आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आठ वर्षांची चिमुरडी असताना चुकुन पाकिस्तानमध्ये पोहोचलेली मूकबधीर गीता आता २८ वर्षांची झाली आहे. मात्र पाकिस्तानातून परतून आठ वर्ष उलटून गेल्यानंतरही गीताच्या कुटुंबीयांचा शोध अद्याप सुरूच आहे. अंधारातील शोधयात्रेचा हा प्रवास आता मराठवाडा-तेलंगणाच्या सीमेवरील गावांत आणि नाशिक परिसरात घेतला जातोय. सांकेतिक भाषा तज्ञांनी सलग चार महिने गीताशी संवाद साधल्यावर त्यांना तिच्या गावाबाबत धागेदोरे हाती लागले. आणि आता ही शोधमोहिम महाराष्ट्रात सुरू झाली आहे...
गीता आता स्वत:लाही ओळखत नाही. ती गीताच आहे की अजून कोणी हे सुद्धा तिला माहित नाही. पंधरा वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर तिला आता स्वत:चे नाव, गाव, आई-वडील सर्वांचाच विसर पडलाय. लहानपणाच्या काही अंधूक आठवणी आहेत. त्यावरून एक-एक कड्या जोडत ही मूकबधीर "भारत की बेटी' स्वत:चा शोध घ्यायला निघाली आहे. आजवर अनेकदा ही अंधारातील शोधयात्रा अंतिम टप्प्यात आल्याचे वाटले. पण पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागली. त्यादृष्टीने आताची शोध मोहिम निर्णायक असेल असं गीतासह सर्वांनाच वाटतंय.
काही वर्षांपूर्वी आलेल्या "बजरंगी भाईजान' चित्रपटामध्ये चिमुकली मुन्नी चुकून रेल्वेत बसते आणि पाकिस्तानातून भारतात येते. येथे सलमान खान तिला तिच्या आई-वडीलांकडे पोहचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो आणि यशस्वीही होतो. गीताची कथाही काहीशी तशीच असली तरी देशांची अदलाबदल झाली आहे. भारतातली ८ वर्षाची चिमुकली १९९९ ते २००१ दरम्यान तिच्या गावाहून रेल्वेत बसली आणि अमृतसरला गेली. तेथून समझौता एक्स्प्रेसमध्ये बसून थेट लाहोरला पोहचली. पाकिस्तान रेंजर्सने तिला ताब्यात घेतले आणि स्वंयसेवी संस्था ईधी फाऊंडेशनला सोपविले. बालपणापासून तारूण्यातील पदार्पणाची जवळपास १५ वर्षे ती पाकिस्तानमध्ये होती. घरापासून लाहोरपर्यंतच्या प्रवासातील टप्पे मात्र गीताला आठवत नाहीत.
ईधी फाऊंडेशनच्या बिल्कीस ईधी यांनी तिला "फातिमा' नाव दिले. पण फातिमा नमाज पडत नव्हती. मुस्लिम धर्मातील रितीरिवाज तिला समजत नव्हते. मांसाहारही चालत नव्हता. पुस्तकात, वृत्तपत्रात हिंदू देवी-देवतांचे फोटो तिला जवळचे वाटायचे, ती ते कापून ठेवायची. बिल्कीस यांनीच तिला गीता नाव दिले. देवाचे फोटो ठेवण्यासाठी ईधी फाऊंडेशनच्या खोलीत एक देवघर बनवून दिले. यावरून बिल्कीस यांच्यावर टीकाही झाली. या ठिकाणीच मानवाधिकारी कार्यकर्ते अंसार बर्नी यांनी गीताला मुलीप्रमाणे वाढवले. तिच्या पालकांच्या शोधासाठी २०१२ मध्ये गीताचा फोटो घेऊन ते भारतात आले. पण अपयश हाती लागले. येथून गीताची माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली.
इंदूर येथे मूकबधीरांसाठी काम करणाऱ्या आनंद सर्विस सोसायटीने तिला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन परराष्ट्र व्यवहारमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांनी गीता २६ ऑक्टोबर २०१५ ला भारतात आली. स्वराज यांनी तिला "भारत की बेटी' असे नाव दिले. परंतू ज्यांच्या पाठपुराव्यामुळे ती भारतात आली त्या आनंद सोसायटीऐवजी तिला मूकबधीर संगठन आश्रमात ठेवण्यात आले. आता गीता २३ ची झाली होती. पहिल्या दिवसापासून तिचे एकच ध्येय होते, आई-वडीलांकडे जायचे. यासाठी ती रडायची. एकटी बसून रहायची. शून्यात बघायची. सुरूवातीची पाच वर्षे तिच्या पालकांच्या शोधासाठी फार प्रयत्न नाही झाले. जे लोकं स्वत:हून तिच्यावर दावा करायचे, त्यांचीच पडताळणी करण्याचे काम मूकबधीर संगठन आश्रमात सुरू होते. या आश्रमात १८ वर्षाखालील मुलींची सोय होती. कमी वयाच्या मुलींमध्ये अॅडजेस्ट होतांना गीताला अडचणी येत होत्या. महिला बालकल्याण विभागाला पत्र पाठवून तीने ही बाब मांडली. ती २८ ची झाल्यावर यावर्षी जुलैमध्ये तीला ज्ञानेंद्र आणि मोनिका पुरोहित यांच्या आनंद सर्विस सोसायटीत पाठवण्यात आले. ज्ञानेंद्र पुरोहित सांकेतिक भाषा तज्ञ असून चार महिने गीताशी संवाद साधल्यावर त्यांना तिच्या गावाबाबत धागेदोरे हाती लागले. आणि येथूनच गीताला तिच्या घरी पोहचवण्यासाठी शोधयात्रा सुरू झाली. ज्ञानेंद्र यात "बजरंगी भाईजान'च्या भूमिकेत आले.
गीताने केलेल्या वर्णनावरून तिचे गाव मराठवाडा-तेलंगाणाच्या सीमेवरील असावे, असा अंदाज आला. गीताच्या उजव्या नाकपुडीत छिद्र आहे. उत्तर भारतात डाव्या नाकपुडीत छिद्र असते. यामुळे ती दक्षिण भारतातील असावी, हे निश्चित झाले. तिच्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनवर देवनागरी आणि इंग्रजीतील पाट्या होत्या. दक्षिण भारतातले शहर असते तर तेथे तेलुगूतही पाटी असती. यामुळे कदाचित ती दोन्ही राज्याच्या सीमेवर असावी, ही दुसरी कडी मिळाली. गीताच्या गावातून वाफेचे इंजिन धावायचे. मराठवाडा वगळता बहुतांशी मार्गावर २५-३० वर्षापासून विजेचे इंजिन धावतात. तिच्या गावात ऊस, भुईमूग आणि भाताची शेती होते. हे पीक मराठवाड्यातच घेतले जाते. जेवणात इडली-डोसा असायचा. गावात इडली-डोसाचा गाडा लागायचा. उत्तरेतील मोठ्या शहरात असा गाडा असतो. पण दक्षिणेतील गावातही असेे गाडे लागतात. गीता रेल्वेने अमृतसरला आणि तेथून घाबरून समझौता एक्स्प्रेसमध्ये लपून बसली. मराठवाड्यातून जाणारी सचखंड एक्स्प्रेस अमृतसरला जाते. गीताच्या गावात रेल्वेेस्टेशन आणि जवळच नदी आहे. त्यात अंघोळ करून लोक देवीच्या मंदीरात दर्शनाला जातात. याच गावात एक प्रसूती रूग्णालयही होते. तिच्या गावाजवळ अमरीश पुरीच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले हाेते. दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू तिला आवडतो. यावरून आमचा शोध आंध्र, तेलंगाणावर आला. परंतू स्टेशनच्या पाट्यांवरील भाषेमुळे आम्ही दोन्ही राज्याच्या सीमेवर थांबलो. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर म्हणजे मराठवाड्यात तिचे कुटूंब असावे, या निष्कर्षापर्यंत पोहचल्याचे ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगीतले.
या वर्णनावरून ज्ञानेंद्र गीताला घेवून मराठवाड्यात आले. मनमाड ते नांदेड आणि पुढे तेलंगाणापर्यंत तिचे घर शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. सुरूवातीला रेल्वे मार्गावरील जालना, परभणी आणि नांदेडला जाण्याचा बेत होता. "बजरंगी भाईजान'मध्ये स्थानिक चॅनेलचा पत्रकार "चांद नवाब' सलमानच्या सोबतीला हाेता. गीताच्या कथेत ६ आयएएस अधिकारी, १४ पोलिस आणि रेल्वे पोलिस अधिकारी, ४ राज्यातले डझनभर सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक पत्रकार "चांद नवाब'च्या भूमिकेत आहेत. "मिशन गीता २०२०' या वॉट्सअॅप ग्रुपवर क्षणाक्षणाचे अपडेट्स सुरू असतात.
औरंगाबादजवळील लासूर स्टेशनला गीता पोहचली, त्यावेळी नदी आणि स्टेशन पाहून तीचे डोळे चमकले. रेल्वे रूळांवर जाऊन तिने परिसर धुंडाळला. गावातही फेरफटका मारला. पण देवी दाक्षायणी मंदीरात गेल्यावर हे "ते' मंदीर नव्हे, असे तिने ठासून सांगीतले. येथून जालन्याला गेले. येथील स्टेशनच्या फलकावर देवनागरी, इंग्रजीसहीत उर्दूतही नाव असल्याचे पाहताच ती नाही म्हणाली. परभणी, गंगाखेड, पूर्णा, नांदेड, धर्माबाद येथेही तिला काहीच ओळखीचे नाही दिसले. गीताच्या चेहऱ्यावरील गेल्या ३ दिवसात हरवलेले हास्य तेलंगणातील बासरला गेल्यावर परत आले. बासर स्टेशन, गोदावरी नदीचा काठ तिला ओळखीचे वाटले. ही अंधारयात्रा संपली असे सर्वांना वाटत असतांना सरस्वती मंदीरात गेले आणि पुन्हा एकदा निराशा हाती लागली. स्टेशन ते मंदीर जवळपास ३ किलोमीटर अंतर आहे. मात्र, तिच्या गावाच्या अगदी जवळ स्टेशन होते. पुन्हा सर्वकाही थांबले.
सततच्या अपयशातून गीता वैतागून जाते. तिची चिडचिड होते. मध्येच रूसते, रागावते. पण थाेड्याच वेळेत हसून पुन्हा कामाला लागते. तिचा मूड सतत बदलत राहतो. कधी-कधी तिला खूप बोलावेसे वाटते. कधी गुपचूप बसून असते. लाहोरच्या १५ वर्षाच्या आठवणी तिला दिलासा देवून जातात. ती हिंदी लिहीणे, वाचणे शिकली आले आहे. पुढे तिला शिकण्याची इच्छा नाही. ज्ञानेंद्र यांना दाेन मुले आहेत. एक मुलगी असावी असे वाटायचे. ही कमी गीताने पूर्ण केली. तिचा घरात मुुक्त वावर असतो. ती आवडीचे पदार्थ तयार करते. टीव्हीवर मालिका बघते. महेशबाबूचे सिनेमे तीला खास आवडतात. तिने शिक्षण नाही घेतले तरी हरकत नाही, पण निदान तिने काही कौशल्य शिकून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे मोनिका सांगतात.
सुषमा स्वराज तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होत्या. भोपाळला एका लग्नासाठी आल्या असता गीता त्यांना भेटायला गेली. तर इंदूरला आल्यावर सुषमा स्वत: गीताच्या आश्रमात गेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तिने भेट घेतली. स्वराज यांनी तिला लग्न करण्याचा सल्ला दिला. चाळीसहून अधिक मुलांनी तिला लग्नाचे प्रस्ताव पाठवले. काही मुलांना ती भेटली. पण एकही पसंत नाही आला. लग्नातील सात फेऱ्यानंतर तिने एक आठवा फेरा ठेवला आहे. आई-वडीलांना शोधण्यात मदत करेल, त्याच्याशी लग्न करणार असल्याचे ती सांगते. सुषमा यांच्या निधनाने गीता खूप दु:खी झाली. एका शोकसभेत तिने हातवारे करून भावना व्यक्त केल्या होत्या. हे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आपण भारत की बेटी असून उभा देश माझा आहे, असे ती अभिमानाने सांगते. इंदूरहून कारने औरंगाबादला येतांना एका ठिकाणी पोलिसांनी अडवले. गीताला शोध सुरू करण्याची घाई होती. ज्ञानेंद्र पोलिसांशी बोलत असतांना गीता कारमधून उतरली आणि मी "भारत की बेटी' असल्याचे सांगू लागली. त्रास दिला तर मोदीनांच फोन लावेल, असा दमही दिला. नंतर पोलिसांनी तिच्यासोबत सेल्फी काढून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
मोनिका पुरोहित म्हणाल्या, आतापर्यंत ४५ लोकांनी गीता त्यांची मुलगी असल्याचे दावे केले आहेत. यापैकी ३० जणांच्या डीएनए चाचण्या करण्यात आल्या. पण त्या जुळल्या नाहीत. मराठवाडा दौऱ्याच्या प्रसारमाध्यमात बातम्या आल्या. त्या पाहून तीन दिवसात नाशिक, विजयवाडा, तेलंगाणा येथील चार जणांनी फोन करून गीताचे पालक असल्याचे सांगीतले. यामुळे नांदेडहून ही टीम नाशिकला रवाना झाली. नाशिक रोड स्टेशन, एकलहरा, पंचवटी, येवला, तांदूळवाडी येथे फिरले. रिकाम्या हातांनी शुक्रवारी ते इंदूरला रवाना झाले.
ज्ञानेंद्र सांगतात, या मोहिमेचा शेवट कसा होईल सांगता येत नाही. पण या दरम्यान कित्येक पालकांच्या ७ ते १२ वर्षाच्या मुली हरवल्याचे लक्षात आले. हे एखादे रॅकेट असावे असा संशय येतो. आम्हाला हरवलेल्या मुलींचे जे फोटो मिळाले ते देशभरातील पोलिस, स्वंयसेवी संस्था, बालगृहांना फॉरवर्ड करत आहाेत. कदाचित आमच्या गीतामुळे दुसऱ्या कोणा आई-वडीलांना त्यांची मुलगी सापडेल. ते म्हणाले, आम्ही ८५ पेक्षा अधिक्् मूकबधीर मुलांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. पण गीताची केस खूपच वेगळी आहे. खरंतर २० वर्षात सर्वकाही बदलले आहे. जुने रस्ते, गाव, स्टेशन, मंदीर यांचा विस्तार झाला आहे. गीता सांगते त्या ओळखी आता पुसट झाल्या आहेत. तरी आम्ही डगमगणार नाही.
mahitri@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.