आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धार आणि काठ:ही वाट दूर जाते...

नामदेव कोळी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नदीकाठी मानवी संस्कृती उदयाला आली. नदीची धार वाहती आहे तोवर तिचा काठ सुखी समृद्ध आहे. आपल्या प्रत्येकात एक नदी निरंतर वाहत असते. तिचं वाहतेपणच आपल्याला सतत प्रवाही ठेवत असतं. निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं नदीने अधिक घट्ट केली आहे. आज नद्या आपल्यातून एक एक करत निघून चालल्या आहेत. नद्यांचं आपल्या जीवनातलं महत्व अधोरेखित करत नदीच्या आणि नदीकाठच्या माणसांच्या गोष्टी "धार आणि काठ' या ललित सदरात मांडत आहेत - "वाघूर'चे संपादक कवी नामदेव कोळी.

नदीकाठी मानवी संस्कृती रुजली. वाढली. इथली माती नदीने समृद्ध केली. नदी जीवनदायिनी. नदीनं गावं जोडली. माणसं जोडली. नदीवरून नकाशातल्या गावांच्या सीमा ठरतात. नदीचा हा काठ सोडून पलीकडे तालुका बदलतो. जिल्हा बदलतो. या गोष्टीचं मला लहानपणी फार नवल वाटे. नदीच्या दोन्ही काठांवर एकाच गावाची ऐलाड-पैलाड ग्रामसंस्कृती वाढते. एकाच भावकीतले एकाच कुटुंबातली घरं नदीच्या पलीकडे वस्तीला गेले की तिथेच एक गाव वसतं. या गावांना जोडणारी पायवाट एकच असते. नद्या जशा आठवणीत राहून जातात तशाच गावांना जोडणाऱ्या पायवाटाही. कडगावच्या अगदीच पल्याड गाव नव्हतं. मात्र उगवतीकडे दोन अडीच मैलांवर वाघूरकाठी दोन छोटी खेडी होती. जोगलखेडा आणि भानखेडा. त्यांचा तालुका भुसावळ. आम्ही जळगाव तालुक्यात. बारमाही खळाळून वाहणारी वाघूर, मुबलक चारा, गायरानं यामुळे गुरंढोरं अमाप होती. आजूबाजूच्या गावातली गुरं कडगावच्या हद्दीत यायची तर इकडची गुरं दूरवर चरायला जायची. खेड्यांच्या रानात कडगावरांच्या जमिनी होत्या. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ बैलगाड्यांची ये-जा चालूच असायची. शिवाय भुसावळहून कडगावला येणारी एसटी दिवसातून दोनदा यायची. संध्याकाळच्या बसचा आवाज कानावर आला की वाघूरच्या दऱ्या-खोऱ्याातून माणसं घराकडे वळायची. गाडरस्ता आणि नदीलगतची पायवाट दिवसभर गजबजलेली असायची. शरीरातल्या धमन्यांसारख्या या पायवाटा आपल्यात धमनी बनून सळसळत असतात. नदी जशी आठवणीत चिरंतन वाहत आलीय पायवाटही तिला जोडूनच माझ्या मनभर वाहतेय.

जोगलखेडा वाघूरच्या अगदीच काठावर होतं. तिथल्या घरांची सावली डोहात पडायची. इतक्या जवळ. वर काही फर्लांग अंतरावर भानखेडा. कडगावच्या तुलनेत ही दोन्ही खेडी अगदी चिल्लीपिल्ली. आमचं गावही खेडंच पण गावचे लोकं तिकडे जाताना म्हणायची - खेड्यावर चाललो. जोगलखेड्यात पाच-पंचवीस घरं होती. त्याहून थोडी अधिक घरं भानखेडयात होती. त्यातही भिल्ल आणि कोळी जमातीची झोपडीवजा घरं अधिक. शेतमजुरी, शिकार, दगड-गाळ-रेती-मातीची कामं ही इथल्या गावकऱ्यांची वर्षभर चालणारी कामं. ही कामं नदीच्याच आसपासची असल्यामुळेही नदीखोऱ्यात सतत माणसांची आणि जनावरांची वर्दळ असायची. या दोन्ही खेड्यांचा आमच्या गावाशी घरोबा होता. गावातल्या काही लेकी तिकडे सुना म्हणून गेलेल्या होत्या तर काही तिकडच्या लेकी आमच्या गावच्या सुना होत्या. माहेरी यायला या लेकींना कुठल्याच सणासुदीच्या निमित्ताची गरज भासत नसे. कुणी मुऱ्हाई घ्यायला वा पोहचवायला येईल याची त्या कधीच वाट पाहत नसत. लेकरं-बाळांना हाताशी घेत त्या नदीच्या वाटेने झपाझप निघायच्या. क्षणात सासरी-क्षणात माहेरी. नदीची ही वाट मैत्रीणच होती त्यांची. वाटेत भेटलेल्या लेकी-सुना उभ्यानेच ख्याली-खुशाली विचारत. आपलं मन मोकळं करत. डोळे भरून आलेत की नदीच्या धारेत त्या आसवांच्या धारांना वाट मोकळी करत. 

खेड्यावरच्या लोकांना व्याजाने पैसे देणारे काही सावकार लोकही आमच्या गावात होते. त्यातले मतलबी सावकार तर व्याजाच्या पैशांवर आपलं पोट भरायचे. वसुलीच्या निमित्ताने जायचं मग गरीबांच्या घरी मन भरून मासे खायचे आणि त्यांच्याचकडून फुकटात ताजे मासे घरी आणायचे. व्याजासहित मुद्दल रक्कम जशीच्या तशी. खेड्यावर कुंभार लोहार सुतार चांभार न्हावी कारू नारू नसल्याने ते कडगाववर विसंबून होते. या गरजा भागविण्यासाठी ये - जा करणाऱ्यांनी नदीची वाट कधीच ओस पडू दिली नाही. बाळू आणि पोपट या दोन्ही न्हाव्यांच्या गव्हाया खेड्यांवर होत्या. नाहीच कोणी वावरणारे दिसले तरी दिवसातून दोन वेळा ही दोघे न्हावी हमखास या वाटेने भेटायचे. त्यांच्या खांद्यावर धान्याची पोतडी आणि एका हाती पेटी असे. सुगीचे दिवस सुरू होण्याआधी शेतीची अवजारे बनवण्यासाठी सुतार आणि लोहार यांच्याकडे खेड्यावरचे लोकांची गर्दी वाढे. आखाजीच्या दिवसात कुंभारवाड्यात नवीन घागरी घेणाऱ्यांची रिघ लागायची. कडगावच्या जत्रेला तर अवघं खेडं यायचं. अशावेळी गावातल्या मारुतीच्या पारावरून नदीच्या वाटेने जा-ये करणारी ही माणसं रांगेत चालणाऱ्या मुंग्यांसारखी दिसायची. कुणी पाहुणे येणार असले की त्यांची वाट पाहणारे याच पारावर गर्दी करत. खेड्यावर कुणाला निरोप द्यायला इथेच लोकं जमत. जाणारा पाहुणा नदीच्या पार पोहचेपर्यंत इथेच थांबत.

जोगलखेड्याच्या पाणथ्याजवळ आमचं ‘भाटी’ नावाचं वडिलोपार्जित वावर होतं. गायरानही जवळच असल्यामुळे बाबांचं गव्हारं वावराच्या आसपास असायचं. मी कधी घरची गुरं चारत तर कधी वावराची राखण करत याच वाटेवर असायचो. दुरून येणाऱ्या बैलगाडीचा आणि जनावरांच्या गळ्यातल्या घंटी-घोगराचा आवाज मला इतका परिचयाचा झाला होता की कोण येतय? येणारी बैलगाडी कुणाची आहे? हे मी न पाहता ओळखून घ्यायचो. पाखरांची किलबिल आणि नदीचं झुळझुळ संगीत हे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकायचं. दररोज कडगावला येणारा एक धल्ला माझा दोस्त बनला होता. उंचपुरा. सावळा. खांद्यावर बागायती रुमाल. त्याच्या जेवण्या हातात रेडिओ असायचा. तो दुरून दिसला की मला फार आनंद होई. आमच्या वावराच्या मेरावरल्या हिवराच्या झाडाखाली तो बसायचा. आमच्या घल्ल्यातून थंडगार पाणी प्यायचा. माझ्या डोळ्यातलं कुतूहल पाहून तो माझ्या हाती रेडिओ द्यायचा आणि तिथेच एक डुलकी घ्यायचा. मी घंटाभर रेडिओचे स्टेशन बदलवत गाणी ऐकायचो. मग पुन्हा घोटभर पाणी पिवून तो निघायचा. त्याची पाठमोरी आकृती आणि रेडीओतल्या गाण्याचे सूर पुसट होईस्तोवर मी वाटेवरून त्याला न्याहाळत असायचो.

वाघूरला मोठा पूर यायचा आणि नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटायचा. आपापल्या गावी परतायच्या वाटा बंद पडायच्या. पण तिकडच्या काठी अडकून पडलेला इकडचा माणूस किंवा तिकडचा कुणीही इकडे राहिला तरी त्याची गैरसोय कधीच होत नसे. पूर ओसरायची चिन्हे दिसत नसली की जो तो आपापल्या ओळखीच्या घरी आसरा घ्यायचा. वावरात गेलेली कडगावची माणसं पार अडकायची. आई बहि‍णींना घेवून घरच्या शेतात गेलेली असली की पुराचा चहाळ घेत मी त्यांना सावध करायचो. पुल पाण्याखाली जाण्याआधी नदी पार करणे ही मोठी कसरत व्हायची. बऱ्याचदा आम्ही अडकून पडायचो. इतर गावकऱ्यांसोबत नदीकाठी पूर ओसरण्याची वाट पहात बसण्याशिवाय काही पर्याय नसायचा. मग दोन्ही खेड्यातली माणसं सगळ्यांसाठी भाकरींची व्यवस्था करायची. पूर ओसरू लागला की अडकलेली दोन्ही काठची माणसं एकमेकांच्या आधारानं नदी पार करायचे. मग पुरातून भिजलेली वाट पुन्हा दुमदुमून निघायची. नदी दुथडी भरून वहायची तेव्हाची ही गोष्ट आहे. तिच्या काठच्या वाटाही वाहत्या होत्या. माणसं माणसांना भेटत रहायची. नदीच्या गोष्टी सांगितल्या जायच्या घरोघरी. नदी जशी काळजात रुतून बसली आहे तशीच गावांना जोडणारी पायवाटही...

kolinamdev@gmail.com (संपर्क: ९४०४०५१५४३)

बातम्या आणखी आहेत...