आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धार आणि काठ:नदी पेरणारा माणूस

नामदेव कोळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नदीचा प्रवाहीपणा ज्या माणसांमध्ये आहे तो अथकपणे नदी उपसत असतो. नदी पेरत असतो. नदीशी आणि मातीशी इमान राखणाऱ्याला निसर्ग भरभरून देतो याची साक्ष आत्माभाऊकडे पाहून पटते. आत्माभाऊचा आत्मा म्हणजे नदी.

नदीकाठची माणसं काटक, सोशिक. नदीचं पाणी या माणसांना नदीसारखं नितळ, निगर्वी, निष्ठावान बनवतं. नदीचा नाद, नदीची लय, तिचं बळ भिनलेलं असतं त्यांच्यात. वाघूरकाठच्या लोकांमध्ये वाघाचं बळ आहे. वाघासारखी घूर घूर करत वाहणाऱ्या वाघूरचीच लेकरं ती. तिच्यासारखी शूर, दगडं फोडणारी. रेताळ-बखळ जमीन कष्टाने फुलवणारी. इथल्या शेती-मातीत कुणबी आणि शेतमजूर सारखेच रक्ताचं पाणी करत राबत. नदी खोऱ्यातल्या काही जमिनी फारच कसदार. माणूस पेरला तर उगवून येईल. बहात्तरच्या दुष्काळानं मात्र होत्याचं नव्हतं केलं. अल्पभूधारक आणि शेतमजूरांची अन्ननदशा झाली. सततच्या नापिकीला कंटाळून लोकांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावात विकून टाकल्या. पोटापाण्यासाठी तरुण सुरतकडे निघून गेले. मिळेल ते काम करून तिकडेच स्थायिक झाले. गावात राहिले ते जमीनदाराकडे दोन वेळच्या भाकरीवर सालदारी करू लागले. चौथे-दोन-चौथे धान्याच्या मोबदल्यात जमिनी गहाण पडलेल्या. यावेळी वाघूरचा मोठा आधार होता. लोकं नदीकाठच्या दगडावरचा खार, खेकडे, झिंगे, मासे, कासवं विकून पोट भरू लागले. मासेमारीतूनच पोटाची खळगी भरू लागले. वाघूरने कुणालाही मरू दिलं नाही.

एकाने डोंगरीच्या डोहाकडे रेतीत डांगरमळा फुलवला. शेती-मातीत राबणाऱ्या माणसांना रेतीतल्या या शेतीचं नवलच वाटलं. कसेल त्याची नदी होती. हाताला कामंही नव्हते. लोकांनी आपापल्या आवाक्यात येईल इतकी नदी पेरायला सुरुवात केली. नदीकाठ दिवसभर दुमदुमून जायचा. रात्रीही कंदील बत्ती घेवून मळ्याची राखण करणाऱ्यांचा मुक्काम नदीवर होता. एकमेकांना मदतीचा हात देत हे मळेकरी. या मळ्यात डांगराचं पीक मुबलक यायचं म्हणून हा ‘डांगरमळा’.

या मळ्यावाल्यांमध्ये एक अफाट बुद्धिमान माणूस होता. आत्माराम गोविंदा कोळी. सर्वांचा आत्माभाऊ. वाघूर कोळून प्यालेला. नदी त्याच्या नसानसात भिनलेली. जेमतेम शिकलेला, नादारीत वाढलेला. उंच पुरा, सडसडीत बांध्याचा पुरुष, हरहुन्नरी. माशासारखे बारीक डोळे, चेहऱ्यावर देवीचे व्रण. पक्का वारकरी, देवधानी माणूस. कपाळावर लाल गंध टिळा. डोक्यात गांधीटोपी. अंगात हमेशा बांडीस पट्ट्यांचा पायजामा. मासेमारीच्या कितीतरी तऱ्हा त्याला ठाऊक. लोक भाऊला ‘माश्यांचा डॉक्टर’ म्हणत. बोलण्यात पटाईत. चावडीवरचा न्यायनिवाडा असो, की कुणाचे सोयरीक कसो, आत्माभाऊच्या शब्दाला मोठी किंमत होती. लोकांनी उभारी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडूनही आला. लग्नकार्यात- मरणाधरणात सर्वात पुढे. गावपंगतीचा स्वयंपाक एकटा करायचा. गुरं-ढोरं-बकऱ्यांचा सौदा असेल तर आत्माभाऊच्या मध्यस्थी शिवाय व्यवहार व्हायचा नाही. सासू-सुनांचे भांडण असो, की भावकीतल्या भानगडी. स्वतःहून उडी घेऊन समेट घडवायचा. गावातल्या नाट्यमंडळात आपलं नाटकातलं पात्र सांभाळून नेपथ्य-प्रोम्टिंग ही कामं लीलया करायचा. गवंडीकाम, सुतारकाम, विणकाम अशा कोणत्याच कामात भाऊ मागे नव्हता. लावण्या-नाट्यपदे रचली. नाटकं लिहिली. समाजप्रबोधनपर गाणी लिहून गायली. स्वतःच्या शारीरिक यातना, आजारपण सोसलं. कुटुंबासाठी झटला. बहिणी, लेक-लेकी नातवंड यांच्यापाठीशी कायम उभा राहिला. बिडी आणि चहा त्याचा जीव की प्राण. सट्टा-पत्ता खेळला पण दारूच्या वाटेला नाही गेला कधीच. लाव्हरी, तितूर, घोरपड, पारवा, सायळ, रानटी डुक्कर, ससा, पाणकोंबडी अशा दुर्मीळ शिकारी आत्माभाऊने केल्या. तितक्याच प्रेमाने संगात्यांना खाऊ घातल्या. आत्माभाऊचा आत्मा म्हणजे नदी. नदीच्या सगळ्या खाचाखोचा त्याला माहित होत्या. पुरातली लाकडंही पकडलीत.

एक-दोनदा नदीत बुडून मेलेल्यांचे प्रेत सापडेना. शेवटी आत्माभाऊला बोलावलं. पाण्याचा प्रवाह, खोली, कडे-कपारींचा अभ्यास असलेल्या या अभ्यासकाने बुडणाऱ्याचा तोल कसा गेला असेल आणि प्रेत कोणत्या ठिकाणी असू शकतं याचा अंदाज व्यक्त केला आणि त्यानुसार प्रेत त्या-त्या जागी मिळाले.

उन्हाळ्याची चाहूल लागली की खांद्यावर फावडं घेऊन आत्माभाऊ रेतीत घाम गाळून वाफे तयार करायचा. मळ्याभोवती वडांग करायचा. त्याला देशी बियाणांची पारख होती. मातीचा आणि रेतीचा पोतही त्याला कळे. भाऊ पिकाला नेणत्या लेकरांसारखं जपायचा. दिवस-रात्र पिकाभोवती पिंगा घालायचा. आजूबाजूच्या मळेवाल्यांना आत्माभाऊचा आधार वाटायचा. इतरांची खोपटी तकलादू. तर भाऊची झोपडी म्हणजे जणू घरच. शेणा-मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंती. पुरातही ती झोपडी तशी शाबूत राहायची. डांगरासोबतच काकडी, ढेमशी, कारले अशी पिकं जोमानं येत. पहिला लाग लागला की वानवळा घरोघर जाई. माल निघायला लागला की सगळ्यांची लगबग सुरू होई. पहाटे चार वाजता अंधारातच तोडणी होई. मांजरपहाटे टोपले बांधून तयार होत. मग दहा-बारा मैल चालत जावं लागे. भुसावळाला लिलावात टोपले पोहचेस्तोवर सकाळ उजाडायची. आलेल्या पैशात घरात मीठ-मिरची-तेल आणि लेकरांना भातकुल घेऊन मळेकरी पुन्हा नदीच्या काठाने घरी परतत. डांगरमळा मजुरांच्या कुटुंबाचा आधार होता.

आत्माभाऊने चारही लेकरं आणि बायकोसह राबून रेतीत सोनं फुलवून दाखवलं. हा माणूस कायम नव्याच्या शोधात असायचा. मूर्तीकाराला ओबडधोबड पाषाणात मूर्ती दिसावी तसंचं भाऊला नदीकाठी काचकनात थडी दिसली. निंबारीजवळची पडीक जमीन भाऊला खुणावत होती. याच जमीनमालकाकडे आधी सालदारकी केलेली असल्यामुळे बिनदिक्कत थडी कसायची परवानगी मिळाली. इथेही हाडाची काडं करत थडी फुलवली. कासराभर खोल खड्डा खोदला. लेकरांनी टीपड्याने पिकाला पाणी दिलं. या थडीत टरबूज, गिलके, दोडके, गवार, कारले पिकवले. काहींनी अनुकरण केलं. पण काबाड-कष्टाचं अनुकरण जमलं नाही. म्हणून फसले.

एकदा असाच भटकत असताना आत्माभाऊला नागझिरीचा नाला नजरेस पडला. शेकडो झीर या नाल्यात होते. या पाण्याचा उपयोग थडीसाठी होईल असा विचारही केला नव्हता. नदीला लागूनच पडीक थडी होती. ती औतफाटा करून कसली. बायको-पोरांना सोबत घेऊन नाल्यावर मातीचा बंधारा घातला. त्या बंधाऱ्यातून गुप्त चाऱ्या खोदल्या. आणि वाफ्यात प्रत्येक रोपापर्यंत पाणी पोहोचवलं. हा प्रकल्प एखाद्या अभियंत्यालाही लाजवेल असा होता. कुठेही पाईपलाईन नाही की पाणी उपसायला यंत्र नाही. केवळ आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर भाऊने नव्हत्याच होतं केलं. हा प्रकल्प पाहायला गावकऱ्यांची गर्दी जमायची.

वय वाढत चाललं तरी भाऊची नदीवरील भटकंती सुरूच राहिली. एक दिवस डाबर आणि पाभे परिसरात मासेमारी करत असताना सांदळीच्या गवतात वाघूर-तापीच्या ऊसूने जमलेला सुपीक गाळ दिसला. सांदळीचं मातलेलं गवत कापून काढलं. नांगरट केली. कुदळ-फावड्याने माती सपाट केली. आजूबाजूला काट्यांचा गराडा घातला. मग त्यात गहू पेरला. लोकांनी याहीवेळी त्याला वेड्यात काढलं. पण अपार मेहनतीने आत्माभाऊने नदी कसली. दिवसरात्र राखण केली. चार पोते गहू झाला. या काळात दिवस-रात्र नदीतच रहावं लागल्याने मनसोक्त मासेमारी देखील करता आली. केवळ नदी आणि रात्र याला साक्षीदार आहेत. नदीचा प्रवाहीपणा ज्या माणसांमध्ये आहे तो अथकपणे नदी उपसत असतो. नदी पेरत असतो. नदीशी आणि मातीशी इमान राखणाऱ्याला निसर्ग भरभरून देतो याची साक्ष आत्माभाऊकडे पाहून पटते.

kolinamdev@gmail.com

(संपर्क: ९४०४०५१५४३)