आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिघाबाहेरची माणसं...:हा फक्त बँड नाही तर माणूस म्हणून जगण्याचे माध्यम आहे

नरसिंग झरे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपाळ- डोंबारी समाजाच्या १८० मुलांनी आपल्या बँड पथकाच्या माध्यमातून समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. आता तर मुलांमध्ये इतका आत्मविश्वास आलायं की, सबंध महाराष्ट्राला त्यांनी चँलेंज केले आहे... "मंगल बँड पथकाला हरवा आणि दोन लाख जिंका'... अद्याप एकानेही हे चँलेंज स्वीकारलेले नाही. हे बँड पथक या समाजासाठी फक्त पैसे मिळवण्याचे माध्यम नाही तर समाजात माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचे एक माध्यम बनले आहे.

प्रचंड अंधश्रद्धा, अज्ञान, गरिबी आणि दारूसेवन यांच्या पूर्णपणे आहारी गेल्याने भीषण पद्धतीने जगणारा एक भटका समाज केवळ १५ वर्षांच्या कालावधीत माणूस म्हणून जगायला शिकतो, स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो ते निव्वळ रचनात्मक कार्यामुळे... संस्कृतीच्या ज्या पायरीवर आपण उभे आहोत तिथून हजारो पायऱ्या खाली असलेला हा समाज आता निम्मे अंतर तरी वर चढला आहे. हा समाज आहे इथलाच, याच मातीतला. ज्या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले त्या लातूर जिल्ह्यातला हा समाज. ज्या निलंगा तालुक्याचे प्रतिनिधित्व शिवाजीराव पाटील –निलंगेकर यांनी एकेकाळी केले त्यांच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अनसरवाडा गावातला हा समाज...भटक्या जमातीत मोडणारा हा समाज गोपाळ समाज किंवा डोंबारी म्हणून जरी ओळखला जात असला तरी ते वीरगोपाळ किंवा खेळकरी-पैलवान अशी गोपाळ समाजाची पोटजात म्हणूनही समाज म्हणूनही परिचित आहेत.

मुळचे गोकुळ नगरीचे म्हणजे द्वारकेचे असल्याचा गोपाळ समाजाचा दावा आहे. कसरतीचे आणि ताकदीचे खेळ करून दाखवतात म्हणून गोपाळ समाजाला खेळकरी आणि पैलवान म्हणूनही ओळखले जाते. गावात खेळ करून दाखवण्यापूर्वी ढोलताशे वाजवायचे, पिपाणी वाजवायची, गर्दी जमवायची आणि मग अफाट ताकदीचे खेळ करून दाखवायचे. ही मंडळी अख्खा नांगर दातांवर उभा करून दाखवतात. लाकडाचा ओंडका दातावर उभा धरतात आणि तो हवेत तोलतात. मानेला दोरी बांधून जड दगड उचलतात. केसांनी 30-40 किलो वजनाचा दगड उचलतात. लोखंडी सळईचे एक टोक दगडाला आणि दुसरे टोक आपल्या कंठाजवळ ठेवून मानेने ती सळई वाकवून दाखवतात. तान्ह्या मुलाची झोळी बांबूला बांधून तो बांबू कपाळावर उभा करतात. कमरेत मागे वाकून रोवलेली सुई डोळ्यांच्या पापण्यांनी उचलून दाखवतात. पोराला कमानीसारखे उभे करून बाप त्याच्या पोटावर चढतो. इतकेच नव्हे तर पोतं भरलेली बैलगाडी अंगावरून जाऊ देतात... जीवावरचे कौशल्याचे आणि अफाट ताकदीचे खेळ करून दाखवणे हा या वीरगोपाळ समाजाचा हातखंडा.

द्वारकेचे असल्यामुळे गाई-म्हशींचे तांडेच्या तांडे घेऊन त्यांना चरायला घेऊन जायये हा या समाजाचा एकेकाळचा मुख्य व्यवसाय. दह्या-दुधावर लोकांचा पिंड पोसलेला असल्यामुळे अंगात रगही तितकीच होती. त्यामुळे एकदा का गाईंना चरायला सोडले की मग अंगातली रग जिरवण्यासाठी असे अचाट ताकदीचे खेळ खेळायचे. पुढे पुढे मुघलांच्या आक्रमणामुळे यांच्या तांड्यावर धाडी पडू लागल्या आणि मग जंगलखोऱ्यातून, डोंगरदऱ्यांमधून हा समाज भटकतच राहिला. मग पोट भरण्यासाठी हेच ताकदीचे खेळ त्यांना उपयोगी पडू लागले. आज या गावात तर उद्या त्या गावात जायचे, कसरतीचे खेळ करून दाखवायचे. हे सगळं करून दाखवल्यानंतर त्यांची गावाकडून अपेक्षा असायची ती भाकरीच्या तुकड्यांची. चतकोर भाकरीच्या तुकडयासाठी लहान मुलांचा अगदी तान्ह्या बाळांचाही जीव पणाला लावण्यात यांना काहीही गैर वाटत नव्हते. लहान मुलांना भीक जास्त मिळू शकते म्हणून त्यांचे कुटुंब हे भलेमोठे असायचे. एकेका जोडप्याला किमान १०-१५ पोरं असायची. त्यातली ४-५ मरायची आणि बाकीची जगायची. मुलांकडे बघून गावातल्या लोकांना दया यावी म्हणून त्यांना कायम अस्वच्छ आणि घाणेरडे ठेवायचे. त्यांना कधीही आंघोळ घालायची नाही.

या समाजाच्या लोकांना लहानपणापासून मी गावात बघत आलो होतो आणि म्हणूनच पुढे शिक्षकी पेक्षा स्वीकारल्यानंतर गोपाळ समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक गुंतागुंतीचा विषय कसा सोडवायचा याचा सातत्याने विचार करत होतो. माझेही वडील व्यसनाधीन असल्यामुळे या समाजासारखीच माझी अवस्था होती. खुप विचार करून निलंगा तालुक्यातील अनसार वाडा गावाच्या वस्तीवर गोपाळ खेळकरी हा प्रकल्प सुरु करण्यात आला. राज्यात सामाजिक काम करणाऱ्या गोविंद महाराज विकास परिषद या संस्थेच्या माध्यमातून १९९५ मध्ये आम्ही लातूर जिल्ह्यातील काही डोंबारी समाजाच्या लोकांचे पुर्नवसन करायचे ठरवले. सुरवातीला या समाजातील लोकांना एकत्र करुन त्यांना काहीतरी काम करू द्यावे, असा विचार केला आणि लोकांना शेतात शेतमजूरी करायचे काम दिले. पण त्यांना शेतीतली कोणतीच गोष्ट कळत नव्हती. म्हणजे तण कोणते आणि पीक कोणते हाही फरक यांना कळत नव्हता.

मग आमच्या लक्षात आले की, यांना प्रत्येक कामाच्या प्रशिक्षणाची गरज आहे, कारण सतत स्थलांतरित आयुष्य जगलेल्या या समाजाला माणूस म्हणून जगायचं कसं हेच माहित नव्हतं... उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ठराविक गोष्टी आपण नित्यनियमाने करत असतो. मात्र या माणसांची दैनंदिन अशी कोणतीही गोष्टच नव्हती. म्हणजे आंघोळ का आणि कशी करायला हवी इथपासून ते जेवण कसं बनवायचं इथपर्यंत त्यांना शिकवण्याची गरज होती. नागर समाज आणि भटक्या जातीतल्या गोपाळ समाज यांच्यातले सांस्कृतिक अंतर हे हजारो वर्षांचे होते. हे अंतर नागरी आणि भटक्या संस्कृतीच्या उन्नयानाच्या टप्प्याचं होतं... जातीय अहंकाराचं होतं, आर्थिक होतं, सामाजिक होतं, दोन्ही समाजांनी परस्परांविषयी बाळगलेल्या पूर्वग्रहांचं हे अंतर होतं. म्हणूनच आम्ही या लोकांना अगोदर घरं बांधून दिली आणि त्यांना स्थीर केले. शाळा सुरू केली आणि सोबतच उद्योग केंद्राची स्थापना केली. शाळेत येणाऱ्या मुलांचा अनुभव फारच वाईट होता. पुस्तकातली भाषा आणि त्यांची बोलीभाषा याचा मेळ काहीही केल्या साधला जात नव्हता. परंतू मुलांच्या अंगी उपजत कला असल्यामुळे शिक्षणासोबत त्यांना कला आणि संगीत शिकवण्याचे ठरवले. कसरती करणे, कसरती सादर करताना ढोल वाजवणे आणि नाचगाणे करणे हे या मुलांना वेगळे शिकवावे लागत नव्हते. त्यांचा तो पिढीजात व्यवसाय होता.

या कलेला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी मग मी काही विद्यार्थ्यांना हैदराबाद येथे एका मंगल केंद्रात वाद्ये शिकण्यासाठी पाठवून दिले. वर्षभरातच विनायक, शिवराम आणि दिलीप हे माझे विद्यार्थी सगळ्याप्रकारची वाद्ये वाजवण्यात तरबेज झाली. अनसारवाड्यात परतल्यानंतर मग या तिघांनी इतरांना वाद्यांचे आधुनिक प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. मुलांचा उत्साह बघून आम्ही एकलव्य प्रशिक्षण पुरुष बचत गटाची स्थापना करुन वाद्ये खरेदी केली. लवकरच या समाजाचे पहिले बँड पथक तयार झाले. ढोल, ताशे, ऑर्गन अशा वाद्यांसह वस्तीवरची मुलं फारच तालबद्ध बँड वाजवायचे. सुरुवातीला गावात एकवेळ जेवणाच्या मोबदल्यात आणि मिळेल त्या बिदागीवर बँड वाजवला जायचा.पण व्यसनाचे प्रमाण इतके होते की पैसा मिळाला की लगेच दारूमध्ये तो पैसा उडवला जायचा. मग हातात बिदागी न देता प्रत्येकाचे बँक खाते सुरू करण्यात आले आणि त्यात बचत करण्याची पद्धत सुरू केली. व्यावसायिक दृष्टीकोन किती आवश्यक आहे हे प्रत्येकाला व्यवस्थित समजावून सांगण्यात आले. बघता बघता एका बँड पथकाची तब्बल ११ बँड पथके सुरू झाली. युट्यूबच्या माध्यमातून आधुनिक वाद्ये कशी वाजवायची हेदेखील मुलं शिकली. रक्तातच संगीत असल्याने त्यांच्यासाठी काहीही अवघड नव्हते. आता फक्त अनसारवाडा आणि निलंगाच नव्हे तर सबंध लातूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आमच्या या बँड पथकांची ख्याती पसरली. फिरस्तू असल्याने दहा-बारा भाषेचे उपजत ज्ञान त्यांच्यापाशी होते. मग या भाषेतली गाणी... कसरतीचे खेळ करत असल्यामुळे प्रचंड स्टॅमिना आणि या स्टॅमिनामुळे तासनतास बँड वाजवण्याचे कसब याच्या जोरावर अनेकांची पसंती आमच्या बँड पथकालाच असायची. एकवेळ जेवणाच्या बदल्यात बँड वाजवणारी ही मुलं आता लग्नात बँड वाजवण्यासाठी एक-दोन लाखांच्या सुपाऱ्या घेतात. सरगम, कोयल, कोकीळ, भारलाई अशी या बँन्ड पथकांची नावे आहेत. सर्व बँन्डपथकांची स्वताची वाद्ये आणि भरजरी पोषाख आहेत. इलेक्ट्रॉनिक गिटार आणि ढकलण्याची शोभिवंत वाहनेदेखील आता या बँन्डपथकाच्या ताफ्यात आहेत.

गोपाळ- डोंबारी समाजाच्या १८० मुलांनी आपल्या बँड पथकाच्या माध्यमातून समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. आता तर मुलांमध्ये इतका आत्मविश्वास आलायं की, सबंध महाराष्ट्राला त्यांनी चँलेंज केले आहे... "मंगल बँड पथकाला हरवा आणि दोन लाख जिंका'... अद्याप एकानेही हे चँलेंज स्वीकारलेले नाही. हे बँड पथक या समाजासाठी फक्त पैसे मिळवण्याचे माध्यम नाही तर समाजात माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचे एक माध्यम बनले आहे.

माणूसपण स्वीकारण्याची ही एक प्रक्रिया आहे...

आम्ही किशोर कुमारपासून अजय- अतुलपर्यंत सगळ्यांची गाणी ऐकतो आणि ती बँडमध्ये रचतो. शिवाय ग्रामीण बोली भाषेतली गाणीही आम्ही शिकलोय. आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, जे बऱ्यापैकी लौकप्रिय होतयं... या बँड पथकानेे आमच्यावर असलेल्या चोर, भिकारी, अस्वच्छ, मागास असे शिक्के पुसण्याचे काम केलयं. पूर्वी अस्वच्छतेमुळे लोक जवळ करायचे नाहीत, रिक्षात किंवा बसमध्ये बसू द्यायचे नाहीत. पण आता तो काळ सरलाय... पण मंगल बँड पथकामुळे लग्नाच्या शुभ कार्याचं निमंत्रण घेऊन आमच्या घरी येऊन लोकं आम्हाला सन्मानपूर्वक बोलवायला येतात... हा बदल म्हणजे आमचं माणूसपण स्वीकारण्याची एक प्रक्रिया आहे.आमची पुढची पिढी आता रस्त्यावर डोंबारी खेळ करत जगणार नाही इतकं मात्र नक्की आहे.

विनायक बंडी (बँड पथक प्रमुख)

narsingz1978@gmail.com

लेखकाचा संपर्क - 9881433408

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser