आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:स्वयंसेवी क्षेत्र आणि संचालनातील गुंता

मधुसूदन देशपांडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशातील स्वयंसेवी क्षेत्राचा गेल्या काही दशकातील विकास आणि विकास क्षेत्रातील सहभाग नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. स्वयंसेवी क्षेत्राचे सामाजिक विकासातील योगदान वादातीत आहे. तथापि, या क्षेत्राचा काळाच्या ओघातील एकूण प्रवास पाहिला की संस्था संचालनासारखे काही प्रश्न समोर आल्याशिवाय राहत नाहीत. या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. चर्चेला अनुसरून सकारात्मक बदलही झाले पाहिजेत म्हणजे समाजाचा आधार असणारे हे क्षेत्र निकोप आणि विश्वासार्ह्यता राहील.

समाजातील अक्षम घटकांसाठी सक्षम घटकांनी काम करण्याची परंपरा अतिप्राचीन असून ही परंपरा दीर्घकाळ अनौपचारिक स्वरूपाचीच होती. काळाच्या ओघात ही व्यवस्था औपचारिक होत गेली. या औपचारिक व्यवस्थेला स्वयंसेवी क्षेत्र असे नावही मिळाले. कार्यपद्धती आणि निधी स्रोत बदलत गेले आणि त्यासोबत या क्षेत्राचे नावही बदलत गले. स्वयंसेवी ते अशासकीय संस्था असा नावाचा प्रवासही झाला. सुरुवातीला पदरमोड करून चालवल्या जाणाऱ्या या व्यवस्थेच्या आर्थिक स्रोतात लोकसहभाग, देशी दाता संस्था, परदेशी दाता संस्था, शासनाचे विभाग, उद्योग जगत असे नवनवीन मार्ग येत गेले आणि ही व्यवस्था मोठी होत गेली. विस्तारत गेली.

भारतात स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील अनेकांनी आपल्या कामासाठी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर स्वयंसेवी व्यवस्था स्वीकारली आणि देशभर रचनात्मक काम करणाऱ्या या संस्थात्मक व्यवस्थेचा विस्तार होत गेला. ब्रिटीश राजवटीतच अशा कामाच्या व्यवस्थेसाठी कायदेशीर चौकट तयार केली गेली होती ती चौकट स्वातंत्र्यानंतर गरजेनुसार बदल करून कायम ठेवली गेली. या कायदेशीर तरतुदीचा हेतू या व्यवस्थेच्या संचालनाचे काम सुरुळीत व्हावे, आर्थिक व्यवहार करता यावेत आणि या सगळ्या बाबींवर समाजहिताच्या दृष्टीने शासकीय नियंत्रण असावे हा होता.

स्वयंसेवी व्यवस्थेच्या संदर्भात सर्वात महत्वाची बाब म्हणजे संस्थेचे संचालन करणारे पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळ. सुरुवातीच्या काळात स्वयंसेवी क्षेत्रातील धुरिणांनी या संस्था सामान्यत: भिन्न भिन्न समाज घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समविचारी व्यक्तींना सोबत घेवून उभ्या केल्या. संस्थेच्या विश्वस्त मंडळात सहभाग म्हणजे अधिकची जबाबदारी होती. शक्यतो प्रत्यक्ष कामात सहभागी व्यक्तीच आळीपाळीने या विश्वस्त मंडळात यायची. कधी कधी सामाजिक प्रभाव असणाऱ्या कार्यकर्त्यांना मंडळावर निमंत्रित केल्या जायचे आणि ते आपल्या प्रभावाचा संस्था कामाला लाभ करून द्यायचे. विश्वस्त मंडळ ही प्रतिष्ठा मिळवण्याची नाही तर दायित्व निभावण्याची जागा असल्याची भूमिका होती आणि म्हणून त्यासाठी फारशी स्पर्धा देखील नव्हती. आपल्याकडील उपलब्ध वेळ, अनुभव आणि कौशल्य यांचा विचार करून लोक सहभागी व्हायचे आणि करून घेतल्या जायचे.

अलीकडच्या काही दशकात या स्वयंसेवी व्यवस्थेचे स्वरूप बदलत गेले. निधीचे स्रोत वाढले. क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली. या कामाला व्यावसायिक स्वरूप आले. क्षेत्राला कॉरपोरेट लूक यायला लागला आणि सगळेच अमुलाग्र बदलत गेले. कधी काळी कुणाच्या तरी जागेतून चालणाऱ्या या संस्थांनी जागा घेतल्या. इमारती बांधल्या. कामाच्या सोयीसाठी म्हणून संसाधने खरेदी केली. व्यवस्था नियमित चालावी म्हणून कॉरपस फंड उभारला. याच काळात या व्यवस्थेत प्रत्यक्ष कामाच्या बरोबरीने किंबहुना त्याहून जास्त महत्व संस्थात्मक उभारणीला दिले गेले. यातूनच संस्था म्हणजे पसारा व्हायला वेळ लागला नाही.

एकीकडे या संस्थात्मक पसाऱ्याला सांभाळायचे आणि दुसरीकडे संस्था ज्या उद्देशाने उभारली गेली त्यासाठीही काम करायचे यातील समतोल साधणेे ही तारेवरची कसरत विश्वस्त मंडळासाठी जिकिरीची बाब ठरली. या प्रक्रियेत कळत नकळत संस्थेचा आर्थिक विस्तार झाला, काम करणारी माणसे वाढली. संस्था नोकरी देणारी व्यवस्था झाली. पदाधिकारी आणि विश्वस्थांसाठी सुविधा उपलब्ध होत गेल्या. विश्रामगृह आले, दोन, चार चाकी गाड्या आल्या, खाजगी सचिव आले आणि वैयक्तिक सुविधासाठी नोकर चाकर आले. परिणामी, संस्था विश्वस्त आणि पदाधिकारी ही पदे जबाबदारी सोबतच प्रतिष्ठेची व्हायला लागली.

दहा घरातली दहा माणसे एकत्र आली की विचारांची भिन्नता आलीच. विश्वस्त मंडळातील ही भिन्नता जुन्याकाळात देखील होती मात्र सर्वांचा हेतू एक होता, कुणाच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हता, वैयक्तिक लाभाचा प्रश्न नव्हता आणि म्हणून ही भिन्नता स्वीकारणे कुणाला अवघड जात नव्हते. किंबहुना ही वैचारिक मतभिन्नता व्यापक अर्थाने संस्थेला बळ देवून हेतूकडे घेवून जाणारी ठरत होती. अनेकांचे मार्ग भिन्न असले तरी पोहचायचे ठिकाण एकच होते आणि हाच धागा विचारांच्या भिन्नतेवर मात करणारा ठरला.

बदलत्या संदर्भात संस्था स्थापनेच्या प्रधान हेतूला जोडून अनेक आवश्यक आणि अनावश्यक हेतू या व्यवस्थेला जोडल्या गेले. आर्थिक व्यवहार वाढला. आधी केवळ कामापुरता असणारा पैसा आता शिल्लक राहायला लागला. त्याच्या विनियोगाचा प्रश्न आला. सुरुवातीला संस्था विकासाला प्राधान्य दिले गेले. मात्र, हळू हळू संस्था विकासाची जागा समूह, कुटुंब आणि व्यक्ती विकास अशी संकुचित झाल्याचेही अनेक ठिकाणी पाहावे लागले. याचाच एक परिणाम असा झाला की विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सामाजिक हिताहून अधिक या संस्थात्मक व्यवस्थेची, वैयक्तिक वर्तनाची चर्चा व्हायला लागली.

अनेक ठिकाणी संस्थात्मक व्यवस्थेसंबंधीच्या मतभिन्नतेतून विश्वस्त मंडळात वाद उभे राहिले. त्याला वैयक्तिक महत्वाकांक्षा, इर्षा, स्पर्धा, लालसा या अपप्रवृत्ती जोडल्या जायला वेळ लागला नाही. अनेक ठिकाणी विश्वस्त मंडळातील वाद कोर्टात गेले, असभ्य पद्धतीने समोर आले, मूळ हेतू बाजूला जावून नको ते प्रश्न प्रतिष्ठेचे होत गेले. परिणामी ज्यांची गरज होती असे अनेकजण या क्षेत्रातून बाहेर पडले. अनेक संस्थांचे काम विस्कळीत झाले. काहींच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात झाले. विश्वस्त संस्थेत कमी आणि न्यायालयात जास्त वेळ दिसू लागले तर काही संस्थांचे काम चक्क थांबले. अनेक लोकोपयोगी उपक्रमांना याची झळ पोहोचली. या क्षेत्रावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या असंख्य घरातील चूल विझली.

स्वयंसेवी क्षेत्रातील या स्थित्यंतराची क्षेत्राने दखल घेतली नाही असे झाले नाही. मात्र, अनेकांनी दखल घेताना व्यापक विचार दूर ठेवला. सोपे उत्तर शोधण्यात समाधान मानले आणि तिथेच या क्षेत्रासाठी अनिष्ट प्रथा रुजली. संस्था संचालनाचे काम मनासारखे काम करता यावे, विसंवाद नसावा, परस्पर विश्वास असावा अशी किमान या क्षेत्रासाठी तरी न पटणारी कारणे देतसंस्था प्रमुखांनी कुटुंबातील व्यक्तींना विश्वस्त मंडळावर घेण्याचा पर्याय शोधला. सुरुवातील विश्वस्तांनी आपल्या कुटुंबातील एक प्रतिनिधी देवून आपला वारसाही कायम राहील आणि प्रश्नही सुटेल असा अत्यंत संकुचित विचार करून आनंद साजरा केला. हा आनंद देखील फार काळ टिकणारा नव्हता. मुळात तकलादू उत्तराने ऐरणीवरचे प्रश्न धसाला लागत नाहीत याचे सुज्ञांनाही विस्मरण झाले आणि त्यांनी उत्तराचा शोधात आणखी एक घातक पावूल उचलले.

संस्थेच्या विश्वस्त मंडळात आपल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींचे बहुमत राहील याकडे संस्था प्रमुखांनी लक्ष दिले आणि अनेकांनी हे लक्ष साध्यही केले. नाही म्हणायला काही संस्था याला अपवाद होत्या. मात्र, बहुतेकांनी संस्थात्मक रचनेला कौटुंबिक स्वरूप देण्यावर भर दिला.यात एक व्यावहारिक सोय बघण्याचा हेतू नव्हता असे म्हणता येत नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या संस्थामधून हा विचार प्राधान्याने केला गेला. आपल्या पुढ्या पिढ्यांची सोय असाही दृष्टीकोन ठेवला गेला.

मुळात चुका इथेच झाल्या. विश्वस्त ही एक वृत्ती आहे आणि विश्वस्तांच्या कुटुंबातील सगळ्यांकडे ती असेलच असे गृहीत धरता येत नाही या मुद्द्याकडे चक्क दुर्लक्ष झाले किंवा हेतुपुरस्सर केल्या गेले आणि संस्था व्यवहारात कौटुंबिक स्वार्थाचा विचार डोकावू दिला. परिणाम व्हायचा तोच झाला. विश्वस्त मंडळातील ज्या विसंवादावर औषध म्हणून हा पर्याय निवडला होता तो पर्याय औषधापेक्षा रोग बरा याच वर्गवारीतला होता. या उपायाने संस्थेतील विसंवादाला संस्था प्रमुखाचे कुटुंब हे आणखी एक घर मिळाले. खरा पर्याय संस्थेतील आणि संपर्कातील उपलब्ध मनुष्यबळातून सुयोग्य व्यक्तींना दुसरी फळी म्हणून घडवून त्यांना सहभागी करून घेणे हा होता आणि तोच नेमका बहुतांश ठिकाणी दुर्लक्षिला गेला.

यासंबंधी चर्चा करताना स्वयंसेवी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मुलांवर ते संस्कार झालेले असतात, त्यांना कामाचा परिचय असतो तेव्हा त्यांनी या क्षेत्रात यायला काय हरकत असा प्रश्न आवर्जून विचारला जातो. खरेतर कुटुंबातील सदस्यांनी कुठल्या क्षेत्रात काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य असायलाच पाहिजे. अगदी आपल्या पालकांप्रमाणे स्वयंसेवी क्षेत्र देखील त्यांना निवडता यावे. तथापि, हे काम करायला तीच संस्था असावी लागते, पदाधिकारीच व्हावे लागते (विश्वस्तांच्या घरातील माणसांनी आपल्या वकुबानुसार नोकरी संस्थेत नोकरी करू नये असा काही नियम नाही.), वर्षानुवर्ष काम करून संस्थेला लौकिक मिळवून देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कुटुंबाबाहेरील सहकाऱ्यांवर अधिकार गाजवावाच लागतो असा समज करून घेणे मात्र योग्य ठरत नाही.

कुटुंबाच्या श्रद्धेचा विषय म्हणून कुटुंबातील एखादा सदस्य कदाचित कार्यकारी मंडळावर यायलाही हरकत नाही पण लोकसंस्था म्हणवून घेताना कुटुंबातील प्रत्येकासाठी हीच काय ती एकमेव कर्मभूमी करण्यात काही चुकते का याचा आवर्जून विचार झाला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी हेच काम करायचे तर त्यासाठी इतर संस्थांच्या माध्यमांचा वापर करायला पाहिजे. गरज पडल्यास नवीन संस्था उभारल्या पाहिजेत म्हणजे अस्तित्वातील संस्थावर वेगळा परिणाम होणार नाही.

थोडक्यात, समाजसेवी क्षेत्राच्या संचालनातील गुंत्याचा धावता आढावा आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. मुळात या क्षेत्राची खूप गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जगण्यातली गुंतागुंत या सगळ्याच्या परिणाम स्वरूप समाजातील प्रश्न कधी नव्हे ते प्रखर होवून समोर यायला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्वयंसेवी क्षेत्रातील धुरिणांनी मूल्यांना प्राधान्य देऊन संस्थांचे संचालन केले पाहिजे. सामाजिक हिताच्या विचारात मागच्या दाराने व्यक्तिगत स्वार्थ डोकावणार नाही किंवा फसलेल्या आणि चुकीच्या धारणांच्या आधारे निर्णय होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. समाज आणि कुटुंब दोघांच्याही स्वास्थ्याला सांभाळले पाहिजे. असे झाले तरच, या क्षेत्राच्या माध्यमातून श्रीज्ञानेश्वरांना अपेक्षित दुरितांचे तिमिर जायला पाठबळ मिळेल.

संपर्क - ८४५९६००८५

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser