आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रसिक स्पेशल:विशेष आभार... समर नखाते सर!

नारायण शिवाजी अंधारेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली बहुतांश मराठी सिनेमांच्या सुरुवातीला विशेष आभार म्हणून समर नखाते सरांचं नाव दिसतं. फक्त मराठीच नाही, इतर भाषिक सिनेमातील लेखक दिग्दर्शकही सिनेमा सेटवर जाण्यापूर्वी सरांचा सल्ला घेतात. सरांसोबत त्यांच्या पटकथेवर चर्चा करतात. त्यांचं मार्गदर्शन घेतात. लघुपट करणारे अनेक जण सरांच्या अवतीभवती घुटमळत असतात. बदल घडत आहेत यावर ते डोळा ठेवून असतात. त्यांना अपडेट राहायला आवडतं. ते सिनेमा कोळून प्यायले आहेत. सिनेमावर तासनतास बोलू शकतात. सर मुंबई, पुण्यासह देश आणि जगभरातील अनेक ठिकाणी लेक्चर्स द्यायला जातात. नुसतं सिनेमाच नव्हे पत्रकारिता, जाहिरात आणि माध्यमांच्या विषयांवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. चालतं बोलतं विद्यापीठच आहे ते.

यावर्षी दिल्लीत उसळलेल्या दंगलीनंतर "दीदी' या चित्रपटातील "हमने सुना था एक है भारत...' हे गाणं बरंच व्हायरल झालं होतं. या गाण्यात मुलं त्यांना शाळेत शिकवलेला भारत आणि प्रत्यक्षातील भारत वेगळा का आहे, असं त्यांच्या सरांना म्हणजे सुनील दत्तना विचारत असतात. हा प्रश्न विचारणाऱ्या मुलांमध्ये एक चुणचुणीत मुलगा आहे. गाण्यातील "लेकिन जब नजदीक से देखा...' या ओळी तो गातो. "हा मुलगा कोण आहे?' असा एक प्रश्न त्या मुलाच्या स्क्रिनशॉटसह फेसबुकवर फिरत होता. बहुतांश जणांना ते ओळखता आलं नाही. काहींनी मात्र बरोबर ओळखलं. ते समर नखाते सर आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून काही सिनेमांत काम केलंय. दो आँखे बारह हाथ सिनेमातील "तक तक धूम धूम...' गाणं आठवत असेल तर या गाण्यात जी दोन मुलं दिसतात, त्यांच्यातील उंच मुलगा म्हणजे समर नखाते सर आहेत.

बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करत असताना सरांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. कॉलेज करत असताना ते पुण्यातील "थिएटर अकॅडमी' या नाट्यसंस्थेशी जोडले गेले. या संस्थेद्वारे निर्मित नाटकांसाठी ते प्रकाशयोजना करत असत. त्यांनी काही नाटके दिग्दर्शितही केली. ऐंशीच्या दशकात देशभरात पथनाट्यांचं वारं होतं तेंव्हा नखाते सरांनी तत्कालीन सामाजिक विषयांवर महाराष्ट्रात पथनाट्ये केली. पुढे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काही काळाने तिथेच त्यांची संचालक म्हणून निवड झाली. पण अध्यापनाची आवड असल्याने त्यांचं मन त्यात रमलं नाही. सरांना विद्यार्थ्यांत रमायला आवडतं. जागतिक सिनेमात काय बदल होत आहेत याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. यासोबतच आपल्या भोवताली कशा प्रकारचे सामाजिक, राजनैतिक, आर्थिक बदल घडत आहेत यावर ते डोळा ठेवून असतात. त्यांना अपडेट राहायला आवडतं. ते सिनेमा कोळून प्यायले आहेत. सिनेमावर तासनतास बोलू शकतात. सर मुंबई, पुण्यासह देश आणि जगभरातील अनेक ठिकाणी लेक्चर्स द्यायला जातात. नुसतं सिनेमाच नव्हे पत्रकारिता, जाहिरात आणि माध्यमांच्या विषयांवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. चालतं बोलतं विद्यापीठच आहे ते.

माझी आणि सरांची ओळख उमेश कुलकर्णींच्या "शूट अ शॉर्ट' वर्कशॉपमध्ये झाली. एक छोटीशी कल्पना सिनेमाचं रूप कसं घेऊ शकते हे त्यांच्याकडून ऐकणं हा कमाल अनुभव असतो. कल्पनेचा विस्तार कसा करायचा हे वर्कशॉपमध्ये शिकवत असताना सरांनी "महात्मा फुले मंडई' हा विषय घेतला होता. तेंव्हा " मंडईतला भाई म्हणून कुणाला घ्यायचं " असं विचारून त्यांनी सर्वांवर नजर फिरवली. शेवटी माझ्याकडे बघून म्हणाले, " तू इकडं ये ! " मलाच म्हणत आहेत का हे मला कळलं नाही. म्हणून मी " मी का ? " असं म्हणालो तेंव्हा " हो तूच ! तूच मंडईतला भाई दिसतोयस. ये इकडं !! " असं म्हणाले. मी उठून स्टेजकडे जाऊ लागलो तेंव्हा  " सर्वांनी टाळ्या वाजवा. शेठ येत आहेत ! " असं ते म्हणाले. सर्वजण टाळ्या वाजवत हसायला लागले. मलाही हसू फुटलं. सरांनी मला मंडईतला भाई करून टाकलं होतं. त्यांचं नाव निघालं की मला हा किस्सा आठवतो. सर सिनेमा शिकण्याची प्रोसेस आनंददायी करून टाकतात.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एका कार्यक्रमात महोत्सवाचे संयोजक जब्बार पटेल सर त्यांच्या "सामना' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आठवणी सांगत होते. चित्रपट कसा असणार आहे आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेम कशी दिसेल याचं होमवर्क त्यांनी केलं होतं. त्यांच्या डोक्यात त्यांना चित्रपट दिसत होता. पण पहिलाच चित्रपट असल्याने प्रत्यक्ष चित्रिकरण करताना हवा तो शॉट कसा घडवून आणायचा व चित्रपटाच्या तांत्रिक बाबी कशा हाताळायच्या याबाबतीत सारखा विचार करायचे. काय केलं म्हणजे अपेक्षित परिणाम साधता येईल असा त्यांना प्रश्न पडायचा. तेंव्हा समर नखाते सर त्यांच्या मदतीला धावून यायचे. समर नखाते सर सामनाचे सहदिग्दर्शक होते. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि त्यांच्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता असं जब्बार पटेल सर म्हणाले. हे ऐकून बऱ्याच जणांना सुखद धक्का बसला व टाळ्यांचा कडकडाट झाला. बहुतांश लोकांना हे पहिल्यांदा कळत होतं. नखाते सर महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीमध्ये असतात व चित्रपटांच्या स्क्रिनिंगलाही उपस्थित असतात त्यामुळे सर्वजण त्यांना ओळखतात. ते कुणीतरी मोठे व्यक्ती आहेत हे माहित असतं पण बऱ्याच जणांना त्यांची पुरेशी ओळख नसते.

हल्ली बहुतांश मराठी सिनेमांच्या सुरुवातीला विशेष आभार म्हणून समर नखाते सरांचं नाव दिसतं. फक्त मराठीच नाही, इतर भाषिक सिनेमातील लेखक दिग्दर्शकही सिनेमा सेटवर जाण्यापूर्वी सरांचा सल्ला घेतात. सरांसोबत त्यांच्या पटकथेवर चर्चा करतात. त्यांचं मार्गदर्शन घेतात. लघुपट करणारे अनेक जण सरांच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांच्यात काही प्रामाणिक आणि अनेक हौशी व उत्साही लोक असतात. सर त्यांच्यातील प्रामाणिक लोकांना बरोबर ओळखतात. अतिउत्साही आणि वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना मात्र योग्य भाषेत समजवतात. सिनेमाबाबत बोलताना त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नसतो. त्यांच्यासोबतची चर्चा कला, साहित्य, समाज, राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध अशा कुठल्याही क्षेत्रात वळण घेऊ शकते. पण ती विषयाशी निगडीत योग्य चर्चा असते. सरांना फालतू टाईमपास केलेला आवडत नाही. ते वेळेचे पक्के आहेत. दिलेल्या वेळेत समोरची व्यक्ती हजर झाली नाही तर त्याची काही खैर नसते. समर नखाते सर विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांशी बोलताना ते त्यांच्यातीलच एकजण होऊन जातात. सिनेमा, कला, माध्यम, मार्केटिंग अशा सर्वच क्षेत्रांतील ज्या ज्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध आला, त्या त्या क्षेत्रातील विद्यार्थी सरांना विसरू शकत नाहीत. त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा उमटतो. त्यांना कुणी सर म्हणतं तर कुणी गुरुजी ! कुणी मास्तर म्हणतं तर कुणी बाबा ! त्यांच्याप्रति आदर आणि प्रेम दाखवण्याचं हे एक माध्यम आहे. ज्यांना गुरू म्हणावं आणि ज्यांच्याप्रति मनात कायम आदर असतो असे फार कमी लोक असतात. समर नखाते सर त्यांच्यातील एक आहेत. आज गुरुपौर्णिमा ! सरांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुसाठी खूप शुभेच्छा !! 

"तुम्हीदेखील करु शकता हा आत्मविश्वास दिला' -  भाऊसाहेब  कऱ्हाडे (‘ख्वाडा’फेम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक)

मी ग्रामीण भागातून सिनेमा शिकायला पुण्यात आलो होतो.  सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डिसीएससारख्या डिपार्टमेंटमध्ये जिथे समृद्ध ठिकाणाहून विद्यार्थी शिकायला आलेले असताना  माझ्यासारख्या ग्रामीण पाश्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना नखाते सरांनी खूप आपलेपणानं  शिकवलं. आज विद्यापीठ असो किंवा कोणत्याही ज्ञानशाखा तिथं अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकारण होतं असतं. अशा ठिकाणी माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचा टिकावं लागणं ही तशी अवघड गोष्ट.. तरीही आमची भाषा, दिसणं आम्ही कोणत्या जातवर्गातून आलोय अशा  कोणत्याच गोष्टींचा सरांना कधीही काहीच फरक पडला नाही. मी नगरवरुन त्यांना भेटायला यायचो त्यावेळी भाजी-भाकरी सोबत असायची.  त्यांच्या गाडीत बसून, अनेकदा पायी चालत त्यांनी मला पुणं दाखवलयं. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना "तुम्हीदेखील करु शकता' हा आत्मविश्वास नखाते सरांनी दिला आहे. याच आत्मविश्वासाच्या बळावर मी "ख्वाडा'सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा करू शकलो. वर्गात फक्त लेक्चर घेणं असं त्यांनी कधीच केलं नाही तर आम्हाला ते कळावं यासाठी त्यांची सतत धडपड सुरु असायची. त्यामुळे  विद्यापीठांच्या अनेक झाडांखाली मिळेल त्या जागी बसून मला त्यांनी सिनेमा शिकवला आहे. २००९ साली शिकवलेल्या गोष्टी मला आजही आठवतात आणि त्या सगळ्यांची मला माझ्या कामात मदत होते. अशा शिक्षकांमुळेच तर एक प्रस्थापित आणि झगमगाट असलेल्या क्षेत्रात माझ्यासारख्या आणखी कित्येक विद्यार्थांना काहीतरी करता आलं आणि आपलं जगणं  मोठ्या पडद्यावर आणता आलं...

सृजनशील माणूस घडवला... - अमेय वाघ (अभिनेता)

नखाते सरांबद्दल मी आधीपासून ऐकून होतो आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डीसीएस विभागात मी प्रवेश घेतला होता. नखाते सरांकडून सिनेमा शिकत असताना आपण माणूस म्हणून समृद्ध होत जातोच, शिवाय माझ्या कामातही त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचा उपयोग होतो. शिकणं आणि शिकवणं म्हणजे काय याच्या समर्पक व्याख्या करायच्या असतील तर त्याचं उत्तर समर नखाते सर हेच असेल. कोणतीही तांत्रिक साधनं नसतानाही ते सिनेमा शिकवू शकतात. कोणत्याही विषयाबद्दल आपल्याला शिकायचं असेल तर अकॅडमीक गोष्टींऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करायचे महत्व मला त्यांच्यामुळेच कळले.आज इतक्या वर्षानंतरही ते आपल्या अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात शिवाय आम्ही काय काम करतोय याची ते सतत चौकशी करत असतात.सगळीकडे शिक्षण पद्धती आणि शिक्षक या सगळ्यांवर प्रश्न क्रिटीकली प्रश्न उपस्थित केले जात असताना नखाते सरांसारखे शिक्षक हे नेहमीच सृजनशील विद्यार्थी, माणूस घडविण्याचे काम करतात. 

स्वतःमध्ये झाकून बघायला शिकवलं... -  प्रसाद नामजोशी (दिग्दर्शक, लेखक)

"रंगा पंतगा' सिनेमा हा नखाते संरांना आवडला हीच माझ्या कामाची सर्वात मोठी पावती आहे असं मला वाटतं. एकदा बोलत असताना सर म्हणाले की, तु तुझा सिनेमा कर आणि जे दाखवायचं ते दाखवं. आमच्या संवादातलं हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं आणि मी माझा सिनेमा केला. हेच वाक्य माझ्या आयुष्यालाही लागू पडलं. सिमेमा, नाटकं या व्यतिरिक्तही त्यांच्याशी मी अनेक गोष्टींवर चर्चा केलीय. आपलं माणूसं असणं आणि जगणं म्हणजे काय आहे हे सतत स्वतःमध्ये झाकून बघायला सरांनीच शिकवलंय. त्यांच्याशी बोलत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून ते आयझेस्टीन, कुरोसावा,नामदेव ढसाळ, पाब्लो नेरुदा असे अनेक संदर्भ येत राहतात. या सगळ्या संदर्भातून आपण आपल्या वर्तमानातील जगण्याला प्रश्न विचारु लागतो. खरं तर ते कामात खूप व्यस्त असतात,बरचं वयही झालायं तरीही माझ्यासहित कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून बोलायला कधीही तयार असतात. विद्यार्थ्यांसाठीची त्यांचीही तळमळ,उत्साह बघून अजून काम करण्याची ऊर्जा मिळते.     

narayanandhare85@gmail.com

लेखकाचा संपर्क - 9766935585

0