आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:“अपेक्षांची उपेक्षा"

नितीन शास्त्री2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटन हा उद्योग पारंपरिक आहे आणि तो सर्वथा खाजगी क्षेत्रात आहे ; याचमुळे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून झेप घेण्याची इच्छा असलेल्या या क्षेत्राला कोणतीही सवलत नको आहे, कोणतीही सबसिडी नको, कोणतीही नुकसान भरपाई नको आहे, कोणतेही अनुदान नको आहे. या क्षेत्राला हवे आहे आपले सहकार्य, हवी आहे आपल्या सरकारची साथ , त्याच्या विविध-विभागांची साथ, ज्या शेकडो – हजारो पर्यटकांची स्वप्ने पूर्ण केली त्याची साथ !!!

हे देवा महाराजा आज आमचो देशावर कोरोना चो मोठा संकट इला असा. त्याच्यासाठी आमच्या देशाचो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमची अर्थमंत्री निर्मला सीतारमन या लोकांनी ठप झालेली अर्थव्यवस्थ्येक चालना देण्यासाठी देशभरातल्या सगळ्या उद्योग धंद्याका लागतले असे वीस लाख कोटी रुपये पॅकेज म्हणान दिले आसत पण पर्यटन उद्योगाक एक नवो पैसो पण मिळाक नाय, काय तरी सवलत उद्योग- धंद्याक देण्याची सद्बुद्धी त्यांना दी हीच तुझ्या चरणीप्रार्थना देवा बा महाराजा !!! होय महाराजा !!!

कोकणातून आलेल्या कोणत्याही कुटुंबात सणवारा निमित्ताने कुलदैवताला घातलेले गाऱ्हाणे आता आठवायचे कारण केंद्र सरकारने बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेस दिलेला ४० लाख रुपयांचा टेकू; त्यानंतर पर्यटन क्षेत्रास भरीव हातभार देण्याच्या घोषणा करणाऱ्या भारत सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी LTC चे नवीन धोरण जाहीर केले आणि तमाम पर्यटन व्यावसायिकांच्या जखमेवर मीठ चोळले. या नवीन धोरणामुळे अनलॉकनंतर पर्यटन क्षेत्राला नवीन उभारी मिळायची कोणतीही संधी राहिली नाही. इतर उद्योगधंद्याच्या बाबतीत सवलतींचा भडीमार करतांना पर्यटन उद्योगाची झोळी रिकामीच राहिली त्यामुळे पर्यटन व्यवसाय कमी अधिक स्वरूपात बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

दीडशे वर्षांची पारतंत्र्याची बंधने तोडून १९४७ मध्ये आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारताची पहिली पंचवार्षिक योजना सन १९५१ मध्ये जाहीर झाली त्यावेळी तिचा आवाका २,३७८ कोटी रुपयांचा होता. यात प्रामुख्याने शेती आणि सिंचन यावर सर्वात जास्त भर दिलेला होता.पर्यटन, हवाई वाहतूक आदींना त्यात काहीही स्थान नव्हते. त्यावेळची आपली स्थिती पहिली तर ते स्वाभाविकच होते, त्यानंतरच्या प्रत्येक पंचवार्षिक योजनांची व्याप्ती वाढत गेली आणि २०१२-२०१७ या काळासाठी १२ वी पंचवार्षिक योजना राबविण्यात आली त्यावेळी खर्चाचा आकडा ४७ लाख कोटी एवढा प्रचंड होता. या काळातच योजना- आयोग गुंडाळून त्याची जागा नीती आयोगाने घेतली त्यामुळे २०१७ नंतर पंचवार्षिक योजना जाहीर करण्यात आल्या नाहीत. २०१८ मध्ये केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक होते ते तब्बल २,४४२,२१३ कोटी रकमेचे - हाच आकडा २०२० मध्ये ३०,४२,२३० कोटी रुपये एवढा वाढला आहे.२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या वाट्याला आले २,१५० कोटी रुपये - हाच आकडा २०२०-२१ च्या काळात झाला २,५०० कोटींचा. सन २००० मध्ये भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या होती जवळपास १६ लाख तो आकडा आता २०१८ मध्ये १ कोटीच्या पुढे गेला आहे. परदेशी प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या विदेशी चलनाचा आकडा आहे US $ 28585 Millions (१९४८८२ कोटी रुपये). असे असतानाही केंद्र सरकार कडून या क्षेत्राकडे कानाडोळा करण्यात आला याचा त्या क्षेत्रातील काहींना जबर धक्का बसला आहे.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो पर्यटन खात्याला कायमच दुय्यम किंवा नगण्य स्थान आतापर्यंत देण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्राची उपेक्षा करण्याची केंद्र सरकारची ही काही पहिलीच वेळ नाही. सन १९९९ हे वर्ष केंद्र सरकारने VISIT INDIA YEAR मोठ्या गाजावाजात जाहीर केले परंतु अर्थसंकल्पात भरीव तरतूद न केल्याने या योजनेसमोर ठेवलेले उद्दिष्ट्य गाठता आले नव्हते. असे प्रकार होणे हे काही आपल्याकडे नवीन नाही. आपल्या नंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी पर्यटन उद्योगाचे महत्व ओळखून आपल्या आर्थिक रचनेत त्याला महत्वाचे स्थान दिले आणि त्यामुळेच पूर्व आशिया, यूरोप येथील कित्येक देशांकडे त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पर्यटक आकर्षिले जातात. सर रिचर्ड अटेन्बरो यांचा सुपरिचित "गांधी" सिनेमा १९८२ मध्ये यूरोप, अमेरिकेत प्रदर्शित झाला – जगभर गाजलेल्या या चित्रपटाचा आपल्या पर्यटन क्षेत्रास नगण्य फायदा झाला तो सरकारी अनास्थेमुळे. आमच्या सरकारला वाटले हा चित्रपट कर मुक्त करणे हेच आपले काम आहे. याच्या उलट "लास्ट एम्परर "हा चित्रपट १९८७ साली बॉक्स ऑफिसवर आल्यानंतर कम्युनिस्ट चीनने त्याचा पूर्णपणे वापर केला. त्याचा फायदा एवढा होता की १९८८-८९ या कालावधीत चीनला येणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या १० लाखांनी वाढली आणि यात यूरोप, अमेरिका येथून येणारे पर्यटकांची टक्केवारी ७० % होती, त्यानंतर चीनकडे जाणारा पर्यटक संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. प्रत्येक सरकारी विभाग, वित्तीय संस्था आणि बँक, खाजगी दूरसंचार कंपन्या, विविध प्रसार माध्यमे यांचेकडून असाच उपेक्षेचा अनुभव येत असतांनाही पर्यटन क्षेत्र प्रत्येक वर्षी नवी उमेद घेत काम करीत आहे हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

२०२९ मध्ये ४५० million US $ कमवायचे लक्ष्य ठेवलेला हा व्यवसाय कोरोनाने ज्या आपत्ती निर्माण केल्या त्याचा मुकाबला करत नजीकच्या काळात नव्याने सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंत तज्ञानी जे अंदाज व्यक्त केलेले आहेत त्यावरून तरी असे दिसते की या वर्षात परदेशी प्रवासी कमी येतील याचे कारण आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल निर्माण झालेली भीती, नवीन येणारे व्हिसाचे नियम, विमानप्रवास, तारांकित निवास व्यवस्था आणि आरोग्य विमा महाग होण्याची शक्यता इत्यादी असे असले तरीही मोठ्या संख्येने परदेशी प्रवाशांना भारताकडे आकृष्ट करणे अशक्यप्राय नाही याचे मुख्य कारण या उद्योगक्षेत्रात असलेली प्रचंड कार्यक्षमता !!!

हा उद्योग पारंपरिक आहे आणि तो सर्वथा खाजगी क्षेत्रात आहे ; याचमुळे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून झेप घेण्याची इच्छा असलेल्या या क्षेत्राला कोणतीही सवलत नको आहे, कोणतीही सबसिडी नको, कोणतीही नुकसान भरपाई नको आहे, कोणतेही अनुदान नको आहे. या क्षेत्राला हवे आहे आपले सहकार्य, हवी आहे आपल्या सरकारची साथ , त्याच्या विविध-विभागांची साथ, ज्या शेकडो – हजारो पर्यटकांची स्वप्ने पूर्ण केली त्याची साथ !!! कारण या आपत्तीत पर्यटन व्यवसायातला प्रत्येक घटक या घडीला आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे. या व्यवसायातल्या प्रत्येकाने त्याच्या स्वतःची, वाडवडिलांची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेऊन व्यवसायासाठी आर्थिकशक्ती उभी केली आहे. या व्यवसायातल्या प्रत्येकाला थोडासा वेळ हवा आहे – जो पर्यंत तो परत आपल्या प्रवाशाबरोबर जोडला जाऊ शकेल; हेच माझे पर्यटक मला मार्ग दाखविणार आहेत आणि सांगत आहेत, नजीकच्या काळात लांबचे प्रवास होणार नाहीत – न होऊ देत; आम्ही आमच्या कोकणात जाऊ, आम्ही आमच्या अनेक संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या मराठवाड्यात जाऊ, आम्ही बा.भ. बोरकरांच्या, जितेंद्र अभिषेकी, दीनानाथ मंगेशकरांच्या गोव्याला जाऊ, आम्ही तानाजीच्या सिंहगडावर जाऊ, आम्ही शिवबा ज्या लाल महालात वाढला त्या लाल महालात जाऊ, आम्ही ज्या रामरायाच्या आणि सीतामाईच्या पावलांनी महाराष्ट्रात संस्कृती आली त्या नाशिकला जाऊ. आज दोन / तीन महिन्यात आलेल्या या संकटाने गर्तेत सापडलेल्या या व्यवसायाला उपेक्षून चालणार नाही. प्रत्येक वेळी जेंव्हा जगाला वाटतं की, आता भारत संपला, त्या प्रत्येक वेळी आपण संकटाचं संधीत रूपांतर करून सशक्त होऊन उभे राहतो हा आपला इतिहास आहे. म्हणूनच पर्यटनक्षेत्र आज आपल्या सर्वांकडून जी अपेक्षा करत आहे ती प्रसिद्ध कवी दता हलसगीकर यांच्या शब्दांत व्यक्त करतो :

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फूलं द्यावीत

ज्यांचे सूरजुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत

ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यानी ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करुन भरुन घ्यावे

nitinshastri@gmail.com

बातम्या आणखी आहेत...