभ्यासाकडेही लक्ष पुरवलं. वेळोवेळी मला अभ्यासात मदत केली. माझ्या प्रत्येक अडचणीला, समस्येला ‘सर’ हेच उत्तर असायचं. यशापयशापेक्षा आपण प्रयत्नांत कमी पडता कामा नये, हा सरांचा मंत्र असायचा. सरांच्या मार्गदर्शनामुळेच मी २०१५ साली एमपीएससी उत्तीर्ण झाले आणि पोलिस दलात रुजू झाले. या परीक्षेच्या ग्राऊंड राऊंडसमध्ये मी पैकीच्या पैकी गुण मिळवू शकले, याचे सर्व श्रेय सरांकडेच जाते. खेडेगावातल्या गरीब घरातल्या मुलीला त्यांच्या संस्कारांनी, मार्गदर्शनाने एक डॅशिंग ऑफिसर बनवले. सर असल्यामुळे आपण आईवडिलांपासून दूर आहोत, असे कधी वाटलेच नाही. सरांचे सगळे कुटुंबच आमचेही कुटुंब बनले. मी तर त्यापुढे जाऊन असे म्हणेन, की त्यांच्या कुटुंबाचा साऱ्या शिष्यांच्या रुपाने शाखाविस्तारच झाला आहे. ही मातृशाखा अशीच कायम पाठीशी राहो, ही प्रार्थना.

jayubokil@gmail.com

(लेखिकेचा संपर्क - ९८८१०९८०४८)  

बातम्या आणखी आहेत...