आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पुढची ‘चाल’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ. इथला मुरब्बी खेळाडू आपली शेवटची चाल काय असेल ते ठरवून पहिली चाल खेळतो. प्रतिस्पर्धी कितीही कसलेला असला तरी तो त्याला आपल्या पुढच्या खेळीचा अंदाज येऊ देत नाही. योग्य संधी आली की तो आधी प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला ‘बाजूला’ करतो अन् लगेच राजाला घेरून चेकमेट देतो... ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणाही झाली. आता खडसेंच्या या ‘चाली’नंतर कोण कुणाला आणि कसा चेकमेट देणार याची चर्चा रंगते आहे. खडसेंची भाजपने उपेक्षा केल्याने ते वचपा काढतील याविषयी अनेकांना खात्री आहे. आणि त्यांच्या या ‘क्षमते’वरच राष्ट्रवादीची भिस्त आहे. खडसेंनीही पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना थेट लक्ष्य करून आपला रोख स्पष्ट केला आहे. त्यामुळे त्यांची पुढची प्रत्येक चाल भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. खडसेंच्या भाजप सोडण्यापेक्षाही राष्ट्रवादीतील प्रवेशाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक जुन्या-नव्या हिशेबांचे संदर्भ आहेत. त्या अर्थानेही खडसे राष्ट्रवादीसाठी फायद्याचेच ठरतील. आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांवर भाजपकडून आडूनपाडून होणाऱ्या हल्ल्यांना, त्यामागच्या खेळ्यांना ते पुरून उरतील हे खरेच. पण ‘खडसे आमचे नेते आहेत’ असे जाहीर वक्तव्य करताना खासगीत मात्र ‘...पण ते गेले तर बरेच!’ अशी भूमिका घेणारे भाजपचे नेते खडसेंच्या पवित्र्याबाबत अजिबात गाफील नसतील. त्यातच खडसेही मुरलेले नेते आहेत. ते सत्तेतील आपलं स्थान ‘बळकट’ केल्याशिवाय लगेच कुठली ‘चाल’ करणार नाहीत. पण जसा खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय एकाएकी घेतलेला नाही तसा त्यांना घेण्याचा राष्ट्रवादीचा निर्णयही अचानक झालेला नाही. दोघांच्या गरजा आणि कारणे वेगवेगळी असली तरी ‘टार्गेट’ मात्र एकच आहे आणि ते साध्य करणे हा त्यांचा कमाल समान कार्यक्रम असेल. त्यामुळेच डावातील आपली निर्णायक ‘खेळी’ जाणून असलेल्या ‘त्या’ खेळाडूने खडसेंच्या रूपाने खेळलेली पुढची ही ‘चाल’ जास्त महत्त्वाची आहे. आणि कदाचित ती महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटही बदलेल.

बातम्या आणखी आहेत...