आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन विशेष:ट्रेंड्ज कवितेमधील, रिअली?

नितिन भरत वाघएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट या सर्वव्यापी संस्थेने बरावाईट प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यावर टाकलेला आहे. तसा तो कविता या माध्यमावरही झालेला आहे. मात्र इंटरनेटने निर्माण केलेल्या सामूहिक वर्तनाचा आणि मानसिकतेचा कल म्हणजे ट्रेंड, त्याचे कवितेत चलन जगभरात फारसे झालेले दिसत नाही. कवितेचे प्रवाह असू शकतात मात्र कवितेचे ट्रेंड असू शकत नाही. कविता ही खोलवर वैयक्तिक कला व गरज असते, ट्रेंडच्या गतीत, चलनात कवितेची निर्मिती होऊ शकते का? आणि समजा झालीच तर कवितेचे मूल्य कसे ठरविले जाईल.

असं म्हणतात मार्क झुकरबर्गला त्याच्या कॉलेजमधून काढून टाकलं होतं, म्हणजे त्याचीच स्वत:ची तशी इच्छा होती. जर आपल्याला बाहेर राहून जग बदलण्याची संधी आहे तर, शिकून वेळ वाया घालवायची काय गरज आहे, असा त्याचा विचार होता. तेव्हा त्याने फेसबुक या दुधारी शस्त्राचा पूर्ण विकास केलेला नव्हता, तरी झुकरबर्गला आपण काय करणार आहोत याची चांगल्याप्रकारे कल्पना होती. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर समाजमाध्यमं सशक्तपणे उभी राहिली आणि लोकांना आपलं म्हणणं मांडायची जागा या माध्यमांनी दिली. कविता, स्फुट, ललित, चुटकुले, मिम्स, एक दोन ओळीची तरी लक्षवेधी विधानं अशा सर्जन प्रकारांतून सर्व लोकांना फेसबुकने अभिव्यक्तीसाठी जागा उपलब्ध करून दिली. चर्चा, वादविवाद यांसकट अभ्यासगट फेसबुकवर कार्यरत झाले. फेसबुकसह ट्वीटर आणि इन्स्टाग्राम ही दोन ताकदीची समाजमाध्यमं लोकप्रिय झाली. या समाजमाध्यमांचं आणि त्यांच्या वापराचं स्वरूप स्पष्ट होत गेलं तसे काही शब्द नव्याने उदयाला आले, काहींचे अर्थ बदलले तर काही शब्दांना नव्याने अर्थ प्राप्त झाले. त्यांपैकी व्हायरल, हॅशटॅग, ट्रेंड्ज हे अगदी रोज वापरले जाणारे शब्द बनले. हॅशटॅगचा वापर त्या दिवसापुरता किंवा अगदी तासांपुरता एखादी विशिष्ट घटना, विचार, व्यक्ती चलनात असते तेव्हा किंवा चलनात ठेवायची असते तेव्हा केला जातो. या हॅशटॅगमधून तसेच ट्रेंडमधून समाजातील बहुसंख्य लोकांच्या विचाराचा तत्कालीन कल लक्षात येतो. हॅशटॅगचा ट्रेंड एखाद्या चळवळीसारखा चालवला जातो, मात्र या ट्रेंडचे माध्यमातील आयुष्य अत्यल्प अवधीसाठी असते. समाजमाध्यमावरील लोकांचं सामूहिक वर्तन, त्यात घडणारा बदल, विकास, परिस्थिती म्हणजे ट्रेंड असं म्हणता येईल. समाजमाध्यमात ट्रेंड ही कल्पना अनुषंगिक आणि तत्कालिक असते, त्याचे स्वरूप समजण्यासाठी हे विवेचन. ट्रेंडचा अर्थ अर्थशास्त्र, राजकारण, फॅशन, लाइफस्टाइल या विषयानुसार बदलत जातो. 

इंटरनेट या सर्वव्यापी संस्थेने बरावाईट प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यावर टाकलेला आहे. तसा तो कविता या माध्यमावरही झालेला आहे. मात्र इंटरनेटने निर्माण केलेल्या सामूहिक वर्तनाचा आणि मानसिकतेचा कल म्हणजे ट्रेंड, त्याचे कवितेत चलन जगभरात फारसे झालेले दिसत नाही. कवितेचे प्रवाह असू शकतात मात्र कवितेचे ट्रेंड असू शकत नाही. कविता ही खोलवर वैयक्तिक कला व गरज असते, ट्रेंडच्या गतीत, चलनात कवितेची निर्मिती होऊ शकते का? आणि समजा झालीच तर कवितेचे मूल्य कसे ठरविले जाईल. जर ट्रेंडी कविता लिहिल्या गेल्या तर त्या कवितांचं काय होतं त्याचं उदाहरण म्हणून ‘दरम्यानच्या पिढी’च्या कवितांकडे बघता येईल. साधारण दोन हजार सालानंतर अनेक ब्रँडसच्या याद्या, कम्प्युटर वगैरे संदर्भातले शब्द वापरून कविता लिहिण्याची फॅशन अर्थात सुपर फ्लॉप ट्रेंड आला होता. या ट्रेंडला जागतिकीकरणाचा प्रभाव वगैरे तेव्हा म्हटले गेले. हा ट्रेंड आला तसा गेला आणि कवीही गेले, या ट्रेंडपायी अनेक कवी गहाळ झाले तर अनेक हास्यास्पद झाले. तसाच प्रकार चारोळी या क्षुद्र प्रकाराबाबत झाला. चारोळीला नीट व्यवस्थित वापरून तत्त्वज्ञानाची जोड देऊन जपानी हायकू काव्यप्रकारासारखे प्रस्थापित करता आले असते, मात्र तसे झाले नाही कारण तो ट्रेंड होता, प्रवाह नाही. थोडक्यात कवितेत व्होगसारखे किंवा फॅशनसारखे चलन निर्माण होऊ शकत नाही. कारण जर समजा प्राथमिक पातळीवर एखादा ट्रेंड निर्माण झालाच तर त्याचा पुढे सशक्त प्रवाह निर्माण व्हायला हवा. बीट जनरेशनने सुरुवात केलेल्या कवितांच्या ट्रेंडचा असा सशक्त प्रवाह निर्माण झाला. ज्याने कवितेचे स्वरूपच बदलून टाकले. किंवा बिबॉप या जॅझ कविता प्रकाराने ब्लॅक आवाजातील वैयक्तिक स्वातंत्र्याला आणि व्यक्तीवादाला एक ठोस अस्तित्व आणि आवाज प्राप्त करून दिला. Dream within a dream / our dream deferred असं म्हणणारा लँग्टन ह्युजेस सारखा बलदंड कवी या प्रवाहाने दिला. तसेच १९८०च्या दशकात लोकांपासून तुटलेली कविता लोकांपर्यंत पुन्हा नेण्यासाठी ‘स्लॅम पोएट्री’ नावाचा कवितेचा प्रकार उदयास आला होता. यात सादरीकरण, कविता लेखन, स्पर्धा आणि प्रेक्षकांचा थेट सहभाग अशा बाबी अंतर्भूत होत्या. केवळ ट्रेंडसारखी सुरू झालेली स्लॅम पोएट्री आज अनेक देशांत एका मजबूत प्रवाह आणि कलात्मक चळवळ झालेली आहे.

समाजमाध्यमांच्या उपलब्धतेनंतर जगभरात सर्वच भाषेत मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जायला लागली. युनिकोडमुळे बहुतेक महत्त्वाच्या लिप्या सहजगत्या मोबाईल आणि संगणकावर वापरता येणे शक्य झाले. सहजपणे उपलब्ध असलेल्या आणि लोकांपर्यंत जाता येणाऱ्या प्लॅटफॉर्ममुळे प्रतिक्रियावादी कवितांचा एक ट्रेंड चलनात आहे. जगात काहीही घडलं तरी त्यावर तात्काळ प्रतिक्रिया म्हणून कवितांचा पाऊस पडण्याचा हा ट्रेंड आहे आणि तो जगभर आहे. समाजमाध्यमांचा हा भडीमार जरी असला तरी पारंपरिक कविता सामान्य लोकांपासून बऱ्यापैकी दूर गेलेली आहे. त्याला कवी आणि कविता कारणीभूत असली तरी समाजमाध्यमांमुळे एकविसाव्या शतकातील सामान्य लोकांच्या वाचनाच्या सवयी मूलभूत बदलल्या आहेत. लोकं आज दीर्घ, लांब पल्ल्याचं वाचत नाही. अल्पाक्षरी आणि लवकर वाचून संपणाऱ्या कविता आदी लेखन लोकांना सोयीचं वाटतं. हे निरीक्षण सामान्य वाचकांबद्दलचं आहे. सरसकट जगभरातल्या वाचनसंस्कृतीबद्दल नाही. या वाचनसंस्कृतीला पूरक असे कवितेचे निर्मितीबंध अलीकडे पहावयास मिळतात. त्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्मितीबंध म्हणजे ‘इन्स्टा पोएट्री’ म्हणजे इन्स्टाग्राम या माध्यमावर प्रकाशित केली जाणारी कविता. मुख्यत: इमेजेस, फोटोग्राफ प्रसिद्ध करणारे माध्यम म्हणून इन्स्टाग्राम लोकप्रिय आहे. केवळ इमेज स्वरूपात या माध्यमावर पोस्ट करता येते. या मर्यादेमुळे कदाचित इन्स्टा पोएट्रीची निर्मिती झाली असावी. या कविता अगदी अल्पाक्षरी दोन ते आठ ओळींच्या असतात. असे असले तरी आजच्या तरुण वाचकांच्या प्रकृतीशी मिळत्याजुळत्या असल्याने त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या पट्कन वाचून होतात, कधीही आणि कुठेही वाचता येतात, शिवाय शेअर करायला त्या सोप्या असतात. सध्यातरी हा कविताप्रकार एका ट्रेंडसारखाच आहे मात्र त्यात एक सशक्त कविताप्रवाह बनण्याची क्षमता आहे. रुपी कौर या स्त्री-कवीचा ‘मिल्क अँड हनी’ हा इन्स्टा पोएट्रीचा २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला संग्रह चाळीस भाषांमध्ये अनुवादित झाला आहे आणि त्याच्या पस्तीस लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. तिच्या या कविता संग्रहाने ‘द ओडिसी’ या होमरच्या कविता संग्रहाला विक्रीत मागे टाकून प्रथम स्थान पटकावले होते. यावरून या ट्रेंडची ताकद आणि लोकप्रियता लक्षात येते. या कवितांमध्ये कवितांच्या दृश्यरूपाचा परिणाम मोठा असतो. 

अशाच प्रकारच्या काही दृश्य प्रतिमांच्या आधारे अभिव्यक्त होणारे काही कवी, प्रतिमाकार मराठीतही दिसून येतात, त्यात अनिल साबळे या कवीचं नाव घेता येईल. तो ज्या आदिवासी जगण्याचं प्रभावी चित्रण आपल्या फोटोग्राफीद्वारा करतो आणि त्याला कॅप्शन देतो ते इन्स्टा कवितेपेक्षा कमी नसते. तसेच इंद्रजीत खंबे हा प्रतिमाकार जे चित्रण आपल्या फोटोग्राफीत करतो, ते या ट्रेंडच्या जवळच जाणारे आहे. फोटोपोएट्रीचा असा एक अदृश्य ट्रेंड नक्की अस्तित्वात आहे, फक्त आपल्या वैशिष्ट्यांसह तो अजून स्पष्ट केला गेलेला नाही. सत्तरच्या दशकात र. कृ. जोशी यांनी कॅलीग्राफी पोएट्रीसारखा अप्रतिम आकृतिबंध मराठीत निर्माण केला होता, मात्र तो त्यांतील अमूर्ततेमुळे पचनी पडला नाही आणि लुप्त झाला. यात कवितेची दृश्यात्मकता आणि मांडणी एक महत्त्वाचा भाग होता. 

‘अल्ट’ म्हणजे अल्टरनेटिव्ह लिटरेचर हा एक फक्त इंटरनेटच देऊ शकत होतं असा कवितेचा वा लेखनाचा प्रकार होय. यात इंटरनेटवरून कुठूनही लेखाचा तुकडा उचलायचा आणि त्याची मोडतोड करून त्याची मांडणी कवितेच्या स्वरूपात करायची. हा प्रकार विचित्र वाटत असला तरी अस्तित्वात आहे. सारिका उबाळे-परळकर यांचे अलीकडे वाचनात आलेले काही लेख असेक पोएटिक होते, त्यांची मांडणी बदलली तर ते अल्टरनेटिव्ह प्रकारातल्या दीर्घ कविता होतील. काही वर्षांपूर्वी कविता परिच्छेद स्वरूपात लिहायचा ट्रेंड आला होता. हिंदीत, मराठीत काही महिने हा ट्रेंड बऱ्यापैकी चालला. 

संपर्कांच्या सुविधेमुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचून वेगाने व्हायरल होतात, तसेच हे ट्रेंडसुद्धा चलनात येऊन नाहीसे होतात. वर म्हटल्याप्रमाणे कवितेचा ट्रेंड असू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या सधन नसलेल्या, अभावग्रस्त देशांमध्ये तसेच समूहात तर कविता ट्रेंड असूच शकत नाही. कारण कवितेचे चोचले सगळ्यांनाच परवडत नाही. सिरीया, इराण, इराक, फिलीस्तीन, अफगाणिस्थान, आफ्रिकेतले देश, भारतातले बहुसंख्य, बांगलादेशी या भू भागातल्या, तिसऱ्या जगातल्या लोकांचे जिवंत राहणे हीच एक कविता असते आणि ती त्यांना नेहमी ट्रेंडमध्ये ठेवावी लागते. 

waghnakhe@gmail.com

संपर्क - 8999107099

बातम्या आणखी आहेत...