आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:परीक्षा नियोजनातील चूक

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांतून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची धांदल सुरू आहे. राज्य सरकार, यूजीसी, विद्यापीठे यांच्यातील संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे राज्य सरकार व विद्यापीठांसमोर परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. सक्तीनंतर मुंबई व होळकर सोलापूर विद्यापीठांच्या परीक्षांना तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन परीक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ. मुंबई विद्यापीठात ८१ हजार व एका जिल्ह्यापुरते असलेल्या सोलापूर विद्यापीठात १० हजार विद्यार्थी परीक्षा देत अाहेत. ९५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा देत असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाचा आहे. तर सोलापूर जिल्ह्यात ७० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा देत आहेत. ऑनलाइन परीक्षेतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी खूप हैराण झाले. जिथे नेटवर्कचा फारसा प्रश्न नाही, अशा मुंबईत सुरुवातीला खूप अडचणी आल्या. त्यामुळे वेळ वाढवून द्यावा लागला. काही विद्यार्थ्यांनी मोबाइलवरून परीक्षा दिली. मोबाइल हाताळण्यात चूक झाली तर तांत्रिक अडचणी नक्की येणार. सोलापुरात वेगळीच अडचण विद्यापीठाच्या नंतर लक्षात आली. एका विद्यार्थ्याच्या नावावर अनेक ठिकाणांवरून लॉग-इन केल्यामुळे विद्यापीठाच्या सर्व्हरवर ताण आला. त्यामुळे ३० टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. या सगळ्या अडचणींमागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षांचे नियोजन विद्यापीठांकडून नीट झाले नाही. शिवाय परीक्षा आयोजनासाठी खासगी संस्थांची निवड करण्यातही उशीर झाला. नियोजनात मुख्य अडसर आला तो विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा. विद्यार्थ्यांचा गळा दाबला की सरकारचे तोंड उघडेल, या हिशेबाने त्यांनी वेळ साधली. आंदोलन नंतर मागे घेतले. पण पूर्ण व खात्रीची तयारी न होताच दोन विद्यापीठात परीक्षा सुरू झाल्या. पण सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा एकाच वेळेस घेण्याचा मुंबई व सोलापूर विद्यापीठाचा निर्णय अयोग्य होता. एकाच वेळेस साऱ्या परीक्षांमुळे सर्व्हरवर ताण आल्याने विद्यार्थ्यांसमोरील तांत्रिक अडचणी वाढल्या. मुंबईमध्ये दुरुस्ती लगेच झाली. पण सोलापूर विद्यापीठाला उर्वरित परीक्षा दोन दिवस पुढे ढकलाव्या लागल्या. पुणे, औरंगाबाद विद्यापीठांतील परीक्षा सुरू व्हायच्या आहेत. त्यांनी मुंबई, सोलापूर विद्यापीठांच्या अनुभवातून धडा घेत वेळीच दुरुस्ती केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...