आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर-पार:कोरोनानंतर लाखो 'छबू मंडल' काय करणार?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थव्यवस्थेची मांडणी करताना मोठेमोठे बिझनेस चॅनेल्स, आर्थिक सल्लागार सेन्सेक्सच्या चढउताराबद्दल भरभरून बोलतात,

मयूर लंकेश्वर

अर्थव्यवस्थेची मांडणी करताना मोठेमोठे बिझनेस चॅनेल्स, आर्थिक सल्लागार सेन्सेक्सच्या चढउताराबद्दल भरभरून बोलतात, भविष्यवेधी गणितं मांडतात, गुंतवणुकीच्या परताव्याचा अंदाज बांधतात. सारे काही आलबेल होईल असा आशावाद निर्माण करतात. २०२१ सालात सेंसेक्स रुळावर येईल, गुंतवणुकीचा परतावा पुन्हा चांगला जोर पकडेल असेही आताच म्हटले जात आहे. ह्या प्रोजेक्टेड आशावादात भांडवली अर्थव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या मजुरांचे स्थान काय आहे?

टाळेबंदीच्या आयुष्याची आता आपल्यासारख्या बहुतांश लोकांना सवय झाली आहे. आपापल्या परीने आपलं मानसिक स्थैर्य टिकवून राहावं म्हणून आपल्या हाताशी असंख्य साधने असंख्य क्लृप्ती आहेत. कोरोनानंतरचं जग आणि आधीचं जग अशी विभागणी तज्ञापासून सामान्यापर्यंत बरेचजण करताना दिसतायत. एका अर्थाने ज्याला आपण इंग्रजीत adaption असे म्हणतो,  म्हणजे भोवतालाशी जुळवून घेणे ते सुरू आहे. काहीजण त्याच्याही पुढे जाऊन survival of the fittest – म्हणजे जो जगण्यालायक आहे तोच जगणार – अशी अगदीच शास्त्रीय, तार्किक आणि नैसर्गिक वाटावी अशीही मांडणी करत आहेत. दोन्ही संज्ञा एकमेकांना पूरक आहेत. भोवतलाशी जुळवून घेतल्याशिवाय टिकून राहता येत नाही हा निसर्गनियमच असल्याने Adaption, Survival of the fittest ह्या संज्ञाबद्दल आक्षेप घेता येत नाही. अगदीच मूलभूत वैश्विक तत्वासारख्या ह्या संज्ञा आहेत. त्याच्यामागे वैज्ञानिक अधिष्ठान आहे. मला प्रश्न पडतो तो मात्र ज्यांना ह्या संज्ञा कधीही ज्ञात नसतील आणि ज्यांच्या आयुष्याचा झगडा त्यांच्या जन्मापासूनच पिढीदर पिढी वारसाहक्काने चालत आल्यासारखा अविरत सुरूच राहतो अश्या माणसांचा. ही माणसे नेमकी कोण आहेत? त्यांचे समाजव्यवस्थेतील स्थान काय आहे? त्यांचे जातवर्गचरित्र काय आहे? लोकांनीच उभ्या केलेल्या ह्या व्यवस्थेत काही माणसांचा बळी जातो तेव्हा त्यांच्यासाठीही आपण Adaption आणि Survival of the fittest सारख्या संज्ञाचे पांघरूण ओढून इथल्या व्यवस्थेचे कोडगेपण झाकावे का? ह्या कोडगेपणाची परिसीमा गाठत युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात सोहळे मिरवणारा माहोल इथे झगमगतो तेव्हा त्या झगमगाटाखाली दडलेल्या अंधारात आपण नेमके समाजातील कुठल्या स्तराला चिरडून ठेवले आहे ह्याचा कधी हिशोब मांडणार आहोत का?

गेल्या सहा वर्षात आणि त्यातही गेल्या दोन महिनाभरात सर्वात जास्त देशोधडीला लागलेला समूह कोणता असेल तर तो आहे घरापासून मूळ गावापासून हजारो मैल दूर पोटाच्या भुकेसाठी आपले श्रम अगदीच किरकोळ किमतीत विकणारा मजूर वर्ग. अर्थव्यवस्थेतच नाही तर इथल्या एकूणच समाजव्यवस्थेत अत्यंत हेटाळणीचे आयुष्य वाट्याला येणारा हा समूह आहे. भारताच्या जातीव्यवस्थेचा विचार करताना हे स्पष्ट दिसून येते की ज्या सामाजिक स्तरातून हे मजूर निर्माण होतात तो इथल्या जातीय उतरंडीत सर्वात खालचा ठरवला गेलेला स्तर आहे. तुमची आमची शहरं साफ ठेवणारा, तुम्ही आम्ही राहतो त्या सोसायट्यांची उभारणी करणारा, तुमच्या आमच्या चारचाकी गाड्या ज्या हायवेवरून सुसाट धावू शकतात त्या हायवेची बांधणी करणारा, तुमची आमची महानगरं बेफाट सुरळीत चालू रहावीत म्हणून पडेल ते काम करण्याची तयारी असणारा, गावगाड्याने बहिष्कृत केला गेलेला आणि शहरांनी दुर्लक्षित केलेला हा समूह आहे. भांडवली अर्थव्यवस्थेने थट्टा उडवलेला आणि हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने दलित मागासवर्गीय म्हणून राजरोस चिरडला जाणाऱ्या ह्या समूहाच्या वेदनांचे काय? त्यांच्याकरिता आपण कुठल्या Adaption आणि Survival of the fittest च्या संज्ञा लावणार आहोत? ह्यांच्यासाठी कधी कुणी बाल्कनीत उभं राहून घटकाभर कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या असतील का? नोटबंदीने नुसतेच भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले गेले नव्हते तर समाजव्यवस्थेतील एका मोठ्या शोषित निम्नजातीय समूहाला तिने रस्त्यावर आणले होते. आज ह्याच रस्त्यावरून लाखो मजूर घराकडे जाण्याची फरफट करताना दिसले. तेव्हा त्यांना कुणीही कोरोना वॉरियर्स म्हणून संबोधले नाही. झालेच तर घरबसल्या विविध रेसिपीज शिकून, नेता सांगेल तेव्हा घोषणाबाजी करून युद्धात जिंकल्याचा जोश दाखवत, स्वान्तसुखाय, घरांना ऐसपैस बाल्कनी असणाऱ्यांनी ह्या मजूर वर्गाची कायद्याचे पालन न करणारे नालायक लोक म्हणून निंदाच केली. समाजातील ह्या उच्चभ्रू वर्गाने आपल्या परमप्रिय सर्वोच्च नेत्याला मात्र अंदाधुंद कारभाराचा जाब आजपर्यंत विचारलेला नाही. इथून पुढेही ती शक्यता सुतराम नाही.

अर्थव्यवस्थेची मांडणी करताना मोठेमोठे बिझनेस चॅनेल्स, आर्थिक सल्लागार सेन्सेक्सच्या चढउताराबद्दल भरभरून बोलतात, भविष्यवेधी गणितं मांडतात, गुंतवणुकीच्या परताव्याचा अंदाज बांधतात. सारे काही आलबेल होईल असा आशावाद निर्माण करतात. २०२१ सालात सेंसेक्स रुळावर येईल, गुंतवणुकीचा परतावा पुन्हा चांगला जोर पकडेल असेही आताच म्हटले जात आहे. ह्या प्रोजेक्टेड आशावादात भांडवली अर्थव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या मजुरांचे स्थान काय आहे? पाच ट्रीलियन डॉलरच्या प्रोजेक्टेड इकॉनॉमीच्या अनेक आलेखात शोषित जातीतून येणाऱ्या ह्या मजुरांचा कोणता असा हक्काचा आलेख आहे? कोरोनाआधीचं जग आणि कोरोनानंतरचं जग अशी मांडणी जोर धरू लागलेली असताना, कोरोना आधीच्या जगातही मजूर देशोधडीलाच लागलेले होते आणि कोरोनानंतरच्याही जगात ते बेदखल होण्याचीच शक्यता अधिक प्रबळ आहे. कोरोनानंतरच्या जगात ह्या मजूर घटकाचे स्थान काय असणार आहे?  टाळेबंदीतल्या भवतालाने घरात बसून बसून येऊ घातलेले नैराश्य कसे दूर करावे ह्याबद्दल बरेच मानसोपचारतज्ञसुद्धा विविध माध्यमांवर बोलताना दिसून येत आहेत. जन्मापासून मरणापर्यंत झगडणाऱ्या मोठ्या समुहाच्या अस्तित्वाची दखल घेण्यापुरतेही नैराश्य, संवेदना निर्माण न करू शकणाऱ्या भारतीय समाजाच्या मानसिकतेचे काय करायचे हा मात्र कठीण प्रश्न आहे.

छबू मंडल ह्या पस्तीस वर्षाच्या मजुराने घरात अन्नाचा कण नाही म्हणून मोबाइल विकून किराणा भरून घेतला आणि शेवटी आत्महत्या केली. जिता ह्या बारा वर्षाच्या मुलीने दीडशे किलोमीटर चालून झाल्यावर घरापासून केवळ चौदा किलोमीटर अंतरावर असताना जीव सोडला. छबू मंडल ज्या सामाजिक स्तरातून येतो तिथे संघर्ष नवीन नाही. किंबहुना वरच्या जातीय आर्थिक स्तरातील लोकांचं आयुष्य सुकर व्हावं म्हणून खालच्या जातीय स्तरातील लोकांनी कायम खस्ता खाव्यात, बळी जावे हा आपल्या समाजरचनेचा अघोषित नियमच आहे. बारा वर्षांची जिता एखाद्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी असती तर अशी जीवघेणी पायपीट तिच्या वाट्याला नक्कीच आली नसती, घरात बसून तिने तिच्या स्वप्नांची चित्रे रंगवली असती. छबू आणि जिता आणि त्यांच्यासारखे अगणित जीव, सरकार दरबारी बेदखल असणारे, असंघटित क्षेत्रात काम करणारे हे कोट्यवधी लोकसुद्धा कोरोनाशी लढणाऱ्या वॉरियर्सप्रमाणे भारताचेच वॉरियर्सच आहेत, त्यांच्या हातांनी आणि पायांनी हा देश घडवला जातो हे वास्तव आपल्या व्यवस्थेला कधी मान्य होणार आहे? कोरोनाशी दोन हात करत लढणाऱ्यांबद्दल काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हवाई दलाने खास विमानातून खास फुलांचा वर्षाव केला असल्याचे वाचले. देशभरात फील गुड फॅक्टर वाढावा म्हणून सरकार अशी सोहळाबाजी करत दिवसरात्र झटत आहे. त्यातलीच काही फुले ज्या रस्त्यावरून हा मजूर वर्ग जखमी रक्तबंबाळ पाय घेऊन चालला, शरीरातले पाणी सुकून त्यांनी जिथं जीव गमावला त्या रस्त्यांवर पडली असतील का?

mayur.lankeshwar@gmail.com

संपर्क - ९९७००२८४०८

बातम्या आणखी आहेत...