आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:चैतन्य ताम्हाणे; समकालीन चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा आश्वासक आवाज

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नम्रता जोशी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाने डबल धमाका करताना ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि सर्वोत्कृष्ट पटकथा’ असे दोन मानाचे पुरस्कार मिळवले. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला होता. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे.

चैतन्य ताम्हाणे, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल व सप्टेंबर महिना याचं खास नातं असावं. ‘कोर्ट’ २०१४च्या सप्टेंबरमध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. आणि त्याला Orizzonti (Horizons) category’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट पदार्पण म्हणून ‘The Luigi De Laurentiis’ (Lion of the Future) हा पुरस्कार मिळाला होता. आता सप्टेंबर २०२०मध्ये चैतन्याचा मुंबईतल्या शास्त्रीय संगीतातल्या जगतावर आधारित दुसरा चित्रपट ‘द डिसायपल’ हा (The Disciple) व्हेनिस महोत्सवात प्रदर्शित झाला आणि त्याला ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि सर्वोत्कृष्ट पटकथा’ असे दोन मानाचे पुरस्कार मिळवले.

‘कोर्ट ‘ आणि ‘द डिसायपल’ याच्या दरम्यानच्या काळात चैतन्य ताम्हणे चार अकादमी पुरस्कारांचे मानकरी असलेल्या मेक्सिकन चित्रपट दिग्दर्शक आल्फासो क्युअरन (Cuarón) यांच्या हाताखाली ‘Rolex Mentor and Protégé Arts Initiative’च्या अंतर्गत प्रशिक्षण घेत होता. चैतन्यची चित्रपटाच्या बाबतची समज – उमज, विषयाकडे बघण्याची व्यापक दृष्टी, अभिव्यक्तीची मुक्तपद्धत आणि उपजत प्रतिभा यामुळे आल्फासो क्युअरन सुद्धा भारावून गेले. समकालीन चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा ताज्या दमाचा आश्वासक आवाज! अशी चैतन्यची प्रशंसा त्यांनी केली आहे. या अभूतपर्व कामगिरीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य ताम्हणेशी संवाद साधला गेला. ‘द डिसायपल’ कसा बनवला त्या मागचा चैतन्यचा खासा प्रवास, "दिव्य मराठी रसिक'च्या वाचकांसाठी..

प्रश्न : ‘कोर्ट’ हा एक बिंदू ग्रहित धरून पाहिला की त्यात दिसून येतो तो एक सामाजिक अवकाश, ती रचना व सांस्कृतिकता. हे सर्व एकजिनसी होऊन पडद्यावर साकारले गेले आहे. त्या अनुषंगाने तुझी नवी कथा येते की, तुझी कथाच तसा अवकाश, रचना अपेक्षित धरते?
चैतन्य: ‘कोर्ट ‘आणि ‘द डिसायपल’ची कथन शैली वेगवेगळी आहे. ‘कोर्ट’ हा तटस्थ दृष्टिकोनातून मांडला गेला आहे. ‘द डिसायपल’ हा व्यक्तिनिष्ठ आणि भावनिक आहे. संपूर्ण चित्रपटात एकाच व्यक्तिरेखेचा प्रवास दिसतो. हे कथानक माझ्याच एका नाटकाच्या कल्पनेवर आधारित आहे. २००८ मध्ये हे नाटक मी लिहिलं आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यावेळी मी २१ वर्षाचा होतो. त्या नाटकाचे नाव होते, ‘ग्रे एलिफंटन्स इन डेन्मार्क'. जादू आणि माईंड रीडिंगवर आधारित हे नाटक आहे. या नाटकाचा नायक आणि निर्माता होता विवेक गोंबर (‘कोर्ट’मध्ये त्याने वकिलांची भूमिका होती व दोन्ही चित्रपटाचा निर्माता आहे.) या नाटकात त्याने जादुगाराची भूमिका केली होती. आता मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळतो.

‘द डिसायपल’च्या बाबतीत ज्या रचनेने मला प्रभावित केलं, ती गोष्ट म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत. आधी मांडणी विचारात असल्याने, मी शोधपत्रकारितेप्रमाणे माहिती गोळा करायला सुरवात केली. शास्त्रीय संगीताशी निगडित अनेक लोकांच्या घरी जाऊन, त्यांच्या बरोबर वेळ घालवला. त्यांच्या आयुष्याशी जोडलो गेलो. त्यांचा सोशल मीडियावर पाठपुरावा करत गेलो. या विषयाबद्दलच्या डॉक्युमेंट्रीज, चित्रपट पाहिले. त्या संदर्भातील पुस्तकं वाचली. या संशोधनाच्या प्रवासात जाणवला तो भारतीय शास्त्रीय संगीताचा वैभवशाली इतिहास, त्यातील छोटे किस्से, घटना, शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेले विलक्षण लोक. भारतीय शास्त्रीय संगीत ही दुर्मीळ अशी कला आहे. या कलेला वाहून घेतलेले कलाकार सतत त्याच्या परिपूर्णतेचा ध्यास घेत असतात. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी प्रशिक्षणाची गरज भासतेच. मी शास्त्रीय संगीताबाबत पूर्ण अनभिज्ञ होतो, त्यामुळे ते समजून घेण्यासाठी बराच कालावधी गेला.

या सर्व गोष्टींकडे मी अतिशय रिक्त मनाने पाहात होतो. प्रत्येक अनुभव माझ्यासाठी नवा होता. माझ्यापुढे अजेंडा नव्हता. त्यामुळे मनात काही मिळेलच असे कोणतेही गणित ठेवले नव्हते. त्यातून सनसनाटी, वादग्रस्त काही मिळायला हवे, हा माझा हेतू नव्हता. त्याच बरोबर या प्रक्रियेच्या शोधातील काय घ्यायचे, काय नाही याची जाण सतत मला होत होती. जी वस्तुस्थिती असते, तीच कथानकाचा भाग बनत जाते. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी का? कसे? असे काही प्रश्न साहजिकच असतात. नंतर ते प्रश्न उरत नाही. चौकट मोडून पडते. आणि प्रवास सुरू झाल्यावर येणाऱ्या कल्पना, निरीक्षणामुळे अनुभव गोळा होत जातात. हे सर्व गोष्टींचा ठाव घेताना कमालीचे सातत्य लागते. दोन-तीन महिने केवळ देऊन, सर्व समजले असा साधा सोपा प्रकार हा निश्चितच नाहीये.

प्रश्न : ‘कोर्ट’ प्रदर्शित झाला २०१४ साली आणि आता हा ‘द डिसायपल’ २०२०ला प्रदर्शित होतोय. फिल्म तयार करण्यामागे तुझी घाई नसते वाटतं.?
चैतन्य : ‘कोर्ट’ प्रदर्शित झाल्या नंतरचा बराच काळ इतर फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘कोर्ट’चा समावेश असल्यामुळे गेला. नंतर ऑस्करचे कॅम्पेन सुरू होतं. त्यानंतर ‘Rolex Mentor and Protégé Arts Initiativeच्या अंतर्गत प्रशिक्षण सुरू झाले. आल्फासो क्युअरन यांच्या ‘रोमा’ या चित्रपटाशी जोडला गेलो. या मधल्या कालावधीत जाणीवयुक्त अनुभव घेत होतो. तसं पण मी चित्रपटावर काम करताना, त्यासाठी लागणारा पुरेसा अवधी घेत असतो. मला कोणतीच घाई नसते. कथानकाकडे चिंतनाच्या विविध पैलूतून पाहात असतो. हे सर्व होत असताना ते कथानक स्वतःचं, व्यक्तिगत होऊन जातं आणि माझे विश्व विस्तारित जाते. प्रत्येक वेळी मीच नवा होत जातो. या अंतर्गत घडामोडी अतिशय त्रासदायक, रक्तबंबाळ करणाऱ्या, अवघड, कठीण असतात. सोप्या, सहज मिळणाऱ्या उत्तरांवर संतुष्ट होऊन चालत नाही. आता हेच बघा, या दोन्ही चित्रपटांचा बाज वेगवेगळा आहे. तुम्ही म्हणू शकतात की ‘कोर्ट’ हा कोर्टरूममधील नाट्य आहे, पण नेहमी दाखवले जाणारे नाट्य त्यात नाहीये. ‘द डिसायपल’च्या बाबतीत निश्चित अशी कोणतीच चौकट नाहीये. मी काहीतरी शोधण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. त्यासाठी मला वेळ लागतो. आशा बाळगायला हरकत नाही, की पुढे जाऊन असं होऊ शकत की असा चित्रपट असेल की त्यात इतका शोध, वेळ लागणार नाही. अगदी शून्यापासून सुरूवात करावी लागणार नाही.

प्रश्नः ‘कोर्ट’ हा चित्रपट मुंबईत घडतो. या शहरातील विविध संस्कृतींचे उपघटक त्यात दिसतात. न्यायालये, मराठी मध्यम वर्ग, दलित चळवळींमधील कार्यकर्ते. ‘द डिसायपल’मध्ये नेमके काय दिसते?
चैतन्य: ‘द डिसायपल’ हा पूर्णपणे मुंबईत घडतो आणि तो मराठी सिनेमा आहे. माझ्यासाठी मुंबईच्या बाबतीत मांडावं तितकं कमीच आहे. हे महानगर सातत्याने घडत – मोडत असतं, उध्वस्त होत, वसत असत. प्रत्येक क्षणी बदलत असतं. शिवण उसवल्यासारखं भसाभास काहीना काही बाहेर पडत असत. गोळा होत, विखुरले जात असत. आणि आपल्याला त्यातून संस्कृतीचे अनेक उपघटक दिसतात. सगळं एकमेकांना बांधले गेलेलं. कोव्हिड येण्याआधी माझा आवडता उद्योग म्हणजे रात्री दोन – तीन वाजता मित्राबरोबर लाँग ड्राईव्हला जाणे. प्रत्येक वेळी जे काही सापडायचे, ते विस्मयचकित करणारे असायचे. ही फिल्म भारतीय शास्त्रीय संगीतातील एक घटकावर आधारित आहे. फारशी जाण नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला असा प्रश्न पडायचा की भारतीय शास्त्रीय संगीत आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे का, ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ? पण माझ्या या शोधयात्रेत मला मुंबई शहरात या क्षेत्रातील गतिशील, जिवंत, रसरशीत आणि विकसनशील असे किती तरी पैलू दिसले.

प्रश्न : कोणत्या प्रकारचे संगीत ऐकत तू वाढलास ? तुझा संगीतात रुची घेण्याकडे कल होता का?
चैतन्य : मी सांस्कृतिक कल असलेल्या घरात वाढलो नाही. प्रभादेवीच्या एका चाळीमध्ये जन्माला आलो, तिथे हिंदी चित्रपट संगीत आणि थोडेफार वेस्टर्न म्युझिक कानावर पडत लहानाचा मोठा झालो. तरुण असताना शास्त्रीय संगीतापासून तसा दूर होतो. कारण या क्षेत्रात अपेक्षित असणारी कमालीची श्रद्धा आणि त्यांचा ताठरपणा, सनातनीपणा यामुळे त्यांच्यापासून चार हात दूर राहायचो. वाढत्या वयानुसार या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करायला जमू लागले. शास्त्रीय संगीतात असणारा खरेपणा, सौदर्य, अलौकिक बुद्धिमत्ता जाणवायला लागली. शतकानुशतके ते कसं अधिकाधिक वृध्दिंगत होत गेलं. त्यात पर्शियन, पाशात्य संगीताच्या अन्य परंपरा कशा विरघळत गेल्या, हे लक्षात आलं. शास्त्रीय संगीताचा अनुभव साक्षात घ्यायला हवा. मी जातीने संगीत महोत्सव ऐकायला जायला लागलो. तेव्हा मला शास्त्रीय संगीताचा खरा अर्थ उलगडायला लागला, त्यातील सौंदर्याचा प्रत्यय आला. चित्रपट बनवताना लय हा घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मी बऱ्याचदा स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग, फिल्मची जडण – घडण ही संगीताच्या साह्याने करत असतो. ही सर्व प्रक्रियाच मुळी एखाद्या संगीत रचनेसारखी असते. हा सर्व प्रकारचं मला संगीतमय वाटते.

प्रश्न : चित्रपटाच्या लय याचा उल्लेख बोलतांना केलास...‘कोर्ट’ला स्वतःची अशी लय आहे. आता तर लयीच्या जगाशीच थेट संबंध असणारा चित्रपट निर्माण केला आहेस. ती लय मांडताना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागले ?
चैतन्य : इंगमार बर्गमन यांनी असे म्हटले आहे की, कोणताही चित्रपट सुरू करण्यापूर्वी मागील अनुभवाची ओझी फेकून देऊन, पाटी कोरी ठेवून, नव्याने सुरवात करायची असते. ‘द डिसायपल’ हे स्वतंत्र कथानक आहे. कथानक तुम्हाला त्याची स्वतःची अशी एक लय सुचवत असते. तुम्ही कृत्रिमतेने कोणतीही लय त्यावर बळजबरीने थोपण्याचा प्रयत्न करणे, हे चुकीचे असते. माझ्या मते व्यक्तीला संवेदनशील होऊन कथानकाची मागणी समजावून घ्यायला हवी. त्या मुळे असे म्हणतात, चित्रपट तीन वेळा लिहिला जातो. पहिल्यांदा कागदावर, नंतर शूटिंगच्या दरम्यान आणि शेवटी एडिटिंग टेबलावर. ती लय सतत राहात नाही, ती सारखी शोधावी लागते. बाकीच्या इतर घटकासारखी ती सुद्धा विकसित होत जाते. तुमचे एडिटिंग आणि साऊंड डिझाईन यांचा मोलाचा वाटा त्यात असतो. या सर्वातून दिग्दर्शक म्हणून मी पण परिपक्व होत गेलो. मी २५ वर्षाचा असताना ‘कोर्ट’ बनवला आणि आता ३०-३१चा असताना ‘द डिसायपल.’ या दरम्यान मी बदलत गेलो, चांगलं का वाईट हे सांगू शकत नाही.

प्रश्न : साऊंड ट्रॅकसाठी विशेष असे काही केलं का?
चैतन्य : लेखक, इतिहासतज्ज्ञ आणि नावाजलेले तबलावादक अनिश प्रधान यांनी या चित्रपटाची संगीत योजना केली आहे. तुम्हांला चित्रपटात पारंपरिक राग ऐकायला मिळतील. तसेच गरजेनुसार त्यांना वेगळ्या ढंगात पेश करण्यात आले आहे. चित्रपटात योग्य बसावे म्हणून प्रसंगात असलेला नाट्यमय तणाव संगीताद्वारे पोहचवला आहे. आर्थिक गणित लक्षात ठेवून वेळेत हे सर्व बसविणे गरजेचे होते. असे असले तरी त्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्याचे सादरीकरण व्हायला नको, याची काळजी घेतली गेली कारण भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रतिनिधित्व हे संगीत करत आहे. अनिश प्रधान यांनी अतिशय जबाबदारीने, खुल्या मनाने, संवेदनशीलतेने कथानकाला न्याय दिला आहे. निश्चितच प्रत्येक प्रसंगानुसार स्वतंत्र संगीत सादर केले आहे. वेगवेगळे असले तरी प्रवासाला निघाल्या वर जसे वेगवेगळे टप्पे असले, तरी प्रवास एक असतो. त्या प्रमाणे ते एकजीव झाले आहे. चित्रपट काल्पनिक असला तरी तो संगीत महोत्सव किंवा म्युझिक व्हिडिओ नाहीये. पण तरीही या घटकांची काळजीपूर्वक हाताळणी करायला हवी. या सर्वाची सांगड त्याने उत्तम पद्धतीने घातली आहे.

प्रश्न : साहजिकच असा प्रश्न आहे की तुला आल्फासो क्युअरन बरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि आता ते या फिल्मचे एक्झक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. तर तुम्ही दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक मातीतील पाळंमुळे असलेली माणसं आहात तेव्हा तुमच्या ताळमेळ कसा बसला?
चैतन्य : ‘Rolex Mentor and Protégé Arts Initiative’च्या अंतर्गत प्रशिक्षणाच्या दरम्यान आमची भेट झाली. आणि आमचे नाते प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता ते फुलत गेले. आम्ही आता चार वर्षापासून एकमेकांना ओळखतो. ते खूप उदार आणि मदतीसाठी तत्पर आहेत. ‘रोमा’च्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत जवळून बघितली होती. त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर माझ्यात फिल्म मेकर म्हणून खूप बदल झाला. त्यांच्यामुळे माझ्या ज्ञानात खूप भर पडली. त्यांनी मला निडर होऊन, उत्तम गोष्टीसाठी आग्रही राहायला शिकवले. स्वतःला कमी न लेखता, कोणत्याही मर्यादा आणि साधन सामग्रीच्या कमतरतेचे कारण द्यायचे नाही. त्यांनी मला बजावले, ” स्वतःला छोटा स्वतंत्र दिग्दर्शक आणि या चित्रपटाला छोटा भारतीय चित्रपट म्हणणं आधी बंद कर. असं काही नसतं! ”

त्यांनी प्रत्यक्ष कामातही मला खूप मदत केली. त्यांनी रफ कट बघितले, स्क्रिप्ट बघून मला सिनेमॅटोग्राफर सुचवला. आणि आता चित्रपटाचे एक्झक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. आमच्यातील हा विश्वास, जिव्हाळा जे चार वर्ष एकमेकांसोबत घालवले त्यातून निर्माण झालेला आहे. मी त्याचे कायम आभार मानत राहतो, तेव्हा ते म्हणतात, “माझे नको, त्या चित्रपटाचे आभार मान. मी चित्रपट आवडला म्हणून हे सर्व केले आहे.” मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांनी अशा प्रकारचा पाठिंबा मला दिला.

प्रश्न : मुख्य प्रवाहातील बाजारगणितावर आधारलेले सिनेमे करण्यापेक्षा इंडी फिल्ममेकर म्हणून विकसित होणे हे मुक्त वाटत नाही का?
चैतन्य : आल्फासो क्युअरन जे म्हणाले, त्याचा संदर्भ नीट समजून घ्यायला हवा. तुम्ही जेव्हा कमी बजेटच्या प्रोजेक्टवर काम करता. तुम्हाला त्याच्या मर्यादा आणि संदर्भ माहिती असतात. तेव्हा काही सुरू करण्याच्या आधीच, तुम्ही स्वतःला मानसिकरित्या मर्यादित करून घेतात. त्यामुळे तुमची दृष्टीच मुळात मर्यादित राहाते. तुम्ही स्वतःवरच सेन्सॉरशिप लादून घेतात. त्या अनुषंगाने ते तसे म्हणाले आहेत. स्वतःकडून जास्त मागणी करून, आग्रही राहायला व अल्पसंतुष्ट न राहण्याची वृत्ती माझ्यात तयार व्हावी, अशी त्यांची माझ्याकडून अपेक्षा आहे. हे स्वतःला मर्यादित न ठेवण्याबद्दलच वक्तव्य नसून, अधिक जास्त मोकळं आणि निडर होऊन अभिव्यक्त होण्याच्या मानसिकतेच्या संदर्भात त्यांचे भाष्य आहे.
(सौजन्य : द वायर)

divyamarathirasik@gmail.com
(नम्रता जोशी, या मुक्त लेखिका व चित्रपट समीक्षक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...