आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड आय...:‘चुडेल्स’ : अब मर्द को दर्द होगा...

जितेंद्र घाटगे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी ५ वर प्रदर्शित झालेल्या ‘चुडेल्स’चे सगळ्यात मोठी यश हे की ही फक्त पाकिस्तानची गोष्ट नसून भारतीय उपखंडातील समाजजीवनाबद्दल आहे हे पहिल्या एपिसोडपासूनच आपल्या ध्यानात येऊ लागते. पाकिस्तानातील स्त्रिया म्हणजे निव्वळ सनातनी वृत्तीने ग्रासलेल्या ह्या समजुतीला छेद देत एकेक अंतःस्तर निष्ठुरपणे उलगडत जातात. बऱ्याचदा आपलं सामाजिक-राजकीय भान एका ठराविक दिशेने वळवण्यात मिडियाचा हात असतो. त्यामुळे पाकिस्तानची आजवर ठसवली गेलेली प्रतिमा ही सनातनी वृत्तीची अन मागासलेपणाची आहे. दिग्दर्शक ह्या गोष्टी अमान्य न करता स्त्रीपात्रांच्या दु:खाचे अनेक पदर उलगडत परस्परविरोधी विचारांचं juxtaposition समोर ठेवतो. अर्थात तो पदर केवळ धर्मधिष्टीत नाही. त्यामुळे भारतसदृश दृश्य नजरेस पडत राहिल्याने आश्चर्य वाटत नाही.

‘चुडेल्स’ बद्दल काही लिहिण्याअगोदर हे नमूद करावे लागेल की ह्या वेबसिरिजचा दिग्दर्शक पाकिस्तानी असून भारतीय स्त्रीने (शैला केजरीवाल) याची निर्मिती केली आहे. पाकिस्तानी कंटेंट दाखवत असूनही लोकप्रियता लाभत असलेल्या ‘जिंदगी’ चॅनल वर तीन वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान तणावामुळे बंदी आली. राजकीय स्थित्यंतरे आपल्या व्यक्तिमत्त्वात अनभिज्ञपणे शिरकाव करून आपल्या आवडीनिवडी कसे बदलवू शकतात हे बघणं रोचक असतं. त्यामुळे समाजमाध्यमंमध्ये ‘चुडेल्स’ बद्दल चर्चा न होणे ही तशी आश्चर्यजनक बाब नाहीये. भारतीय समाज आणि त्यातील प्रश्न यांची प्रतवारी इतकी गुंतगुंतीची आहे की, कुठलाही एक विचार छोट्याश्या वर्गाला देखील एकसमान लागू पडत नाही. अशा परिस्थितीत अमुक एक पुस्तक नाही वाचलं, एखादा सिनेमा नाही बघितला, तरी कुणाच्याच आयुष्यात काहीच बिघडणारं नसतं. एखादा सिनेमा प्रदर्शित होणे किंवा कलाकृती जगासमोर येणे ही अभूतपूर्व घटना असू शकते का? किती साऱ्या कलाकृतीबद्दल ठामपणे असं म्हणता येईल. मात्र अनेक वर्षानंतर क्वचित एखादी कलाकृती समोर येऊन उभी राहते, जी पाहताना आपण "अनकोंशियस' पातळीवर कितीही कोरडं राहून मीमांसा केली तरी निर्लेप असं मागे काहीतरी उरतं. जिच्या विचारातील स्पष्टता, अभिव्यक्तीतील धैर्य आणि मांडलेले सिद्धांत पचवताना आपल्याला आधी ‘Learn to unlearn’ जमवाव लागतं. अशी कलाकृती पाहण्याआधीचे आपण अन पाहून झाल्यानंतरचे आपण यात मूलभूत पातळीवर बदल झालेला असतो. ही परिमाणे लावून बघितले असता, असीम अब्बासी दिग्दर्शित "चुडेल्स' झी ५ वर प्रदर्शित होण्याला वर्तमानकालीन जागतिक सिनेमा/वेबसिरिजच्या विश्वात एक महत्वाचा टप्पा म्हणून दखल घेण अनिवार्य ठरतं.

‘चुडेल्स’ ची कहाणी सुरू होते कराची शहरातल्या चार भिन्न पार्श्वभूमीच्या स्त्रियांपासून... समाजातील वेगवेगळ्या घटकातून आलेल्या असूनही त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे यातल्या प्रत्येकीच आयुष्य पुरुषप्रधान संस्थेने पिचलं गेलय. वकिलीचे शिक्षण घेतेलली आणि एक परफेक्ट गृहिणी म्हणून स्वतःलं सिद्ध करू बघणारी "सारा' कराचीतील उच्चभ्रू वर्गाचं प्रतिनिधित्व करते. आपल्या नवरा बाहेरख्याली हे कळल्यावर, "पत्नीला फसवणाऱ्या तमाम पुरुषवर्गाला' पर्यायाने पितृप्रधान संस्थेला धडा शिकवण्याच्या उद्देशाने एक डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करण्याचं ती ठरवते. ह्या कामात तिला सोबत मिळते ती अशा स्त्रियांची ज्या रूढार्थाने समाजाने "टाकलेल्या' आहेत. "जुगनू चौधरी' ही एलिट क्लास मध्ये अतिश्रीमंत वर्गात मोडणारी वर्किंग वूमन. समाजाने स्त्रियांसाठी ठरवून दिलेल्या अन वर्ज्य सांगितलेल्या ज्या गोष्टी करायला नको, जुगनू त्यात बुडालेली आहे... आपल्या पतीचा खून केल्याने २० वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आलेली "बतुल' - जिच्या चेहऱ्यावर केलेल्या कृत्याचा काहीएक लवलेश नाही, उलट त्याचा अभिमान असणारी... रूढीप्रिय घरात जन्माला येऊन सुद्धा बुरख्याआड चोरून बॉक्सिंगचे शॉर्ट्स घालणारी, बॉक्सिंग करून झाल्यावर आपल्या बॉयफ्रेंडसोबत चोरटं सुख अनुभवणारी "झुबैदा'... ‘अब मर्द को दर्द होगा’ ही टॅगलाइन घेऊन सुरू झालेल्या या चौघींच्या कामात अनेक स्त्रिया सोबत जोडल्या जातात. पत्नीची फसवणूक करणाऱ्या पुरुषांना पुराव्यानिशी पकडून देणं हे काम बुरख्याच्या दुकानाच्या आड सुरू होतं. प्रसिद्धी वाढते तसं यांच्या स्कॅनरच्या कचाट्यात शहरातला संपूर्ण पुरुषवर्ग ओढला जातो. त्यासोबतच समोर येतात हादरवून टाकणारी तथ्यं अन आपल्या आजवरच्या समजूतीला सुरुंग देणारे सत्य.

१९४९ साली ‘द सेकंड सेक्स’ हा ‘सिमोन द बोव्हूआर’ यांचा स्त्रीवादावरचा अभिजात ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा जगभरात खळबळ माजली होती. स्त्रीत्वाचा विविध अंगांनी एवढा सखोल विचार त्याआधी मांडला नव्हता. त्यामुळे ‘द सेकंड सेक्स’ वाचलेली व्यक्ती स्त्रीकडे आधीच्याच पूर्वग्रहदूषित नजरेने बघण केवळ अशक्य. हीच बाब चुडेल्स बाबत म्हणता येईल. ‘चुडेल्स’चे सगळ्यात मोठी यश हे की ही फक्त पाकिस्तानची गोष्ट नसून भारतीय उपखंडातील समाजजीवनाबद्दल आहे हे पहिल्या एपिसोडपासूनच आपल्या ध्यानात येऊ लागते. पाकिस्तानातील स्त्रिया म्हणजे निव्वळ सनातनी वृत्तीने ग्रासलेल्या ह्या समजुतीला छेद देत एकेक अंतःस्तर निष्ठुरपणे उलगडत जातात. बऱ्याचदा आपलं सामाजिक-राजकीय भान एका ठराविक दिशेने वळवण्यात मिडियाचा हात असतो. त्यामुळे पाकिस्तानची आजवर ठसवली गेलेली प्रतिमा ही सनातनी वृत्तीची अन मागासलेपणाची आहे. दिग्दर्शक ह्या गोष्टी अमान्य न करता स्त्रीपात्रांच्या दु:खाचे अनेक पदर उलगडत परस्परविरोधी विचारांचं juxtaposition समोर ठेवतो. अर्थात तो पदर केवळ धर्मधिष्टीत नाही. त्यामुळे भारतसदृश दृश्य नजरेस पडत राहिल्याने आश्चर्य वाटत नाही.

दिग्दर्शक असीम अब्बासी जसा एकेक पापुद्रा काढत जातो तेव्हा सिरिज फक्त फेमिनिजम पुरती मर्यादित न राहता सोशल हॉरर म्हणून खोलवर परिणाम करायला सुरुवात करते. एखाद्या बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगाने आळीपाळीने आपलेच विकृत रूप दाखवण्याचे काम ‘चुडेल्स’ इतका सराईतपणे करते की त्यातून तुम्ही किती तावून सुलाखून बाहेर पडतात हे ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. कारण एका क्षणात मायक्रोस्कोपीक व्ह्यू दाखवून गहिरं काहीतरी आपल्या हाती लागलं आहे असा भास तो निर्माण करतो तर पुढच्याच सीन मध्ये मॅक्रोस्कोपीक व्ह्यू समोर ठेवून आपण त्याच गुंतागुंतीचा अविभाज्य घटक आहोत हे दाखवून देतो. खऱ्या आयुष्यात कितीही आव आणला तरी आपण परस्परविरोधी आणि सोयीस्कर तत्वज्ञानाच्या अपरिहार्य चौकटीत अडकले गेलेले असतो. चुडेल्स बघताना ध्यानात येऊ लागते की ही गोष्ट दुसऱ्या देशात, शहरात घडणारी नसून आपल्या भवतालची आहे, जो अनेकांसाठी कल्चरल शॉक असूनही त्याकडे डोळेझाक करता येत नाही. त्याच्या मुळापर्यंत जायचं असल्यास तो जिथे फरफटत घेऊन जाईल तिथवर जाण्याची तयारी हवी. बुरखा घालून लढणाऱ्या ह्या स्त्रियांच्या रूपाने दिग्दर्शक आयते उत्तर समोर ठेवत नसून उघडाबोडका, उग्र, रखरखीत आणि कुठल्याही भाबड्या आशावादाला थारा नसलेला शेवट दाखवतोय.

लेखक-दिग्दर्शक अब्बासी दहा एपिसोडच्या सिरिजमध्ये फेमिनिजमची उकल मांडताना ज्या गुंतागुंतीच्या विषयांना स्पर्श करतो तो चकित करणार आहे. बालविवाह, लग्नाच्या पहिल्या रात्री घरच्यांनी केलेली कौमार्य चाचणी, स्त्रीचा मातृत्वाचा, प्रजननाचा हक्क, बेकायदेशीर गर्भपात, घरगुती अत्याचार, बाललैंगिक शोषण, वंशद्वेष, वर्णद्वेष, वर्गवाद, फेअरनेस क्रीम इंडस्ट्री, ग्लॅमर इंडस्ट्री, उच्चभ्रू सेक्स रॅकेट, ब्रिटिश वसाहती-शैलीचे शिक्षण, आधुनिक human zoo आणि saarah baartman ची व्यंगचित्रं... ह्या विषयांचे परस्परसंबंध कुठलाही उसने आव न आणता एकामागोमाग एक समोर येतात तेव्हा सुन्न व्हायला होतं. स्त्रीत्व, कला, शिक्षण, अत्याचार यांची क्लिष्ट मांडणी उलगडून दाखवण्याचे अभूतपूर्व काम याआधी पाकिस्तानी सिनेसृष्टीत झालेले नाही. (अनुराग कश्यपच्या डार्क शैलीचा इथे प्रभाव वाटतो. अनुरागच्या अनेक सिनेमातील गाणी ‘चुडेल्स’मध्ये मूळ व्हर्जन पेक्षाही प्रभावीपणे वापरलेली दिसतात.)

‘चुडेल्स’ चे नाव अजून एका उल्लेखनीय गोष्टीसाठी सिनेमाच्या इतिहासात नोंदविले जाईल. कुठल्याही प्रकारचा सुचकपणा टाळून LGBTQ समुदायातील व्यक्तिरेखेचं थेट आणि बेधडक चित्रण आजवर एकाही मुख्य प्रवाहातल्या पाकिस्तानी सिनेमात/सिरीजमध्ये झालेले नाही. त्यांचा वावर चटपटीत लैंगिक दृष्यांपुरता नसून फेमिनिजम शब्दाची व्याप्ती विस्तृत करणारा आहे. जेलमधून बाहेर आलेल्या उतारवयातील दोन लेस्बियन स्त्रियांना आणि एका ट्रान्सजेंडर पात्राला महत्वाच्या भूमिकेत बघणे सुखद धक्का आहे. तर दुसरीकडे एक समलिंगी पात्र, - प्रेमच काय साधं अर्थपूर्ण सेक्शुअल नातं देखील वाट्याला न येण्याची खदखद व्यक्त करतो तेव्हा, आजवर उपेक्षित राहिलेल्या वर्गाच भारतीय उपखंडातील स्थान तपासून पाहण्याची निकड भासते.

चुडेल्समधला फेमिनिजम आणि त्याने आपल्यावर केलेला थेट परिणाम याउपर जाऊन अनेक अंगाने बोलण्यासारखं आहे. दिग्दर्शक असीम अब्बासी यांनी केलेली प्रतिकांची पुनर्मांडणी हा असाच एक उल्लेखनीय बदल. ज्या स्त्रियांसाठी बुरखा हे दडपशाहीचे प्रतीक आहे त्याच स्त्रिया बुरख्याला सुपरहीरो ड्रेस सारखे वापरताना दिसतात. गुप्तहेर म्हणून काम करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी बुरखा घातला जातो. (काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी गायक/संगीतकार ‘हरून रशीद’ यांनी ‘बुरखा अॅवेंजर’ ही लहान मुलांसाठीची अॅनिमेशन मालिका तयार केलेली. शाळेत शिक्षिका असणारी बुरखा घालणारी स्त्री अन्यायाविरुद्ध उभी राहते ही खर तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट. मात्र हीच शिक्षिका आपली ओळख लपवून बुरखा घातल्यानंतर ‘पुस्तक, पेन, पाटी ही हत्यार वापरत स्त्रियांवर अन्याय करणाऱ्याविरोधात हॉलीवूडच्या सुपरवुमन सारखा लढा देते!). अर्थात बुरखा अॅवेंजर ही फँटसी वाटावी अशी गोष्ट आहे. याउलट ‘चुडेल्स’ मधल्या स्त्रिया ‘हलाल डिझाईन्स’ नामक कपड्यांच बुटीक चालवताना त्याच्याआड स्त्रियांची फसवणूक करणाऱ्या पुरुषांना हलाल करण्याचा चंग बांधतात. असीम अब्बासी संस्थात्मक नीतीमत्ता आणि वैयक्तिक नीती यांच्यातला फरक तसेच व्यक्तिपरत्वे येणारा फोलपणा उलगडून दाखवतात. "चुडेल्स' मधली प्रत्येक स्त्री हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. नवऱ्याच्या हत्येचा अभिमान बाळगणारी बतुल तिचं कृत्य कधीच अमान्य करत नाही. उलट पुढेही तिच्याकडून झालेल्या कृत्याचे समर्थन करते.- "हम चाहते तो यही थे की, सब कानून के दायरे में हो, लेकिन किताब खोली तो समझ आया की कानून तो लिखा तुम मर्दों ने, तो हमने सोचा हम इसे दुबारा लिखेंगे, अपने किस्से, अपने कायदे और अपने उसूल, सब अपना. दायरे ही फाड़ देंगे.’ याचा अर्थ असा नाही की बतुल नीतीशून्य आहे, एवढचं की ती रूढ नैतिकतेला बांधील नाहीये. तिच्यात हा कडवटपणा कुठून आला याचा प्रेक्षक म्हणून शोध घेतल्यावर मात्र तिला कुठलेही लेबल चिपकवायला कुणी धजावणार नाही.

चुडेल्समधील सर्व स्त्री पात्रे ही सदोष आहेत. आपला स्वार्थ जसा त्यांना कळतो तशाच आपल्या असुरक्षितताही गोंजारता येतात. त्यामुळे त्यांना कधीच कुणाची सहानुभूती मिळणार नाहीये, तशी त्यांना गरजही नाहीये. निर्णय घेण्याची वेळ येत येते तेव्हा मागे खेचणारा भूतकाळ आणि घ्यावे लागलेले कटू निर्णय या गदारोळात विचारांची स्पष्टता पुढे येत राहते. स्त्री पात्रांची उन्मळून टाकणारी द्वंद्वात्मकता आणि त्यांनी घेतलेले निर्णय याची बाजू न घेता दिग्दर्शक फक्त त्यातली अपरिहार्यता समोर ठेवतो. त्यामुळे सिरीजमध्ये स्वतःच मांडलेल्या सिद्धान्तांची पुर्नरचना करायला त्यांना तपासून बघायला तो अजिबात मागेपुढे पाहत नाही. उदाहरणार्थ स्त्रीची फसवणूक करणारा पती समलिंगी असेल तर काय? समाजाच्या भीतीने त्याला आपल्या भावना दाबून ठेवाव्या लागत असतील तर यात दोष कुणाचा? अपरिहार्य अशा डॅमेज कंट्रोलने एखाद्या पुरुषाचा बळी गेल्यास कोण चूक कोण बरोबर? यातल्या कुठल्याच प्रश्नाची आयती उत्तरे आपल्याला मिळत नाही. मात्र प्रचंड अस्वस्थता, अखंड घालमेल मागे ठेवत मागे स्त्रीत्वाच्या आपल्या मर्यादित समजुतीला तपासून पहायला भाग पाडतो. सारा, बतुल, जुगनू, झुबेदा आणि इतर स्त्रियांच्या काउंटर अॅक्शनसाठी नितीभ्रष्ट समाज जबाबदार आहे. त्यामुळे ह्याच समाजाने घालून दिलेले वर्तणूकीचे नियम ह्या ‘चुडेल्स’ धुडकावून लावणारच.

‘द सेकंड सेक्स’ लेखिका ‘सिमोन द बोव्हूआर’ म्हणते की, ‘इतिहासातील कोणताही कालखंड घ्या, त्यात स्त्रीचा सामाजिक दर्जा बदलण्याची प्रक्रिया कधीही अखंडपणे चाललेली नाहीये. ती त्या त्या ठिकाणच्या राजकीय स्थैर्यशी निगडीत असते. परकीय आक्रमण झाले किंवा एखाद्या राज्याचे अस्तित्व धोक्यात आले की त्याचे थेट परिणाम स्त्रीच्या सामाजिक दर्जावर होतात.’ खऱ्या आयुष्यात हे गृहीतक कदाचित इथून पुढेही लागू होईल. मात्र ‘चुडेल्स’ मधल्या स्त्रिया यातून सुटण्याचा अन अखेरीस बंड करून भिडण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्या थांबतील असं वाटत नाही. निदान सिनेमात तरी! आणि खऱ्या आयुष्यात त्यांच काय? प्रत्येकाने हे स्वतःपुरतं शोधून काढायच आहे.

jitendraghatge54@gmail.com

संपर्क - 9689940118