आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिघाबाहेरची माणसं...:संघर्ष भेदणाऱ्या हरीभाऊंची कहाणी...

लक्ष्मण गायकवाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्याचं सबंध बालपण उचल्यांसोबत गेलं....पाकीटमारी करणं, नकली सोनं असली म्हणून खपवणं, चोरलेलं सोनं सराफाला विकणं हे त्या समाजाचं एकेकाळचं जगण्याचं साधन होतं... मात्र एकाक्षणी त्याला आपण काय करतोय हे कळून चुकलं आणि यापुढे उचलेगिरी करायची नाही असा त्याने निश्चय केला. भटक्या विमुक्तांची संघटना त्याच्या मदतीला धावली आणि मग त्याच सोन्याच्या धंद्यात त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं... लहानपणीचा हरी आज लातूरच्या सराफी बाजारात “हरीभाऊ गायकवाड सलगरकर: सोन्या-चांदीचे व्यापारी’ म्हणून नावलौकिक मिळवून आहे...

लातूरच्या जवळूनच मांजरा नदी वाहते. याच नदीच्या काठी सलगरा नावाचं गाव वसलयं. गावाच्या बाहेरच मांजरेच्या किनाऱ्यालगत उचल्या, पाथरुट या जमातीच्या वस्त्या कधी काळी वस्तीला आल्या होत्या. पंधरा-वीस घरांची वस्ती असलेल्या या पाथरुट लोकांचे काम म्हणजे नदीला जाऊन मासे पकडणे आणि ते गावात विकणे. या रितसर कामाशिवाय मोठमोठ्या जत्रांमध्ये, आजूबाजूच्या शहरांतल्या बाजाराच्या दिवशी ही पाथरुट जमात खिसेही कापायची. त्यांच्या टोळ्या खिसेकापू म्हणून प्रसिद्ध होत्या. लग्नसराईतही नकली सोन्याच्या खांबल्या असली म्हणून विकण्यात, लोकांना फसवण्यात ही जमात पटाईत होती. सलगरा हे गाव अशा कामांसाठीच कुविख्यात होतं. "उचल्यांचं सलगरा' या नावानेच ते सुरुवातीला अोळखलं जात असे.

या लोकांमुळेच गावात पैशाची आवक-जावक मोठ्या प्रमाणात वाढायची. अडल्या पडल्या काळात गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडून हे लोक व्याजानं-बट्ट्यानं पैसे घेऊन आपला संसार चालवत आणि तिरगून (चोरी करण्यासाठी जाणं) आल्यावर सगळ्यांचे पैसे फेडून उरलेल्या पैशात मौजमजा करायचे. असं असलं तरी गावात मात्र कुणाची चोरी करायची नाही, कुणाशी लबाडी करायची नाही हा पाथरुटंचा नियम होता.

अशा या गावातला हरी गायकवाड नावाचा पोरगा शाळेत कसाबसा चौथी-पाचवीपर्यंत शिकला. त्याचा बाप गुलाबराव हा उचलेगिरीच्या धंद्यात पटाईत होता. हरी हे सगळं लहानपणापासूनच पाहात आला होता. हळूहळू बापाने उचलेगिरीसोबत नकली सोनंही असली म्हणून विकायला सुरूवात केली. असं करता करता तो नकली सोन्याच्या बदल्यात असली सोनंही मिळवू लागला. फसवणूकीच्या मार्गाने मिळवलेलं हे असली सोनं हरीचा बाप लातूरच्या सराफी गल्लीत विकायचा. कधीकधी हरीही सोबत असायाचा.. किती तोळं सोनं विकलं, कुठल्या सराफानं त्याचं किती वजन केलं याचा हिशेब पाचवीपर्यंत शिकलेला हरी चांगल्याप्रकारे करू शकत होता.

हरीच्या वयाची दुसरी पोरं पाकीटमारीचं शिक्षण घेत होती. पण त्यातल्यात्यात पाकिटमारीपेक्षा हे सोन्याचं काम हरीला बरं वाटायचं. अधूनमधून या गावात उचल्यांच्या टोळ्याही बाहेरून तिरगून यायच्या. चोरीच्या मालाचा हिशेब पाहण्यात काही गडबड झाली तर जात-पंचायती बसायच्या. या जात-पंचायतीचा प्रमुख हरीचा बाप हाच असे. लहानमोठे तंटे गावातच सोडवले जायचे. एकदा या गावातल्या "काकनू' नावाच्या पाकीटमाराने अंबाजोगाईच्या बाजारातून पाकिट मारलं. त्यात दहा हजार रुपये होते, मात्र त्यातले पाच हजार रुपये काकनूने लांबवले आणि बाजूला ठेवून दिले. एव्हाना दहा हजारचे पाकिट मारल्याची बातमी गावभर पसरली. दहा ऐवजी पाच हजार रुपये असलेले पाकिट मारल्याचं आपल्या साथीदाराने खोटचं सांगितल्याचं पाकीटमार टोळीलाही कळलं आणि मग जात-पंचायत बसली. कारण, पाकीटमाराने बेईमानी केली होती. काकनूला पंचायतीने जबरी शिक्षा ठोठावली. पुढे आणखी एका प्रकरणात त्याला पोलिसांकडून जबरी मारही बसला.

काकनूचे ते हाल पाहून हरीने ठरवले की, आपण आपल्या बापासोबत तिरगाईला गेलो तरी फक्त लांब उभं राहून लक्ष द्यायचं. बापासोबत राहायचंच नाही... दुसरीकडे चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिस गावात आले की बायका-लेकरं सोडून पुरुष मंडळी कित्येक दिवस नदीच्या डोहात किंवा शेतात लपून बसायची. हे आणि असले कितीतरी प्रसंग हरीने पाहिले होते. तो मोठा होऊ लागला तसतसा अशा जगण्याचा त्याला वीट येऊ लागला. पोलिसांनी पकडलं तर आपल्याही आयुष्याचं वाटोळं होईल, नाहीतरी आपलं सोनं चोरीचं आहे म्हणून सराफी दुकानदार किमतीपेक्षा कितीतरी कमी पैसे हातात ठेवतो आणि चोरलेल्या सोन्याचा मलिदा भलत्याला मिळतो.... असे विचार हरीच्या मनात येऊ लागले.

पुढे हरीचं लग्न झालं, जबाबदारी आली आणि त्याने बापाच्या धंद्याला कायमचा रामराम ठोकला. वयानं वाढल्यामुळे आपल्या समाजाची कल्पना त्याला यायला लागली, समाजाची परिस्थिती समजू लागली. चोरी केली असली किंवा नसली तरी उचल्यांना, पाथरुट लोकांना, त्यांच्या बायका-लेकरांना पोलीस रात्री बेरात्री मारहाण करत, वाटेल तेव्हा पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवतात.या विरोधात भटक्या-विमुक्त समाजाच्या संघटनेने लातूरमध्ये मोठा मोर्चा काढायचे ठरवले होते. चोर म्हणून ज्यांना विनाकारण त्रास दिला जायचा असे उचल्या, पाथरुट समाजाचे अनेक लोकं मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यातले माझे भाषण ऐकून हा हरी एकदिवस नात्यागोत्याची ओळख काढून घरी आला. गप्पाटप्पा झाल्या आणि हरी मला म्हणाला की, मला तुमच्या संघटनेत काम करायचं आहे. आमच्या समाजने प्रगती करावी असे मला वाटते, तुम्ही संघटनेचा मला सदस्य करून घ्या, मला या परिस्थितीतून बाहेर काढा. हळूहळू माझ्या संघटनेशी हरीचा संबंध वाढू लागला. पुढे हरीला मी गुत्तेदारीच्या कामाला लावलं. तू करत असलेलं काम बंद करण्याची ताकीद दिली. एकीकडे गुत्तेदारीचे काम करता करता हरी भटक्या-विमुक्त संघटनेच्या कामात रस घेऊ लागला. ते काम तो जोमाने करू लागला.

संघटनेचं कवचकुंडल मिळाल्याने तो पुढे लातूरमध्ये आला आणि भाड्याने खोली घेऊन बायको-मुलांसह राहू लागला. आपल्या मुलांना त्याने इंग्रजी शाळेत घातले. हाच हरी पुढे हरीभाऊ गायकवाड झाला, संघटनेचा मोठा कार्यकर्ता झाला. सलगरा गावातले उचल्या, पाथरूट समाजाचे लोक लातूरमध्ये आले म्हटलं की पूर्वी पोलिस त्यांचा शोध घेऊन त्यांना जनावरासारखे तुडवायचे. म्हणून भाड्याच्या घरात राहतानाही हरी आपली ओळख उघड होऊ नये याची सतत काळजी घ्यायचा. पुढे संघटनेचा जोर वाढल्याने पोलिसांनी तसले प्रकार बंद केले. हरी संघटनेच्या लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष बनला. चांगली भाषणे करू लागला, चोरी करू नका यावर तो प्रबोधन करू लागला. एकेदिवशी त्याने मला हळूच विचारलं,"साहेब, मला सोन्या-चांदीच्या व्यापाराची लहानपणापासूनच चांगली माहिती आहे आणि त्याची खूप आवडही आहे. मला लातूरच्या सराफी बाजारात तुम्ही मदत केलीत तर मी सोन्या-चांदीचा चांगला व्यापार करू शकेन'.

हरीभाऊचा हा विचार मला वेगळा वाटला. मी त्याला या व्यापारासाठी भाड्याने जागा पाहून दिली. त्याचा एक नातेवाईकही सोबत होता, त्याच्याही गाठीशी पैसे होते. दोघांनी मिळून सराफी दुकानात भांडवल घातलं आणि "हरीभाऊ गायकवाड सलगरकर: सोन्या-चांदीचे व्यापारी' असा फलक दुकानावर झळकला. एकदिवस पोलिसांची त्या दुकानावर नजर गेली आणि सलगरकर उचल्याचा माणूस दुकान टाकतो म्हणजे तो नक्की चोरीचं सोनं घेत असेल यासाठी त्यांनी दुकानावर पाळत ठेवायला सुरूवात केली. हे कळल्यावर मी स्वत: हरीच्या दुकानात तासनतास बसू लागलो. मी तिथं बसत असल्याने हे लक्ष्मण गायकवाड यांचे दुकान असे समजून माझ्या ओळखीचे प्राध्यापक, सरकारी नोकरदार त्या दुकानात येऊ-जाऊ लागले आणि पुढे पोलिसांनीही दुकानावर नजर ठेवण्याचे काम सोडून दिले.

अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करताना हरीने एकदाही त्याच्या समाजतल्या लोकांनी चोरलेलं सोनं खरेदी केलं नाही. अल्पावधीतच सोन्या-चांदीचा उत्तम व्यापारी म्हणून त्याने नाव मिळवलं. त्याचा व्यापार वाढला, श्रीमंत-गरीब असे सगळेच त्याच्या दुकानात गर्दी करू लागले आणि उचल्या समाजाचा हरीभाऊ गायकवाड हा महाराष्ट्रात प्रथमच सोन्या-चांदीचा व्यापारी बनला.

पुढे हरीभाऊने सगळं लक्ष समाज प्रबोधनावर केंद्रीत केलं. वाईट धंदे सोडा, कष्ट करा, भाजीपाला विका, केळी विका, शहरात झोपडी घेऊन राहा, खोटेनाटे धंदे बंद करा, आपल्या मुलाबाळांना शिकवा... हा संघटनेचा संदेश त्याने अनेकांपर्यंत पोहचवला. परिणामी, या समाजाचे अनेक तरूण एकेक करत लातूरमध्ये कुठं झोपडपट्टीत तर कुठं भाड्याच्या घरात स्थायिक झाले. केळी, भाजीपाला विकणं, रिक्षा चालवणं असे वेगवेगळे व्यवसाय करू लागले. हरीभाऊने तो राहत असलेल्या गल्लीत चांगलचं बस्तान बसवलं. बघता बघता लातूरच्या बाहेर नांदेड नाक्याकडे एक एकर जमीन विकत घेऊन उचल्या, पाथरूट समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय त्याने घेतला.पाथरुट समाजाची एक चांगली वसाहत तयार झाली. जे उचले, पाथरुट पोलिसांच्या भितीने लातूरमध्ये पाय ठेवत नव्हते त्याच लोकांची तिथे हरीभाऊने वस्ती वसवली. व्यापारात हरीला फायदा होऊ लागला, सामाजिक कार्यामुळे त्याची राजकीय नेत्यांमध्ये उठबस सुरू झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याला कॉँग्रेसकडून तिकीट मिळाले आणि पुढे तो नगरसेवक म्हणून निवडूनही आला. उचल्या, पाथरूट समाजाचा पहिला नगरसेवक... पुढे लातूरच्या नगरपालिकेत सभापतीही झाला आणि वंचितांसाठी त्याने अनेक समाजपोयगी कामे केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने लातूर येथे जात-पंचायतीला मुठमाती देण्याचा कार्यक्रम झाला होता. या मेळाव्यात माझ्या हस्ते हरीभाऊचा सत्कार करण्यात आला, तेव्हा मला २०-२५ वर्षांपूर्वीचा हरी मला आठवला. आज या हरीभाऊंचे फक्त एक नव्हे तर तीन-चार सराफाची दुकाने आणि काही केमिस्टची दुकाने आहेत. हे सगळं आठवून आणि तिथं जमलेली हजारो तरुणांची गर्दी पाहून मला गदगदून आलं... माणसाला संधी मिळाली तर तो स्वत:ची प्रगती तर करतोच पण आजूबाजूच्या लोकांनाही पुढे घेऊन जातो, याची प्रचिती मला आली.

संपर्क – ९८७०४५२४१०