आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करोना... कॅमेरा.. अॅक्शन:सोशल डिस्टन्सिंग...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करोना व्हायरस... अनेक घटना अन् अनेक कहाण्या... याच विषयावर चित्रपट काढण्यासाठी सध्या जगभरात चढाओढ सुरू आहे

महेशकुमार मुंजाळे

करोना व्हायरस... अनेक घटना अन् अनेक कहाण्या... याच विषयावर चित्रपट काढण्यासाठी सध्या जगभरात चढाओढ सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर  पटकथाकार महेशकुमार मुंजाळे यांनी लिहिलेली ही खास ‘पटकथा’ ‘दिव्य मराठी रसिक’च्या वाचकांसाठी...

काळ्या स्क्रीनवर फक्त आवाज येत आहे:

“मित्रों, आप कोरोना वैश्विक महामारी में पुरी दुनिया के स्थितीको समाचारों के माध्यम से सून भी रहे है, और देख भी रहे है. आप ये भी देख रहे है की दुनिया के समर्थ से समर्थ देशों को भी कैसे इस महामारीने बिलकुल बेबस कर दिया है. ऐसा नहीं है के ये देश प्रयास नहीं कर रहे है या उनके पास संसाधनो की कमी है लेकीन कोरोना व्हायरस इतने तेजी से फैल रहा है की तमाम तैयारीया और प्रयासो के बावजुद इन देशोमें चुनौती बढतीही जा रही है. इन सभी देशो के दो महिनो के अध्ययनसे जो निष्कर्ष निकल रहा है और एक्सपर्ट्स भी यही कह रहे है की इस वैश्विक महामारी कोरोना से प्रभावी मुकाबले के लिये एक मात्र विकल्प है सोशल डिस्टन्सिंग. यानी एक दुसरेसे दूर रेहना, अपने घरोमेंही बंद रेहना. कोरोना से बचनेका इसके अलावा कोई तरीका नहीं है.”

TITAL CARD: सोशल डिस्टन्सिंग

काळी स्क्रीन हळू हळू उजाडू लागते. त्यावर आतल्या बाजूने गज असलेली लाकडी बंद खिडकी दिसते. त्या खिडकीच्या टवका उडालेल्या फटीतून सूर्याची किरणं आत येत आहे. ती किरणं जमिनीवरच गुंडाळून ठेवलेल्या गादीवर अंगाचं मुटकुळं करून पहुडलेल्या साधारण २५-२६ वर्षे वयाच्या एका तरुणाच्या हातावर पडत आहेत. पाठमोऱ्या आकृतीत त्याचे विस्कटलेले केस, चुरगळलेला शर्ट आणि कळकट झालेली बर्मुडा त्याचा "बॅचलर' अवतार दाखवत आहे. त्या गादीच्या शेजारी एका लवंडलेल्या छोट्या प्लास्टिकच्या पांढऱ्या डब्यातून नुडल्स बाहेर येताना दिसत आहेत. हिटर वायरला लोंबकळत आहे. खाली सिगारेटची थोटकं अस्ताव्यस्त पडलीयेत. त्या पलीकडे एक पालथी स्लीपर दिसतेय.

सूर्याची किरणं हातावरून सरकत डोळ्यांवर जाऊ लागतात. त्याच्या डोळ्यांची हालचाल होते. हाताने किरणं आडवत तो सूज आलेले डोळे प्रचंड त्राण आणून उघडण्याचा प्रयत्न करत आहे. हळूवारपणे तो डोळे उघडतो आणि आहे त्याच जागी उठण्याचा प्रयत्न करू लागतो. गादीच्या खाली पाय ठेवणार तोच त्याला खाली बघून दरदरून घाम फुटायला लागतो. तो घाबरत घाबरत हळूवार एक पाय टेकवतो पण त्याची हिम्मत होत नाही. तो खाली पाय न टेकवता स्वतःला ताणत तुटलेल्या चार्जरच्या वायरला लटकत असणारा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो. काही प्रयत्नांनंतर मोबाईल हाती येतो. तो त्राग्याने डोक्यावर हात मारून घेतो. सगळा जीव एकवटून मोबाईलचं बटण दाबतो. फोन स्विच-ऑन होऊ लागतो. चालू होतानाच बॅटरी संपल्याचं नोटीफिकेशन ब्लिंक होतं. तेवढ्यात एक मेसज येतो. तो मेसेज ओपन करण्यासाठी त्यावर क्लिक करतो. मोबाईल वर मेसेज दिसतो. 

‘To defeat COVID19 pandemic, Honorable Prime minister extends lockdown period till 3rd of May. Stay Home Stay Safe.’

मेसेज पूर्ण वाचून होतो न होतो तेच बॅटरी संपल्याचं नोटीफिकेशन ब्लिंक होऊन फोन बंद होतो. तो जीवाच्या आकांताने जोरात आक्रोश करतो आणि हातातला मोबाईल भिंतीवर फेकून मारतो. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. त्याच आक्रोशात तो घाबरत घाबरत पुन्हा पाय जमिनीवर टेकवतो आणि समोर पालथी पडलेली चप्पल पटकन हातात घेऊन फरशीवर वेगवेगळ्या ठिकाणी जोरजोरात मारू लागतो. कोरोनाच्या नावाने घाण घाण शिव्या देऊ लागतो. त्याच तंद्रीत तो समोर जाऊन सिगारेटची थोटकं गोळा करतो आणि लायटर उचलून परत पटकन गादीवर येऊन बसतो. थोडीफार शिल्लक राहिलेली सिगारेट तो थरथरत्या हातांनी पेटवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करतो. सातव्या आठव्या प्रयत्नानंतरसुद्धा लायटर काही पेट घेत नाही. शेवटी तो लायटर रागात फेकून देतो. इकडे तिकडे पाहतो आणि गादीवर उभा राहून हिटरची वायर जोडलेल्या प्लगचे बटण चालू करतो. हिटर तापून लाल होऊ लागतो, त्यावर चिकटलेले नुडल्सचे तुकडे करपू लागतात. लाल भडक झालेल्या त्या हिटरवर तो ते सिगारेटचं थोटूक टेकवून पेटवतो आणि पटकन कश मारायला सुरुवात करतो. प्रत्येक कश अंगात भिनवण्यासाठी तो ताकदीने पटापट झुरके मारायला सुरुवात करतो. ते थोटूक संपतं ना संपतं तोच तो पुढचं थोटूक पेटवतो. असं हे बराच वेळ चालू राहतं, तिकडे हिटर प्रचंड तापत चाललाय. लालभडक रंग आता तापून तापून पांढरा होत चाललाय. हा इकडे एक एक थोटूक फिल्टरपर्यंत शोषून घेत आहे. तेवढ्यात जोरदार आवाज येतो आणि वर फ्युजमधून धूर निघतो.

“ मला काय व्हतंय?”, “पापी माणसाला काय नस्तोय करत कोरोना.”, “आपल्याला जगण्यापुरतं खायला आणि स्पीडवालं इंटरनेट आसल्यावर कुणाची गरज नाय लागत.”, “एकटा जीव सदाशिव, लै सुखी हाय आपन” असे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांसमोर बढाईखोर डायलॉग फेकणाऱ्या ‘त्याची’ ही अशी बदलती मानसिक अवस्था आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्याने एकामागून एक केलेले प्रयत्न त्याला अजून गर्तेत कसे खेचत नेत आहेत हे उलगडणारी कथा म्हणजे ही ‘सोशल डिस्टन्सिंग’

वर उल्लेखलेले प्रसंग म्हणजे संपूर्ण कथा नाही. ती पटकथेची एक हलकीशी झलक आहे. त्याची ही अवस्था होईपर्यंतचे टप्पे काय काय होते? पुढे त्याचं काय होईल? त्याला आधी कोरोना हरवेल की त्याचा मेंदू? की या दोन्हीवर तो मात करेल? की त्याला कुणाची मदत मिळेल? हे कथा उलगडत गेल्यावर नक्कीच कळेल. तूर्तास एवढी झलक पुरेशी आहे.

संपर्क - ८३०८६३९३७७

बातम्या आणखी आहेत...