आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड आय:‘भारत-महाला’च्या गुलाबो-सिताबोंसाठी अंजन!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश माचकर

जुही चतुर्वेदी आणि शुजित सरकार यांना खरोखरच फक्त लखनऊच्या एका जुनाट हवेलीची गोष्ट सांगायची आहे का? की ही एक रूपककथा आहे… आजच्या काळाला जत्रेतल्या बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र आरशात पकडू पाहणारी… तिच्यातली फातिमा महल म्हणजे काय, एकमेकांशी झगडणारे कोत्या बुद्धीचे गुलाबो सिताबो कोण, त्यांना भूल घालणारे ग्यानेश आणि क्रिस्टोफर कोण आणि त्यांचे मालक कोण, हे आपलं आपण शोधायला हवं… तेवढे कष्ट घ्यायला हवेत… 

"गुलाबो सिताबो' या उत्तर भारतातल्या बाहुल्यांच्या खेळातल्या दोन बाहुल्या. त्या एकमेकींशी कडाकडा भांडत असतात सतत. मशुजित सरकार यांच्या, नुकत्याच अॅमेझाॅन प्राइम या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं हे शीर्षक आहे. सिनेमात आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे स्टार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्यामुळे, टाॅम अँड जेरीसारख्या सतत एकमेकांशी भांडणाऱ्या आणि त्यातून हसवणाऱ्या दोन व्यक्तिरेखांचा हा सिनेमा असावा अशी समजूत होणं शक्य आहे. (सिनेमात सुरुवातीलाच बाँके म्हणजे आयुष्मानच्या घरात टाॅम अँड जेरीचं कार्टून सुरू असलेलं दिसतंही)… सिनेमात या दोघांनी साकारलेल्या बाँके रस्तोगी आणि मिर्झा व्यक्तिरेखांमधला संघर्ष आहेही, पण तो टिपिकल फिल्मी कुरघोड्यांचा मसालेदार आणि हास्यस्फोटक वगैरे संघर्ष नाही… तो अधिक वास्तवातला त्यामुळे कमी हसवणारा आणि अधिक अंतर्मुख करणारा संघर्ष आहे…

दिग्दर्शकाने या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये त्यांच्या मनोवृत्तींचा अर्क पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे… त्यासाठीच की काय त्यांना शारीरिक व्यंगंही दिली गेली आहेत. बाँके बोबडा आहे, मिर्झा कुबडा आहे, त्याचं नाक अवास्तव मोठं आहे, दाढीचं जंजाळही अव्वाच्या सव्वा आहे… दोघेही माणूस म्हणून अत्यंत सुमार बुद्धीचे, कुवतीचे आणि त्याहूनही अधिक अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे आहेत… 

या दोघांपैकी कोणी (किंवा अन्य व्यक्तिरेखांपैकी कोणी) सिनेमाचा ‘नायक’ नाही. अर्थात, याची आता आपल्याला सवय आहे. संमिश्र गुणावगुणांच्या प्रमुख व्यक्तिरेखांचे सिनेमे आपण खूप काळापासून स्वीकारू लागलो आहोत. पण सिनेमा पाहताना आपल्याला तो कुणाच्या तरी नजरेतून किंवा बाजूने पाहण्याची सवय असते. या दोन्ही व्यक्तिरेखा त्या बाबतीत पंचाईत करतात. त्या इतक्या आपमतलबी आणि मंदबुद्धी आहेत की त्यांच्याभोवती गुंफलेला सिनेमा असूनही तो त्यांच्या दृष्टिकोनातून पाहता येत नाही. मग समोर येते सिनेमातली तिसरी प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे फातिमा महल ही लखनऊमधली शंभरेक वर्षं जुनी, पडझड झालेली, वैभव लयाला गेलेली हवेली. तीच या दोघांमधल्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. तिची मालकीण फातिमा बेगम हिचा मिर्झा हा नावापुरताच नवरा आहे आणि बाँके आहे एक भाडेकरू… इथे मालक, भाडेकरू सगळेच निम्नस्तरातले. दारिद्र्यात पिचणारे. देशभरात सगळ्या जुन्या वाड्यांमध्ये, चाळींमध्ये, हवेल्यांमध्ये, इमारतींमध्ये चालतो तोच खेळ इथेही आहे. भाडं जुन्या दरांप्रमाणे असूनही थकवलं जातं. मग, मालक देखभाल-दुरुस्ती करत नाहीत आणि भाडेकरूही भाडं थकवत राहतात… अधोगतीचं चक्र सुरूच राहतं.

इथला मिर्झा तर अत्यंत लोभी, कंजूष आणि मख्खीचूस. भाडेकरूंच्या वस्तू चोरून भंगारात विकण्याची भुरटेगिरी करणारा फाटका माणूस. त्याच्यापेक्षा वयाने १५ वर्षं मोठ्या असलेल्या फातिमाबेगमचा कधी ना कधी मृत्यू होईल आणि तिच्यापश्चात आपण हवेलीचे मालक बनू, या आशेवर तो जगत असतो… भाडं थकवून वर पुन्हा भाडेकरूंच्या अधिकारांवर बोट ठेवून ताप देणारा बाँके त्याला सतत सलत असतो… दोघे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न करत राहतात.

अशात या दोघांना दोन तारणहार सापडतात… ग्यानेश (विजय राज) हा पुरातत्त्व खात्याचा अधिकारी बाँकेला भेटतो आणि ही हवेली पुरातन असल्याचं जाहीर करून सरकारजमा करण्याचं आणि सगळ्या भाडेकरूंना एलआयजीमधली घरं देण्याचं आमिष तो दाखवतो. दुसरीकडे क्रिस्टोफर (ब्रजेंद्र काला) हा वकील हवेली मिर्झाच्या नावावर करण्याचं आणि नंतर ती विकून त्याला बक्कळ पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवतो. हे दोघेही अर्थातच भाडेकरू आणि मिर्झा यांना गंडवून आपापल्या ‘मालकां’ना हवेली स्वस्तात मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार हे उघड असतं… …इथून पुढे काय होतं, ते सांगणं योग्य नाही… तोच सिनेमाचा गाभाही आहे आणि त्यातूनच क्लायमॅक्सही उभा राहतो… 

मात्र, या समस्येची लेखिका जुही चतुर्वेदींनी केलेली उकल आपल्यासाठी धक्कादायक आहे. तिच्यात अनेक व्यावहारिक गोष्टी अनुत्तरित राहतात… कारण, आखीव मार्गाने चालणाऱ्या सिनेमात गुलाबो आणि सिताबो एका टप्प्यावर झगडा विसरून एकत्र आले असते आणि त्यांनी हवेली वाचवली असती, तर आपल्याला आवडलं असतं… ‘खोसला का घोसला’ टाइप मध्यमवर्गीय स्वप्नरंजनी साहसपूर्ण रोचक उकल तर फारच आवडली असती… पण, या "माणसां'ची ती कुवतच नाही आणि लेखिका चमत्कार घडवून ती त्यांच्यात निर्माण करत नाही… हे दोघेही स्वार्थांधतेच्या झापडांमुळे स्वहित कळण्याइतकेही हुशार नाहीत… मालकाने भाडेकरूंचा आणि भाडेकरूने मालकाचा विचार केला तरच हवेली वाचू शकते, हे कळण्याइतके ते हुशारही नाहीत आणि उमदेही नाहीत... 

…त्या कुबट, अंधाऱ्या खोल्या, बोळकांडं, निव्वळ नाईलाज असलेल्यांनीच राहावं अशा लायकीच्या हवेलीत राहून तशीच कुबट मनं झालेल्या बाँके आणि मिर्झासारख्या वृत्तीच्या माणसांचं भागधेय वेगळं काय असणार?

आयुष्मान खुराना हा मानवी उणिवा असलेल्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठीच प्रसिद्ध असा अभिनेता आहे. बाँकेचा बैलबुद्धीचा आक्रमकपणा तो परफेक्टच दाखवतो. अमिताभ बच्चनच्या चेहऱ्याचा बराचसा भाग भलंमोठं नाक आणि प्रोस्थेटिक्सने व्यापलेला आहे. आवाज, डोळे आणि शरीर यांच्यातूनच त्याला व्यक्त व्हायचं आहे. त्याला पाहून अमिताभच्या अतिपरिचित चेहऱ्याची आठवणही येऊ नये आणि तो एखाद्या बाहुल्यासारखाच दिसावा, अशी ही व्यवस्था आहे. त्याचं ते कुबड, ती फेंगडी चाल, चेहऱ्यावर कायमचा लुब्रा लालची भाव यांतून मिर्झा मिर्झाच दिसतो, अमिताभ दिसत नाही. विजय राज, ब्रजेंद्र काला ही मंडळी नेहमीच उत्तम कामगिरी करतात, इथे तर त्यांना मुख्य व्यक्तिरेखांइतकाच स्कोप आहे. ९० वर्षांच्या फारुख जफर या अभिनेत्रीने मोठ्या ठसक्यात साकारलेली फातिमा बेगम आणि सृष्टी श्रीवास्तव हिने साकारलेली बाँकेची फटाकडी बहीण गुड्डो यांचा अभिनय विशेष लक्षवेधी आहे.

प्रदीप जाधव यांचं कलादिग्दर्शन आणि हर्षवर्धन पुरोहित यांच्या सेट डेकोरेशन यांच्या करामतीने फातिमा महल अतिशय अस्सल उभी राहिलेली आहे आणि अविक मुखोपाध्याय यांनी तिचा उदासवाणा जुनाटपणा, पडझड, कुबटपणा, कोंदटपणा गडद करणारी चित्रणशैली वापरली आहे. शुजित सरकार यांनी कृतक नाट्यमयता निर्माण करणारं दृश्यविरेचन न करता सर्वसामान्य माणसांचं सर्वसामान्य आयुष्य सर्वसामान्य गतीने चित्रित होतंय, असाच फील सर्व काळ कायम राहतो.

त्यामुळेच की काय, न्यूज चॅनेलांवरही हरएक सेकंदाला काही ना काही ‘घडताना’ पाहण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांना या सिनेमात ‘खास काहीच घडत नसल्याचं’ असमाधान जाणवतं… पण, त्यापेक्षा मोठं आहे ते सिनेमाच्या शेवटल्या अपेक्षाभंगाने निर्माण केलेलं असमाधान. ते अधिक काळ पिच्छा पुरवत राहतं... 

असं का होतं?

मुळात जुही चतुर्वेदी आणि शुजित सरकार यांना खरोखरच फक्त लखनऊच्या एका जुनाट हवेलीची गोष्ट सांगायची आहे का? की ही एक रूपककथा आहे… आजच्या काळाला जत्रेतल्या बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र आरशात पकडू पाहणारी… तिच्यातली फातिमा महल म्हणजे काय, एकमेकांशी झगडणारे कोत्या बुद्धीचे गुलाबो सिताबो कोण, त्यांना भूल घालणारे ग्यानेश आणि क्रिस्टोफर कोण आणि त्यांचे मालक कोण, हे आपलं आपण शोधायला हवं… तेवढे कष्ट घ्यायला हवेत… हे कसलं रूपक आहे ते समजून घेण्यासाठी एक क्लू सिनेमातच शेवटी पाहायला मिळतो…   ग्यानेशचे असोत की क्रिस्टोफरचे असोत, मालक सगळे एकच असतात आणि ते कायम एकत्रच असतात, यातून काय ते समजून जा.

mamanji@gmail.com

बातम्या आणखी आहेत...