आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:धुमसते बर्फ टिपणारे तीन योद्धे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक छायाचित्र दशलक्ष शब्दांपेक्षा अधिक बोलके असतात असं म्हटलं जातं.

एक छायाचित्र दशलक्ष शब्दांपेक्षा अधिक बोलके असतात असं म्हटलं जातं. दार यासीन, मुख्तार खान, चन्नी आनंद यांनी काढलेली छायाचित्र पाहिली की हे सत्य अगदी ठसठशीतपणे सामोरं येतं. हे तिघेही जम्मू-काश्मीरचे छायाचित्रकार... जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील प्रसारमाध्यमांसमोर जी काही बिकट परिस्थिती उद्भवली त्याचे हे तिघेही साक्षीदार. काश्मीरमधील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद असण्याच्या काळात लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचे अस्तित्व राखण्यासाठी तेथील पत्रकार-छायाचित्रकारांची जी काही केविलवाणी धडपड सुरू होती त्यात या तिघांचाही समावेश होता. ‘कॉन्फ्लिक्ट झोन’मध्ये वार्ताकन, छायांकन, छायावृत्तांकन करण्याची तशी काश्मीरच्या पत्रकारांना पूर्वीपासूनच सवय... पण ह्या सगळ्यात त्यांच्यातली परिस्थितीतून मार्ग काढून पत्रकारिता करण्याची जी जिद्द आहे तीच त्यांना तिथे पत्रकार म्हणून जिवंत ठेवते. त्यांच्यातील याच जिद्दीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. असोसिएटेड प्रेस (एपी) या जागतिक वृत्तसंस्थेसाठी छायाचित्रण करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या या तीन छायाचित्रकारांना यंदा पत्रकारितेतील सर्वोच्च मानले जाणारे "पुलित्झर' पारितोषिक जाहीर झाले आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतरची आठ महिन्यांची संचारबंदी, स्थानिकांचा प्रचंड रोष, फुटीरतावाद्यांचे डावपेच, पाकिस्तानच्या कुरापत्या आणि केंद्र सरकारने काश्मीरी प्रसारमाध्यमांचे छाटलेले पंख या सगळ्या पार्श्वभूमीवर  "एपी'च्या या तीन छायाचित्रकारांनी मोठी जोखिम पत्करली. काश्मीरमधील जनजीवनाचे यथार्थ वास्तववादी चित्रण या तीन छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जम्मू-काश्मीरच्या या पुलित्झर पारितोषिक विजेत्या छायाचित्रकारांच्या एकंदरीत कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

भाजीच्या थैलीत कॅमेरा लपवायचो...

दार यासीन (श्रीनगर)

‘ही फक्त मी काढलेल्या छायाचित्राची हकीकत नाहीये तर ते माझंही जगणं आहे. खऱ्या अर्थाने जगाने आमच्या जगण्याची आज दखल घेतली आहे ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे.’ अशी प्रतिक्रिया एका वृत्तसंस्थेशी बोलताना दार यासीन यांनी दिली आहे.  दार यासीन हे श्रीनगरचे रहिवासी असून यांनी आपल्या फोटोग्राफी करियरची सुरवात  "एपी'मध्ये २००४ सालापासून फ्रिलान्स व्हिडीओग्राफर म्हणून केली. २००६ साली ते पूर्णवेळ छायाचित्रकार म्हणून काम करत होते. १६ वर्षाच्या त्यांच्या करियरमध्ये त्यांनी काश्मीरच्या विकासासोबतच रोहिंग्या स्थलांतराची परिस्थिती आणि अफगाणिस्तान, श्रीलंकेची अनोखी परिस्थिती त्यांच्या कॅमेऱ्यातून जगासमोर मांडलीय. पुलित्झर पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर यासीन म्हणतात की, ‘फोटो काढणं हा आमच्यासाठी नेहमीच उंदीर-मांजरासारखा धरपकडीचा खेळ राहीलाय. या गोष्टींमुळे इतकं निश्चित झालंय की, आम्ही कधीच शांत राहू शकत नाही’.  इतका मोठा सन्मान मिळेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. दार यांनी त्यांचे काम करतानाचे अनुभव सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात झाली. आधीच मोठ्या प्रमाणात सैनिकीकरण झालेल्या क्षेत्रात आणखी सैनिकांची संख्या वाढली, नागरी हक्कांवर गदा आणणारे कर्फ्यू, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅंडलाईन आणि केबल टीव्ही सेवा बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत रस्त्याच्या शेजारी अनेक दिवस लपूनछपून,कधीकधी अनोळखी लोकांच्या घरात राहून तर कधीभाजीच्या पिशवीत कॅमेरे लपवून आम्ही फोटो काढले. फक्त फोटो काढणं इतकंच नाही तर इंटरनेटसेवा बंद असल्यामुळे क्लिक केलेले फोटो सुरक्षितपणे दिल्लीच्या एपीच्या(असोसिएट प्रेस न्यूज एजन्सी) कार्यालयात पाठवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना काश्मीरमध्ये फोटोग्राफी करताना करावा लागतो याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.

बॉर्डरवरच्या लोकांचे आयुष्य टिपायचं होतं...

चन्नी आनंद (जम्मू)

""मला काहीच कल्पना नव्हती पण ऑफिसमधून निरोप आला की पुलित्झर पुरस्कार घोषणेचा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे तो बघा... मी पुरस्काराचा कार्यक्रम बघत होतो आणि माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं,'' अशी प्रतिक्रिया पुलित्झर पारितोषिक विजेते जम्मूचे छायाचित्रकार चन्नी आनंद यांनी व्यक्त केली. आनंद म्हणतात की, ‘या पुरस्कारामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसलाय, मी यावर विश्वास ठेवू शकलो नाही. मी खूप आनंदी आहे’. जम्मूचे रहिवासी असणारे आनंद यांनी त्यांच्या करियरची सुरवात ही "स्टेट टाइम्स' या स्थानिक दैनिकातून केली होती. काही वर्ष त्यांनी "अमर उजाला'  या दैनिकातही काम केलं. पुरस्काराची घोषणा होण्यापूर्वी ते व त्यांचे कुटुंबीय यूट्युबवर या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण बघत असताना त्यांच्या वीस वर्षीय मुलाने त्यांना विचारले होते की, ‘या पुरस्कारासाठी तुमची निवड होईल असं वाटतयं काय? त्यावेळी आनंद म्हणाले, ‘माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलंय की तुमच्या कुटुंबासोबत हा कार्यक्रम तुम्ही बघा म्हणून मी बघतोय’.  

ज्या छायाचित्राबद्दल हा पुरस्कार मिळाला त्याची माहिती देताना आनंद म्हणाले की, भल्या पहाटेच मी आर.एस. पुरा या सीमेवर वसलेल्या गावात गेलो होतो. सीमेवरच्या गावात शेतीची कामं करायला भल्या पहाटेच सुरूवात होते हे मला ठाऊक होतं. पोलिसांकडून कडक तपासणी होत असली तरी तेथील पोलिस गावकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करतानाही मला दिसले. हे सगळं दैनंदिन आयुष्य टिपण्याचा मी प्रयत्न केला.

जीव मुठीत घेऊन फोटो टिपायचो...

मुख्तार खान (श्रीनगर)

‘हा पुरस्कार आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण तो आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेल्या घटनांना मिळाला आहे’. अशी प्रतिक्रिया मुख्तार खान यांनी व्यक्त केली आहे. मुख्तार हे श्रीनगरचे रहिवाशी. २००० सालापासून ते "एपी'सोबत काम करतात. काश्मीरीचे रोजचे आयुष्य टिपण्याकडे त्यांचा अधिक फोकस असतो. ‘मला नेहमीच मदत करणारे मित्र आणि सहकारी यांचा मी मनापासून आभारी आहे. पुलित्झर पुरस्कार हा आमच्या कामाचा फार मोठा सन्मान आहे. मी आयुष्यात काम करताना कधीच कल्पनाही केली नव्हती  की या पुरस्कारासाठी माझी निवड केली जाईल, अशी प्रतिक्रिया खान यांनी दिली. फिल्डवर काम करतानाचे त्यांचे अनुभव सांगताना खान म्हणाले की, ‘मी लॉकडाउनच्या काळात श्रीनगर आणि आजूबाजूच्या भागात सतत लपत- छपत रस्तावर राहण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला नेहमीच सैनिक आणि आंदोलक या दोघांच्या रोषाचा सामना करावा लागतो.जीव  मूठीत घेऊन काम करणं हे आता आमच्या रोजच्या जगण्याचा भाग झालाय. या काळात आम्ही कित्येक दिवस आमच्या कुटुंबीयांपासून दूर होतो. फोटो काढण्यापेक्षा सर्वात कठीण काम हे काढलेले फोटो अपलोड करणं हे होतं.  

संकलन - मिनाज लाटकर

minaj.latkar@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...