आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:शोकान्त महाकाव्याचे व्यापक, सनातन व्यथेने जोडलेले सर्ग ..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीन वैद्य

माती, नाती आणि भवताल हे संदीप जगदाळे यांच्या कवितेचं भावविश्व आहे. मातीत जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातील वेदनादायी, दुःखदायक प्रवास म्हणजे ही कविता आहे. अनुभवातून जाताना आणि जगण्याला भट्टीत टाकून वितळवताना जी आंतरिक घालमेल, क्रियाप्रतिक्रियांच्या जंगलातून होणारं मन्वंतर म्हणजे ही कविता आहे. या मन्वंतराच्या प्रवासातील श्वासनि:श्वासांची आंदोलनं शब्दात पकडण्याचा प्रयत्न हा कवी करतो.  नुकताच संदीप जगदाळे यांच्या "असो आता चाड' या संग्रहाला मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या निमित्त...

"असो आता चाड' या संदीप शिवाजीराव जगदाळेंच्या पहिल्याच कवितासंग्रहात तीन विभागातल्या फक्त २५ कविता आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या सनातन झगड्याची, कृषीसंस्कृतीतल्या स्थित्यंतरांची, बदलत्या परिस्थितीतल्या पराकोटीच्या आगतिकतेची ही कविता आहे. लढण्याचे बळ ज्या जीवनानुभवाच्या, सामाजिक शाहणीवेच्या, निसर्गाच्या भरवशावर मिळवायचे तोच डळमळीत झाला की जगण्यावरचा, कमावलेल्या धारणांवरचा विश्वास ढासळू लागतो, त्या अगतिक काळातले हे आक्रंदन आहे. ते आत कुठंतरी निसर्ग नक्की पोचावे, सद्भावनेची करपलेली मुळं पुन्हा कुठं कोंब धरू लागतील या आशेनं ही शब्दांची आरास मांडलेली आहे.

"एक गाव मरताना पाहिलंय' या पहिल्या विभागातल्या १३ कवितांतून सक्तीच्या विस्थापनाचा, जगण्यातून समूळ उखडण्याचा दाहक अनुभव येतो. "आपल्या घरादारावर जीव आहे नदीचा' या विश्वासाला डोळ्यांदेखत तडा जातो, धरण होताना काळीपांढरीची कसलीच वहिवाट न पाळता सगळ्याच सुपीक खाणाखुणा ती गिळून टाकते. धरणाला धरण म्हणत नाही कवी, "नदीच्या देहावरची जखम' म्हणतो. (कोणत्या तहानेनं व्याकूळ झालीस) 

कशासाठी अडून बसलाय तुम्ही? माती काय छातीवर बांधून नेणार आहात काय? ऐकल्या नाहीत का जनसुनावण्या? वाचले नाहीत का सतराशे साठ पानांचे न्यायालयांचे निवाडे? असा सवाल व्यवस्था करते तेव्हा (कशासाठी अडून बसलायत तुम्ही)... राखून ठेवलंय का ओंजळभर पाणी माझ्या गिळलेल्या रानासाठी? कीव आलीये का कधी मुळांशिवाय अधांतरी जगणाऱ्या माणसांची? अशा निरुत्तर करणाऱ्या सवालांसह कवी यातनांची गाठोडी उकलत राहतो. (असं कुठवरं बडबडत राहू)... ही परकी माती तळपायांना बिलगत नाही. आपलं गाव पोटात घेतलेल्या पाण्यानं परक्याचं रान फुलतं, आपला घसा कोरडाच राहतो या वांझ संतापाचं काय करायचं? मग ओपन क्लोजच्या गारूडानेच दिवस उगवतो, घोटाघोटानं बुडवून रात्री रोज नव्यानं मरत राहतो. (सोडली गावशीव कायमची)... विस्कटलेली पण डोळ्यात रूतून राहिलेली चित्रं येतात. त्यात सुलेमानभाई असतो. (धरणाचा तळ गाठताना) हातभर जमीन नसलेला, पीठाची चक्की चालवणारा, तरी 'धोंडी धोंडी पाणी दे , रानावनात चांदणं तुंबु दे..' म्हणणारा, गावगाड्याचं पोट भरलं तर आपलंही भरंल ही शाहणीव उपजत असलेला सुलेमानभाई, त्याला बापजाद्यांसाठी ईदची फातिहा पढायची असेल तर धरणाचा तळ गाठावा लागेल कारण त्यांच्या कबरी आता तिथं आहेत.

गाव आठवणींसकट पोटात घेणाऱ्या अफाट जलसागरात संगीताच्या तालावर नाचणारी दिव्यांची झगमगाटी आरास पाहताना डोळ्यांना धारा लागतात. हे असं सगळं होण्यातली अपरिहार्यता जास्त जीवघेणी. नंतरच्या जगण्याला कवी "अस्तित्वहीन बिनबुडाच्या गाडग्यासारखे घरंगळत राहणे' म्हणतो. पाय झडून जावेत असं वाटण्याचे, श्वासांची लय तुटण्याचे अस्तित्वभयाने झाकोळलेले दिवस... 

"असं कुठवर बडबडत राहू' ही कविता जाब विचारत नाही, तेवढी ताकद आपण ठेवलेलीच नाही, हे मूक आक्रंदन आहे. मुळांशिवाय अधांतरी, अर्थहीन दिवस ढकलणाऱ्यांची कीव येते का तुम्हाला, असा घशात आवंढा आणणारा सवाल ती करते. माझे शब्द बदलून द्या, दुःखाचं हे गाठोडं कुठवर वागवू  असा आर्त टाहो. काही थोड्या आगतिकांचे दुःख, आतड्यातून तुटत जाणं सहज काना-डोळ्याआड करणाऱ्यांची क्षणचित्रं उभी करते, मुळात जिवंत असेल तर हलेल आत, या अपेक्षेनं. धनुष्कोडी पर्यटन उत्सवात पाण्यात बुडालेला रेल्वेरूळ, पडकं चर्च, मैलोनमैल पसरलेल्या वाळुत पुरली गेलेली मरणं.. शंखशिपल्यांच्या वस्तु घेतानाही कवीला वाटते, प्रचंड लाटेत गुदमरुन गेलेल्या जीवांची हाडं तर नसतील ही? या संवेदनेचं काय करावं? फार थोड्यांजवळ ती असावी, त्यांनाही पुसता येऊ नयेत तिचे ठसे मनावरून, कहर उन्हातही करपत नाही तिची ओल.. आणि उर्वरितांकडे असावा तिचा मरणदुष्काळ, यातला तिढा कसा सोडवावा?

"प्रार्थनेची ओळ' या दुसऱ्या विभागात ४ कविता आहेत. हा कवी शिक्षक आहे. शिकवणं तळमळीचं पण त्यातलं आणि मुलांच्या प्रत्यक्ष जगण्यातलं अंतर दिसतं त्याला त्यांच्या डोळ्यात. आपलं असणं कुठंच उमटत नाही या शाब्दिक पसाऱ्यात हा सल वाचता येतो तिथे. गावातून गायब मुलं थापतायत विटा, बांधताहेत उसांच्या मोळ्या, तर याच्यात्याच्या चुलीतल्या गोवऱ्या होताहेत मुली. पुस्तकांच्या वासानं नजरेत उमललेलं कापसाचं फुल पाहायचंय या डोळ्यांत पण प्रार्थनेच्या शब्दांशिवाय देण्यासारखं काहीच उरलेलं नाही. किमान हे शब्द तरी निरर्थ होऊ नयेत यासाठी काय करावं? प्रार्थनेतली निरर्थ अगतिकता साकाळून येते त्यात.

"जहाल पान लागलं' या तिसऱ्या विभागात ८ कविता आहेत. पोटापाण्यासाठी भाऊबंदकीसारख्या कटु आठवणींसह गावपांढरी सोडली, तशी अंतरातली जिव्हाळ ओल कोरडी होत गेली नंतरच्या अस्तित्वझगड्यात. परकेपणाची धूळ साचत गेली त्यावर. गावात कधी गेलोच तर कष्टणारे जीव बांधाच्या कडेला भाकरी खात बसलेले पाहून वांझ समाधान करून घेतले तरी गावानं पाडलेली वहिवाट राखता आली नाही आपल्याला, हा सल टोचत राहतो.

ही कविता केवळ ग्रामसंस्कृतीचे पोकळ गोडवे गात नाही . 

या बोटावरचा थुका त्या बोटावर करताना

शेजारच्या मळ्यातलं उभं पीक अपरात्री फुकून देताना

कासराभर तुकड्यासाठी बांधावर मुडद्यांचे ढीग रचताना 

नुसत्या झाडांच्या सळसळीनेही एकटीदुकटी बाई धांदरताना

आपण कानात शिसे ओतून घेतले आहे. (वसवा पसरलाय गावभर) 

तर निवडणूकीच्या वाटमारीत गुरफटून गेलो 

 सहकारी पतपेढ्यांत गहाण पडलो

हरितक्रांतीत बुचकळलो , सेंद्रीय जगण्याला जहाल पान लागलं..

(आपण थाळा वाजवून साप घरात घेतले)

असा आरसाही ती दाखवते .

ही कविता त्यामुळे फक्त सर्वांगांनी नाडल्या गेलेल्या शेतकऱ्याची , धरणाच्या पाणपसाऱ्यात सर्वस्व गमावलेल्या विस्थापितांची राहात नाही, तर संपत गेलेल्या सहअनुभूतीची होत जाते. कसलीच चाड नसलेल्या मुर्दाड मनांना सवाल करत जाते. शोकान्त महाकाव्याचे सनातन व्यथेने जोडलेले सर्ग वाटावेत अशा या कविता. दर्शनसुलभ तरी चक्रव्युहात खेचणारी, वाचणाऱ्याचा जीव गुदमरून टाकणारी कविता असं तिचं वर्णन ब्लर्बमध्ये राजन गवस करतात ते सार्थ, नेमकं आहेच पण ते तिला काटेफडाच्या बोंडाची विलक्षण उपमा देतात. बाहेरून तीक्ष्ण काट्यांनी भरलेलं पण आतून अप्रतिम गोड आयुर्वेदिक सत्त्व पोसणारं काटेफडाचं बोंड. जगदाळेंच्या या कवितेत पहिलेपणाचा मागमूसही नाही, जीवनानुभव तीत थेट उतरला आहे. कसल्याही चकचकीत मुलाम्याशिवाय या कविता साध्या शब्दांत सनातन अस्तित्त्वाच्या गाभ्याला भिडतात , हे अस्तित्त्व आज आपली जमीन गमावलेल्या हतबल माणसांचं असलं तरी उद्या तुम्हा आम्हा संवेदना किमान जिवंत असणाऱ्या सगळ्यांचंच असणार आहे या भीषण भविष्याला सामोरं करतात.

असो आता चाड ( कवितासंग्रह )

संदीप शिवाजीराव जगदाळे

लोकवाङमय प्रकाशनगृह 

पृष्ठे ९२ , मूल्य १५०/-

vaidyaneeteen@gmail.com

(लेखकाचा संपर्क - ९४०५२६९७१८)

बातम्या आणखी आहेत...