आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:कथा तिच्या उद्धटपणाची... व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची!

किरण सोनावणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झोमॅटो गर्ल... प्रियंका मोगरे नुकतीच जामीनावर तुरुंगातून बाहेर आली आहे. तब्बल १४ महिने आणि सात दिवसांनी... अपराध होता एका ट्रॅफिक हवालदाराशी घातलेली हुज्जत. साडेतीन वर्षांच्या लेकीशिवाय जगात आधार देण्यासाठी कोणीही नाही. सगळेच दुरावलेले... प्रियंकाच्या प्रकरणामुळे पोलिस आणि न्याय यंत्रणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर तोडगा निघेल तेव्हा निघेल मात्र सध्या स्वत:च्या हिमतीवर एकेकाळी आयुष्याशी झगडून यशाच्या वाटेवर निघालेल्या प्रियंकाच्या आयुष्याला ब्रेक लागले आहेत. तिची नोकरी गेलीये, व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून तिची पुरती बदनामी झालीये आणि पुन्हा एकदा दुर्दैवाच्या फेऱ्यात ती अडकली आहे.

तो दिवस रिया चक्रव्रतीचा होता... मुंबईच्या भायखळा तुरुंगाबाहेर देशभरातील मीडिया प्रतिनिधींची तुडुंब गर्दी होती. मी, माझे मित्र राज असरोंडकर आणि स्वप्नील पाटील मात्र निवांत एका बाजूला कठडा पकडून उभे होतो. आम्ही रियाची नव्हे तर प्रियाची म्हणजेच प्रियंका मोगरेची तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहत होतो. १४ महिने ७ दिवस... "प्रयास" आणि "कायद्याने वागा" या सामाजिक संघटनेच्या प्रयत्नानंतर प्रिया आज बाहेर येणार होती. तिच्या मागे ग्लॅमर नसल्याने आणि ही टीआरपीची स्टोरी नसल्याने प्रिया सुटली काय किंवा आतमध्ये असली काय, प्रस्थापित माध्यमांच्या संवेदनशीलतेच्या परिघात ती येत नव्हती. मात्र याच प्रियाचा व्हिडिओ त्याच माध्यमांसाठी १४ महिन्यांपूर्वी ब्रेकिंग न्युज ठरली होती.

झोमॅटो गर्ल ने की पुलीस से बत्तमीजीं... "झोमॅटोच्या डिलीव्हरी गर्लचे ट्रॅफिक पोलिसांसोबत ग़ैरवर्तन... अशा बातम्यानी दोन-तीन दिवस वृत्तपत्रं आणि वृतवाहिन्यांनी या झोमॅटो गर्लचे प्रकरण चवीने चघळले. अनेकांच्या मोबाईल मध्ये ही क्लिप फिरत होती. याप्रकरणाची सोशल मीडियावर देखील उलट-सुलट चर्चा होती. त्यानंतर मात्र या झोमॅटो गर्लचे क़ाय झाले? ती कुठे आहे? क़ाय करते? याचे कुणालाच तसे काही देणे घेणे नव्हते, त्यांच्यासाठी ही "बात आयी गई' झाली होती.

प्रियंका मोगरे वय २८, पदवीपर्यंत शिक्षण, अतिशय अस्खलित इंग्लिश आणि सोबतच इतर सात भाषांवर प्रभुत्व... जगण्याने ओतप्रोत भरलेली, स्व:ताच्या जगण्याचे नियम स्वत: ठरवणारी तरुणी, परिस्थितीशी कायम दोन हात करून मेहनतीने जगणारी एक धीट तरुणी.

तो दिवस होता ८ ऑगस्ट २०१९... स्थळ होते वाशी, सेकटर १७, (नवी मुंबई) आणि वेळ होती संध्याकाळची... झोमॅटोसाठी डिलिव्हरी गर्लचे काम करणारी प्रियंका तिच्या बाईकवरून या एरियात एका ऑर्डर देण्यासाठी निघाली होती. तितक्यात तिचा मोबाईल वाजला आणि कॉल घेण्यासाठी तिने बाईक बाजूला घेऊन तसेच गाडीवर बसलेल्या स्थितीत कॉल घेतला. ती फोनवर बोलत असताना तिच्या लक्षात आले की, मागून ट्रॅफिक पोलीस तिच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो काढत आहे. प्रियंका त्या ट्रॅफिक पोलिसाला म्हणाली, ""पुढे पण प्लेट आहे, पुढून फोटो काढा आणि मी काही नियम मोडलेला नाही, मी हॉल्टिंगवर आहे''. झालं... साध्या बाईकच्या पार्किंगवरून वादाला तोंड फुटलं आणि त्यातच प्रियंकाचा तोल गेला. ती पोलिसांशी उद्धटपणे बोलली, तिने स्वतःच्या मोबाईलने ते सगळं शुट करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांचा मोबाईल हिसकावला आणि तो परत त्यांच्या अंगावर टाकला.

एरव्ही ट्रॅफिक पोलीस आणि नागरिक यांच्यात अनेकदा अशी भांडणे होतात, त्यात काही प्रकरणाच्या क्लीप देखील व्हायरल होतात. मात्र त्या प्रत्येक प्रकरणात पुढे जाऊन गुन्हे दाखल होतातच असे नाही. एकमेकंाशी बोलून माफी मागून, ताकीद देऊन प्रकरण तिथेच मिटवलं जातं. मात्र याप्रकरणात एक सेल्स गर्ल आपल्यासोबत आरेरावीची भाषा करते, हे पोलिसांच्या जिव्हारी लागलं होतं, त्यांचा पोलिसी अहंकार दुखावला होता आणि त्यामुळे त्यांनी तिला धडा शिकवण्याची खूणगाठ बांधली. त्यानंतर पोलिसांनी ते काम अतिशय तत्परतेने केले. पोलिस स्टेशन वरून ज्यादा पोलीस मागवून घेतले. यावेळी प्रियंका अतिशय सभ्यतेने पोलिसांना प्रकरण काय आहे ते सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र पोलिसांनी तिला पोलिस स्टेशनला नेले आणि तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, भारतीय दंड विधान (IPC) 353, 294, 393, 506 आणि 504 कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडिया वर पसरला, आणि तिथून तो वृत्त वाहिन्यांच्या कार्यालयात पोहचला. प्रियंकाला न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी आपली बाजू जोरदारपणे मांडली. त्यामुळे कोर्टाने प्रियंकाला काही जामीन दिला नाही, आणि तसेही तिच्या बाजूने कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात बाजू मांडणारे होते तरी कोण? त्यामुळे तिची रवानगी थेट भायखळा जेलच्या महिला सेलमध्ये झाली.

प्रियंकाला पोलिसांसोबत उद्धट वागणं खूप महाग पडलं होतं, कारण तिची अवघ्या साडेतीन वर्षांची लहान मुलगी सासूबाईंकडे सोपवावी लागली होती. मात्र एका महिन्याने पुन्हा जेंव्हा प्रियंकाची केस सुनावणीसाठी आली तेव्हा कोर्टाने प्रियंकाला २५ हजार रुपयांच्या दोन सोल्वनसीवर जामीन मंजूर केला. मुलीसोबत एकटी राहणाऱ्या प्रियंकाला यात ना तिच्या परिचित, ना सासर, ना माहेर, ना मित्रमंडळीनी मदत केली. त्यामुळे प्रियंका जामीन मिळूनही पुन्हा तुरुंगातच खितपत पडली होती. प्रियंकाच्या आयुष्यात जरा डोकावलं तर, प्रियंका ही आई-वडील विभक्त असलेल्या कुटुंबात आईकडे वाढली, शिकली आणि पदवीधर झाली. हुशार असल्याने तिने स्वत:च्या गुणवत्तेवर नोकरी मिळवली. अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या, गोव्यामध्ये एका कंपनीत ती आठ वर्ष एच आर विभागात होती. बाइक रायडिंग, ट्रेकिंग, गाणी, घर सजवणे आणि स्वयंपाक करणे असे छंद ती जोपासून होती. त्यातच ती प्रेमात पडली आणि त्यातून तिला एक मुलगी झाली. जस जसे दिवस जात होते तशी प्रियंका अस्वस्थ होत गेली. मित्रांना मदत मागून पाहिली, सासरच्यांनी हात वर केले, म्हातारे वडील प्रियंकाला मदत करण्याचा स्थिती नव्हते, महिन्या मागून महिने जात होते, तसा प्रियंकाचा धीर सुटत होता. ती बाहेर येण्यासाठी धडपडत होती.

फेब्रूवारी महिन्यात "प्रयास'कडे प्रियंकाची केस आली आणि पुढची प्रोसिजर सुरू होणार होतीच तितक्यात मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. सर्वच काम ठप्प झाली. तेंव्हापासून प्रयासची टीम प्रियंकाला बाहेर काढ़ण्यासाठी प्रयत्न करीत होती. "प्रयास' हा "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स"च्या अंतर्गत प्रकल्प आहे,जो महाराष्ट्र शासन तुरुंग प्रशासन यांच्या सहकार्याने चालवला जातो. यात अंडर ट्रायल कैद्यांना कायदेशीर मदत, अत्याचार पीडित महिला, मुले यांना मदत, त्यांचे पुनर्वसन कारण्यासाठी ही संस्था काम करत असते. प्रियंकाची ही व्यथा "प्रयास'कडून "कायद्याने वागा' लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांना समजली, त्यांनी प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला आणि यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचे ठरवले. प्रियंका १४ महिन्यांपासून तुरुंगात असल्याचे वृत्त ‘द वायर’मध्ये प्रसिद्ध झाले. इंग्रजीत हे वृत्त प्रकाशित झाल्याने त्याची दखल विदेशी पत्रकारांनी घेतली. हे वृत्त फाउस्टो गायडीस (Fausto Giudice) या लेखक-पत्रकाराने ५ ऑक्टोबरला फ्रेंच भाषेत आणि ६ ऑक्टोबरला इटालियन भाषेमध्ये ‘ट्लाक्सकाला’ (Tlaxcala) या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केले. इतकेच नव्हेतर प्रियंकाच्या जामिनासाठी किती पैसे आवश्यक आहेत, याची विचारणा फाउस्टो गायडीस यांनी केली आणि कमी पडणारे पैसे युरोपातून उभे करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. इंग्रजी आणि विदेशी वृत्तपत्रात ही बातमी आल्याने पोलीस, न्यायालयाची यंत्रणा हलली. यात वसईचेडॉ. कैलासनाथ कोपीकर यांनीही मदत देऊ केली. मात्र ‘प्रयास’ संस्था आणि ‘कायद्याने वागा यांनी रक्कम उभी केली आणि ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंग मोरे यांनी जामिनाचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात करण्यासाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आणि २५ हजार रु. रोख रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर प्रियंकाला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.

प्रियंकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. झाल्याप्रकारामुळे तिची नोकरीही गेली आहे आणि तिच्या घराचे भाडेही अद्याप भरलेले नाही. दोन जामीनदार मिळवण्यासाठी तिची धावपळ अद्याप सुरू आहे. आता तिच्यापुढे पुन्हा आयुष्य उभे करण्याचे आव्हान तर आहेच सोबत आपली व्हिडिओमधील प्रतिमा देखील पुसून टाकण्याचे आव्हान अधिक मोठं आहे. प्रियांका ही काही गुन्हेगार प्रवृत्तीची नाही. केवळ पार्किंगवरून सुरू झालेल्या वादाची तिला फार मोठी शिक्षा झाली असून सरकारने याप्रकरणात संवेदनशीलतेने विचार करून एक तरुणी जिच्या पुढे पूर्ण उभे आयुष्य आहे, तिच्यासाठी जसे राजकीय आंदोलकांचे गुन्हे मागे घेतले जातात, तसेच प्रियंकावरील गुन्हा मागे घेऊन तिला जगण्याची आणि वाढण्याची संधी सरकारने तिचे पालकत्व घेऊन करावे अशी मागणी "कायद्याने वागा" लोकचळवळ तर्फे मुख्यमंत्री, अजित पवार, बच्चू कडू आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.

प्रियंका मोगरे हिला मदत मिळाली, ती बाहेर आली आहे मात्र तिच्या या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीकडे न्याय व्यवस्था म्हणते जामीन हा आरोपीचा अधिकार आहे आणि अशा अटी घालते की, त्यामुळे अनेक कैदी ज्यांचा गुन्हा अतिशय किरकोळ किंवा सौम्य स्वरूपाचा आहे आणि जामीन मंजूर होऊनही ते तुरुंगात खितपत पडले असतील तर त्यांच्यासाठी खाजगी किंवा स्वयंसेवी संघटना नव्हे तर सरकारी यंत्रणा असावी. जेणेकरून अशा अंडर ट्रायल कैद्याना बाहेर येण्याचा मार्ग उपलब्ध होईल. एखादी तरुणी किंवा तरुण थोडक्यात चुकला असेल तर पोलिस यंत्रणेने संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळणे गरजेचे आहे. पोलिस यंत्रणा कुणाचे आयुष्य खराब करण्यासाठी नाही आहे, हे पोलिसांना पुन्हा एकदा समजावून देण्याची गरज आहे. "कायद्याने वागा' लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात दरोडा आणि सरकारी कामामध्ये अडथळा हे गुन्हे कसे लागू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खरं तर कायद्याच्या चौकटीत शक्य असेल, तर प्रियंकाविरोधातला गुन्हा शासनाने न्यायालयाला विनंती करून मागे घेतला पाहिजे.

‘आज आपण जर प्रियंकाला फोन केला तर तिला बाहेर निघाल्यावर सतत भीती वाटत असते. तिच्या पुढे दोन जामीनदार मिळवण्यासाठी तिची धावपळ सुरू आहे, हाताला काम नाही आणि खिश्यात दाम नाही. एका छोट्या चुकीने प्रियंकाचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. ""जो पर्यंत केस सुरू आहे तो पर्यंत कोर्टात हेलपाटे मारणे नशिबात आले आहे, नोकरी मागायला गेल्यावर व्हिडिओ मधून झालेली बदनामी पुन्हा समोर येते आहे. मात्र मी हरणार नाही, मी यातून देखील उभी राहीन आणि माझी जी प्रतिमा झाली आहे, तशी मी नाहीये हे येणाऱ्या काळात दाखवून देईल'' हा प्रियंकाचा निर्धार आहे.

maxmaharashtra2020@gmail.com