आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:माझ्या मराठी लेखकांनो आणि प्रकाशकांनो...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुस्तक खरेदीचे रोडावलेले प्रमाण, पुस्तकाच्या निर्मितीचा वाढत जाणारा खर्च

दिनकर गांगल

पुस्तक खरेदीचे रोडावलेले प्रमाण, पुस्तकाच्या निर्मितीचा वाढत जाणारा खर्च, जीएसटी आणि नोटबदींचा फटका यामुळे अगोदरच तडाखा बसलेल्या मराठी साहित्य व्यवहाराला दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे आगामी काळात फार मोठी किंमत मोजावी  लागणार आहे. या आपत्तीवर येत्या काळात कशी मात करता येऊ शकेल... त्यासाठी लेखकांना आणि प्रकाशकांना कोणते पर्याय निवडावे लागतील यावर ज्येष्ठ लेखक-प्रकाशक दिनकर गांगल यांचा महत्वाचा लेख...

मराठी प्रकाशन व्यवसाय गेल्या दोन दशकांपासून संकटात आहेच; पुस्तकांची विक्री झपाट्याने मंदावत चालली आहे. कोरोनाने त्या व्यवसायास कड्याच्या टोकाला आणून ठेवले आहे का? भीती तर तशी आहेच. मराठी प्रकाशन व्यवसाय आर्थिक व्यवहाराच्या अंगाने समृद्ध कधीच नव्हता. स्वतंत्र भारताच्या विकास कार्यक्रमास १९६०-६५ सालानंतर उत्थान लाभले. त्यात शैक्षणिक विकासविस्ताराचा अनुषंगिक भाग म्हणून प्रकाशन व्यवसाय बहरला, काही प्रकाशकांना, विक्रेत्यांना उत्तम लाभ झाला, ते आर्थिक दृष्ट्या स्थिरावले. प्रकाशन हा व्यवसाय सरकारावलंबी सतत राहिला आहे. सरकारचे अनुदान ग्रंथालयांना मिळते, त्यावर तो व्यवसाय निर्भर असतो. पुस्तकांची लोकांमधील विक्री ही फार मोठी कधी राहिलेली नाही. पुस्तकांची दुकाने कमी आहेत. परंतु, कोरोनानंतर सरकारने जीवनावश्यक ज्या गोष्टी ठरवल्या त्यात साहित्यकलांचे नामोनिशाण नव्हते. कलाकारांना "ग्लॅमर' असल्याने, कोणी सुबोध भावे करमणूक उद्योगातील हजारो कर्मींचे दुःख टेलिव्हिजनवर येऊन मांडताना दिसला. संगीतकला-लोककला क्षेत्रातील कलावंतांना पाठिंब्याची गरज मांडताना कोणा मैफल संयोजकांना ऐकले, तेवढेच. एरवी सर्व चर्चा आरोग्यरक्षणाची आणि जनतेला धनधान्य पुरवण्याची होती/आहे. त्यात पुस्तकांना स्थान कोठेच नव्हते. काही अधिक लोक लॉकडाऊनच्या काळात पुस्तकवाचनाकडे वळले मात्र.

साहित्यकला-संस्कृती हे प्रश्न या समाजात कधी अग्रस्थानी आले नाहीत. विकास कार्यक्रमाबरोबर शैक्षणिक संस्था व देवभक्तीच्या संस्था यांना बरकत आली. पण जिज्ञासा, ज्ञानोत्सुकता यांना समाजात सतत दोन-तीन टक्क्यांचेच स्थान राहिले. पुस्तक हे त्या ज्ञानोत्सुकतेचे प्रतीक आहे. त्याची काय अवस्था कोरोनानंतरच्या जीवनाच्या पुनर्मांडणीत असणार आहे? सकृतदर्शनी तरी "चिंताजनक', असे त्याचे उत्तर एका शब्दात देता येईल. येती दोन-तीन वर्षे समाजास काटकसरीचे जीवन जगावे लागणार आहे. त्यातही पुस्तकांना स्थान मिळणे अवघडच राहील नाही का? माझी इच्छा तशी नाही, बरे. लोकांनी पुस्तके घ्यावी, ती वाचावी; त्यात त्यांचे आयुष्यनिधान व सुखसमाधान आहे असेच माझे मत आहे. पुस्तक वाचताना जो ब्रम्हानंद गवसतो तसा तो अन्य कोणत्याही साधनाने मिळत नाही; पुस्तक व्यक्तीला घडवते हा माझा विश्वास आहे. पण वास्तव त्याहून विपरीतच सतत राहिले आहे व आता ते अधिक भडकपणे जाणवण्याची शक्यता आहे. "कोरोना'ने माणसांची मानसिकताच बदलणार आहे.

पुस्तक ही गोष्ट भारतीय भाषांत/मराठीत दोनशे वर्षांपूर्वी आली. त्याआधी हस्तलिखिते होती. त्यांच्या प्रती हाताने लिहून मोजक्या निघत होत्या, परंतु ज्ञानप्रसाराचे प्रमुख माध्यम भाषण-कीर्तन-प्रवचन म्हणजे श्रवण हे होते, त्याची जागा ग्रंथ आल्यानंतर वाचन या माध्यमाने घेतली. ते माध्यम बहरले गेल्या शतकात, परंतु तेव्हा साक्षरताच समाजात नगण्य होती. त्यामुळे पुस्तकाचे जे काय महात्म्य ते सतत सुशिक्षित समाजात राहिले व अजूनही समाजात सुशिक्षितांचे प्रमाण कमी आहे, व्यवसायशिक्षितांचे अधिक आहे! त्यामुळे मराठी समाजात राज्यभर कॉलेजे निघाली, अनेक अभ्यासक्रम तयार झाले, नवनव्या विद्याशाखा येत गेल्या, तज्ज्ञ मंडळी आली, परंतु मराठी भाषा ज्ञानसंपन्न होऊ शकली नाही व स्वाभाविकच, मराठी ग्रंथव्यवहार हा उपेक्षित, दुर्लक्षित व वंचित राहिला.

तरीसुद्धा पुस्तक ललित साहित्याच्या अंगाने मराठी राज्यात प्रभाव टाकून राहिले होते, ते १९४० ते १९८० या काळात. खांडेकर-फडके-अत्रे ते कुसुमाग्रज-पुल-वपु असा तो काळ आहे. मराठी लेखकांची व त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याची मोठी प्रभा महाराष्ट्र राज्यात त्याकाळी फाकली गेली होती. पाडगावकर-करंदीकर-बापट-सुर्वे-महानोर-दया पवार-शिवाजी सावंत यांना केवढ्या गौरवाने महाराष्ट्राने पुजलेले आम्ही पाहिले. पण टीव्ही-संगणक-मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक व त्यापाठोपाठ डिजिटल माध्यमे येत गेली आणि छापील शब्दाचा/पुस्तकाचा महिमा संपला. पहिला घाला नियतकालिके-वर्तमानपत्रे यांवर पडला. जगभरच्या मोठ्या संस्था गडगडल्या. त्यांना "ऑनलाइन'ची कास धरावी लागली. आम्ही वाचनप्रसार/ग्रंथप्रसार हे व्रत घेऊन मराठीमध्ये कामास सुरुवात केली, तेव्हा टेलिव्हिजन नुकता आला होता (१९७२). आमच्या आरंभीच्या चर्चा-विषयांत "दूरदर्शनचे आक्रमण' हा मुद्दा महत्त्वाचा व लोकांना आकृष्ट करणारा वाटे. ते आक्रमण वाचनावरील आहे असेच लोकांना वाटे. नंतर आलेल्या संगणकाने व इंटरनेटने तर पुस्तकव्यवहाराला ग्रासूनच टाकले. पुस्तकात जे जे आहे, त्यापेक्षा कितीतरी सवाई तेथे उपलब्ध आहे.

या गेल्या तीन दशकांत वाचनाचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. वाचन हे ज्ञानाचे, साहित्यकलेचे माध्यम होते, त्याऐवजी तो छंद झाला आहे -जसे कलाकुसरीचे विविध छंद असतात तसा. वाचनाचा छंद असलेले छांदिष्ट वय वर्षे सहापासून ऐंशीपर्यंत समाजात अनेक सापडतील. त्यांची पुस्तक ही उत्कट गरज असते, पण ते तेवढेच. सतार-बासरी ते हार्मोनियम वाजवणारे लोक असतात. ते त्यांच्या त्या नादात असतात. तसे पुस्तकप्रेमी असतात -ते त्यांच्या तंद्रीत असतात. परंतु पुस्तक ही सामाजिक गरज राहिलेली नाही. पुस्तक-वर्तमानपत्र यांची ती जागा इंटरनेटवरील गुगल, युट्यूब यांसारख्या नेटवर्कनी घेतली आहे. ती रोजची वर्तमानपत्रे आहेत आणि विद्यापीठेही आहेत. आमच्यासारखी जेष्ठ पिढी जी पुस्तकांच्या जगात वावरली, त्यांना पुस्तकांचे महत्त्व अनन्य वाटणारच; ते काही प्रमाणात तसे आहेही. पुस्तकवाचनाने व्यक्तिमत्त्वास जशी सघनता प्राप्त होते तशी अन्य कोणत्याही माध्यमाने लाभत नाही, कारण वाचन ही कष्टसाध्य गोष्ट आहे, त्यासाठी लिपी शिकावी लागते -अक्षर सहज डोळ्यांत शिरत नाही; छापलेल्या ओळी वाचत जावे लागते तेव्हा डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडतो. पडद्यावरील दृश्य डोळ्यांत सहज घुसते आणि तसेच विरूनही जाते. अर्थात त्याचेही महत्त्व आहेच- प्रत्येक माध्यमाची शक्ती वेगळी असते. पण त्यात पुस्तक निर्विवादपणे सरस असते.    

मराठी पुस्तक व्यवसायातील विसंगती अशी, की मराठीत पुस्तके, दिवाळी अंक, जिल्हापत्रे यांचे प्रकाशन वाढतच गेले आहे. जगभर असे मानले जाते, की पुस्तक व वर्तमानपत्र कागदावर छापील स्वरूपात पुढच्या दोन-तीन दशकांपर्यंतच पाहण्यास मिळतील. काही भविष्यवेत्त्यांनी तर छापील शब्दांचा महिमा संपण्याचे ते साल दशकभरातच येईल असा अंदाज बांधला आहे. त्यावेळी म्हणे जगातील शेवटचे वर्तमानपत्र बंद पडेल! मग मराठीत व भारतात छापील शब्द माध्यमाला ही सूज का? तर भारत अजून विकासाच्या वाटेवर आहे. भारतात भौतिक सुविधा अजून तेवढ्या प्राप्त झालेल्या नाहीत. येथे दारिद्र्याचे प्रमाण मोठे आहे. ते वर्ग जसजसे विकासक्रमात येतील तसतसे ते या "जुन्या' गोष्टींबद्दल काही काळ आग्रह धरतील. त्या "जुन्या' गोष्टींत पुस्तके-वर्तमानपत्रे यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यामुळे पुस्तके जास्त छापली जातात, वर्तमानपत्रे नवनवी निघत राहतात. मात्र ती जेवढी विकली जातात तेवढी वाचली जातात का हा प्रश्न आहे. समाजातील वाचन कमालीचे मंदावले आहे असाच निर्वाळा सर्व जाणकार देतील.

तंत्रज्ञानाने एकूण जीवनात व ग्रंथव्यवहारात माणसाच्या रुचीमध्ये बदल घडवून आणणे चालवले आहे, त्यास "कोरोना'ने गती आली आहे व अजून येईल. उदाहरण ऑनलाईन शिक्षणाचे घेऊया. ते तीन-चार महिन्यांत रूळावलेदेखील. पालकांना बालकांच्या हाती मोबाईल देणे पसंत नव्हते ना! तेच पालक त्यांच्या पाल्यांच्या हाती मोबाईल देऊन "शिक्षकांनी काय पाठ पाठवला आहे ते बघ आणि शिक्षिका तुला किती वाजता कॉल करणार आहेत तेही पाहून घे' असे बजावू लागले आहेत!

मराठी पुस्तकव्यवहारात सर्वात मोठे भाग दोन होते. ते म्हणजे क्रमिक पुस्तके व पूरक साहित्य यांचा एक आणि भावभक्ती साहित्याचा दुसरा. या दुसऱ्यात आंबेडकरी साहित्याचाही समावेश होऊ लागला आहे. त्या साहित्यातील आग लोटली आहे. त्यात तिसऱ्या विभागाची भर गेल्या दोन-तीन दशकांत पडली ती जीवनोपयोगी साहित्याची. त्यामध्ये यंत्रदुरुस्तीपासून समाजात वागावे कसे व व्यक्तिमत्त्वविकास येथपर्यंतच्या साहित्याचा समावेश होतो. त्यांपैकी क्रमिक पुस्तके आणि जीवनोपयोगी पुस्तके या दोन्ही प्रकारांची पुस्तके छापून उपलब्ध करून देणे गरजेचे नाही, हे कोरोनानंतर प्रकर्षाने ध्यानी आले आहे. सरकारने बारावीची पुस्तके मुलांना ऑनलाईन दिलीदेखील. जीवनोपयोगी साहित्याऐवजी युट्यूब विद्यापीठ व तशी नेटवर्क ही साधने माणसांना सज्ञान, हिकमती व शहाणे करण्यासाठी म्हणून सहज हाताशी उपलब्ध आहेत. त्यांचा परिणामकारक उपयोग प्रत्येक कल्पक व्यक्ती व तिचे "फॉलोअर्स' करून घेत आहेत. तंत्रज्ञान व्यक्तीला आवडो-नावडो, अवगत होवो-नाहोवो ते तिला येऊन भिडते. पुस्तकाचे तसे नाही, पुस्तक मिळवावे लागते.   

        कोरोनाने माणसांचे बरेचसे व्यवहार घरबसल्या होऊ शकतात हेही ध्यानी आले आहे. त्यामुळे माणसांचा बाहेर पडण्याचा, समाजात मिसळण्याचा कल कमी होत आहे/ होणार आहे. सभासमारंभ होण्याची शक्यता जवळजवळ नाही. म्हणजे पुस्तकप्रसाराची अन्य साधने स्वीकारावी लागतील. काही प्रकाशक व्हॉट्सअॅप वगैरे साधनांचा उपयोग करूही लागले आहेत. पुस्तकांचे "कव्हर रिलीझ' वगैरे 'प्रोमो' प्रसृत होतात. कवी-लेखकांच्या फेसबुक लाइव्ह गप्पा सुरू झाल्या आहेत. काही वेळा मनात येते, की ग्रंथप्रसाराचे असे प्रयत्न पुस्तकवाचनास प्रेरक ठरतील की मारक ठरतील? कारण लेखक-कवींचा "कंटेण्ट' असा प्रकट झाल्यानंतर त्यांची पुस्तके वाचण्यास पुन्हा लोक का प्रवृत्त होतील? तेवढा सखोल "कंटेण्ट' देण्याची ताकद साहित्यिकांत तरी आहे का? तीन-चार दशकांपूर्वी लेखक-कवी यांची जागा समाजात अग्रस्थानी भासत असे. सद्यसमाजात त्यांना शोधावे लागते. कारण एकतर लेखक-कवींची समाजाला काही देण्याची बौद्धिक क्षमता व मूल्यजाणीव तेवढी प्रखर राहिलेली नाही किंवा समाज अधिक शहाणा, प्रगल्भ होत आहे असेही म्हणता येईल.

"कंटेण्ट'च्या अंगाने मराठी पुस्तकांनी फार मोठी झेप कधी घेतलेली नाही. प्रथम मराठी ललित साहित्यावर मध्यमवर्गीय भावविश्वाचा आविष्कार म्हणून टीका होत असे. त्यामध्ये सामाजिक जीवनदर्शनाचा पदर दलित व ग्रामीण साहित्याच्या रूपाने आला. त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात व्यवसायदर्शन आले. व्यावसायिक जीवनानुभव व तदनुषंगिक ज्ञानाविष्कार असे त्या मराठी ग्रंथसंपदेचे स्वरूप आहे. राजहंस, रोहन, मनोविकास यांनी त्या अंगाने मजल मारली, तर मेहतांनी प्रामुख्याने दालन चोखाळले ते भाषांतरित पुस्तकांचे. तशा पुस्तकांचा फार मोठा संच गेल्या दोन दशकांत मराठीत तयार झाला आहे. अनुवादकर्त्यांचा लेखकगटही मराठीमध्ये ठाशीवपणे दिसतो. प्रकाशक त्यांच्या कृती अहमहमिकेने छापत असतात. वाचकांच्या उड्या त्या पुस्तकांवर पडतात, कारण त्यांना नवे जग, नवे भावविश्व तेथे अनुभवण्यास मिळते. म्हणजे प्रत्येक वाचकाची भूक नव्या 'कंटेण्ट'ची असते.

कोरोनानंतर लेखक-कलावंतांवर फार मोठी जबाबदारी येणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईस तिसरे महायुद्ध असेही म्हणतात. पहिली दोन्ही महायुद्धे युरोपच्या भूमीवर लढली गेली. साऱ्या जगाने त्यांचे अनुभव साहित्य व अन्य कलाकृती यांमधून जाणून घेतले. दुसऱ्या महायुद्धाने तर साहित्य-कलांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला, अभिजाततेचे नवे दंडक तयार झाले. कोरोनाची लढाई जगभर प्रत्येक माणूस त्याच्या भूमीवर, त्याच्या क्षमतेने लढत आहे. तो अनुभव त्याला हादरवून टाकणारा आहे. लेखकांनी त्यांच्या उपजत अधिक संवेदनशीलतेने तो जाणला पाहिजे आणि मांडला पाहिजे. हकिगती व ललित साहित्य यांतील फरक मंगलाष्टकाची गीते व कविता यांतील फरकाइतका ठसठशीतपणे दिसून येणार आहे. मराठीतील अभिजात प्रकाशक-संपादक श्री.पु.भागवत व राम पटवर्धन यांची लेखकांना एक सूचना असे -अनुभव मुरवा. कोरोनाचा अनुभव समाजात सखोल मुरवला जात आहे तो व्यापक मीडियाजालातून. लेखक-कलावंतांना व्यक्तिगत पातळीवर त्याची सूक्ष्मता सखोल जाणता येईल व ते जागतिक लेखकांच्या तोडीस तोड साहित्यनिर्मिती या आपत्तीमधून करू शकतील अशी आशा करुया. आपत्तीमध्ये संधी असते ती अशी.

dinkargangal39@gmail.com

(लेखकाचा संपर्क - 9867118517)

बातम्या आणखी आहेत...