आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:नवा संवादसेतू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत निवडणुकीच्या पंधरा दिवसांनंतरही अध्यक्षांबाबतची अनिश्चितता कायम आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि निर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे वेगवेगळे उद्योग चालू आहेत. निवडणुकीत गैरप्रकार झाले नाहीत असे म्हणणाऱ्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या संचालकांना ट्रम्प यांनी हटवले. बायडेन यांची निवड जाहीर करण्यास प्रतिबंध करा आणि ट्रम्पना विजयी घोषित करा यासाठी ट्रम्प समर्थकांनी नेवाडा कोर्टात धाव घेतली. दुसरीकडे, निर्वाचित अध्यक्ष विविध देशांच्या प्रमुखांशी संवाद साधत आहेत. ट्रम्प यांच्यामुळे जे दुखावले होते अशा जर्मनी व कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांशी त्यांनी प्रथम संवाद साधला. त्यानंतर ते भारत आणि इस्रायलशी बोलले. नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी टेक्सास व अहमदाबादेत दोन प्रचंड प्रचार सभा घेतल्या होत्या, पण विजयी झाले बायडेन. त्या पार्श्वभूमीवर दोघांतील संवाद महत्त्वाचा होता. कोविड महामारीचा सामना, प्रादेशिक असुरक्षितता, धोरणात्मक भागीदारीबाबतची कटिबद्धता, पर्यावरण बदल आणि भारत, अमेरिकेबरोबरच अन्य देशांतील लोकशाहीचे बळकटीकरण या समान आव्हानांचा समावेश दोघांच्या बोलण्यात होता. प्रादेशिक सुरक्षिततेसंदर्भात अमेरिकेची साथ हा मुद्दा चीन, पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी कळीचा आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा याबाबतचा अनुभव चांगला नाही. ३७० व ३५ अ कलमांचा काश्मीरमधील अंमल रद्द करण्याच्या निर्णयावर ते नेहमी आक्षेप घेत आले आहेत. कमला हॅरिसही त्याला अपवाद नाहीत. बायडेन यांना भारताबद्दल वाटत आलेली आस्था हा आशेचा मुद्दा आहे. भारताविरुद्ध लादलेले व्यापारविषयक निर्बंध रद्द करण्याबाबत २००१ मध्ये त्यांनी तत्कालीन अध्यक्षांना पत्र लिहिले होते. शिवाय, २००८ मध्ये त्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील नागरी अणुकराराचे समर्थनही केले होते. अर्थात, दोन्ही देशांची, विशेषत: भारताची त्या वेळची आणि आताची स्थिती यात खूपच फरक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रांतील कामगिरीबाबत भारताने स्वत:ला जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. शिवाय, कोविडनंतर चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूल वातावरण आहे. बायडेन याबाबतीत कोणती भूमिका घेतात यावर भारताच्या दृष्टीने पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

बातम्या आणखी आहेत...