आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

थर्ड आय:‘सायलेंट मेजाॅरिटी’चा प्रतिनिधी : ‘भोसले’!

मुकेश माचकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोज बाजपेयी निर्मित ‘भोसले’ पाहायला हवा. या सिनेमाला पार्श्वभूमी आहे मुंबईतल्या ‘मुंबईवर अधिकार मराठी माणसाचा’ या प्रखर भावनेची. त्यामुळे हा सिनेमा प्रखर मराठीवादी माणूस कसा पाहतो, मराठी असूनही सर्वसमावेशक उदारमतवादी असलेला माणूस कसा पाहतो, ‘भय्या’ कसा पाहतो आणि या प्रश्नाची वरवरची माहिती असलेला यापलीकडचा प्रेक्षक कसा पाहतो, यावर त्याचा परिणाम बदलत असेल.

एखाद्या सिनेमाचा परिणाम कशावर ठरतो?

अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संगीत, तांत्रिक बाजू… आपल्याला साधारण या क्रमानेच घटक आठवतात… मात्र एक घटक कधीच आठवत नाही… तो म्हणजे प्रेक्षक. सिनेमा पाहणारा कोणी नसेल तोवर सिनेमाला काहीही अर्थ नसतो. त्यामुळेच सिनेमा पाहणारा तो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावरही सिनेमाचा परिणाम ठरतो.

म्हणजे काय, हे समजून घ्यायचं असेल, तर मनोज बाजपेयी निर्मित ‘भोसले’ पाहायला हवा. या सिनेमाला पार्श्वभूमी आहे मुंबईतल्या ‘मुंबईवर अधिकार मराठी माणसाचा’ या प्रखर भावनेची. त्यामुळे हा सिनेमा प्रखर मराठीवादी माणूस कसा पाहतो, मराठी असूनही सर्वसमावेशक उदारमतवादी असलेला माणूस कसा पाहतो, ‘भय्या’ कसा पाहतो आणि या प्रश्नाची वरवरची माहिती असलेला यापलीकडचा प्रेक्षक कसा पाहतो, यावर त्याचा परिणाम बदलत असेल.

अर्थात एक लक्षात घ्यायला हवं की मराठी-भय्या संघर्षाचं सूत्र या सिनेमात मध्यवर्ती असलं, त्याभोवती सिनेमा फिरत असला तरी तो या ‘समस्ये’वरचा दुफळीबाज आणि टाळीबाज सिनेमा नाही. या सिनेमात कोणत्याही बाजूची रक्त उकळवणारी भाषणं, फिल्मी संघर्ष, हाणामाऱ्या, राजकारण वगैरे नाही… सिनेमाचं शीर्षक ‘भोसले’ असं आहे (त्याला शेवटच्या एका प्रसंगात मराठीवादी व्यक्तिरेखा ‘तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहात, तुम्ही मराठी माणसाच्या बाजूने असलं पाहिजे’ असं सांगतो, तेव्हा हे आडनाव योगायोगाने भोसले नाही, विचारपूर्वक आहे, असं वाटून जातं.) आणि ही त्या नावाच्या एका एकाकी माणसाची कहाणी आहे प्रामुख्याने… एक तृतियांश लेखक आणि दिग्दर्शक देवाशिष माखिजा यांनी सिनेमाभर हे एकाकीपण सोडलेलं नाही… चर्चिल चाळीतल्या एका खोलीत एकटा राहणारा गणपत भोसले हा हवालदार पोलीस खात्यातून रिटायर होतो… एकट्याने खोलीत स्वयंपाक करणं, जेवणं, बाबा आदमच्या जमान्यातल्या ट्रान्झिस्टरवर खरखरत्या आवाजात मराठी गाणी ऐकणं, सतत खिडकीत येणाऱ्या कावळ्याला हाकलणं (हा कावळाही मुंबईच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली व्यक्तिरेखाच बनला आहे या सिनेमात) एवढ्यातच फिरणारं या माणसांपासून फटकून राहणाऱ्या अबोल माणसाचं रूक्ष, कोरडं, भकास जग सुरुवातीची जवळपास १६ मिनिटं नि:शब्द दाखवतो दिग्दर्शक.

पहिला संवादी प्रसंग त्यानंतर येतो. चाळीत या वर्षी फक्त मराठी माणसांचा गणपती आणायचा असा निर्धार मराठी मोर्चाचा कार्यकर्ता असलेला विलास धावले (या नावाचं देवाशिषला फॅसिनेशन असावं, त्याच्या आधीच्या ‘आज्जी’ या थ्रिलरमध्येही खलनायकी राजकीय कार्यकर्त्याचं नाव हेच आहे) या टॅक्सी ड्रायव्हरने केला आहे. मराठी माणूस भय्यांना अन्न, वस्त्र, निवारा देतो, बदल्यात त्याला काय मिळतं, मुंबईतल्या सगळ्या सुखसुविधांवर मराठी माणसांचा अधिकार आहे, त्या गोष्टी हे बाहेरून आलेले उपरे बळकावतात, ही त्याची विचारधारा… गंमत म्हणजे दिग्दर्शक थोडा वेळ त्याचंही व्यक्तिगत आयुष्य दाखवतो… तेही भोसलेइतकंच रूक्ष, भकास, एकाकी आणि माणूसपणाचे हिरवे कोंबच नसलेलं आयुष्य आहे… चाळीत एक उत्तर भारतीय नर्स तरूणी आणि तिचा धाकटा भाऊ भोसलेचे शेजारी म्हणून राहायला येतात, इथे कथानकात तिसरा कोन येतो… (जवळपास ४५ मिनिटं निव्वळ पार्श्वध्वनी ऐकवल्यानंतर या टप्प्यावर पार्श्वसंगीत येतं…) तो भोसले आणि विलास यांच्यात संघर्ष घडवून आणतो… मात्र, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा संघर्ष टिपिकल भाषणबाज, टाळीबाज संघर्ष नाही… त्याची सोडवणूकही ‘कुणाएका भोसलेची त्याच्यापुरतीच राहिलेली कथा’ अशा रीतीनेच होते… ती सामाजिक पातळीवर जात नाही… मात्र, कुठेतरी भोसले हा या शहरातल्या मराठीजनांमधल्या सायलेंट मेजाॅरिटीचा प्रतिनिधी आहे… तो सगळ्यांचं ऐकतो, पण, स्वीकारशील आहे…

मुंबईची देवता असलेल्या गणेशोत्सवाचा काळ, गणेशमूर्तींच्या रेखीव आणि भंगलेल्या प्रतिमांचा वापर, गणेशोत्सवातल्या मिरवणुकांचं चित्रण, भोसलेचं गणपत हे नाव आणि भोसले हे आडनाव, या सगळ्यातून त्याचं प्रातिनिधिकत्व मनावर ठसत जातं… माणूस तितका एक, खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे किंवा माणसाने माणसाशी माणसासम वागणे अशा प्रकारच्या कोणत्याही तत्त्वज्ञानाची मांडणी न करता, गरिबाने गरिबाला सांभाळून घ्यावं, एवढ्याच उदारतेने हा सर्वसामान्य माणूस सहसा सर्व प्रकारच्या माणसांना स्वीकारायला तयार असतो… त्यासाठी प्रसंगी ‘आपल्या’ माणसांशीही संघर्ष करतो… अर्थात हे ‘आपले’ आणि ‘परके’ ही फारच गुंतागुंतीची भानगड आहे… मराठी-भय्या संघर्षात परके असलेले भय्ये हिंदूमुस्लिम संघर्षात हिंदू म्हणून ‘आपले’ कसे होतात आणि मुंबईत राहून कधीच ‘आपले’ न झालेले विशिष्ट राज्यांचे रहिवासी पैशाच्या बळावर सगळ्यांना ‘आपलेसे’ कसे करतात, हे मुंबईच्या मराठी माणसाने फार जवळून पाहिलेलं आहेच की... मुख्य मुद्दा असा की जगभरातल्या भूमिपुत्रांमध्ये अशा बडबडबाजी न करणाऱ्या स्वीकारशील लोकांची बहुसंख्या नसती तर कोणत्याही शहरात, महानगरात, राज्यात किंवा देशात दोनपाच माणसांचंही स्थलांतर होऊ शकलं नसतं… ‘भोसले’ हा त्या सर्वसामान्य माणसांचा शेवटपर्यंत सर्वसामान्यच राहणारा ‘हीरो’ वगैरे न बनणारा प्रतिनिधी आहे.

‘भोसले’चा सगळा डोलारा शीर्षकभूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपेयीच्या खांद्यांवर पेललेला आहे. या भूमिकेमध्ये त्याच्या अभिनयसामर्थ्याला असं काही आवाहन आहे की त्यासाठी त्याने या सिनेमाची निर्मितीही स्वत:च केली आहे. एखाद्या अभिनेत्याने उत्तम भूमिका साकारली की तो भूमिका ‘जगला आहे’ असं म्हटलं जातं. वस्तुत: त्यात लेखक-दिग्दर्शकांपासून ते रंगभूषा, वेशभूषा करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने केलेल्या डिटेलिंगचा मोठा वाटा असतो. या व्यक्तिरेखेवर या सगळ्यांनी केलेल्या कामाला मनोज न्याय देतो. त्याचं सगळं शरीर त्याने या व्यक्तिरेखेला कसं समर्पित केलेलं आहे, हे पाहणं अभिनयाच्या प्रशिक्षणाचा भाग ठरू शकतं. मराठीतला डॅशिंग अँग्री यंग मॅन संतोष जुवेकर याने साकारलेल्या विलास धावलेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरळसरळ खलनायक असा शिक्का बसू शकेल अशी व्यक्तिरेखाही संतोषने मानवी पातळीवर आणली आहे, त्याच्याबद्दलही शिसारी येत नाही, करुणाच वाटत राहते (चित्रपट आस्वादक मुंबई परिसरातला मराठी माणूस असल्याचा हा परिणाम असेल का, हीच भावना एखाद्या ‘भय्या’ आस्वादकाची असेल का?), शिवाय, त्याला होत असलेली मराठी माणसावरच्या ‘अन्याया’ची जाणीव खोटी कशी म्हणावी? शेवटी तुझ्या वाटणीची भाकरी, प्रतिष्ठा, अस्मिता तो पाहा तो दुसरा, उपरा पळवतो, असं सांगून कोंबड्या झुंजवणाऱ्या विचारधाराच तर प्रबळ होत चालल्या आहेतच की सगळीकडे! नेत्याची भेट मिळावी म्हणून दारात बसून राहिलेला विलास आणि एक्स्टेन्शनचा निर्णय घेणाऱ्या साहेबाला भेटण्यासाठी तिष्ठलेला भोसले यांचे प्रसंग समांतर विणून दिग्दर्शकाने या दोघांनाही एकाच पातळीवर आणलेलं आहेच की! नर्स साकारणारी इप्शिता चक्रवर्ती सिंग आणि तिच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत पदार्पण करणारा विराट वैभव यांची साथही दमदार आहे.

छायालेखक जिग्मेत वांगचुक यांनी दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला प्रमुख व्यक्तिरेखांचा गर्दीतला एकाकीपणा अप्रतिम टिपला आहे. सगळ्या सिनेमाला काळ्या, करड्या, उदास छटांचा स्पर्श आहे… गणपतीच्या काळातल्या पावसाळी मुंबईतलं मळभ सगळ्या सिनेमावर साकळून राहिल्यासारखं वाटतं ही कलादिग्दर्शन आणि छायालेखनाची कमाल आहे. अर्थात, कामोद खराडे यांनी पार्श्वध्वनींची दिलेली जोडही महत्त्वाची आहे. त्याला पूरक अशी उदासवाणी धून मंगेश धाकडे यांच्या पार्श्वसंगीतात ऐकायला मिळते.

सोनी लाइव्हवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा का पाहावा, याची बरीच कारणं आहेत, पण मनोज बाजपेयीचा अभिनय आणि सिनेमाकलेचा उत्तम सांघिक आविष्कार ही दोन कारणं प्रमुख ठरतील… तिसरं, सर्वात कारण म्हणजे आपल्यावर सिनेमा काय परिणाम करतो आणि तो तसा परिणाम का करतो, हे तपासून पाहण्याची दुर्मीळ संधी या सिनेमाच्या रूपाने मिळाली आहे.

mamanji@gmail.com