आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मधुरिमा स्पेशल : परदेशात आहे पोर; जिवाला लागलाय घोर...

Aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परदेशात आहे पोर; जिवाला लागलाय घोर...

दीप्ती राऊत

कोरोनाच्या काळजीनं अवघं जग धास्तावलंय. त्यात परदेशी शिक्षणासाठी असलेल्या आपल्या पाल्याच्या काळजीमधून त्यांचे पालक तरी कसे सुटतील? दोन्ही देशांतल्या वेळा सांभाळून केलेले व्हिडिओ चॅट, स्काइप कॉल्स आणि व्हॉट‌्सअॅप मेसेजेस...आपला मुलगा-मुलगी तिकडे सुरक्षित आहे हे कळण्याची हीच काय ती माध्यमं आता दोघांमधला दुवा झाली आहेत. 

अशा परिस्थितीत आपलं मूल आपल्या नजरेसमोर असावं असं आई-वडिलांना वाटणं स्वाभाविक आहे. मात्र दुसऱ्या देशातून प्रवासात अधिक धोका असल्यानं पालक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. अशाच काही पालकांशी साधलेला हा संवाद.

कॅनडातील सर्वाधिक संसर्गित टोरँटोमधील ऑन्टेरिओमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी गेलेला अंधेरीचा श्रावण कुलकर्णी, जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात पीएचडी करीत असलेला वाशीचा तुषार रासकर, फ्रान्सच्या ग्रेनोबन विद्यापीठात शिकत असलेला परभणीचा असीम क्षीरसागर, अायर्लंडच्या डब्लिंग विद्यापीठातील नाशिकची रसिका सावळे या साऱ्यांच्या घरातील घड्याळंच जीवनावश्यक सेवा बनली आहेत. त्या त्या देशातील दिवसांतील वेळांशी जुळणाऱ्या भारतीय वेळेची या साऱ्यांचे आईवडील चातकासारखी वाट बघत असतात. भारतीय वेळेनुसार कधी मध्यरात्री त्यांचे फोन येतात किंवा कधी भल्या पहाटे व्हॉट्सऑप कॉल. शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या मुलांच्या पालकांना जिवाची तगमग नवीन नाही, पण कोविड-१९ च्या सावटानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. याला कारणं होती दोन – एक तर कोसो मैल दूरचे अंतर आणि दुसरं मायदेशी परतावे तर अधिक धोकादायक बनलेला प्रवासच. 
विद्यापीठे, महाविद्यालये तर सगळीच बंद करण्यात आली आहेत. हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांनाही बाहेर घरे बघावी लागली. आठवड्यातून एखादा दिवस स्टोअर उघडतं आणि तासाभरातच जीवनावश्यक वस्तूंचा सपाटा होतो, या कहाण्या या मुलं पालकांना कळवत आहेत. भारतीय कुटुंबांची सवय असल्याने आठवडाभराचा किराणा भरून ठेवणे, घरी साठवलेल्या चिजांमधून अन्नपदार्थ बनवणे या सवयींचा त्यांना फायदा होतोय. काहींच्या शहरांमध्ये इमारतीखाली उतरायचं असेल तरीही लेखी परवानगी घ्यावी लागते अशी गत. पुढील आठवड्यापासून सगळ्यांची लेक्चर्स ऑनलाइन होणार आहेत. भारतातील पालकांसोबतचे कॉल्स वाढले आहेत. सर्वांच्याच पालकांना काळजी वाटतेय ती कोसो मैल दूरच्या अंतराची आणि ते तिथे एकटे असण्याची.  सुरुवातीस या पालकांना वाटलं, आपल्या मुलांनी तत्काळ मायदेशी निघून यावे, परंतु नंतर विमानप्रवासात होत असलेल्या संक्रमणाच्या बातम्या वाचल्यावर त्यांना वाटतंय, त्यांनी आहे तिथेच सुरक्षित असावे. शिवाय नंतरच्या काळात विमानतळेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्याच्या तात्पुरत्या घरांमधून ऑनलाइन अभ्यास करणे आणि भारतातील पालकांशी ऑनलाइन बोलत राहणे हाच त्यांच्यापुढचा पर्याय आहे.

तुषार-नीला-भीम रासकर, नवी मुंबई

तुषार जर्मनीमध्ये पीएचडी करतोय. तो राहत असलेल्या हॅम्बुर्ग शहरात त्याच्या विद्यापीठाने वर्क फॉर्म होमची ऑर्डर काढलीए. खाजगीपणाच्या टोकाच्या कल्पना असलेल्या त्या शहरात कोणताही कम्युनिटी सपोर्ट नाही, त्याच्या इमारतीत आजूबाजूला कोण राहते हेदेखील माहीत नाही. त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटते. काळजी घे, गरम पाणी पी, एवढंच आम्ही सांगू शकतो, त्याचे वडील भीम रासकल सांगत होते. त्यानं भारतात परतावं की कसं, याचा निर्णय ३१ मार्चनंतरच घेता येईल ही हतबलताही त्यांच्या शब्दात जाणवत होती. तुषारची आई नीला मात्र अधिक धीराच्या वाटल्या. अशा परिस्थितीत येणारा एकटेपणा त्यांना काळजीत टाकणारा वाटतो. त्यासाठी आपणच जास्तीत जास्त मुलांशी संपर्कात राहणे, बोलत राहणे हा उपाय त्यांनी शोधून काढला आहे. 

असीम-माधुरी-राजन क्षीरसागर, परभणी

फ्रान्सच्या ग्रेनोबन विद्यापीठात पीएचडी करणारा परभणीचा असीम राहत असलेल्या शहरात गेल्या आठवडाभरापासून कर्फ्यू आहे. इमारतीच्या खाली उतरायचे असेल तरी लेखी परवानगी लागते. आठवड्यातून एकदा स्टोअर उघडतं तेव्हा अन्नाची खरेदी करावी लागते.  दिवसभर घरात बसून काम करीत राहायचे ही त्याची दिनचर्या आहे. त्यांनी साठवलेलं पुरत असेल का, स्टोअरमधला स्टॉक संपला तर, एखाद्या वेळी आवश्यक त्या वस्तू मिळाल्या नाही तर अशा अनेक प्रश्नांनी भारतातील त्याची आई धास्तावते. ऑनलाइनच अभ्यास आणि काम करायचे आहे, ते त्यानं इथे येऊन करावं असं त्यांना वाटतं. मात्र, आता विमाने बंद असल्याने येणेही शक्यही नाही आणि सुरक्षितही नाही. त्यामुळे त्याने आहे तिथेच सुरक्षित राहावे, असे माधुरी क्षीरसागर म्हणतात.

रसिका-सुजाता-संजय सावळे, नाशिक

नाशिकची रसिका आर्डलँड विद्यापीठात कम्पॅरिटिव्ह सोशल चेंज विषयावर उच्च शिक्षण घेतेय. पुण्यातील तीन मैत्रिणींसह ती राहत असलेल्या शहरातला रुग्णांचा आकडा बारा हजारांपर्यंत जाईल, असा तेथील सरकारचा अंदाज आहे. त्यामुळे तिच्या आईलाही वाटतं, ती आपल्याजवळ असती तर अधिक सुरक्षित असती. तिथलं स्टोअर उघडलं की काही तासांतच सर्व संपून जातो. ती आणि तिच्या मैत्रिणी टॉर्टिला हा पोळ्यांसारखा पदार्थ स्टोअरमधून आणून घरात साठवतात आणि गरजेनुसार त्यात भाजी किंवा काही स्टफ घालून खातात. वडील तिला फोनवर बजावतात, बी सेफ. पण दूध, किराणा, भाज्या यासाठी तिला घराबाहेर पडावेच लागते. मैत्रिणींची सोबत हा या परिस्थितीत तिचा मोठा आधार बनला आहे. 

श्रावण-पूनम-प्रशांत कुलकर्णी, अंधेरी

कोरोनाचा सर्वाधिक आउटब्रेक असलेल्या ऑन्टेरिओ सिटीत श्रावणला जाऊन काही महिनेच झाले आहेत. तिथेच काम करून तो हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षणही घेत आहे. त्याची आई म्हणते, मी पॅनिक नाही अजिबात. आधी काळजी वाटत होती, कारण इतर सर्व देशांतील बातम्या येत होत्या, पण कॅनडाची काहीच खबर नव्हती. दोन आठवड्यांपासून कॉलेज बंद झालंय, या आठवड्यात काँही बंद झाली. पुढल्या आठवड्यापासून ऑनलाइन लेक्चर्स, असाइनमेंट होणार आहेत. मित्रमित्र मिळून राहत असल्याने एकमेकांना मदत होतेय. तेथील सरकारची काटेकोर व्यवस्था बघून चिंता कमी झाल्याचे त्या नोंदवतात. काय साठवता येईल, काय नाही याबाबत आई म्हणून त्या श्रावणला फोनवरून टिप्स देतात. तो जिथे आहे तिथे त्याने सुरक्षित राहावे हीच त्यांची अपेक्षा आहे. 

0