आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन विशेष:पोकळ आधुनिकतेचाच 'ट्रेंड'

माधुरी दीक्षितएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सांस्कृतिक विविधतेची आपल्या मानसिकतेला सवय आहे, त्यामुळे नव्या फॅशन्स स्वीकारण्याला आपल्याजवळ सुपीक भूमी आहे, असं म्हणा हवं तर. पण वस्तुरूप फॅशन्स आपण जेवढ्या चटकन अंगीकारतो, तेवढ्या त्यांच्या मागे उभा असलेला इतर सामाजिक संकल्पनांची ओळख किंवा त्यांचा भार मात्र आपण ती फॅशन अनुसरताना डोक्यावर घेत नाही. धार्मिकतेचा येतो तसा आंतरजातीय लग्नांचा ट्रेंड येईल का? आदिवासी किंवा भटक्या जमातींच्या कलात्मक वस्तू फॅशन म्हणून वापरतो तसं त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा देणं जमेल का? उत्तर उघड आहे. मग आज कोणत्या गोष्टींचा समावेश असलेली आणि नेमक्या कोणत्या गोष्टींना हद्दपार केलेली जीवनशैली हे नवे ट्रेंड्स निर्माण करत आहेत? 

हल्ली काही चक्रावून टाकणाऱ्या विरोधाभासाच्या गोष्टी दिसल्या की "आता ही फॅशन / ट्रेंड (कल) आहे', असं म्हणून आपण आपलंच समाधान करून घेतो. आजूबाजूची माणसे (यात बाईमाणसेही आली) अशी का दिसतात, वागतात, बोलतात, विचार करतात असे प्रश्न पडले की सरळ हे उत्तर आठवावं, कारण खुद्द त्यांना विचारलं तरी या प्रश्नाचं उत्तर बहुतेक वेळा "हल्ली ही फॅशन/ट्रेंड/स्टाईल आहे' असंच मिळतं. या शब्दांना कल, शैली असे मराठी प्रतिशब्द सहज आपल्याला आठवत नाहीत, इतकी शब्द, हावभाव, वस्तू, सेवा, संकल्पना, विचार यांची आयात आपण करत असतो. मोठी माणसं, परंपरा, शासन, आणि करियर नावाच्या संकल्पनेनंतर बहुधा फॅशनच आपल्या जीवनावर हुकुमत गाजवत असते. निदान पन्नाशीपर्यंतची माणसं तरी हल्ली असं बिनधोक म्हणू शकतात. 

नीट पाहिलं तर वेगवेगळे ट्रेंड्स किंवा फॅशन्स नव्वदीच्या दशकानंतर अधिक दृश्यमान झालेले दिसतील. टीव्ही, सिनेमा, जाहिराती आणि वेबसिरीज यांनी हा ट्रेंड्सचा सुकाळ आपल्या दारी आणला. नव्वदीच्या दशकात स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणामुळे आपले बाजार नवनव्या उत्पादनांना खुले झाले. नुडल्स, सॉसेस, पास्ता आले. थाई करीज आल्या. बंगाली मिठायांनी खीर, शिरा, जिलेब्यांना आपल्याकडे तरी हदद्पार केलं. पनीरच्या डिशेस, तयार पीठे, चटण्या, ब्रेड्स्प्रेड, व्हिप्डक्रीम, प्रोटीन शेक्स, ऑर्गनिक फूड, यू ट्यूब चॅनल्स, झुम्बा डान्स आणि विविध परीक्षांचे क्लासेस आले. लमाणी दागिने, गरब्याचे घागरे, न्यूड मेकअप, वारली प्रिंटचे कपडे, रिटर्न गिफ्ट्स, गुलाबी-निळ्या रंगांचे बाळांसाठी कोड, आयते रुखवत, डोहाळजेवणाला खास स्त्रियांसाठी लावणीचा कार्यक्रम, लग्नात नवऱ्यामुलाचे बूट लपवण्याचा "फिल्मी विधी', आणि साडीवरसुद्धा दुपट्टा आला. व्यायामाचे वेगळे कपडे, फिटनेस बँड, पाण्याच्या वेगळ्या बॉटल्स, ओर्कुटनंतर फेसबुक,  व्हाट्सअपवरच्या निःशब्द होण्याचे आणि आता कोरोनातल्या ऑफिससाठी झूम मिटींगा तर लग्नासाठी डिझाईनर मास्क सुद्धा "ट्रेंडमध्ये' आले. 

निव्वळ वस्तूंची दुकानं या अर्थाने नाही तर सांस्कृतिक-सामाजिक म्हणता येतील अशा सेवा उत्पादनांनासुद्धा बाजार खुला झाला. त्यातून सर्व काही साजरं करण्याच्या व्हॅलेंटाईन, मदर्स डे यासारख्या एरवी सांस्कृतिकदृष्ट्या अपरिचित कल्पनाही आपण कधी विरोध करून तर कधी सहर्ष स्वीकारल्या. वृद्धाश्रम, डे केअर, रुग्णसेवा, पार्लर, तसेच पुष्पगुछांची, किराणा मालाची, हॉटेलच्या अन्नाची, बँकिंग सेवांची घरपोच डिलिवरी, अशा अनेक नवीन सेवा आपण घेऊ लागलो. आज या सर्व गोष्टींची एवढी सवय आपल्याला झालेली आहे की सुरुवातीला आपण त्यांची हेटाळणी केली होती हे आपण समाज म्हणून विसरून गेलो आहोत. त्या परक्या कल्पनांना छानछोकी, पैशांची उधळपट्टी म्हणताम्हणता आपल्या आयुष्यात त्यांनी कधी चंचुप्रवेश केला आणि कधी त्या आपली गरज होऊन बसल्या हे आता सांगता येणार नाही. 

आपल्या उत्सवप्रिय मनोवृत्तीला नव्या फॅशन्स मधाचं बोट चाटवतात खरं पण त्या कुठून येतात, का येतात आणि का जातात याविषयी आपण फार विचार करत नाही. तसंच आपण त्यांना कवटाळतो, स्वप्नवत मानतो, त्यांच्यासाठी झुरतो, त्या मिळाव्यात म्हणून रक्ताचं पाणी करतो किंवा गेला बाजार भांडतो तरी, म्हणजे आपण काय करतो हेदेखील आपण जरा थांबून न्याहाळत नाही. सांस्कृतिक विविधतेची आपल्या मानसिकतेला सवय आहे, त्यामुळे नव्या फॅशन्स स्वीकारण्याला आपल्याजवळ सुपीक भूमी आहे, असं म्हणा हवं तर. पण वस्तुरूप फॅशन्स आपण जेवढ्या चटकन अंगीकारतो, तेवढ्या त्यांच्या मागे उभा असलेला इतर सामाजिक संकल्पनांची ओळख किंवा त्यांचा भार मात्र आपण ती फॅशन अनुसरताना डोक्यावर घेत नाही. वारली चित्रांमध्ये असलेल्या निसर्गाबरोबरच्या सहजीवनाशी लोकलच्या खडखडाटात तो शर्ट घालून जातांना आपलं देणंघेणं नसतं. मदर्स डे ज्या मदर्ससाठी साजरा करतात, त्यांना वयाच्या साठीपर्यंत आपल्या पोरांसाठी रांधत-वाढत बसायचं नसतं. व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या, डेटवर जाणाऱ्या समाजात अॅसिडचे हल्ले होत नसतात. बायकोला स्मार्टफोन गिफ्ट देणाऱ्या नवऱ्याने तिचं व्हाट्सअप तपासून पाहणं अभिप्रेत नसतं. प्री-वेडिंग शूटमध्ये सामील होणाऱ्या हसऱ्या सासूसासऱ्याने सूनेनं स्लीवलेस का घातलं याच्यावर आक्षेप घ्यायचा नसतो. कितीही डेस्टिनेशन वेडिंग केलं अथवा एखाद्या चॅनलच्या विवाह मंडळातून एचआयव्ही रिपोर्ट पाहून लग्न जमवलं तरी ते अजूनही जातीतच जमते. यातली विसंगती आपल्याला व्यथित करत नाही. एरवी घडोघडी आपल्या स्वत्वाविषयी, ओळखीविषयी, रंगरूपाच्या जुळवाजुळवीविषयी जागृत असणारे स्त्री-पुरुष अशा वैचारिक स्वरूपाच्या विसंगतींविषयी मात्र बेफिकीर आढळतात.      

आर्थिक भांडवलाबरोबरच सांस्कृतिक भांडवल सहज उपलब्ध असणाऱ्या उच्चभ्रू जातीवर्गात फॅशनचं लोण पूर्वीपासून आहे त्यात नवल काही नाही. किंवा महानगरात वास्तव्य करणाऱ्या लोकांना फॅशन्स आणि ट्रेंड यांचा बोलबाला लवकर कळतो यातही त्यांच्या स्थानमाहात्म्यामुळे विशेष असं काही नाही. पण आजकाल फॅशनच्या पसरण्याचा वेग बघितल्यास फॅशनचं "लोकशाहीकरण' झाल्यासारखं वाटतं. म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना ते ट्रेंड माहिती होतात. त्याचं कारण फॅशनचं अधिकाधिक सुलभीकरण, वस्तूकरण झालेलं आहे. पैशांशिवाय फॅशन करणे शक्य असते का? किंवा करायला अवघड गोष्टींचे ट्रेंड्स बनतात का? त्यामुळे फॅशन करायची म्हणजे कोणती "सोपी कृती' करायची? तर वस्तू वापरायच्या - अंगावर घालायच्या, भेट द्यायच्या, घरात सजवायच्या, कार्यालयात मांडून ठेवायच्या, वस्तुंचंच विंडो शॉपिंग करायचं, वस्तू खायच्या, प्यायच्या, दाखवायच्या, त्यांचे फोटो पाठवायचे, इ.इ. सणसमारंभ नव्या पद्धतीनं साजरे करायचे म्हणजे उदाहरणार्थ हॉटेलमध्ये जेवू घालायचं. दिवसभरात वेगवेगळ्या वस्तूंमध्ये घुसून (जिम, ऑफिस, मॉलचे वेगळे कपडे) आणि वेगवेगळ्या वस्तू घेऊन दिनक्रम पार पाडायचा. लग्नकार्यातल्या नव्या फॅशन्स म्हणजे प्री-वेडिंग शुटींगची नवी (वस्तुरूप) सेवा वापरायची. तिथे नव्या लोकेशन्सवर जाऊन नव्या प्रकारच्या पोशाखात, नव्या प्रकारच्या हावभावासह फोटो (वस्तू) तयार करायचे, किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नवे काय तर नवरा नवरीला कसा जिंकतो त्याची बॉलीवूड छापाची नाट्यरुप गोष्ट फिल्म (वस्तू) रूपाने दाखवायची. या वेगाने आणि या धाटणीने निव्वळ विचार, ध्येय, भावना, आणि वस्तुहीन कृती कधीही फॅशनच्या परीघात येऊ शकणार नाही, असं आपल्याला जर जाणवत असेल तर त्याचा दुसरा अर्थ असा की वस्तुरूपी ट्रेंड्सने आपल्या जीवनाला विळखा घातला आहे आणि त्या वस्तूंची निर्मिती आणि विक्री करणारी बाजारशक्ती आपल्यावर राज्य करत आहे. 

कोणती गोष्ट ट्रेंडमध्ये आहे/आणायची आणि कोणती गोष्ट आउट-ऑफ-फॅशन आहे/ठेवायची हे व्यापक अर्थाने बाजार ठरवतो, म्हणजे नक्की कोण ठरवतो? काही डिझायनर्स, काही उत्पादक, काही सेलेब्रिटीज, काही जाहिरात कंपन्या, काही सामर्थ्यवान, अल्पसंख्य गट? त्यांचा हेतू आणि लाभ काय असतो? आणि मुळात ते निव्वळ फॅशन "आणतात' की त्याबरोबर अजून काही? फॅशनचा, ट्रेंड्सचा सुळसुळाट बघता, फॅशन न करू शकणाऱ्यांचा कोंडमारा बघता, फॅशनच्या आहारी गेलेल्यांना सहन करावी लागणारी अस्थिरता आणि खोटी व्यस्तता बघता या मुद्द्यांचा विचार आवश्यक वाटतो. फॅशन आणि ट्रेंड्स काळाबरोबर असण्याचा खोटा आभास देतात. सामूहिक जीवनाच्या सुरक्षितेबरोबर वैयक्तिक वेगळेपणा जपल्याचे खोटे आश्वासन देतात. पण त्यापेक्षा गंभीर परिणाम म्हणजे वैयक्तिक बंड केल्याची, आधुनिकतेची कास धरल्याची खोटी जाणीव देतात. 

ट्रेंडमधल्या आधुनिकतेच्या जाणीवेला खोटी जाणीव म्हटलं कारण एकतर ती निव्वळ वस्तू वापरून आलेली असते, प्रश्नांची उत्तरे वस्तूंमध्ये शोधते. त्यानं विचार परिवर्तन झालेलं असतं, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. उदाहरणार्थ, माणूसकीमुळे नव्हे तर चहाच्या विशिष्ट चवीमुळे इथे अल्पसंख्यांक घराविषयी मोकळेपणा वाटलेला दाखवला जातो. पुरुषांसारखं भटकायला मिळण्यासाठी विशिष्ट गाडी असायला लागते. बायकोचे कष्ट कमी करण्यासाठी विशिष्ट वॉशिंग मशीन असावे लागते. रस्त्यावरच्या छेडछाडीला तोंड द्यायला विशिष्ट साबण लावावे लागते, इ. शिवाय नवरात्रीच्या सणाला नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याची "परंपरा' आपल्या डोळ्यादेखत "निर्माण' केली गेली आहे. व्रतांची माहिती देण्याचा टीव्ही मालिकांचा ट्रेंड भले एपिसोडची गरज भागवत असेल, पण धार्मिकतेचं/(अंध)श्रद्धांचं नको इतकं पुनरुज्जीवन करताहेत. धार्मिकतेचा येतो तसा आंतरजातीय लग्नांचा ट्रेंड येईल का? आदिवासी किंवा भटक्या जमातींच्या कलात्मक वस्तू फॅशन म्हणून वापरतो तसं त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा देणं जमेल का? कृषीआधारित जीवनातील पोळ्यापासून दिवाळीच्या सणापर्यंत सर्व शुभेच्छांचा पाऊस व्हाट्सअपवर पाडणारे शेतीत कामाला जातील का? उत्तर उघड आहे. मग आज कोणत्या गोष्टींचा समावेश असलेली आणि नेमक्या कोणत्या गोष्टींना हद्दपार केलेली जीवनशैली हे नवे ट्रेंड्स निर्माण करत आहेत? 

या प्रश्नाचं उत्तर अवघड नाही पण लपलेलं आहे. बाजाराला उठाव देणारी, उच्चवर्गजातीय मूल्यांना उचलून धरणारी, ज्वलंत प्रश्नांना नजरेआड करणारी आणि सर्व काही आलबेल असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या जीवनशैलीचा ट्रेंड 'आधुनिक' म्हणून मुळात आज सेट झाला आहे आणि त्यातल्या विषमतेचं प्रतिबिंब आजच्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून पाय ओढत जाणाऱ्या मजुरांच्या तांड्यामध्ये दिसतं आहे.

mmd_pune@yahoo.com

(लेखिकेचा संपर्क - ९४२३५८६३४८)

बातम्या आणखी आहेत...