आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन विशेष:#खंडेराव... सोशल मीडियावरची एक समृद्ध अडगळ!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला सांस्कृतिक राजकारणाची कृतीशील दृष्टी दिली

कुणाल गायकवाड

सोशल मिडीयावर असलेल्या अनेक ट्रेंडपैकी #खंडेराव हा ट्रेंड गेली कित्येक वर्षे सुरू आहे. बहुतांश शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या व शहरात स्थिरावलेल्या अर्बन नेटकऱ्यांनी हा ट्रेंड सेट केला. कधी खंडेराव टिंगलीचा विषय असतो तर कधी कौतुकाचा... काहींना हा नेमका खंडेराव कोण आहे व त्यामागे सांस्कृतिक पार्श्वभूमी काय हे माहित नसते परंतु त्यानिमित्ताने एक किमान धागा पकडून अनेक लोकं लिहिती झाली. खंडेरावच्या चुलीवरच्या मटणापासून ते गावाकडील शेतातील फोटो असे अनेक विषय कौतुकाने सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत असतात. डॉ.भालचंद्र नेमाडेंच्या कांदबऱ्यातील पात्रे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेत अनेक पिढ्यांनी त्यांना वाचलंय, प्रेम केलयं, टिकाही केली. परंतु सोशल मिडीयाच्या स्पेसमध्ये "हिंदू' कांदबरीतील खंडेराव पात्र इतकं सोशल मिडीयावर कायम ट्रेंडमध्ये का असतं? त्यामागे नेमक्या काय प्रेरणा आहेत? त्यावर एक दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न.

महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला सांस्कृतिक राजकारणाची कृतीशील दृष्टी दिली. अर्थात महात्मा फुले सक्रीय आणि प्रभावशाली समाजसुधारक आणि एका व्यापक अर्थाने ब्राम्हणत्तेर राजकारणाचे क्रांतीकारक आहेत. पेशवाईच्या स्वरकल्पनाविलासात रमणाऱ्या तुच्छतावादी जातीयवादी परिस्थितीला थेट भिडण्याची ताकद आणि वकूब महात्मा फुल्यांमध्ये होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले राजकारण बेडरपणे पुढे नेले. परंतु एवढं सर्व बेधडक आणि कृतिशील व्यक्तीमत्व असताना त्यांना महाराष्ट्राला सांस्कृतिक पर्याय का सुचवावे वाटले? त्यांनी आपल्या राजकारणाचा भाग म्हणून सामाजिक-आर्थिक शोषणावर ग्रंथ लिहिलेच परंतु त्यांना “तृतीयरत्न’ नाटक, “ब्राम्हणांचे कसब’ सारखी कविता (अखंड) आणि जोतीबा-धोडिंबा “संवाद' यांसारख्या साहित्याच्या अंगाने आधुनिकतेचा आणि येथील बहुजनांच्या अभिरूचीचा-जाणिवांचा-प्रश्नांचा आशय असणारे फॉर्म का निवडावे वाटले? हे सर्व साहित्याच्या स्वरूपातील महात्मा फुलेंचं सांस्कृतिक राजकारण होतं. या सांस्कृतिक राजकारणात त्यांनी येथील बहुजनांना आपल्याच रिच्युअल,मिथकांची,जीवनशैलीची नव्याने ओळख करून दिली. जोतीबा- धोंडीबा संवादात खंडोबा कोण आहे? त्यांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व काय आहे? याची जाणिव करून दिली. यातील खंडोबा येथील बहुजनांचा देवता. अवैदिक परंपरेतला. बहुजनांना त्यांच्याच मिथकांच्या- लोक दैवतांच्या न्युनगंडातून काढून उलट येथील ब्राम्हणी सांस्कृतिक वर्चस्वाच्या विरोधात उभं करावं लागेल,हे महात्मा फुलेंना समजले होते. आणि त्यातूनच खंडोबा हा बहुजनांचं- ब्राम्हणेत्तरांचं लोकदैवत उभं राहिलं. हा खंडोबा परशुरामाच्या म्हणजे कुणाच्या विरोधात संघर्ष करत होता? हे वेगळं सांगायची गरज नाही. आजच्या घडीला परशुराम कशाचं प्रतिनिधित्व करतो हे सर्वश्रूत आहे. आणि महात्मा फुलेंनी नेमक्या या सांस्कृतिक गुलामीलाच पर्याय देण्याचा प्रयत्न केला. कारण भौतिक शोषणाला अधिमान्याता देणाऱ्या यंत्रणा-व्यवस्थांना भक्कम सांस्कृतिक आधार असतो. तो आधारच मुळातून खणला पाहिजे ही दृष्टी किती महत्वाची आहे. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच दृष्टी मोठ्या व्यापक स्तरावर अमलात आणून प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं. बाबासाहेब हे फुलेंना गुरू मानायचे. बाबासाहेबांची सुरूवातीची काही भाषणं जेजुरीला झाली आहेत. जेजुरी गडाच्या पायथ्याला आजही त्याच्या संदर्भ सापडतो. 

इतिहासाकडं इतकं सजगपणे पाहून फुलेंनी नवीन सांस्कृतिक दृष्टी दिली त्यातून कॉ. शरद पाटील  यांनी अब्राम्हणी सौंदर्य़शास्त्र उभं केलं. ते आजच्या डॉ. आ.ह.साळुंखे यांच्यापर्यंत या दृष्टीचा विकास झाला. आणि हे पर्यायी सांस्कृतिक राजकारण आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचा भाग बनलं आहे. या आत्ताच्या सांस्कृतिक राजकारणात काही वैचारिक अडचणी आहेत का? तर निश्चित आहेत. त्याची चिकित्साही झाली पाहिजे, यात दुमत नाही. पण फुलेंनी दिलेल्या दृष्टीतून जे काही सांस्कृतिक राजकारण उभं राहिलं, त्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्तीदायी राजकारण व दुसऱ्या बाजूला सत्यशोधक समाजाचं राजकारण उभं राहिलं. या दोन्ही राजकीय प्रवाहांचे सांस्कृतिक संदर्भ पाहिले तर स्पष्टपणे जाणवतं  की सत्यशोधक प्रवाह हा नंतर ब्राम्हण्यविरोधी व मराठाकेंद्रीत बहुजनवादाची भाषा करणारा होता तर आंबेडकरी प्रवाहाचा सांस्कृतिक विकासक्रम अधिक समावेशक व मुक्तीदायी राजकारणाचा विचार करणारा होता.  परंतु आंबेडकरी राजकारण म्हणून असे काही भौतिक व व्यावहारिक पातळ्यांवर काही यशस्वी झाले नाही, त्याला अनेक कारणं असतील. पण सांस्कृतिक जाणिवांनी आंबेडकरी समाज अधिक तीक्ष्ण झाला. साहित्य व सांस्कृतिक व्यवहारात दलित साहित्य जोमाने उठले.

सत्यशोधक नंतर झालेल्या ब्राम्हणेत्तर चळवळीने काही अंशी ज्ञाननिर्मितीत योगदान दिले, परंतु जास्तीत जास्त कल लिखापढीपेक्षा सामाजिक प्रबोधनाचा होता. ज्ञानातील सत्ताकेंद्रे, विद्यापीठं,प्रकाशनसंस्था अशा यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत, तेच लोकं संदर्भ साहित्य तयार करतात, तेच शिकवलं जातं. आंबेडकरी चळवळीने ज्ञाननिर्मितीतही लक्ष घातलं. परंतु सत्यशोधक व नंतरची ब्राम्हणेत्तर चळवळ फक्त “ब्राम्हण हटाव’ पुरती मर्यादित राहून येथील मराठा समाजाला ज्ञानाच्या क्षेत्रात खेचण्यासाठी अपयशी ठरली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. आता येणाऱ्या काळात बहुजन शिकतायेत. इतिहास तसेच अनेक विद्याशाखेत संशोधन करतायेत. ज्ञानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी मोडायची असेल तर समाजप्रबोधन चळवळी बरोबरचं, ज्ञानाच्या सत्ताकेंद्रात आपलं प्रतिनिधित्वच नव्हे तर आक्रमक सहभाग हवा याची जाणिव आता झाली आहे.

दुसऱ्या बाजूला सक्रीय सत्तेच्या राजकारणात भौतिक व व्यावहारिक पातळ्यांवर  मराठाकेंद्री बहुजनवाद कायम पुढे राहिला, मात्र सांस्कृतिकदृष्ट्या कायम ब्राम्हणी सांस्कृतिक मिथकांवर त्यांचं अवलंबित्व राहिलं. त्यामुळे कायम हिंदुत्वाचा कच्चामाल म्हणून या समाजाला वापरणं सहज शक्य झालं. त्याचं कारणच मुळात सांस्कृतिक परावलंबीपणा. जसं जसं कृषीकेंद्री मराठा व त्यावर अवलंबून असलेल्या समाजात परत काही वैचारिक घुसळणं, शिक्षण, स्थलांतर होत राहिलं त्यानुसार हा समाज आपल्या सांस्कृतिक पर्यांयाविषयी, अभिरूचीविषयी विचार करायला लागला. अगदी याचं प्रतिबिंब काही अंशी साहित्यात उमटायला सुरूवात झाली होती. ग्रामीण साहित्य कृषीकेंद्री जाणिवांनी व्यापलेलं, परंतु त्यातील खेडुतपणा कायम शहरांच्या टाळ्या घेण्यासाठी होता.  द.मा. मिरासदार ते शंकर पाटील यांनी खेडे-शेती, त्यातील अशिक्षित पात्र म्हणजे निव्वळ टिंगल टवाळीचा व हाश्या पिकवण्याचा खेळ म्हणून शहरी व अभिजन वाचकांसाठी पोसला. त्या पात्रांची नावही अशीच हास्यास्पद असतं. हे तर नमुन्यादाखल उदाहरण आहे. आपल्या  सांस्कृतिक-भाषिक वेगळेपणा विषयी,जाणिवांविषयी न्युनगंड पोसण्यासाठी अशा अनेक यंत्रणा व व्यवस्था कार्यरत असतात.  तुमची आयडेंटीटी, अस्मिता तुम्ही सांस्कृतिक पटलावर अभिव्यक्त करूच नयेत, तुम्हाला त्याची लाज वाटावी याची सोय करून ठेवलेली असते. परंतु फुलेंच्या सांस्कृतिक पर्याय देण्याच्या दृष्टीने व आजपर्यंतच्या सांस्कृतिक राजकारणाच्या विकासक्रमात मराठा केंद्रीत बहुजनवादाचा साहित्याच्या “डोमेन’मध्ये विचार केला तर भालचंद्र नेमाडे हे नाव सगळ्यात वरचं आणि आमच्या पिढीचंही लाडकं. त्यांनी पेरलेली पात्र वाचकांच्या मनावर प्रभाव पाडतात. त्याचं मुख्य कारण पात्रांची निवड आणि त्यांची नावं यात एक सांस्कृतिक दृष्टी आहे. एक परंपरा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या सांस्कृतिक परंपरा येथील बहुजनांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्यामुळे बहुतांश पात्रं जवळची किंवा आपल्यातलीच वाटतात. 

पांडुरंग- चांगदेव - खंडेराव  यात एक सुत्र आहे. ही निव्वळ पात्रांची नावं नसून व्यवस्थितपणे रेटलेलं सांस्कृतिक राजकारण आहे. ऐऱ्हवी जे पात्र येथील वर्चस्ववादी संस्कृतीत कमी महत्वाची किंवा असंस्कृत किंवा टिंगलीची आहेत त्यांना आपल्या कांदबऱ्यांचा नायक बनवून एक सांस्कृतिक कथन नेमाडे यांनी सेट केलं. त्यांची पात्र हिट होण्यामागे आणि ते रुजण्यामागे केवळ त्या कथनांच्या प्रतिभेचा अथवा पात्रांच्या नावात असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वाटा नसून या पात्रांना पचवणारा वाचकांचाही आहे. या पात्रांना डोक्यावर घेणारा वाचकही निर्माण होण्याची एक दिर्घकालीन प्रक्रिया या महाराष्ट्रात गेल्या चार पाच पिढ्यांपासून घडत होती. या वाचकाचे हितसंबंध आणि ऋणानुबंध कृषीकेंद्री जाणीवांमध्ये आहेत. त्यांचे सामाजिक स्थान व सांस्कृतिक गरजा काय आहेत , हे नेमकेपणाने लेखकाला माहित असणार किंवा तोही या प्रक्रियेचा भाग आहे. नेमाडेंची पात्र या बाबतीत प्रतिभावान कथन करतात व चलाखीही करतात. ती कृषीआधारित प्रत्येक जातीसमूहांना चॉकलेट देतात आणि वाचकांच्या सांस्कृतिक अस्तित्वाला अधिमान्यता देत उपयोगिताही सेट करतात. आपल्यामुळेच गावगाडा व कृषीसंस्कृती आहे याची काहीअंशी खरी व काहीअंशी धूळफेकी मांडणी फार रोमँटिक वाटते. त्यात लूप होल आहेत. उभी जातीव्यवस्था नसून आडवी जाती व्यवस्था होती,अशा प्रकारची मांडणी हितसंबधांना बाधा आणत नाही, आणि समतेचा भास निर्माण करते त्यामुळे दलित व ब्राम्हण वगळता बहुतांश वाचक वर्ग या रोमँटिक व आकर्षक मांडणीच्या प्रेमात असतो.   परंतु सातत्याने इतका दिर्घकाल असा वाचक मिळणं या मागं एक साहित्य व्यवहारही आहे. त्यांनी उभं केलेल्या कृषीकेंद्री जाणिवांच्या अभिरूचीच्या संदर्भांना व मर्यादित अर्थाने केलेल्या विद्रोहाला सामाजिक आधार मिळवण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले असतीलच. यात प्रकाशक,लेखक,प्राध्यापक, मराठी विभाग यात त्यांच्या भक्तांचा दबदबा आहे.

 दलित डिस्कोर्समधून तर प्रचंड टिका नेमाडेंच्या एकदंरीत मांडणीवर झालीये. खंडेराव हा मुक्तीचा नायकच काय तर साइड अॅक्टरसुद्धा होऊ शकत नाही. एका अपराधी गंडातून सडलेल्या शोषित संस्कृतीच्या पदराआडून त्याच्या उद्धवस्त होऊ पाहणाऱ्या मुल्यव्यवस्थेला पाहणारा हा नायक... काय करायचं हे माहीत नाही त्याला... मग तो पाच हजारवर्षापूर्वीची समता उकरून काढतो काय... ही शेतकऱ्याची पोरं पार बावचळून टाकलीत गड्यानं!! अशा पद्धतीचीही टिका होते. 

अशा आणि प्रत्येकाला हा खंडेराव आवडायला लागतो. दोन्ही बाजूचं प्रेम व टिका या पात्रांना मिळते. केवळ दोन टोकावरून या खंडेराव पात्राला व ट्रेंडला पाहता येतं नाही. बहुतांश जनांमध्ये असलेल्या खंडेरावाला प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्या सांस्कृतिक राजकारणाचं केंद्र केवळ “मराठा' न ठेवता ते सरकवत अधिक व्यापक झालं तर यात खंडेरावचा फायदा आहे आणि तरच महात्मा फुल्यांनी सुचवलेल्या सांस्कृतिक राजकारणाकडे आपल्याला लक्ष वेधता येईल.

kunal.gaikwad24@gmail.com

संपर्क -9284268904

बातम्या आणखी आहेत...