आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्रंथार्थ:रेम्ब्राज रीडिंग : चित्रकाराचं वाचन - संस्कृती आणि समाजाचा आरसा

नितिन भरत वाघ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कलांमध्ये असणारे परस्परसंबंध किती आवश्यक असतात आणि कला माध्यमांना पुढे घेऊन जाण्यासाठी कसे परिणामकारक ठरतात याची नेमकी जाणीव ‘रेम्ब्राज रीडिंग: द आर्टिस्टस् बुकशेल्फ ऑफ अॅन्शिएन्ट पोएट्री अॅन्ड हिस्ट्री’... हे पुस्तक वाचताना होते. कला, वाचनसंस्कृती याची तुलना समाज स्तराची कल्पना कशी देऊ शकते हे वाचत असताना वारंवार जाणवत राहते. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी तसेच चित्रकारांनी तर आवर्जून वाचावे असे हे रोचक पुस्तक आहे.

‘रेम्ब्राज रीडिंग: द आर्टिस्टस् बुकशेल्फ ऑफ अॅन्शिएन्ट पोएट्री अॅन्ड हिस्ट्री’... पुस्तकांच्या जगातल्या भटकंतीत अचानक हाती लागलेलं हे वेगळ्या विषयावरचं पुस्तक. रेम्ब्रा हार्मेन्सझून व्हान रीन हा सतराव्या शतकाच्या सुरुवातीचा एक वेगळ्या धाटणीचा डच चित्रकार. कथात्म चित्र काढण्याच्या बाबतीत अत्यंत गौरवाचे स्थान प्राप्त तसेच लोकांची वेगवेगळ्या मूड्सची चित्रे त्यांच्या ठेवणीसह निर्माण करण्यात कुशल असलेला चित्रकार होता. इतर समकालीन किंवा आधीच्या वास्तववादी चित्रकारांपेक्षा त्याची सौंदर्यदृष्टी अत्यंत भिन्न होती. त्याने कुरुपतेत सौंदर्य शोधले. त्याच्या काळातील चित्रकारांप्रमाणेच त्याचा भर देखील बायबल तसेच मिथकांवर आधारित आणि इतिहासातील काही विशिष्ट घटनांवर चित्रे काढण्यावर त्याचा भर होता. त्याने निवडलेले विषय देखील फारसे लोकप्रिय किंवा जनमान्य नव्हते असे दिसते. त्याच्या बौद्धिक जडणघडणीत तसेच त्याच्या चित्रकलेत त्याच्या वाचनाचा काय प्रभाव होता याचा वेध घेण्याचा प्रयत्न अॅमी गोलाह्नी यांनी केला आहे. या पुस्तकाच्या निमिताने सतराव्या शतकातील चित्रकलेच्या जगात असणाऱ्या वाचन संस्कृतीची परिस्थिती तसेच प्रभाव काय होता, याचा अंदाज करता येतो. चित्रकारांनी फारशा शब्दांच्या मोहात पडू नये मात्र सगळा इतिहास त्यांना चांगल्याप्रकारे माहीत हवा असा काहीसा विरोधाभासी विचार मांडला जातो. मात्र या पुस्तकात कळते की त्या काळातील अनेक देशांनी चित्रकारांसाठी वाचनासाठी स्वतंत्र याद्या बनविल्या होत्या. इटलीमध्ये तर १५८६ पासून अशा पुस्तकांच्या याद्या बनविल्या जात असत. ही गोष्ट आजच्या काळातही विलक्षण वाटणारी आहे.

रेम्ब्रा आपल्या चित्रासाठी इतिहास आणि काव्यातून विषय निवडताना कोणकोणती पुस्तके वाचायचा, त्याच्या वाचनाचा त्याच्या चित्रकलेवर किती प्रभाव पडत होता? या प्रश्नांचा वेध घेणारं हे पुस्तक होय. प्राचीन काव्य आणि इतिहास याचं वाचन रेम्ब्राला त्याच्या कलातील साधारण साहित्याशी जोडून देत होतं. रेम्ब्राची वाचनाची यादी तपासत असताना त्या काळात व्यक्तीची, कलावंताची कला आणि बौद्धिकता तपासण्याचे काय परिमाणे होती हे लक्षात येतं, तसेच रेम्ब्रा कशाप्रकारे मानवी कथांची, कृतींची, भावनिक प्रतिक्रियांची आणि नैतिक भावबंधांची कल्पना कशी करत होता याचा अंदाज हे पुस्तक वाचताना येतो. रेम्ब्राच्या वाचनासोबतच त्याचा ज्या लोकांमध्ये वावर होता त्यात अधिकतर कवी, लेखक होते; त्यांच्या संगतीचा परिणाम त्याच्या कामावर झालेला दिसून येतो. रेम्ब्राच्या वाचनाचा वेध घेताना लेखिकेने दोन पद्धती वापरल्या आहेत : पहिली रेम्ब्राने इतिहास, काव्य आणि मिथकांआधारे काढलेली चित्रे, रेखाटने, मुद्रिते (प्रिंटस्) यांचा अभ्यास करून आणि दुसरी पद्धत उपलब्ध दस्तावेजांवरून, ज्यात रेम्ब्राच्या शेल्फमध्ये प्रत्यक्ष असलेली पुस्तके तसेच असू शकणारी पुस्तके यांच्या अंदाजावरून त्याची वाचनाची यादी बनविली आहे.

या पुस्तकात सतराव्या नेदरलँड्समध्ये वाचन आणि साहित्यविषयक सिद्धांत याचा विचार केलेला आहे. या काळात डच हे यूरोपातील सर्वाधिक साक्षरता दर असणारे लोकं होते. तसेच पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय होता. फिलिप्स व्हॉन झेसेन या जर्मन लेखकाने एक नोंद केली आहे त्यानुसार १६६४ मध्ये अॅमस्टरडॅममध्ये तब्बल ४० प्रकाशक होते आणि मोजता येणार नाहीत इतके पुस्तकविक्रेते आणि पुस्तकबांधणीचा व्यवसाय करणारे लोकं होते. त्यावेळेस केवळ तिथे ५० बेकऱ्या होत्या तर वाईन शॉप फक्त २२ होते. एखाद्या देशाचा एकूण सांस्कृतिक आढावा घेण्यासाठी या नोंदीसुद्धा पुरेशा असतात. त्या काळातील पुस्तकांची नेदरलँड्समधील किती महत्त्वाची भूमिका होती ते लक्षात घेतले तर रेम्ब्राच्या कलेत पुस्तकांचं असणं किती अंगभूत आहे ते अभ्यासता येते. सर्व शिक्षणाचा पाया हा प्राचीन साहित्यातील मानवतावादी दृष्टीकोन होता. हाच दृष्टीकोन थोड्याशा सोप्या स्वरूपात सामान्य लोकांमध्ये प्रसूत होता. या वातावरणामुळे रेम्ब्रा विशिष्ट अशा मानववादी संस्कृतीचा भाग होता हे लक्षात येते. रेम्ब्राच्या सामानाच्या यादीत आणि नोंदींमध्ये एकूण २२ पुस्तकांची नोंद आहे. त्याच्याकडे काय काय होते हे कळण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे ही यादी होय. या चित्रकाराची लायब्ररी ‘रचताना’ लेखिकेने सर्वात आधी कॅल्लो आणि ड्यूरर या चित्रकारांच्या इल्स्ट्रेशनच्या पुस्तकांपासून सुरुवात केली आहे. रेम्ब्राने ज्या पुस्तकांचा आपण आपल्या चित्रकलेच्या विषयांसाठी केला आहे ती, लहान आणि कोणत्याही प्रकारची चित्रे नसलेली पुस्तके आहेत. मात्र रेम्ब्राने आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एकाहून अधिक पुस्तकांचे वाचन केल्याचे दिसून येते. आपल्या चित्रातील आकृत्या निर्माण करण्यासाठी विशेष प्रयास रेम्ब्राने केले आहेत. अभिजात लाटिन भाषेतल्या पुस्तकांची भाषांतरे त्याने वापरलेली दिसतात.

रेम्ब्राची काही चित्रे पाहताना जाणवतं त्याचा आणि वाचनाचा चांगलाच घनिष्ठ संबंध असावा. कारण त्याने वाचन करत असणाऱ्या अनेक लोकांची चित्रे काढली आहेत. तसेच त्याने स्वत:ची पोर्ट्रेट देखील वाचत असतानाची काढलेली आहेत. जरी त्याने वाचनाची चित्र काढली असली तरी त्याच्यासाठी वाचन म्हणजे दैवी शब्दांचे आकलन करून घेणे किंवा एकांतवासाचा आनंद घेणे होते. फिलिपो बाल्डीनुच्चीने रेम्ब्रा पुस्तकं आणि जुन्या चित्रविचित्र वस्तू शोधण्यासाठी कुठे कुठे फिरत असायचा त्याबद्दल लिहिले आहे.

रेम्ब्राच्या वाचनाविषयी आणि चित्रांविषयी बोलताना त्याच्या एका चित्राचा आवर्जून उल्लेख करायला हवा. ते चित्र म्हणजे Judas Returning the 30 Pieces of Silver, 1629. एखाद्या व्यक्तीची भौतिक आणि मानसिक अवस्था चित्रातून किती ताकदीने मांडता येऊ शकते आणि रेम्ब्रा काय चीज आहे, एव्हढं एक चित्रं पाहिलं तरी कळतं. जुडास हा ख्रिस्ती धर्मात तसा मोठा खलनायक म्हणून समजला आणि दाखविला जातो. त्याने फितुरी करून केवळ तीस चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात येशूला पकडून दिले होते. जेव्हा त्याला पश्चात्ताप झाला तेव्हा तो ती नाणी परत करायला गेला होता तेव्हा त्याला माहित होते त्याला क्षमाही केली जाणार नाही आणि काही ऐकूनही घेतले जाणार नाही. फितुरी करणारा जुडास जेव्हढा खरा आहे तेव्हढाच पश्चात्ताप झालेला जुडास खरा आहे. या भावनेतून त्या घटनेचे चित्रं रेम्ब्राने काढलेलं आहे. त्या काळात रेम्ब्राच्या आधी आणि नंतरही कोणी चित्रकार सहसा जुडासच्या वाटेला गेलेला नाही. मात्र रेम्ब्राने केवळ जुडासचं चित्रच काढलं नाही तर त्याच्याकडे सहानुभूतीने आणि क्षमाशीलपणे पाहिले. यात कदाचित दोन घटकांचा प्रभाव असू शकतो, त्यात पहिला म्हणजे रेम्ब्राचे ज्या मानवतावादी विचारांवर पोषण झाले होते तो आणि दुसरा थोडा असंबद्ध वाटू शकतो, तो म्हणजे जुडासचं लायब्ररीयन असणं. ज्या विषयांना इतर चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे आणले नाही, त्या विषयांना रेम्ब्राने आपल्या चित्रांमध्ये जागा दिली. बहुत करून त्याने लोकप्रिय विषय टाळलेले दिसतात. त्याच्यात असलेला हा वेगळेपणा समजून घेण्यासाठी रेम्ब्राचे वाचन आणि त्याचे स्वत:चे आकलन कसे कारणीभूत आहे, याचा थोडक्यात परामर्श सदर पुस्तक घेते. अर्थात या सगळ्या विवेचनात रेम्ब्राच्या चित्रांची वैशिष्ट्ये तसेच ड्यूरर सारख्या तो अभ्यासत असलेल्या चित्रकाराचा त्याच्यावर झालेला परिणाम याचा देखील व्यवस्थित विचार या पुस्तकात आहे.

चित्रकार आणि त्याचं वाचन यातील संबंध किती परिणामकारक असतो हे यात स्पष्ट होते. सोबत एक कलावंत घडत असताना त्याच्यासोबत असलेला देश आणि समाज काय भूमिका पार पाडत असतो हे सुद्धा या पुस्तकाच्या निमित्ताने कळते. त्यासाठी लेखिकेने काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रकारांच्या शेल्फवर असलेली पुस्तकांची यादी दिलेली आहे. विविध कलांमध्ये असणारे परस्परसंबंध किती आवश्यक असतात आणि कला माध्यमांना पुढे घेऊन जाण्यासाठी कसे परिणामकारक ठरतात याची नेमकी जाणीव हे पुस्तक वाचताना होते. कला, वाचनसंस्कृती याची तुलना समाज स्तराची कल्पना कशी देऊ शकते हे वाचत असताना वारंवार जाणवत राहते. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी तसेच चित्रकारांनी तर आवर्जून वाचावे असे हे रोचक पुस्तक आहे.

‘रेम्ब्राज रीडिंग: द आर्टिस्टस् बुकशेल्फ ऑफ अॅन्शिएन्ट पोएट्री अॅन्ड हिस्ट्री’...

लेखक - अॅमी गोलाह्नी

प्रकाशक - अॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे - २९६

waghnakhe@gmail.com

(लेखकाचा संपर्क : ८९९१०७०९९)