आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:पिपल्स लाईव्ह मॅटर...

मिनाज लाटकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी सरळसोपी व्याख्या करत हे काम पत्रकारितेतील व्रत म्हणून निभावणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि अतिशय प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे भारतीय पत्रकार म्हणजे पी.साईनाथ... साईनाथ स्वतःसाठी जगत नाही. तो लोकांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी, नाही रे...च्या वर्गासाठी....म्हणून तर एका सत्यासाठी, उपेक्षितांच्या घटकांसाठी साईनाथ यांची पत्रकारिता आहे. यातच या साध्या माणसाचे मोठेपण सामावले आहे. आज "मेनस्ट्रीम मीडिया'मध्ये  काम करत असूनही त्यांचे अनेक विद्यार्थी "अल्टरनेटिव्ह मीडिया'च्या वाटेवर निघाले आहेत. त्यांच्यासाठी साईनाथ सर हे दिपस्तंभासारखे आहेत...

आपण लिहिलेली बातमी ज्या समाजघटकांची आहे, तो समाज ती बातमी वाचणारही नाही, त्याची साधी प्रतिक्रियाही आपल्याला मिळणार नाही, याची कल्पना असूनसुद्धा उपेक्षितांची बाजू मांडली पाहिजे. समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी सरळसोपी व्याख्या करत हे काम पत्रकारितेतील व्रत म्हणून निभावणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि अतिशय प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे भारतीय पत्रकार म्हणजे पी.साईनाथ... थोर विचारवंत मार्शल मॅकलुहान म्हणतो, Medium Is the message (माध्यम हाच संवाद आहे.) पण, माध्यमातून कोणता संदेश दिला जातो, याचाही अभ्यास व्हायला हवा, असा साईनाथ सांगतात. 

माध्यमे बातम्यांकडून आता करमणुकीकडे वळू लागली आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता हरवत चालली आहे. सामान्यांचे प्रश्न माध्यमांत उमटत नाहीत. भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं आपण म्हणतो, कृषिविषयक किती बातम्या माध्यमात दिसतात? कृषी क्षेत्राच्या बातम्या देणारे पूर्णवेळ किती बातमीदार आहेत? राजकारण, इंटरटेनमेंट, स्पोर्टस बीट पाहणारे पत्रकार आहेत, मग कृषी बीट पाहणारा बातमीदार का नाही? धांगडधिंगा करणाऱ्या कार्यक्रमाला "स्पॉन्सर' मिळतो म्हणून मीडिया पार्टनर म्हणून माध्यमे मिरवतात. शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी आणि उपेक्षित घटकांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? या बातम्यांना "स्पॉन्सर' मिळत नाही म्हणून या घटकांच्या बातम्या दाखवायच्या नाहीत का? असे परखड सवाल करणाऱ्या साईनाथ यांची व्यावसायिक स्पर्धेच्या युगातही अतिशय  स्पष्ट, स्वच्छ आणि निर्भेळ भूमिका आहे. पी.साईनाथ स्वतःसाठी जगत नाही. तो लोकांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी, नाही रे...च्या वर्गासाठी....म्हणून तर एका सत्यासाठी, उपेक्षितांच्या घटकांसाठी साईनाथ यांची पत्रकारिता आहे. यातच या साध्या माणसाचे मोठेपण सामावले आहे.

नोबेल पुरस्कार मानकरी भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन साईनाथांविषयी म्हणतात की, ‘ही इज वन ऑफ द वर्ल्डस् ग्रेट एक्सपर्टस् ऑन फॅमिन अँड हंगर’. पी साईनाथ यांची कारकीर्द ही पत्रकारितेच्या माध्यमातून सुरू झाली. युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएन्आय) वृत्तसंस्थेत ते नोकरीत दाखल झाले. त्यानंतर ते ब्लिट्झ या नामांकित साप्ताहिकामध्ये (मुंबई) सलग दहा वर्षे सहसंपादक (१९८३–१९९३) होते. त्याच सुमारास त्यांना टाइम्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने त्यांना शिष्यवृत्ती दिली. त्यांनी पाच राज्यांतील दुर्गम अशा दहा जिल्ह्यांतून सुमारे एक लाख किमी.चा प्रवास केलाय. त्यांतील पाच हजार किमी. अंतर पायी चालत ते फिरले आणि वंचित समाजाची सूक्ष्म निरीक्षण नोंदवली व सर्वेक्षण केलं. या जिल्ह्यांतील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अठरा महिन्यांतील काळात जे पाहिलं व अनुभविलं, त्यावर एकूण ८४ शोधनिबंधात्मक लेख लिहिले, ते प्रसिद्धही झाले. त्यांनी या संशोधनाच्या आधारे (एव्हरीबडी लव्हज् ए गुड ड्राउटः स्टोरीज फ्रॉम इंडियाज पुअरेस्ट डिस्ट्रिक्टस) ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या शीर्षकाने पुस्तक प्रकाशित केले. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’  या पुस्तकातली माणसं म्हणजे भारतीय समाजाच्या एका भल्या मोठ्या हिश्शाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवनावर हुकूमत गाजवणाऱ्या लोकसंख्येतले प्रमाण फक्त १० टक्के आहेत. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विशाल अशा या समाजघटकापर्यंत उच्चभ्रूंच्या दृष्टीचा पल्ला पोचत नाही. आणि त्या समाजाशी संबंध तुटलेल्या वृत्तपत्रांची, माध्यमाची झेपही तिथपर्यंत जात नाही. गरीबीकडे एक घटना न पाहता प्रक्रिया म्हणून बघणं हे या पुस्तकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. म्हणूनच हे पुस्तक वाचणं हा एक दाहक अनुभव ठरतो.घटना घडून जाते, इतर घटनांच्या मागे दडून जाते. प्रक्रिया सततची असते. ती आहे, हे एकदा मान्य झालं की तिची दखल घेणं हे आवश्यकच ठरतं. गरीबीकडे घटना म्हणून बघताना नेमकं हेच आपण आपल्या नकळत टाळत असतो. प्रस्तुत पुस्तकासारखे दस्तावेज नेमके हेच साधतात.  या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून त्याला तेरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत. ललित लेखनाव्यतिरिक्त (नॉन-फिक्शन) सर्वाधिक खपाचा (बेस्ट सेलर) मान पुस्तकाला मिळाला आहे. या पुस्तकाच्या स्वामित्वाच्या हक्कांधून मिळालेले सर्व उत्पन्न ते ग्रामीण भागातील वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना उत्तेजन देण्यासाठी पारितोषिकाच्या रूपात देत असतात. ग्रामीण भारताची संस्कृती, प्रश्न जतन करुन ठेवण्याच्या हेतूने पीपल्स अर्काइव्ह रुरल इंडिया(पारी) या नावाने त्यांनी अनोख्या समांतर माध्यमाची निर्मिती केलीय.

त्यांच्यामुळेच "स्टोरी टेलर' बनू शकले... -- प्रियांका काकोडकर (वरिष्ठ संपादक,मुंबई)

मी मुंबईत राहणारी आणि शालेय शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेले... पत्रकारिता शिकायला गेले तेव्हा अशा इंग्रजाळलेल्या पद्धतीचे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी होते. ज्यांच्या संवेदना या शहरी मध्यवर्गीय संकल्पनेतून निर्माण झाल्या होत्या. अशावेळी साईनाथ सरांसारख्या शिक्षकांमुळे खऱ्या अर्थाने माणूस म्हणून आमच्या संवेदना निर्माण झाल्या. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेतील एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी निर्माण केला आहे. समोर गोष्टी घडत असताना त्याचा आपल्यासाठी भांडवल म्हणून उपयोग न करता आपण या लोकांचे स्टोरीटेलर कशा पद्धतीने बनू शकतो ही गोष्ट मी साईनाथ सरांकडून शिकले.अनेकदा आपल्याला इच्छा असली तरी शहरी भागात अशी जाणीव निर्माण होणे कठीण असते, पण सर सतत हाच प्रयत्न करत असतात. आज मी ज्या ठिकाणी काम करते तिथं काम करत असताना एखादी घटना घडत असते त्यावेळी सर्वात पहिल्यांदा मला ग्रामीण,शेतकरी वर्गावर या घटनेचा काय परिणाम होतोय किंवा त्यांची परिस्थिती काय झाली असेल हाच विचार येतो. मी जरी मोठ्या शहरात राहत असले तरी मी विचार ग्रामीण भागाचा करते हे माझ्यासाठी खूप महत्वाचं वाटतयं. कॉलेज सोडूनही खूप वर्ष झाली आहेत पण आजही मी संराच्या संपर्कात आहे. साईनाथ सरांसारख्या शिक्षकाने माणसांच्या प्रश्नांशी थेट जोडणारी पत्रकारिता आजही जिवंत ठेवली आहे.

एसी केबीनच्या बाहेरची अस्सल पत्रकारिता - जयदीप हार्डीकर(जेष्ठ पत्रकार, नागपूर)

साईनाथ सरांकडून मी काय शिकलो हे जर सांगायचं असेल तर सर नेहमी म्हणायचे की,  तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचे सुख-दु:ख, त्याचे प्रश्न समजून घ्यायचे संवेदनशील ह्दय नसेल तर तुम्ही कधीच उत्तम पत्रकार बनू शकत नाही.पत्रकारितेमध्ये तटस्थता हा भंपकपणा आहे. आपल्याला काम करताना भूमिका घेऊनच काम करावं लागतं आणि ही भूमिका घेताना ती एकाच बाजूची असते आणि ती बाजू म्हणजे सत्याची... खरंतर माझे आणि पी.साईनाथ सरांचे गुरु शिष्याचे नाते हे पुस्तक, फोन आणि नंतर प्रत्यक्ष भेट अशाप्रकारे सुरु झाले. नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या विभागात शिकत असताना माझ्या एका शिक्षकांनी मला पी.साईनाथ यांचे "दुष्काळ आवडे सर्वांना' हे पुस्तक वाचायला दिले होते. त्या पुस्तकाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. एकदा ते एका प्रोजेक्टसाठी विदर्भात आले होते तेव्हा आमची भेट झाली आणि तेव्हापासून गेली वीस वर्षे  गेली आमच्यातील नाते हे विद्यार्थी ते मित्र अशा पातळीवर पोहोचले आहे. सहसा भारतात इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचणारा पत्रकार हा एसी केबिनमध्ये बसतो. पण आजही साईनाथ सर हे गावांमध्ये, पाड्यांमध्ये फिरताना दिसतात. मला वाटतं की, भारतात अशा पद्धतीने काम करणारे हे एकमेव पत्रकार असतील. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात मला पी साईनाथ यांचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यातून इव्हेटं कव्हर करणे आणि स्टोरी कव्हर करणे यातला फरक कळला. मी प्रवाहात वाहत न जाता वेगळी पत्रकारिता करु लागलो, याचे श्रेय हे साईनाथ यांनाच आहे. शिवाय ते स्वतःकाम करत नाहीत तर त्यांनी तरुण पत्रकारांची फिल्डवर जाऊन वेगळया पद्धतीने काम करणारी पिढी घडवली आहे. एक महत्वाची गोष्ट सांगायची तर सध्याच्या काळात एकमेकांच्या गोष्टी चोरुन बऱ्याचदा पत्रकारिता केली जाते. साईनाथ सरांकडून एक गोष्ट आम्ही शिकलो ती म्हणजे दुसऱ्यांना त्याचे श्रेय देणे. ते सातत्यांने दुसऱ्यांना त्यांच्या कामाचे क्रेडिट देतात.

अफाट जनसंपर्क ही त्यांची खरी ताकद - - पुरुषोत्तम ठाकूर (जेष्ठ पत्रकार, छत्तीसगड)

मी छत्तीसगडमध्ये एका वृत्तपत्रात काम करत होतो. त्यावेळी साईनाथ छत्तीसगडच्या दुर्गम भागात स्टोरी करायला आले होते. तेव्हाच माझी ओळख झाली. आम्ही एकत्र खूप प्रवास केलाय. एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे, मी या भागातला स्थानिक नागरिक असूनही इथल्या भागाची संस्कृती, राजकीय सामाजिक स्थितीची माझ्यापेक्षा जास्त माहिती साईनाथ यांना होती. शिवाय ते ज्या ग्रामीण भागातील लोकांना ते भेटतात त्यांचं नाव ते कधीच विसरत नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्टोरीतील सगळ्या लोकांच्या ते संपर्कात असतात आणि त्यांच्या नावानेच ते त्यांना ओळखतात. देशभरातील अनेक राज्यांमधील ग्रामीण भागातील लोकांशी आजही ते संपर्कात आहेत त्यामुळे त्यांचा संपर्क हा अफाट आहे. १९९८ पासून मी त्यांच्यासोबत आहे. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं तर साईनाथ हे कायम त्यांचे आणि समोरच्या व्यक्तीतले अंतर कसे कमी होईल याचाच सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच त्यांना कधीही भेटता येतं आणि बोलताही येतं. ते आमच्या भागात यायचे तेव्हा टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांची लेखमाला सुरु होती. त्यांची काम करायची पद्धत आणि विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून मलाही जाणीव झाली की माझ्या भागाचे प्रश्न मी मांडले पाहिजेत आणि मी खाजगी वृत्तपत्रातली नोकरी सोडून स्वतःचे एक दैनिक सुरु केले. तेव्हापासून छत्तीसगडच्या आदिवासी भागातले प्रश्न बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. ते ज्या भागात जातात तिथं काम करणाऱ्या पत्रकारांना सोबत घेतात त्यामुळं मला वाटतं की ते स्वतः सोबतच माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना घडवण्याचे काम करीत असतात. 

minaj.latkar@dbcorp.in

संपर्क - 9960503623

बातम्या आणखी आहेत...