आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:प्रेमावर दिलसे असे काही...!

मनोज बोरगावकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम ही जगात सगळ्यात केंद्रस्थानी असलेली, पण मोजायला हाताची बोटं जास्त वाटावीत इतक्या कमी लोकांना गवसलेली गोष्ट. म्हणूनच असे म्हटले जाते की, "प्रेम माने दो व्यक्तियोंके बीच असंभव हो जाना." मनोज कुलकर्णी यांचा ‘अडीच अक्षरांचा प्रवास’ हा कथासंग्रह वाचकाला या वाटेवर आणून सोडतो...

प्रेम ही जगात सगळ्यात केंद्रस्थानी असलेली, पण मोजायला हाताची बोटं जास्त वाटावीत इतक्या कमी लोकांना गवसलेली गोष्ट. म्हणूनच असे म्हटले जाते की, "प्रेम माने दो व्यक्तियोंके बीच असंभव हो जाना." मनोज कुलकर्णी यांचा ‘अडीच अक्षरांचा प्रवास’ हा कथासंग्रह वाचकाला या वाटेवर आणून सोडतो... फक्त आणून सोडतो. ज्याचा जेवढा वकूब तेवढे त्याने ओंजळीत घ्यावे. ते पाण्यासारखे ओंजळीतून निसटून जाण्याची शक्यता गृहीत धरूनही.

ऐकोणचाळीस तुकड्यांच्या हा ऐवज एक अव्यक्त संगती घेऊन वाचकांना सामोरा येतो. हे वाचून प्रेम त्याला गवसेलच असा अविवेकी दावा अजिबातच नाही, पण तनमनावर त्याच्या काही खाणाखुणा उमटून राहाव्यात आणि त्याचे पडसाद काळजावर उमटावेत एवढी ऐपत या ‘अडीच अक्षरां’ची नक्कीच आहे.आपण बोटांच्या चिमटीत फुलपाखरू पकडावे, काही काळानंतर ते उडून जावे, पण बोटांच्या चिमटीत चिकटलेले त्याचे रंग दीर्घकाळ साथसंगत करीत राहावेत. अगदी त्यागतच हा ‘अडीच अक्षरी प्रवास’.

मनोज कुलकर्णी यांच्या लेखनाची ऐपत ही की, रान मोकळे आहे म्हणून पेरत राहीले की उगवायचे राहत नाही, पण जमिनीचा कस खालावतो. याचे सजग भान पुस्तकाच्या पानापानातून डोकावते. अक्षरांची अजमत अन् शब्दांची मात्तबरी लेखक जाणून आहे. ‘प्रेम म्हणजे तुफानाला कवेत घेणं’, या तुकड्यात कैरी-चिंचेसारखी आंबट-गोड चव सभोवार दरवळत राहते. ‘चुके काळजाचा ठोका’ या तुकड्यात पाऊस आणि तिचा धागा समजून घेण्याचा मनस्वी प्रयत्न केला आहे. प्रेम म्हणजे पावसाच्या दोन सरींमधलं अंतर जे कधीही पार करता येत नाही तरीही आपण अविरत तसा प्रयत्न करीत राहतो ता उम्र...

'आशेचा आंबेमोहोर असा खुडू नकोस. ' या सारखी वाक्यं वाचकांचा पाठलाग करीत राहतात. कितीतरी वेळ... कितीतरी वेळा....! ‘वेडावणारी हळवी टॉफी’ अनुभवली की चिमणीच्या दाताने तोडून दिलेली लहानपणीची काळजाच्या पानांत दुमडून ठेवलेल्या आठवणींना हळुवार जाग येत राहते. सभोवार वावरत असलेल्या हिंस्र श्वापदाला ओलांडून आपसूक ऒठावर ओळी येऊन थांबतात.

"किताबे माझं कर देख

या आठ पलटकर देख जरा

न जाने कोनसा सफा

मूडा हुवा निकलेगा..."

‘मॉं, माशुका और मोहब्बत’मधे, मकबूल फिदा हुसेनच्या ओळी इतक्या व मुळाबरहुक मश्गुल झाल्या आहेत की वाचकांचा अवकाश रुंदावत जातो. या कथांच्या तुकड्यातला पाऊस वाचकांच्या मनात एक ओल धरत राहतो. मग अनेक वेळा दुःखालाही पालवी फुटत राहते. ‘सच्ची याद’ तर इतकी सच्ची असते की पायात बळ येणं, अनामिक शक्तीनं खेचणं... या सारखे आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर वाचकाला आलेले अनुभव मनातल्या मनात उजागर होत जातात. नदीसारखे वाहत राहतात. अंजान प्रदेश आपलेसे करीत.

या तुकड्यांना दिलेली शिर्षकही मनस्वी तरल आणि आपला आपला आब राखून आलेली आहेत. या छोटेखानी कथांमध्ये एक अव्यक्त संगती आहे जी वाचकाला खिळवून ठेवते. प्रसंगी सगळ्या लेखन प्रक्रियेचा अॅक्टिव्ह भाग बनवते. प्रेमाचं नात सबलाइम असेच असते, पण नात्यामधल्या सांदींना दरार व्हायलाही फारसा वेळ लागत नाहीत. अशावेळी दिले घेतलेले शब्द कपरासारखे उडून जातात. प्रेम हा कुठलाही व्यवहार नसतोच मुळी. पण प्रेमाला लगटून आलेला व्यवहार सचोटीने केला की नाती अजरामर ठरतात. अमृता-इमरोजसारखी. मी एकदा इमरोजजींना फोनवर प्रश्न विचारला होता, "अमृताजी की बहोत याद आती होगी". ते हसले आणि म्हणाले होते, "याद आने को मै उसे भूलाही कहा हूँ."

अशा परीने प्रत्येकाने आपापल्या परीने या ढाई अक्षरांविषयी लिहलेलेच आहे. प्रेम या खुदाच्या नेमतला मनोज कुलकर्णी यांनी आपल्या काळजातून वाहिलेली ओंजळ वाचकांना समृद्ध करणारी अशीच आहे. आत उतरणारी तरल वाक्य हे या पुस्तकाचे एक महत्वाचे बलस्थान. तू असताना तू नसताना...एखादा कोणी आपला श्वास असणे काय असते ही अनुभुती इतकी देखणी असते की रूढ अर्थाने इतर वेळी पोखरून टाकणारी दुःख निमूट उंबरठ्यावर उभी राहतात आणि त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी दुवा या पलीकडे आयुष्याला अर्थच उरलेला नसतो. मनोज कुलकर्णी यांनी मोठ्या नेकीने कोणत्याही प्रपंचात न बसणाऱ्या प्रेमाचा प्रपंच लेखणीतून वाचकांसमोर साक्षात केला आहे अगदी अल्पाक्षरी नोंदीच्या स्वरुपात. एवढा आभाळाएवढा अवकाश अल्पाक्षरात मांडणं ही देखील करामतच म्हणावी लागेल नफीस अशीच. इसाप प्रकाशन आणि दत्ता डांगे यांचा प्रकाशक म्हणून असलेला रुतबा अधोरेखित करावा असाच आहे. प्रेम या कायनातमधली सर्वात जी बेहतरीन तोहमत...बिदापरवीनच्या आवाजातच समारोप करायचा मोह टाळता येत नाही…

"मेरा दामन बहोत साफ है

कोई तोहमत लगा दीजीए... "

पुस्तकाचे नाव : अडीच अक्षरांचा प्रवास

लेखक : मनोज कुलकर्णी

प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड

पाने : १३६

किंमत : २२५

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser