आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Journalist Nilesh Chavan Writes About Bihar Election And Maharashtra Connection For Divya Marathi Rasik Diwali Special

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक:लेखाजोगाः बिहार निवडणुकीतील महाराष्ट्र कनेक्शन

3 महिन्यांपूर्वीलेखक: निलेश चव्हाण
  • कॉपी लिंक

बिहार निवडणूकीच्या निकालांकडे पाहत असताना महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या कामगिरीविषयी चर्चा करणं आवश्यक आहे. हे तीन नेते आहेत, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस,एमआयएमचे महाराष्ट्रातील खासदार इम्तीयाज जलील आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे... हे तिन्ही नेते बिहार निवडणूकीच्या काळात आपापल्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. या तीनही नेत्यांची त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी बिहारमध्ये कशी कामगिरी झाली याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

---------------

बिहार निवडणूकीच्या निकालांकडे पाहत असताना महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या कामगिरीविषयी चर्चा करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस,एमआयएमचे महाराष्ट्रातील खासदार इम्तीयाज जलील आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे... हे तिन्ही नेते बिहार निवडणूकीच्या काळात आपापल्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. या तीनही नेत्यांची त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी बिहारमध्ये कशी कामगिरी झाली याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

सुरूवात अर्थातच देवेंद्र फडणवीसांपासून... आपल्या पक्षाला मोठं यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावल्याचं भाजपचे बिहारमधील विजयी आकडे सांगतात.बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजप हा एनडीएतील मोठा पक्ष ठरलाय. एनडीएला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळत असताना मोठा बदल झाला तो हा, की भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. भाजपकडे राज्यभर अपील होईल असा चेहरा बिहारमध्ये नाही.उपमुख्यमंत्री राहिलेले सुशीलकुमार मोदी हेच भाजपचा चेहरा राहत आले. पण ते राज्यभर अपील मिळवू शकले नाहीत. गिरीराज सिंह ,नित्यानंद राय या नेत्यांनाही मर्यादा आहेत. यामुळे नितीशकुमारांनाच पुढे करण्याशिवाय भाजपला पर्याय नव्हता. पण असे असले तरी या निवडणूकीत लहानाचा मोठा भाऊ होण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते.त्यामुळे आपल्या जागा वाढवायच्या आणि नितीश कुमार यांच्या जागा होतील तेवढ्या कमी करायच्या अशी आखणी भाजपने केली होती.या जबादारीतील महत्त्वाचा वाटा प्रभारी म्हणून अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर येतो.आजवर नेहमी उत्तर भारतातून नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येत राहिले पण महाराष्ट्रातील नेते फार क्वचितच इतर राज्यातल्या निवडणूकीत महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात.त्यामुळे फडणवीस यांच्या या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित होते. सुशीलकुमार मोदी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असताना कोरोनाग्रस्त झाल्याने ग्राउंडवर नव्हते.भाजपचे चाणक्य अमित शहा हेही बिहारच्या मैदानात दिसले नाहीत,अशावेळी भाजपचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी निश्चितच वाढली होती. नितीशकुमारांसारख्या मुरब्बी मित्राच्या जागा, चिराग या तरुण मित्राच्या मदतीने कमी करण्याचा डाव म्हटला तर अंगाशी येणाराही होता पण तो यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालंय. प्रचारा दरम्यान फडणवीसांनाही कोरोनाने गाठलं. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात ते तिथे नसले तरी भाजपाची तिथली दिशा ठरत असताना ते तिथे होते आणि ती दिशा फळाला आल्याने इथून भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार आहे.

बिहारमध्ये आणखी एका पक्षाच्या कामगिरीची मोठी चर्चा होते आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम हा तो पक्ष... बिहारच्या सीमांचल भागात पाच जागा जिंकत एमआयएमने मुसंडी मारली. या प्रचारात ओवैसींच्या सोबतीला स्टार प्रचारक म्हणून एमआयएमचे महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील होते.अनेक दिवस तिथं तळ ठोकून राहिल्याने आणि प्रचार सभांचा धडाका लावल्याने हे महत्त्वपूर्ण यश त्यांच्या वाट्याला आल्याचं दिसतं. हे यश यासाठी महत्त्वाचे, कारण सीमांचल हा भाग तसा महागठबंधनचा पाठीराखा.मुस्लिम मतदारांची मोठी संख्या या भागात आहे.काँग्रेसपक्षाचे बिहारमधील एकमेव खासदार याच भागातील किशनगंज इथले.शिवाय मुस्लिम-यादव ही हमखास राजदची व्होटबँक म्हणून ओळखली जाते.त्यामुळे अशा ठिकाणी एमआयएमला वाव मिळणार नाही असं म्हटलं जात असताना, ही निरीक्षणं मोडीत काढत एमआयएमने कोचाधामन,जोकीहाट,बायसी,अमौर,बहादुरगंज या पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. "वोटकटुआ पार्टी' असा शिक्का मारला जात असताना एमआयएमने मिळवलेले हे यश महत्त्वाचे ठरते.शिवाय महागठबंधनचे उमेदवार एमआयएममुळेच पराभूत झालेत या दाव्यामध्ये फार तथ्य असल्याचं दिसत नाही.त्याचे कारण म्हणजे ज्याठिकाणी एनडीएचे उमेदवार विजयी झालेत तिथे त्यांनी घेतलेल्या मताधिक्क्यात आणि एमआयएमच्या मतांमध्ये मोठे अंतर आहे.त्यामुळे हा दावा पोकळ ठरतो. उदाहरण द्यायचे झाल्यास प्राणपुर या मतदारसंघात एनडीएचा उमेदवार 2 हजार 972 मतांनी विजयी झाला. तिथे एमआयएमच्या उमेदवाराला 508 मतं मिळाली आहेत.तसेच साहेबगंज या ठिकाणी एनडीएचा उमेदवार 15 हजार 333 मतांनी विजयी झालाय त्या ठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला 4 हजार पंचावन्न मते मिळाली आहेत. तर नरपतगंज या ठिकाणी एनडीएचा उमेदवार 28 हजार 610 मतांनी विजयी झालाय तिथे एमआयएमच्या उमेदवाराला अवघी 9 हजार 495 मतं मिळाली आहेत.उर्वरित ठिकाणीही हेच चित्र आहे.फक्त राणीगंज या ठिकाणी एनडीएचा उमेदवार 2 हजार 304 मतांनी विजयी झालाय तिथे एमआयएमच्या उमेदवाराला 2 हजार 412 मतं आहेत.पण हा फरकही फार नाही..एकंदरीत एमआयएम वोटकटुआ पार्टी ठरल्याचं चित्र मतदानावरून तरी दिसत नाही.एमआयएमला तिथं चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचं यश असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे प्रचारातील साथीदार खासदार इम्तियाज जलील यांना द्यावे लागेल.एमआयएम हा पक्ष हळूहळू आपला विस्तार करत चाललाय त्यात ओवैसी यांना या वाटचालीत आता महाराष्ट्रातून खासदार जलील यांच्यासारखा नेता मिळालाय.सीमांचलला लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आता पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, तिथेही एमआयएम लढणार असल्याचे ओवैसींनी जाहीर केलेय.त्यामुळे तिथेही आता खासदार जलील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

भाजप आणि एमआयएम पक्षांच्या चांगल्या कामगिरीबरोबरच बिहारमध्ये एका पक्षाच्या वाईट कामगिरीविषयीही चर्चा होते आहे. तो पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस..एकेकाळचा इथं सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या मागील वेळेसच्या २७ जागाही राखता आल्या नाहीत आणि तब्बल ७० जागा लढवून अवघ्या १९ जागांवर विजय मिळवता आलाय.पण अशातही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या युवानेत्याच्या बिहारमधील कामगिरीविषयी चर्चा होते आहे, तो नेता म्हणजे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे. बिहारच्या निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचारार्थ सत्यजीत तांबे तळ ठोकून होते.त्यांना बिक्रम विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ सौरभ यांनी तब्बल 35 हजार मतांनी विजय मिळवलाय. त्यामुळे काँग्रेसच्या अपयशाची चर्चा जोर धरत असताना बिक्रम इथल्या काँग्रेसच्या विजयाचं कनेक्शन महाराष्ट्रतील युवानेते सत्यजीत तांबे हे आहेत..बिहारमध्ये काँग्रेसला चेहरा नाही.तिथल्या जातीय हिस्सेदारीच्या राजकारणातही काँग्रेसला स्थान राहिलेले नाही. इतर पक्षांच्या कुबड्या घेऊनच तिथे लढावे लागते आहे.काँग्रेसची संघटनात्मक ताकद तिथे राहिलेली नाही अशात हा विजयही महत्त्वाचा ठरतो.काँग्रेसने लढवलेल्या ७० जागा ह्या जास्त झाल्या हे खरे असले तरी त्या बहुतांश जागा ह्या महागठबंधनला विजयासाठी अवघड अशाच होत्या हेही तिथले जमीनी वास्तव आहे.त्यामुळे देशभरातून काही नेत्यांवर तिथल्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी काँग्रेसकडून देण्यात आली होती.त्यात महाराष्ट्रातील युवा नेते सत्यजीत तांबे यांची कामगिरी फळाला आल्याचे दिसते.यामुळे इथून पुढच्या निवडणुकांमध्येही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

---------

(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि स्वतंत्र पत्रकार आहेत.)

nileshchavan2755@gmail.com

बातम्या आणखी आहेत...