आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापन दिन विशेेष:रंग बदलत्या ट्रेंड्सची मूळं

नीतीन रिंढे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुकरण ही मानवी प्रवृत्ती आहे. ट्रेंड्स स्थिर होण्याच्या मुळाशी ही प्रवृत्ती हे प्रमुख कारण आहे. पण अनुकरण कोण कोणाचं करतो हाही एक लक्षणीय प्रश्न आहे. समाजात जो वर्ग अग्रेसर आहे, पुढारलेला मानला जातो, त्याचं अनुकरण इतर वर्ग करताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण समाज शहरी समाजाचं अनुकरण करतो, शहरी समाज महानगरी समाजाचं अनुकरण करतो, आणि महानगरातला समाज पुढारलेले म्हणून समजल्या जाणाऱ्या अमेरिकी समाजाचं अनुकरण करतो. समाजात खालून वर असा कोणताही ट्रेंड पसरत नाही. वरून खाली असाच पसरतो.

पेहराव-खाद्यपदार्थांपासून वास्तुरचनेपर्यंत आणि राजकारणापासून कलानिर्मितीपर्यंत मानवी जीवन सतत रंग पालटत असतं. वेळोवेळी येणाऱ्या या नव्या वाऱ्यांचं कोणी ‘ट्रेंड’ म्हणून स्वागत करतं, तर कोणी ‘फॅड’ म्हणून उपहास किंवा तिरस्कार करतं. कोणताही ट्रेंड कायमस्वरूपी ट्रेंड म्हणून राहू शकत नाही. फॅड किंवा फॅशन म्हणून त्याचं आगमन होतं; नवलाईने त्याच्याकडे पाहिलं जातं. काही ट्रेंड्स लोकाश्रयाच्या अभावी लोप पावतात, तर काहींचा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रसार होत जातो. असे समाजाने स्वीकारलेले ट्रेंड्स कालांतराने परंपरेच्या मखरात जिरवले जातात. त्यांचं नवेपण, अनोखेपण, ताजेपण, समकालिनत्व वगैरे सर्व विरघळून जातं आणि तो परंपरेचा भाग बनतो. रिवाज, रीत, पद्धत, रूढी म्हणून त्यांचं अस्तित्व उरतं. 

स्वतः परंपरेत विरघळून हे रिवाज बनलेले हे एकेकाळचे ट्रेंड्स नव्या येणाऱ्या ट्रेंड्सना रस्ता करून देत असतात. ट्रेंड ते रिवाज असा हा सिलसिला सुरू राहतो.

कसे निर्माण होतात हे ट्रेंड्स? समाजाच्या मानसिक किंवा दार्शनिक जीवनात निर्माण होणारे प्रश्न, बदलत्या अतिभौतिक किंवा भौतिक गरजा यांच्यामध्ये बहुतेक सर्व ट्रेंड्सचं मूळ असतं. नव्यानं येणारं तंत्रज्ञान नव्या ट्रेंड्सना जन्म देत असतं. युरोपात सलग दोन महायुद्धांमध्ये (आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धामध्ये) बॉम्बहल्ल्यांमुळे प्रचंड विध्वंस झाला. त्यापूर्वीची युद्धं ही प्रामुख्याने युद्धभूमीवर दोन देशांच्या सैन्यामध्येच लढली जात. या महायुद्धांमध्ये मात्र युरोपातल्या नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर अकल्पित मोठ्या प्रमाणावर बांधकामं करावी लागणार होती. युरोपातल्या पारंपरिक गॉथिक शैलीतल्या किंवा आर्केड शैलीतल्या बांधकामांसारखी उभारणी पुन्हा करणं ही प्रचंड मोठी खर्चिक आणि अतिशय मोठा अवधी खाणारी गोष्ट होती. महायुद्धामध्ये बाधित देशांसमोर पुन्हा लवकरात लवकर उभं राहण्याचं आव्हान होतं, पण पैसा नव्हता. यावर उपाय म्हणून सिमेंट आणि विटांच्या सहाय्याने आरसीसी पद्धतीची झटपट उभारता येणारी आणि तुलनेने अल्प संसाधनांची मागणी करणारी बांधकामशैली रूढ झाली. एकप्रकारच्या अभावग्रस्त समाजात ठोकळ्यासारख्या इमारती उभ्या करणारी ही शैली पुढे मात्र विसाव्या शतकाचीच बांधकामशैली बनली. आता आपल्याकडे अगदी खेड्यात देखील हौसेने असे सिमेंटचे ठोकळे उभे केले जातात. म्हणजे सुरुवातीला एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीतली अपरिहार्य गरज म्हणून आलेला हा वास्तुकलेतला ट्रेंड नंतर फॅशन बनला आणि आता देशोदेशींच्या बांधकामांच्या आपापल्या वैविध्यपूर्ण शैलींना नाहिसं करत आरसीसी बांधकाम ही एक प्रस्थापित ‘रीत’ बनली.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवी जीवनात मोठं परिवर्तन घडवून आणलं आहे असं आपण नेहमी म्हणतो. त्याची अनेक उदाहरणं देता येतील. एकोणिसाव्या शतकात युरोपीय चित्रकलेत वास्तववादाचा बोलबाला होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपीय चित्रकार अमूर्ततेच्या आविष्काराकडे वळले. कलेच्या प्रांतातल्या या नव्या ‘ट्रेंड’चा संबंध जितका नव्या, (दोन महायुद्धांदरम्यान) बदललेल्या जीवनदृष्टीशी आहे, तितकाच तो नव्याने उदयाला आलेल्या तंत्रज्ञानाशीही आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅमेऱ्याच्या सहाय्याने छायाचित्रं काढणं शक्य झाल्यानंतर चित्रकलेचा वास्तववादाविषयीचा आग्रह कालबाह्य ठरू लागला. रंगरेषांच्या माध्यमातून चित्रकाराने जिवंत केलेल्या दृश्यांपेक्षा अधिक तंतोतंत दृश्यं कॅमेरा टिपू लागला. कलावंत नेहमी ‘नव्या’च्या शोधात असतो. नवनिर्मिती हे कलेचं वैशिष्ट्य असतं. स्वाभाविकच वस्तुनिष्ठ, वास्तव, मूर्त यांच्या चित्रणाकडून तो अमूर्ताला मूर्त करण्याचा प्रयत्न करू लागला. चित्रकलेत नव्या ट्रेंडचा उदय झाला.

काही वेळा असंही घडतं की एखाद्या सामाजिक वर्गासाठी नवा असलेला ट्रेंड, फॅशन इतरत्र आधीपासून एखादी रीत, पद्धती म्हणून अस्तित्वात असतो. मात्र या नव्या सामाजिक वर्गात प्रवेश केल्यानंतर त्याचा ‘दर्जा’ बदलतो. महाराष्ट्रातल्या वारली आदिवासींच्या घरांच्या भिंतींवरची चित्रं हे याचं आपल्याला परिचित असलेलं उदाहरण. वारली परंपरेने आपल्या घरांच्या भिंती ज्या चित्रांनी रंगवत आले, ती चित्रं आज शहरं-महानगरांमधल्या मध्यमवर्गीय-उच्चवर्गीय घरांच्या भिंतीवर ‘ट्रेंडी’ म्हणून विराजमान झाली आहेत. जी कला वारल्यांसाठी ‘परंपरा’ आहे, ती आधुनिक समाजात एक ‘फॅशन’ म्हणून मान्यता पावली आहे. हे भारतातल्या एकूणच आदिवासी जमातींच्या कलाविष्काराबाबत घडलं आहे. मधुबनी चित्रं, बस्तर, डांग इथल्या आदिवासींच्या कलावस्तू शहरांमधल्या दिवाणखान्यांमध्ये ‘शोभेच्या वस्तू’ ठरल्या आहेत.

ट्रेंड किंवा फॅशन अगदी सुरुवातीला फार कमी लोकांकडून स्वीकारली जाते. कोणत्याही काळात समाजातले बहुसंख्य लोक रूळलेल्या चाकोरीतून वाटचाल करणंच पसंत करतात. त्यात एकप्रकारची सुरक्षितता असते. एकटं पडण्याला किंवा वेगळं उमटून पडण्याला लोक सामान्यतः बिचकतात. ज्यांना स्वतःची वेगळी ओळख ठसवावीशी वाटते, ते ट्रेंडचे वाहक होतात.

बहुतेकदा तरुण पिढीतले लोकच नवा ट्रेंड आणतात. ती एकप्रकारची बंडखोरी असते. ही बंडखोरी पेहरावात असो, कविता लिहिण्यात असो किंवा नव्या विचाराची चळवळ सुरू करण्यात असो. तरुण स्वभावतः बंडोत्सुक असतात. त्यांच्याकडे गमावण्यासारखं संचित नसतं. इथं संचित म्हणजे धनसंपत्ती, घरदार नव्हे. मनुष्य जसजसा आपलं आयुष्य जगत जातो, तसतसं त्याच्याकडे एक विचारांचं, धारणांचं, आयुष्याबद्दलच्या भल्याबुऱ्या कल्पनांचं संचित जमत जातं. त्याच्या जगण्याला आतून हे संचित बळ पुरवत असतं. ते गमवायला तो सहसा तयार नसतो. तरुणांची पाटी तुलनेने कोरी असते. ते आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने घडवायला उत्सुक असतात. कोणती पद्धत ते अद्याप निश्चित झालेलं नसतं. त्या अनिश्चिततेमध्ये एकप्रकारचा बेफिकीरपणा, बेदरकारपणा अनुस्यूत असतो. प्रौढ माणसाची जगण्याची पद्धत, वाट एव्हाना निश्चित झालेली असते. तो तिला सोडायला तयार नसतो. एकेकाळचा बंडखोर तरुण काळ उलटला की बंडाचे झेंडे गुंडाळून मळवाटेवरून जाताना दिसतो ते याच कारणामुळे. 

तरुण कुठले? तर प्रामुख्याने मोठी शहरं, महानगरं इथले. संपर्कमाध्यमं हा ट्रेंडच्या प्रसाराचा प्रमुख मार्ग आहे. शहरं-महानगरांमधली संपर्कमाध्यमं अधिक सशक्त असतात. हे प्राचीन काळापासून आहे. नागर समाज हा अनागर समाजापेक्षा अधिक गतिशील असतो. अगदी प्राचीन काळातसुद्धा दूरदूरच्या शहरांमधलं दळणवळण व्यापार आणि साम्राज्यविस्तारहेतूने केलेली युद्धं यांमुळे चालू राहात असे. प्राचीन भारताततल्या गांधार शिल्पकलेमध्ये ग्रीकशैलीची झांक दिसते. मध्ययुगीन उत्तर-मध्य भारतीय मंदिरांची शिखरं इस्लामी वास्तुशैलीच्या प्रभावातून फुगीर अर्धगोलाकृती झालेली दिसतात. शहरांमधून हे ट्रेंड लहान गावांकडे झिरपत जातात. 

आजच्या काळात प्रसारमाध्यमं ही या ट्रेंड्सच्या प्रसारावर अधिक प्रभाव टाकत आहेत असं म्हणता येईल. प्रसारमाध्यमं ही अर्थातच शहरी असतात. या माध्यमांवर मनोरंजनासाठी दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचं अनुकरण नागर-अर्धनागर समाजात कितीतरी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. उदाहरणार्थ, आज लोकांना प्रत्यक्ष जीवनातल्या लग्नसमारंभांमध्ये करावेसे वाटणारे अनेक ‘इव्हेंट्स’ हे त्या मालिकांमधून, चित्रपटांमधून आले आहेत. बहुजन समाजाचं लोकदैवत खंडोबा शेकडो वर्षांपासून जेजुरीच्या गडावर विद्यमान आहे. पण टीव्हीवर खंडोबाविषयीची मालिका दाखवल्यानंतर तिथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत (जे खरं तर ‘भाविक’ कमी आणि ‘पर्यटक’ अधिक आहेत...) प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी अधिकाधिक भाविक ग्रामीण समाजातले असत. आता शहरी मध्यमवर्गीय लोकांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. हा ट्रेंड एवढ्यावरच थांबत नाही. तिथं आज जाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना फक्त खंडोबाचं दर्शन घ्यायचं नाहीय, तर टीव्ही मालिकेतला खंडोबा बानुबाईला उचलून घेऊन गडावर जातो तसं त्यांना जेजुरगडावर आपल्या पत्नीला उचलून निदान काही पावलं तरी चालायचं आहे. प्रसारमाध्यमं, मनोरंजन-माध्यमं यांच्याद्वारे पसरणारे ट्रेंड्स अतिशय उथळ पण अत्यंत प्रभावी आहेत!

अनुकरण ही मानवी प्रवृत्ती आहे. ट्रेंड्स स्थिर होण्याच्या मुळाशी ही प्रवृत्ती हे प्रमुख कारण आहे. पण अनुकरण कोण कोणाचं करतो हाही एक लक्षणीय प्रश्न आहे. समाजात जो वर्ग अग्रेसर आहे, पुढारलेला मानला जातो, त्याचं अनुकरण इतर वर्ग करताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण समाज शहरी समाजाचं अनुकरण करतो, शहरी समाज महानगरी समाजाचं अनुकरण करतो, आणि महानगरातला समाज पुढारलेले म्हणून समजल्या जाणाऱ्या अमेरिकी समाजाचं अनुकरण करतो. समाजाच्या मध्यम आणि निम्न स्तरांवरचे लोक आपल्या वर असलेल्या लोकांचं अनुकरण करतात. समाजात खालून वर असा कोणताही ट्रेंड पसरत नाही. वरून खाली असाच पसरतो. वर आदिवासी चित्रकलेचं फॅशनमध्ये रुपांतर होण्याचं उदाहरण दिलं आहे. आदिवासींसारख्या परिघाबाहेरच्या समाजाची चित्रकला केंद्रस्थानी असलेल्या मध्यमवर्गाने कशीकाय स्वीकारली? याचं उत्तर अनुकरणाच्या सवयीतच दडलेलं आहे. पण मध्यमवर्गाने आदिवासी समाजाचं अनुकरण केलं नाही. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी एकूणच भारतीय आदिवासींच्या कलाकारीकडे दिल्लीच्या सत्तावर्तुळातल्या काही उच्चभ्रू कलासक्त मंडळींचं लक्ष वेधलं गेलं. इंदिरा गांधी यांची मैत्रिण पुपुल जयकर हे त्यातलं पटकन आठवणारं नाव. या मंडळींनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या संस्थांद्वारे आदिवासींच्या कलाविष्काराला जागतिक प्रदर्शन-मंच उपलब्ध करून दिला गेला. त्यातून भारतीय समाजातल्या दिल्ली, मुंबई अशा महानगरस्थित उच्चभ्रूंच्या अभिरुचीमध्ये आदिवासी चित्रं, शिल्पं यांना स्थान मिळालं. आणि या उच्चभ्रूंकडून नंतरच्या दशकांत या कलेविषयीची आवड मध्यमवर्गीयांमध्ये झिरपली. म्हणजे मध्यमवर्गीयांनी अनुकरण केलं त्यांच्याहून सामाजिकदृष्ट्या निम्नस्तरावर असलेल्या आदिवासी समाजाचं नव्हे, तर वर असलेल्या उच्चवर्गीयांचं.

ट्रेंड बदलतात म्हणजे अभिरुची बदलते. पण अभिरुची ही कल्पना केवळ शुद्ध सौंदर्यवादी आहे असं आता कोणी मानत नाही. समाजात निर्माण होणाऱ्या नव्या अभिरुचीमागे सांस्कृतिक राजकारण असतं. ते बहुतेकदा समाजात अग्रस्थानी असलेल्या वर्गालाच अंकित असतं. त्यामागे छुपे राजकीय, आर्थिक हितसंबंधही दडलेले असतात, असं आजचे समाजशास्त्रज्ञ सिद्ध करत आहेत. आपण ट्रेंड्सचा विचार करतो तेव्हा वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या ट्रेंडच्या पायाशी अदृश्य स्वरूपात असणारी तथ्यांची, दृष्टिकोनांची ही सर्व गुंतवळ ध्यानात घ्यायला हवी. आज इथं बदलणाऱ्या ट्रेंड्सची चर्चा या दृष्टीनेच केली आहे. 

neegrind@gmail.com

बातम्या आणखी आहेत...