आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:चीनशी युद्ध बहुस्तरीय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षणमंत्र्यांच्या दोन व पराराष्ट्रमंत्र्यांच्या एका माॅस्को भेटीतील संवादानंतर भारत-चीनमधला ताबारेषेवरचा तणाव कमी होईल का? हे सांगता येत नाही. कमांडर स्तरावरील लष्करी अधिकाऱ्यांच्या सैन्य माघारी बोलण्याची सहावी फेरी अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर तणावाबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यासही चीन तयार नाही. गेल्या २० दिवसांत लडाखच्या पूर्वेला चिन्यांनी तीन वेळा गोळीबार केला. गोळीबाराचे ठिकाणे बदलली. सिक्किम, अरुणाचल प्रदेशला खेटून असलेल्या ताबारेषेवरही त्यांनी गोळीबार केला. एकीकडे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शांततेच्या गोष्टी करत झुलवण्याचा प्रयत्न करायचा, दुसरीकडे मात्र गोळ्या झाडायच्या.बीजिंगच्या उक्ती आणि कृतीत ताळमेळ नसतो, असे संरक्षणमंत्री म्हणतात, ते खरेच आहे. भारताचा लडाखच्या पश्चिमेकडील ३८ हजार चौ.कि.मी. भूभाग चीनच्या ताब्यात आहे. आता अरुणाचल आणि सिक्किममधील ९० हजार चौ.कि.मी क्षेत्रावर त्याचा डोळा आहे. त्यामुळेच ताबारेषेवरील भारतीय लष्कराची गस्त आणि लष्करी पायाभूत सुविधांच्या बांधकामाला चीनचा विरोध आहे. चीनमधील अंतर्गत स्थिती, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना वाढता विरोध, चीनविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकजूट, आर्थिक दंडेलशाही झुगारून देण्याच्या प्रमुख देशांतील हालचाली अशी अन्य कारणेही आहेत. हिवाळा जवळ येईल, तसा तणाव वाढेल. भारतानेही मोठी लष्करी ताकद उभी केली आहे. पण, हे करताना पाक सीमेकडेही लक्ष द्यावे लागेल. आपल्याला चीनशी केवळ लष्करी नव्हे, तर बहुस्तरीय युद्धाचे डावपेच आखावे लागतील. १० हजार मोठ्या कंपन्या, अति महत्त्वाच्या पदांवरील नेते यांच्या संगणकावर ताबा मिळवून माहिती चोरीचा, हेरगिरीचा प्रयत्न चीन करतोय. या पार्श्वभूमीवर ५ जी संपर्क प्रणाली उभारणीच्या निमित्ताने यूएई कंपनीच्या माध्यमातून भारतात प्रवेशाचा चीनचा प्रयत्न केंद्राने थोपवला पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा. भारताच्या विदेशी गुंतवणूक नियंत्रण कायद्यात राजकीय पक्षांकडे विदेशातून येणाऱ्या पैशाच्या छाननीची तरतूद नाही. याचा गैरफायदा घेत चीन देशात गोंधळ घालू शकतो. त्यामुळे सरकारने कायद्यात तातडीने दुरुस्ती केली पाहिजे. चीनच्या खुमखुमीला भारताने असे वेगवेगळ्या स्तरांवर, अनेक हातांनी लढत तोडीस तोड उत्तर दिले पाहिजे.