आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार आणि काठ:खेकड्यांची शाळा

नामदेव कोळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नदीकाठी मानवी संस्कृती उदयाला आली. नदीची धार वाहती आहे तोवर तिचा काठ सुखी समृद्ध आहे. आपल्या प्रत्येकात एक नदी निरंतर वाहत असते. तिचं वाहतेपणच आपल्याला सतत प्रवाही ठेवत असतं. निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं नदीने अधिक घट्ट केली आहे. आज नद्या आपल्यातून एक एक करत निघून चालल्या आहेत. नद्यांचं आपल्या जीवनातलं महत्व अधोरेखित करत नदीच्या आणि नदीकाठच्या माणसांच्या गोष्टी "धार आणि काठ' या ललित सदरात मांडत आहेत - "वाघूर'चे संपादक कवी नामदेव कोळी.

‘भुरी म्हैस पाण्यात बैस…खेकडा आला तर बोंबलत बैस…’ असं आम्ही पोरं होला पक्ष्याच्या लयदार आवाजात बडबडायचो. गावाला वाघूरचा बारमाही वाहता काठ. त्यामुळे म्हशी अमाप होत्या आणि खेकडेही. गावात प्रत्येकाच्या घरी गायी-म्हशी. गावच्या लोकसंख्येपेक्षा जनावरं जास्त होती. गुरांना पाणी पाजायला नदीवर नेण्याचं काम चिल्लरपार्टीचं. म्हशींना पाण्यात बसून राहणं प्रिय. त्यांना मारून उठवलं तरी त्या उठत नाहीत. मग म्हशी पाण्यात बसवल्या की पोरं नदीकाठी खेकडे शोधत हिंडायचे. दिवसभर नदीचा काठ गजबजलेला असायचा. बाबा गुराखी होते. चराई नदीच्या आसपास होती. त्यामुळे इतर पोरांच्या तुलनेत माझा नदीवरचा वावर जास्त होता. बाबांनी मला खेकडे कसे पकडावे याचे धडे दिले. खेकडा हा उभयचर प्राणी. ज्याला कणा नाही. मान आणि डोकेही नाही. ढालीसारखी टणक चौकोनी पाठ. तलवारीसारखे आठ पाय. दोन धारदार नांग्या. लूकझुप करणारे सुंदर डोळे. त्याची सावध चाल... आणि चव...यामुळे खेकड्यांविषयी माझ्या मनात प्रचंड कुतूहल होतं. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात यांना मुठे, चिंबोरे, किर्व्या, कुर्ली अशीही नावं आहेत. आम्ही मात्र खेकड्यांना डीब्बर म्हणायचो. आगपेटीच्या आकारासारखे म्हणून डीब्बर.

केवळ नदीत पोहता येईल आणि मासे-खेकडे पकडता येतील म्हणून मी गव्हाऱ्यामागे जायचो. डोंगरीचा डोह, सवानी, काकू कराड, ढोकीचा ढोह, टिटोरीचं गायरान, झिरपट, पाभे, वाघनये या भागात खेकडे हमखास मिळायचे. मग मी हटकून गुरं इकडेच वळवायचो. हिवाळ्यात नितळ पाण्यात नदीतला दगड अलगद उचलून बाजूला केला की छोटे खेकडे सहज पकडता यायचे. पावसाळ्यात बीळं बुजली जातात. हे बेघर खेकडे पकडण्यासाठी हा काळ पोषक. उन्हाळ्यात पाणी आटायला लागलं की यांचे वास्तव्य नदीकाठच्या धटांमध्ये आणि मोठमोठ्या कपारींमध्ये असतं. अशा खेकड्यांची शिकार करण्यात खरा कस लागायचा. खेकड्याच्या बिळाला आम्ही वकीर म्हणायचो. वकीरातला गारा रेती खेकडा आपल्या नांग्यांनी बाहेर काढतो. बऱ्याचदा या वकीरात अनेक खेकडे एकत्र राहतात. वकीरातून आणि कपारींमध्ये हात घालून खेकडा बाहेर काढणे दिव्यच. मोकळी हवा घ्यायला बाहेर आलेले खेकडे पावलांची चाहूल लागली की तुरुतुरु कपारीत लुप्त व्हायचे. मग गढूळलेल्या पाण्यात काठीने कपारीत चाचपळून घ्यावं लागे. अथक प्रयत्नांनी कधीतरी यश मिळे. मग घामाघूम झालेलं चिखलाने माखलेलं अंग डोहात सोडायचं. मनसोक्त पोहायचं. मग पुन्हा ‘नवीन वकिर.. नवी शिकार’.

खेकडे पकडण्यासाठी मी खास एक शस्त्र बनवलं होतं. बारक्या आसरीचं तुकडं निशाणावर घासून त्याला टोकदार बाणाकृती आकार दिला होता. हा बाण बांबूच्या फोकाला सुतडीने घट्ट बांधला होता. कपारीत लपलेल्या खेकड्याच्या दिशेने हा बाण खुपसायचो. मग डावीकडे काठी फिरवली की खेकडा त्या बाणाच्या टोकाला अडकून बाहेर यायचा. मग त्याच्या भल्यामोठ्या धारदार नांग्या आणि पाय पिरगाळून वेगळ्या करून न्याहारीच्या फडक्यात बांधून आगेकूच करायचो. लव्हाळीच्या धटातला खेकडा पकडण्यात फार जोखीम असते. आत चिखलात रुतलेला खेकडा धरायला हात आत टाकायचा तर धामण हाती येण्याचीही भीती. एक दोनदा माझ्या हाती धामण आली. मग ढुंगणाला पाय लावून पळत सुटलो होतो. बरेचसे वकिर आरपार असत. इकडून हात टाकावा तर दुसरीकडून खेकडा पसार व्हायचा. गढूळ पाण्यात त्याचा माग घेणे कठीण. खेकड्याची मादी अंडी घालते. या अंड्यांतून जन्मणारी पैदास शेकडो असते. मेलेली पिलं मादी खाऊन टाकते तर कधी पिलं मादीला खाऊन टाकतात. श्रावणात नदीवर शुकशुकाट असतो. नदीकाठी पुराच्या पुरसानात अडकलेला मातीचा ढिगारा कुदळीने कोरला की गब्बर खेकडे, अंड्यांच्या ओझ्याने सुस्तावलेल्या माद्या सहज मिळतात. मग कपाशीचे बोंडं वेचून ओटीत टाकावे इतक्या सहज खेकडे पोतडीत टाकायचे. मनसोक्त भाजून खायचे. उरलेले कावीळ झालेल्या माणसाला घरपोच नेऊन द्यायचे हा माझा श्रावणी उद्योग.

रात्री काळोखात हे खेकडे बाहेर चरायला निघतात. छोटे मासे, लव्हाळी, कीटकं, शेवाळ, माती हे त्यांचं खाद्य. पोट भरलं की पुन्हा आपापल्या बिळाकडे निघतात. माणसाच्या पावलांची चाहूल लागली की हे खेकडे सोबत्यांना आपल्या विशिष्ट आवाजातून सावध करतात. खेकड्यांची ही संकेत-भाषा जाणणारी माणसं रात्री खास खेकडे खाण्यासाठी कंदिल, टॉर्च, बल्लम, काठ्या, कुऱ्हाडी, पोतडी असं शिकारीचं सामान घेऊन निघायची. ही मोठ्यांची शाळा. या रात्रशाळेत जायला घरून सहसा परवानगी मिळत नसे. एकदोनदा गेलो. बत्तीच्या लख्ख उजेडात खेकड्यांची धावपळ पाहून आवाक झालो होतो. काही विशिष्ट भागातले खेकडे मला कधीच पकडता आले नाहीत. मी कायम त्यांना पाहायचो, ते ही माझ्याकडे बघायचे. मी त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही, म्हणून ते निडरपणे वकीराच्या पायथ्याशी ढम्म बसून असत. मला वाकुल्या दाखवत.

खेकडा अतिशय चाणाक्ष व चिवट जीव आहे. तो सहसा हार मानत नाही. आपल्या दोन धारदार टणक नांग्या हेच त्यांचं शस्त्र. यात आपलं बोट सापडलं तर रक्तबंबाळ झाल्याशिवाय सुटका नाही. छोटे खेकडेदेखील आपल्याला कळा येतील इतक्या जोरात चावा घेतात. कपारीतल्या खेकड्यांना पकडण्याकरिता वापरली जाणारी काडी-बांबू खेकडा आपल्या नांग्यामध्ये फिट्ट धरून ठेवतो. ही काडी तकलादू असली तर तुटलीच समजा. बऱ्याचदा शिकाऱ्याच्या दोन्ही हातात आपल्या नांग्या तो स्वतः सोडून देतो आणि चपळाईने खाली उडी घेतो. मार्ग मिळेल तिथे तुरूतुरू पळतो. पाण्यात पडला तर पकडणं मुश्किल. शिकाऱ्याच्या हाती उरतात फक्त नांग्या. असे अनेक खेकडे मला चखमा देऊन पळाले आहेत. अशा नांग्या देऊन पसार झालेल्या खेकड्यांना त्याच जागी नवीन नांगी उगवून येते.

शाळेतही माझ्या शिकारीच्या साहसकथा पोरं जीव एकवटून ऐकायचे. शनिवारी-रविवारी आमची शाळा नदीवर भरायची. खेकडे पकडून झाले की मनमुराद पोहायचो. खेकडे नदीवरच भाजून खायची मजा काही औरच. घरून काडेपेटी मिळेना. कुणी बिडी पिणारा माणूस येईल तोवर वाट पाहा. त्याला विनवा. मग पेटवण जमवा. मग सारे मिळून हवा अडवून बसा अशा अनेक अडचणी नदीवर यायच्या. त्यामुळे आमच्या घरीच खेकडा पार्टी व्हायची. चुलीत पेटवण कोंबायचो. गवरीच्या रेटक्यांवर घासलेट ओतलं की चूल पेटायची. घरभर धूर व्हायचा. तवा तापल्यावर त्यात पळीभर तेल घालून लसूण - चटणीची फोडणी दिली की खेकड्यांवर येथेच्छ ताव मारायचो. आजही तो स्वाद जीभेवर रेंगाळतोय. एखाद रविवार खाडा गेला की मित्र म्हणायचे, “तोंड गह्यरं माटीवानी झालं भो, नदीवर शाळा भरवा यार”. या शाळेतल्या मौज मजा आयुष्यभर आठवणीत राहतील.

kolinamdev@gmail.com

(संपर्क: ९४०४०५१५४३)

बातम्या आणखी आहेत...