आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मोदींचे नवे धक्कातंत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान या नात्याने देशातील जनतेला नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी केलेले संबोधन माध्यमांना मोठा धक्का देणारे ठरले. धक्का यासाठी की मोदींच्या या संबोधनात धक्का देणारी एकही बाब नव्हती! गेल्या सहा वर्षांत कदाचित पहिल्यांदाच असे घडले आहे. मोदी अर्थव्यवस्थेविषयी बोलतील किंवा लस आल्याची घोषणा करतील, किमान एखादे पॅकेज जाहीर करतील, या माध्यमांच्या अटकळी पोकळ ठरल्या. मोदींनी असे काहीही केले नाही. लाॅकडाऊन संपले असले तरी अजून कोरोना संपलेला नाही, असे सांगत त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले. ‘दो गज की दूरी, मास्क जरूरी।’ हा संदेश त्यांनी थोडा सविस्तर समजावून सांगितला. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यावर ज्या देशांनी खबरदारीच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्या देशांत कोरोनाचा फैलाव पूर्वीपेक्षा अधिक वेगाने झाला आहे, हे सांगत त्यांनी देशवासीयांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण, तो करताना भारतातील कोरोना रुग्णसंख्येचाही आवर्जून उल्लेख केला. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनपेक्षा आपल्या देशातील रुग्णसंख्येचे लोकसंख्येशी असलेले प्रमाण, मृत्युदर कसे कमी आहेत, आरोग्य सुविधा किती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत, याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले. हे मोदी सरकारचे यश आहे, असे सांगणारे तेे सूचक विधान होते. पंतप्रधानांच्या या ‘देश के नाम’ संदेशातून जनतेला काहीच मिळाले नाही. पूर्वीप्रमाणे ना त्यांनी काही कार्यक्रम दिला, ना काही घोषणा केली. बिहारची निवडणूक दारात असल्याने खरे तर त्यांच्याकडून घोषणांची अपेक्षा होती. पण ती न करूनच धक्का द्यायचे मोदींनी ठरवले असेल. त्यामुळे प्रचंड त्रास झालेली मोदींची नोटबंदीची घोषणाही ज्यांना उत्साहित करून गेली होती, त्या लोकांचीही मंगळवारी मोदींच्या संबोधनानंतर निराशा झाली असणार. मोदींनी देशाला संबोधित केले, त्या प्रत्येक वेळी माध्यमांमध्ये त्यावर भरभरून चर्चा झाल्या आहेत. या वेळीही तशी तयारी इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी केली असणार. पण, भाषणानंतर चर्चाच काय, बातम्यांमध्येही मोदींच्या भाषणाचा उल्लेख दिसला नाही. शेवटी आडात काही नसेल तर पोहऱ्यात आणायचे कोठून, हा प्रश्नही आहेच.

बातम्या आणखी आहेत...