आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:‘बोस इन नाझी जर्मनी’ : पडद्याआडचे बोस

नितिन भरत वाघ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचं परराष्ट्रीय धोरण काय होतं यावर संशोधन करणाऱ्या   रोमेन हायेस यांच्या ‘बोस इन नाझी जर्मनी’ या पुस्तकात हायेस यांनी सुभाषचंद्र बोस यांचे हिटलर आणि जर्मनीसोबत नेमके कसे संबंध होते याचा सखोल आढावा घेतला आहे. हा एक असा विषय आहे जो भारतीय इतिहासकारात चर्चिला जात नाही.

सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतासाठी एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. जवळपास १९३४ सालापासून सुभाषचंद्र बोस हिटलरला भारतावर आक्रमण करण्याबाबत पटवून देत होते. शेवटी १७ फेब्रुवारी १९४१ रोजी हिटलरने आपल्या ऑपरेशन स्टाफच्या हायकमांडला अफगाणिस्तानमार्गे भारतावर आक्रमणासाठी तयारी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आणि आक्रमणाच्या तयारीसाठी सुभाषचंद्र बोस २ एप्रिलला बर्लिनला पोहोचले होते. ७ एप्रिलला हाय कमांडच्या जनरल हाल्डरने भारतावर आक्रमण करण्यसाठी किती तुकड्या पुरेशा होतील याचा आराखडा तयार केला होता. ९ एप्रिलला बोस यांनी एक्सिस पॉवरसोबत (जर्मनी, इटली, जपान, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया या देशांची युती) सहयोगाची योजना सादर केली. मात्र पुढे कुठे तरी माशी शिंकली आणि आक्रमण लांबले. नंतर पुढे दोन-तीन वर्ष नाझी जर्मनीने आणि एक्सिस पॉवरने भारतावर आक्रमण करावं यासाठी सुभाषचंद्र बोस सतत पाठपुरावा करत राहिले. मात्र ती योजना काही सफल झाली नाही. शेवटी भारतावर हिटलरने आक्रमण करण्याआधीच आत्महत्या करून घेतली. त्यासोबत सुभाषचंद्र बोस यांचं भारतावर आक्रमण करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं, शिवाय काही वर्षातच भारताला स्वातंत्र्यसुद्धा मिळून गेलं. मात्र एक गोष्ट निश्चित की, या सगळ्या आडवाटेच्या प्रयत्नांमुळे सुभाषचंद्र बोस आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासात एक कायमस्वरूपी गूढ बनून गेले आहेत. 

दोन तीन वर्षांपूर्वी रोमेन हायेस (Romain Hayes) या इतिहासकाराने लिहिलेलं ‘बोस इन नाझी जर्मनी’ हे पुस्तक हाती आलं. रोमेन हायेस यांचं स्पेशलायझेशन दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचं परराष्ट्रीय धोरण काय होतं या विषयात आहे. या पुस्तकात हायेस यांनी सुभाषचंद्र बोस यांचे हिटलर आणि जर्मनीसोबत नेमके कसे संबंध होते याचा सखोल आढावा घेतला आहे.  हा एक असा विषय आहे जो भारतीय इतिहासकारात चर्चिला जात नाही. या पुस्तकात सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते तसेच ते किती महत्त्वाकांक्षी होते याचाही प्रत्यय येतो. महात्मा गांधींसोबत असणारे त्यांचे संबंध हा कायम विवादात असणारा मुद्दा इथे काही अंशी वेगळ्या संदर्भात प्रकाश पाडतो, म्हणजे सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे अधिकारी असताना देखील त्यांनी स्वतंत्रपणे नाझी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणे, हे गांधींपासून लपून राहिले नसणार, आणि गांधींना खचीतच आवडले नसणार. तसेच बोस यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैचारिकते आड येत असणार. अर्थात असे असूनही गांधी आणि बोस यांच्यात एकमेकांप्रती आदर होता. गांधी त्यांना घरातले रस्ता चुकलेलं पोर म्हणत. राजकीय आणि सामजिक विचारांच्या बाबतीत गांधी बोसना म्हणाले होते, जेव्हा आपण पूर्णत: एकमेकांच्या विचारांचे होऊन जाऊ तेव्हा एकत्र येऊन काम करू, तोवर आपण वेगळ्याच वाटेने प्रवास करू. तत्कालीन भारतीय नेत्यांसाठी सुद्धा बोस यांचे टोकाचे फॅसिस्ट विचार हा एक अत्यंत वादग्रस्त विषय होता, त्याचाही विचार सदर पुस्तकात आहे. 

भारतीय जनमानसाला बऱ्यापैकी अज्ञात असलेले बोस या पुस्तकात उजागर होतात. ‘भारतातील प्राचीन सामाजिक रीतीरिवाज आणि परंपरा योग्यप्रकारे राबवण्यासाठी हुकुमशाहीच हवी’ असे बोस यांना वाटत होते. थोडक्यात मनुस्मृती आधारित व्यवस्था बोसांना अपेक्षित असणार. भारतीय समाज लक्षात घेता, फॅसिझम आणि कम्युनिझम भारतातच प्रथम अवतरेल अशी त्यांची ठाम धारणा होती. बोस यांना एकपक्षीय आक्रमकता आणि प्रसार याचं वावडं नव्हतं, तर गांधी आणि नेहरू यांना भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यवादाइतकाच धोका नाझीझम आणि फॅसिझमचा वाटत होता. बोस यांनी नाझी आणि एक्सिस पॉवरसोबत केलेल्या युतीमुळे गांधीकेंद्रीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीला थेट आव्हान मिळाले होते. या सगळ्या कश्मकशमध्ये हिटलरला भारतीय राजकारणात किती रस होता आणि सूक्ष्मपणे त्याचं निरीक्षण तो करत होता हे सुद्धा हायेस यांनी मांडलं आहे. ब्रिटीशांनी भारतात ज्याप्रकारची साम्राज्यवादी, वसाहती सत्ता स्थापन केली होती तशीच वसाहती सत्ता हिटलरला सोव्हिएत युनियनवर स्थापन करायची होती हा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोस यांना हिटलरने कायमच अंतरावर ठेवलं होतं किंबहुना हिटलरला बोस यांच्यावर विश्वासच नव्हता, असं पुस्तकात दिलेल्या घडामोडी वाचताना वाटत रहातं. हिटलरला बोस याचं भारतीय राजकारणातलं नेमकं मूल्य आणि स्थान आकळलं होतं, जोपर्यंत गांधी नावाची भिंत आडवी आहे, तोवर बोस काही करू शकत नाही याची त्याला खात्री असावी. 

भारतात ब्रिटीश सत्तेला होत असलेला वाढता विरोध रोखण्यासाठी हिटलरने हॅलिफॅक्सला सल्ला दिला होता ‘All you have to do shoot Gandhi. You will be surprised how quickly the trouble will lie down.’ साधारण १९३० पासून बोस हिटलरला भेटण्याचा प्रयत्न करत होते शेवटी २९ मे १९४२ला हिटलर आणि बोस यांची बहुप्रतिक्षीत भेट झाली होती. जरी हिटलरने अफगाणिस्तानमार्गे भारतावर आक्रमण करण्याची योजना आखली होती तरी त्याने प्रत्यक्षात अमलात कधीही आणली नाही किंवा भारताविरुद्ध आक्रमण जाहीर केले नाही. शिवाय भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याला हरवणे जपानचा घास नाही याची त्याला खात्री होती. याच्या उलट मुसोलिनीसोबत बोस यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. इतके की बोस मुसोलिनीला ‘बिग बॉस’ म्हणत असत. हिटलरने बोस यांच्या प्रस्तावावर विचार करावा यासाठी मुसोलिनीने प्रयत्न केले होते. जरी बोस यांचा मुख्य तळ बर्लिन होता तरी त्याचं बरंच काम रोम, इटलीतूनच चालत असावे, असा कयास हायेस मांडतात. 

बोस नाझी जर्मनीत गेल्यामुळे अनेक नैतिक आणि राजनीतिक प्रश्न उभे राहिले होते, त्यात त्यांचे नाझींसोबत कशा प्रकारचा सहयोग होता? त्यासोबत नाझी जर्मनीचे परराष्ट्रधोरण कसे होते यावर प्रश्नचिन्ह बोस यांच्या जर्मनीत स्वागताने उपस्थित झाले. ते भारतातील ब्रिटिशविरोधी प्रयत्नांसंबंधी काय विचार करत होते? या सगळ्यात हिटलरची भूमिका नेमकी काय होती? सर्वात महत्त्वाचे बोस यांनी नाझी जर्मनीसोबत भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे काय परिणाम झाले? त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात समावेश झाला की निव्वळ बोस यांचा विक्षिप्तपणा ठरला? या आणि अशा अनेक कळीच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. अगदी थेट नसली तरी काही उत्तरांचे अंदाज नक्कीच येतात. बोस यांचे १९४१ मध्ये बर्लिनला येणे म्हणजे नाझी सैन्याच्या आक्रमक वृत्तीचा वापर करून भारतावर आक्रमणासाठी उद्युक्त करणे हाच होता. एका साम्राज्यवादी सत्तेचा बिमोड करण्यासाठी दुसऱ्या त्याहून क्रूर साम्राज्यवादी सत्तेची मदत घेणे, असा संधिसाधू विचार बोस यांचा होता मात्र असं करताना त्यांना मूलभूत तात्विक दुविधेचा सामना अर्थात करावाच लागला असणार. मात्र आपलं इस्पित साध्य करण्यासाठी त्यांची कोणत्याही स्तराला जायची तयारी होती हे लक्षात येतं, याचं उदाहरण म्हणजे ब्रिटीशांची भारतातली सत्ता अगदी नाझी सत्तेपेक्षा जास्त क्रूर आहे असं त्यांनी नाझी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. 

‘बोस इन नाझी जर्मनी’ या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांचे दुभंगलेले आणि अविवेकी वाटणारे व्यक्तिमत्त्व समोर येते. त्यांच्या विचारात सातत्य नव्हते तसेच अनेक बाबतीत धरसोड वृत्ती होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात नेमक्या कोणत्या कारणांवरून आणि विचारांवरून भांडण असेल त्याचा बऱ्यापैकी अंदाज या पुस्तकातील घटना, मांडणी वाचून करता येतो. आणि गांधी नावाचा माणूस परत काय होता याचा अचंबा वाटत राहतो. 

‘बोस इन नाझी जर्मनी’

लेखक - रोमेन हायेस

प्रकाशन - रॅण्डम राऊस इंडिया

किंमत - ३९९ रु.

waghnakhe@gmail.com (लेखकाचा संपर्क  : ८९९१०७०९९)

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser